फेब्रुवारी महिना जसा सुरु झाला तसं या महिन्यामधल्या आऊटिंगचा विचार मनात घोळत होता. आणि शनिवार रविवार असं रायगड, पाली, असा प्लान ठरला. पण या वेळी बाईक वर जायचं असा मनात येत होतं आणि मग शेवटी तोच बेत केला.
शनिवारी पहाटे ६.३० वाजता पौड रोड वरून चांदणी चौक, ताम्हिणी, निजामपूर या रोड ने जायचं ठरवलं. या मार्गाने पहिल्यांदाच जात असल्यामुळे थोडी माहिती काढून ठेवली होतीच. थंडी तशी ओसरू लागली असली तरी पहाटे मात्र चांगलाच गारवा जाणवत होता. पिरंगुट ओलांडून पौड पर्यंत आलो. इकडे थंडी जरा जास्तच होती. मुळशी ओलांडून ताम्हिणी च्या रस्त्याला लागल्यावर मात्र मन नेहमी प्रमाणेच हरवून गेलं.
पूर्वेला सूर्य अजून उगवत होता. रस्त्याच्या आजूबाजूला मधेच एखादं घर झोपेतून जागं होत होतं. आणि त्याची खूण म्हणून छपरातून जणू काही ढग बाहेर सोडत होतं. काही ठिकाणी पाणी तापवण्यासाठी पेटवलेल्या बम्बातून येणारा धूर तसाच वर साचून राहिला होता, आणि तो ढगासारखा भासत होता. डोंगराच्या कुशीत लपलेली घरं पाहून त्यांचा हेवा वाटत होता. ती सर्व घरं खरं अर्थाने निवारा वाटत होती.
ताम्हीनीतून तसाच पुढे निजामपूर च्या दिशेने निघालो. मध्ये विले भागडचा MIDC लागलं. भागड वरून निजामपूर आणि मग माणगाव असं सरळ रोड आहे. रस्ता अतिशय सुंदर आहे. इथे सुंदर म्हणजे रस्त्याच्या सद्य परिस्थिती बद्दल बोलत आहे. साधारण २ तासा मध्ये माणगावला पोहोचलो. इथून पुढे NH 17 वरून सरळ महाड पर्यंत जातं येतं. निजामपूर वरून पाचोड ला सुद्धा जातं येतं पण त्या रोड बद्दल माहिती नसल्या मुळे माणगाव वरूनच आलो.महाड ला पोहोचल्यावर रायगड रोड ने सरळ रायगड पर्यंत पोचता येतं. साधारण ३.१५ तासा मध्ये रायगड ला पोहोचलो.
रात्री तिथेच मुक्काम करायचं असल्यामुळे आधीच रुम बुकिंग करून ठेवलं होतं. तिथे थोडं फ्रेश होऊन साधारण ११.४५ ला रोपवे चा बुकिंग केलं . हा रोपवे Jog Engineering Limited ने १९९४ मध्ये बांधायला सुरु केला आणि १९९६ मध्ये तो बांधून पूर्ण झाला. मी पहिल्यांदाच रोपवे मध्ये बसत असल्यमुळे मनात प्रचंड उत्सुकता होती. परदेशात जाऊन तिथल्या गोष्टींचा माणस किती कौतुक करतात आणि आपल्या देशात आणि तेहि महाराष्ट्रात असलेल्या या आणि इतर अनेक गोष्टी आपण किती सहज उडवून लावतो किवा दुर्लक्षित करतो याचं नवल वाटलं. ७६० मिटर चा तो रोपवे पाहून Engineering च्या कौशल्याला खरंच दाद द्यायला होत होतं. आणि हा रायगड सारख्या किल्ल्यावर आहे याचंही कौतुक वाटत होतं.
१६७४ मध्ये शिवाजी महाराजांनी रायगडला स्वराज्याची राजधानी केलं. आणि तेव्हा पासून रायगड इतिहासाचा साक्षीदार म्हणून उभा आहे. अशा या पावन गडावर ठिकठिकाणी स्वराज्याच्या खुणा दिसून येतात आणि त्या काळातील पुढारलेल्या संस्कृतीची जाणीव होते. अतिशय योजनाबद्ध अशी गडाची बांधणी आणि अगदी सूक्ष्म गोष्टीमधेही दिसणारी शिस्ताबद्धता पाहून भारून जायला होतं.
राणी महाल, दरबार, मेणा दरवाजा जेथून जिजाऊ येऊन किल्ल्य्वर पहाणी करून जायच्या, जगदीश्वर मंदिर ,पालखी दरवाजा ,बाजारपेठ ,महादरवाजा अशा अनेक गोष्टी आपल्याला भूतकाळ समोर उभा करतात. बाजारापेठेतील दुकानांची रचना पाहून तर फार नवल वाटतं. दुकानाच्या मागच्या भागात सामानाची साठवणूक करायची खोली, पुढच्या भागात विक्रीचा उंचवटा, हे सगळं पाहून त्या काळातही किती विचार करून रचना केली जायची हे सिद्ध होतं.
नगारखान्याच्या दरवाजासमोर चा acoustic design पाहून थक्क व्हयला होतं. २०० फुट अंतरावरचा हळू आवाजात बोललेलं महाराजांच्या पुतळ्यासमोर उभा राहुन अगदी स्पष्ट ऐकू येतं. दरबाराची शिस्त किती कडक होती हे या वरून दिसून येतं.
टकमक टोक , हिरकणीचा बुरुज यांच्या अख्ख्यिका तर इतिहासात अजून कित्येक वर्ष ऐकल्या आणि बोलल्या जातील. आणि सर्व मराठ्यांचं उर अभिमानाने भरून येत राहील. शिवाजी महाराजांचा पावन स्पर्श ज्या भूमीला झाला त्या भूमीला प्रत्येकाने एकदा तरी भेट द्यायलाच हवी यात कुठलीच शंका नाही. महाराजांच्या समाधी समोर नतमस्तक होऊन प्रत्येकाने त्या राजाला मनोमन मुजरा केल्याशिवाय राहवत नाही हेच खरं. सर्व गड पाहून मन भारावून जातं.
साधारण ६ वाजण्याच्या सुमारास परतीच्या वाटेला लागलो. राहण्याची सोय पायथ्याशी असल्यमुळे गडावरून खाली उतरणं गरजेचंच होतं. म्हणून मनात नसतानाही खाली आलो.
साधारण ७.३० वाजताच गाव झोपी गेलं आणि एक गुढ अशी शांतता पसरली. शहरात कधीच न अनुभवता येणारी ती शांतता इथे मात्र रोजच वास्तव्याला असते हे पाहून आपल्या छोटेपणाची पुन्हा एकदा जाणीव झाली. आकाशात चांदण्या चमकत होत्या, आणि चंद्र आपला पांढरा प्रकाश गडावर पांघरत होता. रात्रीच्या मिट्ट काळोखातही गड मात्र अतिशय निडर आणि सुंदर भासत होता.
पहाटे ६.३०ला मला जाग आली. बाहेर येऊन पहिल तर गडामागून सूर्य किरणे दिसू लागली होती. आणि पुन्हा नव्या पहाटेचं स्वागत करायला पाखरं गाणी गात होती. मागे असलेल्या विहिरवर पुन्हा मोट फिरत होती.
९.३० वाजता रायगडावरून निघालो . पाचोड गावात आल्यावर पाली साठी रस्त्याची चौकशी केली. गावकऱ्यांनी महाडला न जाता सरळ समोरच्या रस्त्याने जायला सुचवले. थोडा रस्ता मध्ये खराब आहे पण गाडी जाते असंही सांगितलं. त्या प्रमाणे निघालो. सुरुवातीला बरा असलेला रस्ता हळूहळू आपला रूप बदलायला लागला. मध्ये छोटी छोटी गावं, वाड्या लागत होत्या. थोड्या वेळाने पूर्ण दगडाचा कच्चा रस्ता सुरु झाला. लाल माती आणि खडक या मधून बाईक चालवताना दमछक होत होती. थोड्या वेळात खराब रस्ता संपला. आणि चांगला रस्ता सुरु झाला. गुगल च्या map वर नसणारा हा रस्ता मात्र मला एक वेगळाच अनुभव देयुन गेला. आजूबाजूला गर्द झाडी, त्या मधून गेलेला रस्ता, पसरलेले डोंगर, आणि दूरदूर माणसांचा अगदी सूक्ष्म अस्तित्व हे फार सुखावणार होतं. साधारण तीन डोंगर पार केल्यावर आम्ही माणगावच्या दिशेला लागलो. थोड्याच वेळात माणगाव आलं आणि आम्ही पुन्हा NH 17 ला लागलो.
NH 17 वर साधारण ४० K.M. सरळ गेल्यावर कोलाड च्या जवळ पालीला जाण्यासाठी फाटा लागतो. तिथून पाली ८ K.M आहे. १२ वाजता पालीला पोहोचलो. गणपतीचा दर्शन घेऊन महाप्रसाद घेतला. थोडा वेळ मंदिरात बसून मग परतीचा प्रवास सुरु केला. पाली वरून खोपोली आणि मग खंडाळा, लोणावळा आणि मग वाकड मार्गे पुन्हा पौड रोडला पोहोचलो.
साधारण ३६० K.M च्या या प्रवासात मात्र पुन्हा एकदा काही नवीन गोष्टी गवसल्या. आणि नेहमीची वहिवाट सोडून कधीतरी नव्या वाटा शोधल्या पाहिजेत हे जाणवलं, कारण नव्या वाटाच नवं बळ देत असतात काहीतरी न अनुभवलेलं अनुभवायला. पण समोर येईल ये स्वीकारण्याची मनाची मात्र तयारी हवी हे मात्र खरं. शेवटी प्रत्येक प्रवास हा काहीतरी शिकवतच असतो मग तो दूरचा असो नाहीतर जवळचा. याच विचाराने पुढचा प्रवासाचा बेत आखण्याची उर्मी दिली हीच कदाचित या वेळच्या प्रवासाने दिलेली भेट होती.
....आनंद