Powered By Blogger

Sunday, January 31, 2016

पुन:श्च वासोटा





मागच्या वर्षी प्रमाणेच या ही वर्षीचा हा पहिला ट्रेक. वासोटा मुळात त्याच्या नैसर्गिक सौंदर्य मुळे कुणालाही भावेल असा किल्ला आहे आणि त्यामुळेच माझा सगळ्यात आवडता.
30 खूप उत्साही ट्रेकर्स , वय हा एक फक्त आकडा आहे हे सार्थ ठरवणारे सर्वात मोठे काका आणि एक लहानगा चिमुरडा, निसर्ग आणि त्याचं देणं याचा नेमका अर्थ जाणणारे भटके, फोटो मध्ये हे सगळं टिपणारे डोळस फोटोग्राफर, पहिला अनुभव असून केवळ "all it takes is courage" या उक्ती ला खरोखर सार्थ ठरवून मर्यादा शब्दाचीच मर्यादा रुंदावणारे अफाट जीव , या आणि अशा अनेक भन्नाट कारणांमुळेच एकाच दिवशी “नागेश्वर” आणि “वासोटा” अशा दोन्ही ठिकाणांची चढाई यशस्वी रित्या करता आली आणि "Beyond Mountains" च्या या ट्रेक नेही आपलं वेगळेपण यावेळीही जपलं.
रात्रीच पुण्यातून निघून साधारण पहाटे ३ वाजता सगळे बामणोली ला पोहोचलो ,गावातल्या मंदिरात सगळ्यांनी आपल्या स्लीपिंग बैग्स अंथरल्या आणि थंडीत सगळे झोपी गेले.

पहाटे सुरुवात झाली 6 च्या wake up कॉल ने. समोर धुक्यात हरवलेला शिवसागर जलाशय, थंडीत जागं झालेलं गाव, पाण्याचे पेटलेले बंब, नाश्ता करून बोटीची आतुरतेने वाट पाहणारे सगळे लोक, दूरवर दाट झाडीची चादर ओढून बसलेले कोवळ्या उन्हातले डोंगर, पाण्यात डुबकी मारून एखादा मासा पकडणारा पक्षी, एखाद्या चित्रात शोभेल असा आजूबाजूचा परिसर दिसत होता. अर्थात फॉरेस्ट ची परवानगी आणि सोपस्कार उरकून  साधारण 8.35 च्या दरम्यान सगळे बोटीत चढले अन सुरु झाला तो केवळ स्वतःने अनुभवावा आणि ज्याचा त्याने अर्थ लावावा असा एक तरल प्रवास. दूरवर पसरलेल्या हिरव्या रंगांच्या अनेक छटा पाहत असतानाच जणू जगाशी असलेला धागा तोडून एका वेगळ्याच जगात मन नकळत आलं होतं. तासा दिड तासाने आम्ही मेट इंदवली च्या जवळ पोहोचलो, अर्थात यावेळी पाणी कमी असल्यामुळे बोटीने आम्हाला तसं बरंच लांब सोडलं. दूर खुणावणारा वासोटा जुन्या आठवणी ताज्या करत होताच पण त्याचं ते रुपडं अर्थात नेहमी प्रमाणेच केवळ डोळ्याचं पारणं फेडणारे होतं.



मेट इंदवली मधल्या फॉरेस्टच्या ऑफिस जवळ एकत्र जमून सुरु झाला तो आमचा नागेश्वर चा प्रवास. वासोट्याच्या दिशेने थोड चालून आम्ही ओढ्याच्या वाटेला वळलो आणि हे काहीतरी फार भन्नाट असणार आहे याची सगळ्यांची खात्री पटली.

दोन्ही बाजूला घनदाट शब्द अपुरा पडेल इतकं अंगावर येणारं जंगल, ओढ्यात लागणारे पाण्याचे नितळ साठे , सूर्याची लपाछपी खेळणारी किरणे ,मधेच गायब होऊन अचानक कुठल्या फांदीतून डोकावणार आकाश , ओढ्यातले असंख्य दगड त्याच्यावर पाय ठेवून पुढे जाण्याचा आमचा चाललेला खेळ, पावसाच्या पाण्याने उन्मळून पडलेली जुनी झाडे आणि त्यांच्या अवाढव्य फांद्या नि खोडे आणि पक्ष्यांच्या न थांबणारा चिवचिवाट हे सगळं अफाट होतंच पण तितकंच हवाहवासा होतं. नागेश्वर कधी येतं यापेक्षा हे कधी संपु नये अशी वेडी आशा मनाने धरली होती, 


अर्थात असं होणार नव्हतंच आणि आम्ही साधारण 2.30 तासात सगळे नागेश्वर ला पोहोचलो. वरून दिसणारं दृश्य इथपर्यंत येण्याच्या सर्व कसरतीला विसर पाडणारं तर होतंच पण त्याही पेक्षा तिथून दिसणाऱ्या वासोट्याच्या दर्शनाने मनाला त्याच्या दिशेला खेचून घेत होतं. शंकराच्या पिंडीच्या दर्शन घेऊन फार वेळ तिथे न रेंगाळता आम्ही कूच केलं ते वासोट्याकडे.

कड्याच्या काठावरून गेलेल्या पायवाटेने एकामागे एक ओळीने अत्यंत सावधपणे चालत एक एक टेकडी पार होत होती. 
मधेच गवा ,अस्वल यांची विष्ठा त्यांच्या जवळ पास असल्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देत होती. अर्थात दुपारच्या टळटळीत उन्हात त्यांचं दर्शन दुरापास्तच होतं. बराच वेळ उन्हात चालून आम्ही पुन्हा एकदा दाट जंगलात शिरलो आणि अंगावर काटा आणणारी गार वाऱ्याची झुळूक आली. कदाचित वासोट्याला स्पर्शून आलेल्या त्या हवेने आमचं असं स्वागत केलं होतं. वासोटा तसा अजून बराच लांब होत.




जंगल शांत होतं आम्ही एकमेकांना दिलेल्या आरोळ्या शिवाय आता फारसे आवाज नव्हते. सगळ्यांच्याच पोटात भुकेचा डोंब उसळलेला असल्याने जिथे वासोटा आणि नागेश्वर चे मार्ग एकत्र येतात त्या फाट्यावर जेवायचा निर्णय झाला आणि सर्वांनी विसावा घेऊन जेवणावर ताव मारला. घनदाट जंगलाच्या मधोमध गारव्याला ,जसे लोक येतील तसे जेवायला घेतलं. आणि ताव मारून पोट भरेपर्यंत जेवलो. त्यात लिंबू सरबत, कोकम हे जोडीला होतेच. पोट भरून आत्मा शांत झाला आणि आता लक्ष्य होते वासोट्याचे. साधारण २० - २५ मिनिटाची चढण चढून वासोट्याला सगळे पोहोचले आणि वरून दिसणाऱ्या दृश्याने डोळ्याचं पारणं फेडलं. दूरवर दिसणारा शिवसागर जलाशय, हिरव्या रंगांच्या असंख्य छटा, बाबुकडा आणि तिथून दिसणारा जुना वासोटा, मागे नागेश्वर च्या गुहा हे सगळं भारावणार होतं.

निसर्ग आणि त्याची हि रूपं ,अनेक ठिकाणी दिसतात, पण इथे दिसतं ते त्याचं नितळ रूप, कुठल्याही पडद्याशिवाय. आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीशी एकरूप झालेला निसर्ग खूप काही सांगून जातो. जंगलातल्या पायवाटेवर पडलेल्या वाळलेल्या पानांवर दव पडून आलेली ओल आणि त्यामुळे त्यांच्यावर पाय पडून होणाऱ्या आवाजाला आलेली मर्यादा हि केवळ निसर्गाने तिथल्या शांततेला अबाधित राखण्याची केलेली सोय आहे असं वाटत राहता. चालता चालता अचानक वळणारी पायवाट आणि तिलाच लागून असलेली एखादी गायब होणारी पायवाट या जंगलातल्या गूढतेची प्रतिक आहेत. 
म्हणूनच जंगल मला एक जिवंत पोट्रेट वाटतं खूप हळुवार पणे त्यातले रंग बदलतात, आकार बदलतात, जुन्या झाडांची जागा नवी खोडं घेतात , विळखा घालणारे वेळ कधी नाहीसे होतात तर कधी उंच चढत जातात आणि मुळात हे सगळं इतकं आपसूक होत असतं कि एखादी जादू वाटावी. खूप विचार केला कि कळत कि याला सगळ्याला कारणीभूत एकाच गोष्ट असते आणि ती म्हणजे “सहजता”. निसर्गात तेवढी एकाच गोष्ट शाश्वत आहे , बदल स्वीकारत निसर्ग पुढे जात राहतो आणि ते हि मागे राहिलेल्या भूतकाळाला न कवटाळता आणि म्हणूनच तो सहजता जोपासू शकतो. होणारा बदल चांगला वाईट असं नसून तो स्वीकारत पुढे जाण्यात निसर्ग जास्त वाकबगार असतो.

सूर्य मावळत असताना आणि जंगलात अंधार हळूहळू डोकावतानाच आम्ही सगळे खाली पोहोचलो आणि बोटीचा प्रवास सुरु झाला. मागे वासोटा सूर्याला झाकून स्वतः हि अंधारात लुप्त होऊ लागला होता. माणसांच्या भौतिक जगातला दिवस संपला होता, जंगल मात्र जागं होत होतं. दरवेळी वासोटा सोडताना वाटतं तसेच विचार मनात गर्दी करत होते. सायंकाळच्या वेळेला मनाला येणारी अस्वस्थता टाळता येण्याजोगी नव्हतीच. सकाळी जगाशी तोडलेला धागा आता पुन्हा जोडला जाणार होता, काळ्या मिट्ट अंधारात बोट किनाऱ्याला आली. पाउल जमिनीवर पडलं आणि धागा पुन्हा जुळला. मन मात्र भरलेलं होतं ते वासोट्याच्या अजून एका भेटीच्या आठवणीने आणि तो अनुभव मागच्या अनुभवांसारखाच चिरकाल टिकणारा होता यात शकाच नव्हती.

   





आनंद
१८ जानेवारी २०१६