Powered By Blogger

Tuesday, December 31, 2013

The Happiness




आज ३१ डिसेंबर. २०१३ वर्ष संपतंय. सरल्या वर्षात इतक्या काही नवीन अनुभवांनी आयुष्याला नवीन अर्थ दिले, काहींनी पुन्हा जुने रस्ते दाखवले तर काहींनी भविष्याची वेगळीच ओळख करून दिली, काहींनी नात्यांना नवे अर्थ दिले तर काहींनी जड झालेले पाश तोडायला मदत केली. काहींनी आयुष्य सार्थकी करणारे क्षण पुन्हा दिले तर काहींनी झालेल्या चुकांची कबुली द्यायला भाग पाडलं.
इतकं सगळं असलं तरी सरलेल वर्ष खूप अर्थी भन्नाट होतं. वर्षभरातल्या साधारण १५००० किमी च्या वेगवेगळ्या ठिकाणच्या प्रवासात , वेगवेगळी ठिकाणे धुंडाळताना मनाला एक अनामिक आनंद मिळत होता. डोंगर ,जंगले , किल्ले, दर्याखोर्यातली घरे, कुठे तुफान वारा, तर कुठे भेभान पाऊस, कुठे संथ समुद्र तर कुठे कोसळणारा धबधबा , कुठे हिरव्या वाटा अन् कुठे कोरडे पाषाण, कुठे गावातली शाळा, निसर्गाच्या ,माणसांच्या वेगवेगळ्या रूपांना पाहताना माझं मन हरखून तर गेलंच पण त्याच वेळी नवीन काहीतरी लिहिण्याची ऊर्मीही जागृत केली. त्याचवेळी हे सगळं फोटोमध्ये बंदिस्त करण्याचा आनंदही मी अनुभवला. याच बरोबर वर्षभरात अनेक नवीन मराठी चित्रपटांनी आणि काही मोजक्या नाटकांनी खूप सुंदर कलाकृती समोर उभ्या केल्या आणि नवी कवाडे उघडून दाखवली. विचारांना खाद्य म्हणून हे सगळंच पुरेसं होतं आणि त्यामुळेच वर्षातल्या बाराही महिन्यात काहीना काही लिहू शकलो.
मला रोजच्या धकाधकीच्या रुटीन मधे काहीतरी वेगळं हवं हा अट्टहास असल्यानं काहीतरी वेगळं शोधणं भाग असतं, अशातच फेसबुक वर काही महिन्यापूर्वी एका पेजने माझं लक्ष वेधून घेतलं. “ The Happy  Page “ . Happiness  म्हणजे आनंद. आनंदी होण्यासाठी, वाटण्यासाठी इतक्या साध्या साध्या गोष्टींची तिथे कारणे तुम्हाला सापडतील की आपल्याला प्रश्न पडावा की खरंच आनंदी होणं इतकं सोपं आहे का ? या नंतर मला असे आनंदाचे क्षण रोजच्या रुटीन मधे शोधण्याचा छंदच जडला.  मुळात माणसाचा जन्मच आनंदी राहण्यासाठी झालेला आहे असं मला वाटतं. नाहीतर इतका खटाटोप करून कुणी दुखी होण्यासाठी जगेल का ? पण मग जर असं असेल तर अजूनही आनंदी होण्यासाठी अनेकांना इतके कष्ट का पडावेत ? हाच विचार मनात आला आणि मग उमगलं आनंदी होण्यासाठी आधी तो कशात आहे हे जाणण जास्त महत्वाचं आहे. बऱ्याचदा ते उमगत नाही आणि मग सुरु होतो आंधळा प्रवास. काय केलं की आपण आनंदी होऊ हेच माहित नसल्यानं खूप जण अधांतरी भटकत राहतात.



 “Pursuit of Happiness “  चित्रपटातला नायक सुरुवातीला जे वाक्य म्हणतो ते फार बोलकं आहे “ मी सोडून सगळे आनंदी दिसत आहेत पण मग मी कधी आनंदही होईन ? “ आणि इथूनच सुरु होतो त्याचा आनंदी होण्याचा प्रवास. अप्रतिम प्रसंगातून बाप आणि मुलाच्या नात्यातून आपल्याला उमगतं की आनंदी असणं किती गरजेचं आहे. त्यातल्या नायकाप्रमाणे प्रत्येकाला ते कारण शोधणं गरजेचं आहे असं मला वाटतं कारण ते जो पर्यंत मिळत नाही तो पर्यंत दिशाहीन प्रवास चालूच राहिल पण एकदा तो आनंद सापडला की मग मात्र आयुष्य अजून जास्त thrilling and exciting  होईल यात कुठलीच शंका नाही.
The Happy  Page” वरच्या चित्राना पाहून मनात काही शब्द आले त्यांना आपल्या अनुभवांना जोडून खालची कविता बनलीय फारशी साहित्यिक रित्या सक्षम नसली तरी सगळ्यांना आनंदी मात्र करेल आणि शेवटी तेच महत्वाचं आहे नाही का ? 

 
आनंद नक्की काय असतो ?

म्हणून म्हणतो सांगा मला, आनंद नक्की काय असतो ?
मानला तर सगळीकडे नाहीतर कुठेच नसतो.

ऑफिसला जाण्या आधीच कधी तुम्हाला रजा मिळते.
तुमच्याच शत्रूला तुमच्या समोर कधी सजा मिळते,
आठवड्याच्या कामातून थोडे काम वजा होते,
अचानक का होईना जीवाची मजा होते....!
म्हणून म्हणतो सांगा मला, आनंद नक्की काय असतो ?
मानला तर सगळीकडे नाहीतर कुठेच नसतो.

खिडकीच्या कोपऱ्यातला पक्षी कधी आपलं लक्ष वेधतो,
कधी पहिल्या सरीला आपण एकटेच साक्ष होतो,
कुडकुडनाऱ्या थंडीचे आपणच नेहमी भक्ष होतो,
जाणूनबुजून चेष्टेने कुणावर तरी रुक्ष होतो.....!
म्हणून म्हणतो सांगा मला, आनंद नक्की काय असतो ?
मानला तर सगळीकडे नाहीतर कुठेच नसतो.

नवीन पुस्तक वाचताना तुम्ही जगालाही विसरता,
भर गर्दीत असूनही स्वतःलाही हरवता,
बसच्या खिडकीतून आकाशालाही न्याहाळता,
स्वतःबद्दल छान वाटून एकटेच स्वतःला हसता.....!
म्हणून म्हणतो सांगा मला, आनंद नक्की काय असतो ?
मानला तर सगळीकडे नाहीतर कुठेच नसतो.

माझं तुझ्यावर प्रेम आहे हे तुम्ही तिला सांगता,
पिस होऊन वाऱ्यावर दूर दूर तरंगता,
हसून तिने पाहिलं की उगाच हुरळून जाता,
स्वप्नांची चित्रे मात्र मनामध्ये रंगवता.....!
म्हणून म्हणतो सांगा मला, आनंद नक्की काय असतो ?
मानला तर सगळीकडे नाहीतर कुठेच नसतो.

लहान बाळ खुदकन हसून तुमच्याकडे पाहता,
वेडेवाकडे तोंड करून तुम्ही त्याला हसवता,
मोठेपण विसरून तुम्ही स्वतःलाच फसवता,
लहानपण देगा देवा हेच मागणं मागता...!
म्हणून म्हणतो सांगा मला, आनंद नक्की काय असतो ?
मानला तर सगळीकडे नाहीतर कुठेच नसतो.

रिमझिम पावसात गाडीतून long Drive ला जाता,
सीडी वरचे रफी लता वेड लावून टाकतात,
त्याच धुंदीत थांबून तुम्ही पावसाचे थेंब झेलता,
वाफाळलेला चहा घेऊन मोठी दाद देता.....
म्हणून म्हणतो सांगा मला, आनंद नक्की काय असतो ?
मानला तर सगळीकडे नाहीतर कुठेच नसतो.

आयुष्यातल्या या छोट्या क्षणांना विसरलात की काय ?
खूप मोठं होता होता हरवलात की काय ?
याच छोट्या आनंदाना आयुष्यात खरी किंमत असते,
बाकी सगळं झुठ माननं यातच खरी हिम्मत असते..
म्हणून म्हणतो सांगा मला, आनंद नक्की काय असतो ?
मानला तर सगळीकडे नाहीतर कुठेच नसतो.


चला तर मग हाच आनंद शोधण्याचा प्रवास पुढच्या वर्षीही चालू ठेऊया आणि आयुष्य भरभरून जगूया हीच सदिच्छा.


इति आनंद
३१ डिसेंबर २०१३.  
पुन्हा  भेटूच २०१४ मधे   
 अनुभवांच्या नव्या गोष्टीन सोबत.



4 comments:

  1. खूप छान !!!!
    असच नवीन वर्षात पण छान वाचायला आम्हाला मिळाव !!!!

    ReplyDelete