Powered By Blogger

Saturday, April 30, 2016

कोकणातलं घर

कोकणातलं कौलारू घर. पावसात चिंब भिजलेल. अर्थात आजूबाजूने माडाच्या झाडांनी वेढलेलं. पावसाच्या थेंबाना त्या हिरव्या गालिच्यावर झेप घेऊन मग हळुवार घसरत जमिनीवर पडाव लागत होतं. समोर अर्ध गोल अंगण मध्ये तुळस आणि कोपऱ्याला एका झाडाच्या बुंध्या पासून सुरु झालेलं कुंपण . अंगणाला झाडाच्या काटक्यांचा खरतर उगाचच केलेलं वाटावं असा ते कुंपण तरीही सुबक आणि नेटकं त्याच्या बाजूला मात्र दगडी भिंत एकसारख्या दिसणाऱ्या तपकिरी रंगाची.
कोपऱ्यात फुलझाडाची वसाहत आणि त्याला आलेली गुलाब ,झेंडू ची फुले .
पारिजात मात्र वेगळा उभा , त्याच्या फुलांचा सडाही खालीच पडेल याचीही त्याने काळजी घेतली असावी असे वाटेल इतका असा त्याचा आटोपशीर पसारा. मागं एका छताखाली नारळ रचून ठेवलेले. त्याच्या पलीकडे पाण्याचा बंब.
लाल मातीच्या रंगाने उठून दिसणाऱ्या ओल्या पायवाटा आणि त्यातून वाहणारे पाण्याचे ओघळ.  परसाला एक जुना आड. हाताने ओढता येईल अशा मोटेचा. त्याच्या ओल्या काळ्या दगडाचा रंगही डोळ्यात भरेल असा दाट. काजू बदामाच्या झाडांची रेलचेल आणि आपापसात चाललेली कुजबूज.

कित्येक पावसाळे पाहिलेल्या त्या घराला हा पावसाळही नवीन नव्हताच.  पाऊस काय हे माणसाने कोकणात अनुभवाव. कौलांवरून टिपटिप पडणारे थेंब इतके तालात पडत होते कि त्याचंच गाणं व्हावं. ओसरीवर झोपाळा आणि त्याच्या जाड साखळ्या जणू  काही वाड्याच वय सांगणाऱ्या. तिथेच एक जुनी खुर्ची अर्थात डुलणारी.
हवेत गारवा आणि मधेच येणारी वाऱ्याची झुळुक. समुद्रही तसा फार लांब नसल्याने त्याच्या लाटांचाही दूरवरून  येणारा आवाज.
घराच्या आत मात्र तशी उब, कोपर्यातल्या चुलीच्या धुराने धूसर झालेली आतली दारे आणि जिने. कोपऱ्यात पिवळा 40 वॅट चा दिवा. त्याचा प्रकाशही उबदार .सारवलेली जमीन. सुरकुत्या पडलेली म्हातारी दारे,  त्याच्या वर चाहूल देणाऱ्या कड्या आणि तरीही त्यांना धरून राहिलेल्या जुन्या चौकटी.
वय वाढलं तरी आधार देणाऱ्या.
घराचे उंबरे सुद्धा नुसते फक्त म्हणायला झिजलेले अनेक जण अडखळले, अनेकांनी ओलांडलं, सणासुदीचं सजवलं, कुणीतरी  कित्येकदा तिथेच वाट पाहत उभं राहिलं, पण तरीही झीज काळाचीच झाली उंबरे अजूनही तेवढेच भक्कम.
गावाच्या एकबाजूला समुद्र तर दुसऱ्या बाजूला नदी. पाण्याचा असा दुहेरी योगायोग. नदी वळसा घेऊन समुद्राला मिळणारी.
कित्येक पिढ्या पाहिलेल्या या घराला पिढीजात मिळालेला वारसा आणि घरही घरातलं एक सदस्य आहे अशा तऱ्हेने त्याच्या विषयी बोलणारी माणसे.

जेव्हा सकाळ पासून बरसणाऱ्या धारा थांबल्या तेव्हा हलकेच पानावरुन ओघळणारे थेंब आनंदाने उड्या मारून खालच्या डबक्यात पडू लागले. नदी लाल मातीच्या पाण्याने वाहू लागली होती. वातावरण तरल शुद्ध आणि ताजं झालं होतं. घर पुन्हा गलबलून गेलं ,जागं झालं, चुलीवर चहा टाकला गेला ,ओसरी वर घरातली मोठी माणसं बसली.
कुणी छत्री घेऊन गावात निघालं कुणी उगाच पारावर गप्पा मारायला तर कुणी समुद्राला आलेलं उधाण पाहायला.
घर तिथंच होतं, सारं पाहत होतं, तृप्त होत होतं. जमीन आकाश पाऊस ऊन माड, या त्याच्या साथीदारांबरोबर वेळ घालवण्यात मग्न. छतातून निघणारा धूर बाहेर आकाशात लुप्त होत होता.
पाऊस पुन्हा नुकताच सुरु झाला होता.पहिल्याच पावसाने घर मात्र आनंदलं होतं...!

कोकणातल्या घरांना ओढ असते ती फक्त माणसांची, नव्या जुन्या सगळ्याला आपलं करणारी हि घरं माझ्या साठी नेहमीच खूप जिव्हाळ्याचा विषय राहिली आहेत, कधी भाताच्या शेता शेजारी तर कधी डोंगर पायथ्याशी तर कधी समुद्राच्या कुशीत वसलेली कोकणी घरं मनाच्या आत घर करतात.साधं सरळ पण आखीव रेखीव कसं जगावं हे दाखवतानाच त्यातल्या खऱ्या आनंदाची ओळख ती पटवतात. बदलणाऱ्या काळात ती मात्र तशीच आहेत आपली ओळख टिकवत आणि जोडलेली नाती जपत...!

आनंद
30 एप्रिल 2016

(ब्लॉग वरील छाया चित्रे माझी नसून ती ज्यांची आहेत त्यांना आभार )

3 comments:

  1. Anand apratim lihilsys.. mala alibagchi aathvan ali 😥

    ReplyDelete
  2. वा!!!मअप्रतिम .जणू काही कोकण सफारीच..awesome.

    ReplyDelete