Powered By Blogger

Monday, February 27, 2012

पहिलं प्रेम


एकंदरीतच प्रेम या विषयावर लिहावं आणि त्यात पुन्हा पाहिलं प्रेम यावर लिहावं असं वाटण्यामागे खरतर माझ्या मनाच्या अंत: प्रेरणेला व्यक्त होण्यास भाग पाडणाऱ्या ३ गोष्टी त्या म्हणजे मिलिंद बोकील यांच्या कादंबरीवर आधारित “शाळा” हा चित्रपट, वि.स. खांडेकर यांचं “पहिलं प्रेम” हे पुस्तक आणि फार उत्तम नसला तरी परवा पाहिलेला “एक दिवाना था” हा हिंदी चित्रपट. या तिन्ही गोष्टी प्रेम या विषयाभोवती फिरणाऱ्या असल्या तरीही तिन्ही गोष्टी स्वतंत्र पणे प्रेमावर भाष्य करतात आणि आपल्याला विचार करायला भाग पाडतात.

प्रेम हा विषयाच मुळात फार वादाचा होऊ शकतो जर आपण त्याला समाजाच्या, कुटुंबाच्या आणि परंपरेच्या चौकटीत बसवून मोजू पाहिलं आणि इतर नात्यात लावतो ते निकष लावू लागलो तर. कुणाच्या मनात कधी कुणाबद्दल प्रेम वाटू शकत हे कळणं खरंच खूप अवघड असलं तरीही ते वाटल्यावर  आणि जाणवल्यावर उमटणारी प्रत्येकाची प्रतिक्रिया ही मला जास्त महत्वाची वाटते. यात महत्वाची आणखी एक बाब असते ती म्हणजे ज्या वयात हा अनुभव एखाद्याला येतो ते वय.    

“शाळा” मधलं १५-१६ या अजाणत्या आणि कोवळ्या वयातलं प्रेम मला जास्त भावलं ते कदाचित याच कारणामुळे. आयुष्याच्या त्या टप्प्यावर निदान ६०-७० % लोकांना तरी हा हुरहूर लावणारा आणि मनाला भूल घालणारा अनुभव एकदा का होईना आलेला असतोच. मात्र बऱ्याचदा तो अव्यक्त राहतो ,नाहीतर ही काहीतरी फार मोठी भयंकर गोष्ट आहे आणि त्या पासून आपण दूर राहिलेलं चांगलं असं वाटून त्या बद्दल काही बोललं जात नाही. असं वाटण्यामागे शाररिक आकर्षण किती आहे आणि आपल्याला ती व्यक्ती खरंच “का” आवडते हे त्या वयात पडताळल जात नाही किंबहुना ते कळतच नाही. काहीतरी वेगळं वाटतंय आणि आजूबाजूला सुद्धा असंच वाटणारी आपल्या सारखीच मुलं मुली आहेत असं वाटून फक्त ती भावना अनुभवली जाते. 

 
शाळा मधली मुख्य पात्रे जोश्या (मुकुंद) आणि शिरोडकर यांच्यातल्या हळुवार प्रेमाचं साक्षीदार होताना आपण नकळत त्या जागी स्वतःला पाहू लागतो. अशावेळी माझ्या समोर येतो तो संथ पणे स्वतःत हरवून वाहणारा एखादा नदीचा प्रवाह. हा प्रवाह मला प्रत्येकाच्या आयुष्याचा द्योतक वाटतो. त्या प्रवाहात एखादा दगड पडावा आणि पाण्यावर असंख्य लहरी उठाव्यात म्हणजेच प्रेमाची भावना असावी. कोवळ्या वयात मनात उठणारे हवेहवेसे तरंग आपल्याला आवडणाऱ्या व्यक्ती साठी खूप साऱ्या असाध्य गोष्टी घडवून आणतात. शिरोडकर ला नुसता पाहत बसणारा जोश्या भावून जातो तो त्याच मुळे. रस्त्यात वाट पाहत उभं राहून ती येताच भांबावून जाणारा आणि आता आपण पुढे काय करायचं असा निरागस प्रश्न तिला विचारणारा जोश्या खरोखर त्या वयात प्रत्येकाला पडलेला अव्यक्त प्रश्न टाकतो हे जाणवतं. 
अजाणत्या वयातल्या या प्रेमाला नक्की कुठल्या पठडीत मोडता येत नाही. पण हेच पहिलं प्रेम किंवा मनात उमटलेली ही भावना पुढे जाऊन बऱ्याचदा हरवून जाते किंवा हातातून निसटून जाते. वय कमी असल्यामुळे कदाचित नक्की काय हरवलय हे उमजत नाही पण शेवटी काळ तारक ठरतो आणि पाहिलं प्रेम विस्मृतीत जातं. वय वाढतं , समज येत जाते, मात्र मनाच्या कोपऱ्यात असलेलं पहिल्या प्रेमाचं छोटंसं अस्तित्व मधून मधून डोकं वर काढत राहता. अर्थात या मुळे कुठे काही अडत नाही, किंवा दुसऱ्या कुणावर प्रेम करताच येत नाही असं सुद्धा होत नाही. पण दुसरं प्रेम मिळालं तरीही पहिल्या प्रेमाची जागा ते घेऊ शकत नाही अशी मनाची समजूत झालेली असते. 
नेमक्या याच वेळी माझ्या वाचनात आलेल्या वि.स. खांडेकरांच्या “पहिलं प्रेम“ या पुस्तकाने मला आणि खूप जणांना पडलेल्या प्रश्नांना एक नवा विचार नक्कीच दिला. त्यांचे विचार जसेच्यातसे इथे देण्यामागेही हाच उद्देश आहे कि जेणेकरून त्यातला नेमका विचार सगळ्यांपर्यंत पोहोचावा.
पुस्तकाच्या प्रस्तावनेत वि.स. खांडेकर म्हणतात “ पहिलं प्रेम स्वप्नाळू असते, पण खोटे नसते, स्त्री पुरुषांच्या प्रेमात शारीरिक आकर्षणाचा जो मोठा भाग असतो, तो मान्य करायला तरुण मनाची बहुदा तयारी नसते. काव्यातल्या कल्पनांनी भारून गेलेल्या तरुण दृष्टीला पहिले प्रेम हे दिव्य, स्वर्गीय, अतुल आणि अनुपम वाटावे, यात अस्वाभाविक असे काहीच नाही. काव्य आणि काळा चष्मा यांचे साम्य कुणालाही आवडले नाही तरी व्यवहारात ते पदोपदी अनुभवाला येते. डोळ्यांवर काळा चष्मा घालून उन्हाकडे पाहणाराला त्याची तीव्रता जशी जाणवत नाही, त्या प्रमाणे काव्य दृष्टीने जगाकडे पाहणारालाही खाचखळग्यांची जाणीव होत नाही.”
“ऐन विशीत तरुणांच्या अंत:करणात भावनेला सहज प्रवेश मिळतो, विचारला विशेषत: कुठल्याही भावनेची चिरफाड करणाऱ्या विचाराला – तिथे सहसा जागा मिळत नाही. दाट धुक्यातून दगड धोंड्यानी भरलेला डोंगर सुद्धा सुंदर दिसू लागतो, हा कुणाला अनुभव नाही ? तरुणांच्या भावनाकुल दृष्टीला पहिले प्रेम तसेच मोहक दिसते. शारीरिक आकर्षणाचा पहिलावहिला उन्मादक अनुभव ज्या व्यक्तीमुळे आपल्याला मिळतो, तिच्याविषयी मनाला विलक्षण आसक्ती वाटावी हे नैसर्गिकच आहे; पण या आसक्तीत नाविण्यामुळे आवडणाऱ्या अनुभवाचा भाग किती आणि जीवनाला पोषक अशा इतर अनुभवाचा भाग किती याचे पृत्थ्करण केले, तर – प्रेम आणि रसायन शाळा ...! छे नकोच ती भानगड..! “ 


हे वाचून मला खरंच असं वाटू लागलं कि जो पहिला अनुभव आपल्या मनाच्या तारा छेडतो त्याच्या विषयी आकर्षण वाटणं आणि तो पुन्हा पुन्हा अनुभवावा वाटणं यात खरंतर काहीच चूक नाही. फक्त त्यातल्या आसक्ती मधली नाविन्याची भावना जर जास्त वरचढ असेल तर मात्र त्यातल्या प्रेमाच्या भावनेला पडताळून पाहणं गरजेचं आहे.
  
प्रेमातल्या शारीरिक आकर्षणाला नाकारणं हे मला फार चुकीचं वाटतं, “एक दिवाना था “ या चित्रपटातला नायक प्रथम दर्शनीच नायिकेच्या प्रेमात पडतो. त्या नंतर तो फक्त नायिकेला पुन्हापुन्हा पाहण्यासाठी धडपड करत राहतो. त्याच ओघात एका अनावर क्षणी तो सरळ स्वतःच्या प्रेमाबद्दल नायिकेला बोलतो. आपण केलेल्या चुकीची जाणीव होऊन तो नंतर तिची माफी मागतो. नायिका स्वतःपेक्षा मोठी असूनही त्याला त्या बद्दल काहीही वाटत नाही. प्रेमात पूर्णपणे आकंठ बुडालेला असल्याने त्याला दुसरी कुठलीही गोष्ट सुचत नाही.
नायिकेला फारसं ओळखत नसूनही तिच्या साठी वेडा होणारा नायक आपल्याला अनेक चित्रपटातून दिसत असतो. मग प्रश्न पडतो तो नक्की यात प्रेम किती आणि शारीरिक आकर्षण किती असतं ? प्रेम ही भावनाच मुळात आकर्षणातून जन्म घेते ही साधी गोष्ट आजच्या तरुण पिढीला का कळू नये. आणि जर हे कळत असेल तरीही प्रेमाला उद्दात्त असं मोठं रूप देण्याचा व्यर्थ प्रयत्न आपण का करायचा ?
महाश्वेतेला पाहताच तिच्या स्पर्श सुखासाठी धडपडणारा आणि ती दृष्टीआड होताच विरहव्याकुळ होऊन प्राण सोडणारा पुंडरीक पहिल्या प्रेमात शरीरप्रेमाचा भाग अधिक असतो याचे मूर्तिमंत उदाहरण नाही का ? स्त्री पुरुषाच्या प्रीतीची पहिली पायरी शारीरिक आकर्षणच आहे. समाजातल्या भ्याड किंवा ढोंगी संकेतांना बळी पडून, तिचे अस्तित्व तरुण पिढीने नाकारणे या गोष्टी अंती अनिष्ट झाल्याशिवाय राहत नाहीत .
प्रेमात समोरच्या व्यक्तीलाही आपल्या बद्दल काय वाटतं हे कितीवेळा लक्षात घेतलं जातं हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा ठरतो. बऱ्याचदा आपल्यावर कुणीतरी जीवापाड प्रेम करत आहे ही भावनाच सुखावणारी असते आणि त्यामुळे आपल्यालाही खरंच त्या व्यक्ती बद्दल तीच भावना आहे कि नाही याकडे बऱ्याचदा  दुर्लक्ष सुद्धा केलं जातं. पण यात नक्की दोष कुणाचा हे ही सांगणं तितकंच अवघड आहे. 
पहिल्या प्रेमाच्या सविस्तर पृथ:करणात खांडेकर म्हणतात “ खरे पहिले तर संक्रमण काळ हा कृतीचा काळ असतो, पण कृती करणाराला भविष्याच्या नजरेला नजर देण्याचा धीर असायला हवा ! आजच्या मध्यमवर्गात कठोर व्यवहारापेक्षा कोमल काव्यावर पिढ्यानपिढ्या ज्यांचे पोषण झाले आहे, अशा पांढरपेशा वर्गात हा धीर अजून निर्माण झालेला नाही. भविष्य काळातल्या कृती पेक्षा भूतकाळातली स्वप्ने त्यांना अधिक जवळची वाटतात.
“पहिल्या प्रेमातल्या काल्पनिक दिव्यात्वाला अथवा आभासात्मक उत्कटतेला भुलून जाऊन आजच्या मध्यमवर्गीय तरुणाने स्वतःचे मानसिक हाल करून घेणे हा एक वेडे पणाच आहे.”

 
खांडेकरांनी केलेलं हे पहिल्या प्रेमाचं वर्णन जितकं मनाला पटते तितकंच मला विफल झालेल्या आणि प्रेमभंग झालेल्या मुलामुलीनी केलेल्या कृतींबद्दल लिहावं वाटतं. प्रेमभंग ही भावना सुद्धा योग्य प्रकारे हाताळली जात नसल्याचं जाणवतं. प्रेमभंग होताच जग नकोसं वाटू लागणं आणि सगळं काही उधळून लावलं जातं. आयुष्यातले मोजके क्षण ज्याच्या बरोबर घालवले ती व्यक्ती आयुष्यातून नाहीशी होणं हा अर्थातच दुख:द अनुभव आहे मात्र ते क्षण म्हणजेच आयुष्य मानून हातपाय गळून बसणं आणि उरलेल्या आयुष्याकडे उदासीनतेने पाहणं हे पूर्ण पणे चुकीचे आहे.
खांडेकर म्हणतात “ प्रेम परिस्थितीमुळे विफल झाले, कि आपल्या आयुष्यातल्या सर्व रस संपला, म्हणून हताश होणे हा मनाचा दुबळेपणा आहे ! प्रेम आणि जीवन यांच्या परस्परसंबंधांकडे पाहण्याचा दृष्टीकोन इतका संकुचित असून चालणार नाही.  प्रेमभंग ही मुठभर हळव्या लोकांच्या बाबतीत जबर जखम ठरते, पण तरुण शरीराची जखम केवढीही मोठी असली, तरी ती लवकर भरून येते; हा नित्याचा अनुभव आहे . तरुण मनालाही तोच नियम लागू करण्याला काय हरकत आहे ? पहिले प्रेम आहे पुष्पासारखे असून ते सुकले, कि मनुष्य प्रेमाला मुकला, या कल्पनेला अनुभवाचा फारच थोडा आधार आहे . गुलाबाच्या दोन पाकळ्या गळून पडल्या, म्हणून काही त्याचा सुवास कमी होत नाही; प्रेमाचेही तसेच आहे. पहिल्या प्रेमातल्या निराशेने मनुष्य उदास होईल ,त्याच्या डोळ्यांवरची काव्याची झापड थोडीफार कमी होईल पण एवढ्या मुळे त्याला पुन्हा प्रेम करावेसे वाटणार नाही आणि केले तरी त्याला पहिल्या प्रेमाची सर येणार नाही या गोष्टी फक्त काव्यात शोभून दिसतात. तरी जीवनात त्यांना अवास्तव महत्व देण्यात अर्थ नाही”.


मला वाटतं आयुष्य कधीच थांबत नाही अनुभव येत राहतात आणि आपण चालत राहतो. एखाद्या वळणावर मुक्काम लांबतो तर एखाद वळण कधी निघून जातं हेच उमजत नाही. प्रेमातही अशी वळणं येत राहतात. माणसाचं मन वेड असतं ते आवडणाऱ्या सगळ्याचं गोष्टीमध्ये गुंतत जातं. हवीहवीशी गोष्ट नाही मिळाली तर निराश होतं, पण त्याला पुन्हा हसरं करणं आणि नव्या वळणावर सोडणं हे आपल्यालाच करावं लागतं. सुखाचा शोध हेच कदाचित प्रत्येकाच्या आयुष्याचं ध्येय असतं. तो शोधताना येणारे सगळेच अनुभव आयुष्य संपन्न करत असतात गरज असते ती फक्त प्रेम आणि मन यांचा योग्य मेळ घालण्याची. कुणी सांगावं एखाद्या अनोळखी अंधाऱ्या वळणावर कुणीतरी तुमची वाट पाहत बसलं असेल आणि तुम्ही मात्र डोळ्यावर काळा चष्मा घालून त्याला शोधत असाल.....! 
तेव्हा तो काळा चष्मा झुगारून देऊन नव्या वाटेकडे वाटचाल करणं यातच खरं आयुष्याचं गमक आहे..! नाही का ...? 
                                                                          ....आनंद