Powered By Blogger

Friday, July 31, 2015

लघुकथा : सांज सर


दुपारची उन्हं आता उतरू लागली होती. पावसाळा सुरु होऊन बरेच दिवस झाले असले तरी म्हणावा तसा पाऊस सुद्धा झाला नव्हता. वारा सुद्धा एकटा पडून कंटाळला असावा म्हणून त्याचाही आवाज हल्ली कमी होता. पण आज मात्र हवा वेगळी होती. पावसाची चाहूल देणाऱ्या त्या हवेला वेगळाच गंध येत होता. पक्षी किलबिल करत असतानाच रस्त्यावरून मातीची धूळ उडवत एखादी गाडी इकडून तिकडे गेली आणि रमा चमकली. अजून तर बाहेर पडायला बराच अवकाश होता पण तिला उगाच उशीर झाल्या सारखं वाटलं. हातातलं काम पुन्हा सुरु करून ती खिडकीतून बाहेर बघत राहिली. तिकडे मंदिरात आरतीची तयारी सुरु होती. वारा पुन्हा पुन्हा कुठून तरी तो पावसाचा गंध घेऊन येत होता. तिन्ही सांजेचे दिवे लवकरच लागणार होते. शेतातली गुरं परतीला लागली होती आणि घुंगराचा आवाज करत आपापल्या गोठ्यात परतत होती. कुठे कट्ट्यावर गप्पांचा फड रंगला होता तर कुठे हापश्यावर बायका बडबड करत होत्या. पोरं लंगडी, गोट्या तर कुठे लपाछपी खेळण्यात मग्न होती.  रमासाठी जसा हा खूप मोठा दिवस तसच रमेश साठीही होता. रमाचं काम संपल आणि तिला संध्याकाळचे वेध लागले. इकडे रमेशचं कपड्याच्या दुकानातलं काम आवरण्याच्या नादात त्याचं लक्ष किती वाजले या कडे नह्व्ताच पण तरीही तो मध्ये मध्ये घड्याळाकडे पाहून सुटकेचे निश्वास टाकत होता.


आता अंधारून यायला लागलं होतं. संधिप्रकाश नाहीसा होऊ लागला होता. काळे ढग जणू काही वरून खाली चाललेली गलबल वरून पाहत होते. पाउस कोसळणार हे तर पक्का झालं होतं. येणाऱ्या पावसाचं स्वागत किलबिल करणारी घरं करत होती. कुठे वाळलेले कपडे काढण्याची, कुठे गोठ्याला पत्रे लावायची, कुठे छप्पर झाकायची तर कुठे गुरांचा चार झाकून ठेवायची गडबड चालू होती.
रमा संधी साधून बाहेर पडली. कुणी पाहत नाही याची खात्री करून तिने मागच्या गल्लीतून सुटका करून घेतली. भरभर पाऊले उचलत ती रानाच्या दिशेने चालली. आजूबाजूचं जग वेगळ्या सप्तकात आणि रमा वेगळ्या वेगळ्याच सुरांवर स्वार होऊन निघाली होती. मनात धडधड असली तरी ती तितकीच खंबीर होती. आपण करतो आहोत ते बरोबरच आहे याची पक्की जाणीव तिला होती.
 तिकडे रमेश कामावरून सुटला होता. घरी जाऊन तो हि काही निमित्त काढून बाहेर पडला. गावाच्या वेशीकडून रानाकडे निघाला. आता आकाश गडगडू लागलं होतं कुठल्याही क्षणी जोराची सर कोसळेल असं वाटत होतं. पडलेल्या मंदिरापाशी रमेश पोहोचला. इकडेतिकडे पाहिलं तर मागेच रमा पाठमोरी उभी असलेली त्याला दिसली. तो त्या दिशेने वळताच तिला त्याची चाहूल लागली. दोघांनी एकमेकांकडे बघून स्मित केलं. पुढच्याच क्षणी दोघे समोरच्या डोंगराकडे चालू लागली होती. झपझप चालणारी पाऊले आणि दारावर येऊन थांबलेला पाउस यांच्यात जणू काही करार झाला होता. अजूनही एकही टिपूस कोसळला नव्हता पण आकाश मात्र गच्च भरलं होतं. हळूहळू डोंगराची चढण आली. आता पूर्ण अंधारून यायला काही क्षण उरले होते. रमेश ने एका झाडाखाली थांबून कंदील पेटवला. आणि दोघे पुन्हा चालू लागली. रमाच्या हातावर हलकेच पाण्याचा एक थेंब कोसळला. ती शहारली पण पुन्हा चालू लागली. आता डोंगर बराच सर झाला होता. थोडं पुढे जाताच गाव नाहीसं होणार होतं आणि पुढची उतरण लागणार होती. तोच वीज कडाडली आणि मेघ गर्जना होऊन ढगाचा बांध फुटला. जोराची सर कोसळली. पश्चिमेला सूर्य मावळलेल्या जागेवर नुसताच पुसटसा प्रकाश दिसत होता. पाण्याने विझवलेल्या दिव्याच्या वाती सारखा  तो हि हळूहळू नाहीसा होणार होता. सांजवेळ असली तरी या सरीने त्या क्षणाला वेगळंच परिमाण दिला होतं. रमा आणि रमेश भिजू लागले. काही पावलांवर डोंगराची चढण संपत होती. दोघांनी एकमेकांकडे पहिला. एव्हाना पानांवरून थेंब जमिनीवर उड्या घेऊ लागले होते. टपटप पडणाऱ्या थेंबानी पणे नाचत होती.


रमा आणि रमेश दोघे आता मुक्त होती. सरीने वातावरण बदलवून टाकलं होतं. एकदाच दाटून आलेला कंठ रमाने गिळून टाकला. घर सोडून आपण रमेश बरोबर पळून आलोय अशी जाणीवच मुळात तिला होत न्हवती. आणि तिकडे रमेश सुद्धा याच विचाराने आनंदी होत होता. सांज वेळेला आलेल्या सरीने संध्याकाळच्या सुस्तीला पार उडवून लावला होतं. अंधार त्या हवेतल्या गार हवेला बिलगला होता. आता सकाळ पर्यंत त्याला साथ मिळाली होती. पाउलवाट ओली झाली होती आणि त्यावरची पाउले कधीच पुसून गेली होती. उद्या नव्या दिवसाची सुरुवात  होणार होती. दोघे आता उतरणीला लागली होती. हातातल्या कंदिलाने वाट दिसत होती. थोड्याच वेळात रस्ता लागला आणि शेवटची सुटणारी बस समोर उभी असलेली दिसली. दोघे आनंदली. खिडकीतून बाहेर बघताना रमा पावसाचे आभार मानत होती. सांज सरीने तिचे अश्रू पुसले होते आणि जगण्याची नवी दिशा दाखवली होती. रमेश ने तिचा हात हातात घेतला तिला हायसं वाटलं.  आता सरलेल्या भूतकाळा पेक्षा येणारा प्रत्येक क्षण तिला नवा विश्वास देत होता.
पाऊस नवे क्षण रुजवतो हेच खरं मग ते काळ्या जमिनीत किवा कोवळ्या मनात , भविष्याची नांदी होते हे मात्र खरं.

आनंद
३१ जुलै २०१५