Powered By Blogger

Tuesday, November 30, 2010

पाडगांवकरांची मला आवडलेली एक कविता.


"
व्यथा"

तुज कधीच नाही कळले, नाही कळले
मी तुझ्याचसाठी किती किती तळमळले!

पण कसे कळावे? तेव्हा अभिमानाने
भांडले,तंडले,फणफणलें क्रोधानें
काटेरी उधळुनी शब्द परतलें मागें
ते घडलें सारे..... सारे अंधपणानें!

पण खरेच नव्हते तसले काहि मनांत
जे होऊनी अग्नी धगधगलें शब्दांत
जातांना भिडली नजर तुझ्या नजरेला
मी व्यथा पाहिली भिजलेली तेजांत!

का खरीच होती माझी तुजवर प्रीत?
कां अशी वागले? कुठली असली रीत?
अपुल्य़ाशी केले मीच समर्थन माझे
अन म्हटले जुळवीन पुन्हा नवीनच गीत

त्या गीताचे पण सूर कधीच न जुळले
मी ज्योत व्यथेची होऊनी जळले, जळले
मी म्हटले विसरुनी जाईन सारे सारे
तुज सांगु कसे रे मलाच मी किती छळले!

वाटले कितीकदा पुन्हा तुजकडे यावे
अन मिठीत तुझिया माझेपण विसरावें
वाटले कितीकदा मिटून अलगद डोळे
रे तुझ्या प्रीतिच्या आवेगांत बुडावे !

ओसरला अवचित कलह मनांतील सारा
अन विरला क्षणी त्या अभिमानाचा पारा
उगवला मनाच्या निर्मळ क्षितिजावरती
कोवळी शुभ्रता शिंपित हसरा तारा !

मी तशीच उठले... होता जरि अंधार...
काढियला अडसर आणि उघडिले दार
का फसविती डोळें? तूच उभा दाराशी...
मी कोसळलें... घेऊन तुझा आधार !

शिर खुपसुनि वक्षीं स्फुंदुनी स्फुंदुनी रडलें,
मी वादळातल्या फुलापरी थरथरलें
"
या चरणांपाशी मीच निघालें होतें-"
वाटलें म्हणावें- परंतु शब्द न फुटलें !