मानव्य :
मानव्य हि smt. विजयाताई लवाटे यांनी १९९५ साली स्थापन केलेली संस्था पुण्यापासून साधारण १२ km अंतरावर भूगाव या गावात आहे. जन्मतःच H.I.V +ve असणाऱ्या मुलांची तिथे राहण्याची ,शिक्षणाची आणि त्याच बरोबर त्यांची औषधं तसेच दवाखाना याची सोय इथे केली जाते.
माझ्या कंपनीमधल्या Coportate Social Responsiblity (CSR) ग्रुपमार्फत मी या संस्थेशी जोडला गेलो. संस्थेचा सगळा पसारा पाहूनखरंच अगदी भरून यायला होतं. मागच्या वर्षी दिवाळी च्या निमित्ताने १-२ कार्यक्रमाच्या मधून तिथल्या मुलाचं भावविश्व जवळून पाहायला मिळालं. याचंच पुढचं पाउल म्हणून २२ जानेवारीला या मुलांबरोबर आम्ही सगळ्यांनी महाबळेश्वर ट्रीप ठरवली. १० लोकांचे २० हात कामाला लागले आणि शेवटी एक वेगळा दिवस अनुभवून आम्ही सगळे रात्री परत आलो.
मात्र परत आल्यानंतर मनामध्ये विचारांचं नुसता काहूर माजलं. एका दिवसात त्या मुलांनी मला अनेक अवघड प्रश्नांची खूप सोपी उत्तरं दिली होती आणि मलाच अनेक अवघड प्रश्न घातले होते. त्यामुळे लिहाव तर लागणारच होतं.
संस्थेमध्ये एकूण ५० मुलं आहेत त्यामधे २१ मुली आणि २९ मुलं. सकाळी ७.३० वाजता निघायची वेळ ठरली. एवढ्या सकाळी मुलं तयार होतील कि नाही असे विचार मनात येत होते पण ठरल्यावेळेला आम्ही संस्थेमध्ये गेलो तोच समोरचं दृश्य पाहून मला माझ्याच विचाराचं हसू आलं. सगळी मुलं स्वेटर घालून २ -२ च्या जोड्या करून आधीच रांगेमध्ये उभी होती. सगळ्या मुलांना २ बस मध्ये बसवून शेवटी आम्ही ८.३० वाजता निघालो. आपण सगळे फिरायला चाललो आहोत या कल्पनेनंच मुलं खूप खुश दिसत होती. आणि त्यांच्या चेहरया वरचा आनंद पाहून मल छान वाटत होतं. बस मधल्या टीव्ही वर कार्टून बघण्यात त्यांना खूप मजा वाटत होती. मधेच वाटेत लागणारा घाट, बोगदा, डोंगर हे पाहण्यातही मुलं गुंग होती.
पाचगणी :
साधरण ११ वाजता आम्ही पाचगणी ला टेबललेंड ला पोहोचलो. तिथे फिरण्यासाठी घोडागाड्या घेतल्या . प्रत्येक गाडी मध्ये ८ जण असं बसवून आम्ही राईड ला निघालो. घोडागाडी मध्ये बसल्यावर तर प्रत्येक प्रत्येकाला काय करू आणि काय नाही असं झालं होतं. घोडा गाडीची ती धावती राईड संपल्यावर तिथे असलेल्या केव्हस पाहण्यासाठी आम्ही सगळे खाली उतरलो. तिथली माकडं पाहून मुलांना खूप गम्मत वाटत होती. कधीही न घेतलेला अनुभव पहिल्यांदा घेतल्यावर मनात काय काय होत असेल याचा विचार मी करत होतो आणि त्याच बरोबर माझ्या आयुष्यातल्या अशा प्रसंगाची आठवण जागी करायचं प्रयत्न सुद्धा. पाचगणी मधेच आम्ही मग जेवण्यासाठी एके ठिकाणी थांबलो. भूक लागल्यामुळे लागल्यामुळे सगळे अगदी मनसोक्त जेवलो. आणि मग महाबळेश्वर साठी निघालो.
महाबळेश्वर मंदिर : पाचगणी मधून निघाल्यावर सगळे पुन्हा ताजेतवाने झाले होते. आणि मग मी गिफ्ट देणार असं सांगून त्यांना गाणी म्हणायला सांगितली. सगळ्या मुली इतक्या छान गात होत्या, कि मी आणि माझ्या बरोबरचे माझे सहकारी अगदी थक्क होत होतो. सगळयाच मुलीचं पाठांतर आपल्याला लाजवेल असं होतं. आणि एक थांबताच दुसरी आपला आवाज त्यात मिसळत होती. हे सगळं होत असताना त्यांनी मला त्यांच्यात कधी सामावून घेतला कळलंच नाही. आनंददादा अशी त्यांची हाक मला फार आपली वाटत होती. आम्ही मग संदीप खरे आणि सलील कुलकर्णीची गाणी सुरु केली. , मी मोर्चा नेला नाही, मी हजार चिंतानी , अगोबाई ढगोबाई, दमलेल्या बाबांची कहाणी, अशी खूप गाणी गायली. मनात विचार आला “दमलेल्या बाबांची कहाणी” हे गाताना आई आणि बाबा नसलेल्या त्या जीवाला ती आर्तता कोण देत असेल ? काय काय विचार येत असतील त्या सगळ्यांच्या मनात ? क्षणाक्षणाला डोळे भरून येत होते.
सगळ्यांना गिफ्ट वाटून झाली. आणि मग “चिमुकल्या चोची मध्ये आभाळाचे गाणे” हे नवीन गाणं मी त्यांना शिकवलं आणि त्यांनाही ते आवडलं. आणि अगदी १०-१५ मि. मध्ये सगळ्याजणी अगदी सुरात ते म्हणू लागल्या. आणि मग मात्र सरीवर सरं, आताशा असे हे , नसतेस घरी तू जेव्हा हि सगळी गाणी त्यांनी माझ्याकडून आनंददादा अजून एक अजून एक अशी करत गाऊन घेतली. आणि त्यांची ती फर्माईश मी हि नाकारू शकलो नाही आणि गाणी झाल्यावर ती आम्हाला वहीमध्ये लिहून हवी आहेत अशी अट घालून मग मला थांबायची परवानगी मिळाली. परक्याला आपलासं करण्याचं एक अजब रसायन लहान मुलांकडे असतं असा माझा ठाम विश्वास आहे आणि ते पुन्हा एकदा सिध्द झालं होतं. या मुलांनी मला आपलंसं तर केल होतंच पण त्याच बरोबर एक नवा विश्वास सुद्धा दिला होतं आणि तो म्हणजे माणसं जोडणे हि कला फार सोपी असते आणि त्या साठी गरज असते ती फक्त निर्मळ मनाने केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांची.
महाबळेश्वर च्या मंदिरामध्ये दर्शन घेतल्यावर आम्ही आर्थर पोईंट , एको पोईंट साठी निघालो. आर्थर पोईंट वरून दूरदूर वर दिसणारे डोंगर पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटत होतं आणि आपण इतक्या उंचीवर आहोत याचं अप्रूप. सूर्य अस्ताला निघालाच होता. सावित्री पोईंट वरून तो लाल गोळा डोंगामागे कसा जातोय हे बस मधूनच पहिल. आणि परतीची वाट धरली. या सगळ्यात पोईंट म्हणजे काय, अस्त म्हणजे काय, एको म्हणजे काय, शंकरा समोर नंदी का असतो, पंचकुंड म्हणजे काय असे बालसुलभ प्रश्न विचारून मला अगदी त्यांनी घेरून सोडलं होतं.
जेव्हा मी त्यांना सांगितलं कि आता आपण परत जायच आहे तेव्हा एका चिमुकलीचि प्रतिक्रिया ऐकून मला अक्षरशः भरून आलं. “ती म्हणाली अरे दादा मलानं लवकर घरी जायला नको वाटतंय कारण हे रस्त्या वरचे दिवे बघायला फार आवडतं, मला ते कधीच दिसत नाहीत. कारण आम्ही बाहेर फार जातच नाही. “ काय बोलणार त्या चिमुकलीला ? स्वतःमध्ये अखंड तेवणारा दिवा असणऱ्या तिला अशा कृत्रिम प्रकाशाची काय गरज होती. उलट मनाची दारं बंद करून आत प्रकाशाची अपेक्षा करणाऱ्या मुखवटे असणाऱ्या माणसांपेक्षा हि चिमुकली फार थोर होती.
गाणं लिहून देण्यासाठी दुसऱ्या एका चिमुकलीचि वही तिने दिली, आणि ती पाहून मी थक्क झालो. आज सकाळ पासून काय काय पाहिलं, घडलं केलं, यातले सारांश असलेले शब्दतिने लिहून ठेवले होते. त्याच वहीत गाणं लिहिलं आणि तिला दिलं.
साधारण दोन तासाने खेडशिवापूरला पोहोचलो. तिथे रात्रीचं जेवण केलं. जेवायला बसल्यावर मी त्यांच्या शेजारी बसाव म्हणून चिमुकल्या मागे लागल्या. शेवटी सगळ्यांना बसवून जेवण दिलं. तिथेच बाहेर एका झाडाला हिरव्या दिव्यांची लायटिंग केली होती. तोच एक चिमुकलीने मला विचारलं “ दादा झाडाला पण असे दिवे लावतात का रे ?” मी म्हटलं हो. त्यालाही सजवायला नको का. आणि चटकन मनात विचार आलं हिला कोण सजावत असेल असं ?
थोड्याच वेळात गाडीतून पुण्याची वाट धरली. गाडी मध्ये बसल्यावर पुन्हा सगळ्यांनी गाणी म्हटली. खरं म्हणजे शेख सर आणि माझ्याकडून मुलींनी म्हणवून घेतली. J आता आपण परत जाणार हि जाणीव त्यांना होऊ लागली होती. “परत कधी येशील रे आनंददादा” ? , “ आमचा तो गुप् फोटो देशील का रे आणून आम्हाला “ ? असे प्रश्न सगळ्या मला विचारून लागल्या. मीही लवकरच परत येईन असं भरवसा त्यांना दिला.
आयुष्यातली किती वर्ष अजून बाकी आहेत हे माहित नसलेले ते निष्पाप जीव आणि त्यांची जगण्याची धडपड पाहून आपण किती सुखाने ओसंडून वाहत आहोत याची जाणीव होते. शुल्लक गोष्टीवरून बिनसणारी नाती, येणार फ्रश्त्रेशन, कोलमडनारी मने आजूबाजूला पहिली कि वाटतं किती पोकळ आहे हे सगळं. दिलेलं आयुष्य आहे तसा स्वीकारणारे किती असतात ? आणि किती मध्ये ती सामोरा जायची हिम्मत असते ?
अर्धा तासात पुण्यात पोहोचलो. बस मधून उतरून संस्थेकडे जाताना आकाशात चांदणं पसरलं होतं. आकाशातलं टीकाटनं (३ चांदण्या एका रेषेत ) दिसत होतं. मागे चंद्र शुभ्र प्रकाश शिंपडत होता. आणि मुलं चालत असलेली वाट जणू काही तो प्रकाशित करत होता.
एकच प्रार्थना मी केली. आणि निरोप घेऊन परतलो.
.....आनंद