राजगड - १ जानेवारी २०११
वर्षाचा पहिला दिवस. आणि खास सुद्धा १/१/११.
या वेळी तो मी साजरा करायचं ठरवला होता राजगड चा ट्रेक करून. भटकंती हा आवडता विषय तर आहेच पण या वेळी त्याही पेक्षा जास्त महत्वाचा होतं ते मला माझ्या साठी वेळ देणं. हाच विचार करून ठरवलं आणि गेलो. ३१ डिसेंबर च्या नशील्या रात्रीतून जग अजून जागा व्ह्याच्या आधीच १ जानेवारीच्या पहाटे राजगड चा रस्ता धरला. नवीन वर्ष साजरा करायचं आणि ते हि नशा करून आणि त्यात नशे मध्ये नव्या वर्षाचे संकल्प करून हा विचारच माझ्या कल्पेनेच्या पलीकडचा आहे .याचा अर्थ असा नाही कि नशा करूच नये किंवा त्यात गैर आहे कारण तो पूर्ण पणे वेगळाच वादच मुद्दा होईल. असो.
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी केलेला राजगड चा ट्रेक हा एक अविस्मरणीय असा अनुभव ठरला.आणि नवीन वर्षाची सुरुवात हि खूप दिवस स्मरणात राहिला अशा या ट्रेक ने झाली. राजगड हा मला आवडणारा गड , कितीही वेळा गेलं तरी नेहमीच वेगळा भासणारा आणि नवीन रूपे दाखवणारा गड.
भटकंती प्रिय असल्यामुळे मागच्याच आठवड्यात कोल्हापूर आणि पन्हाळा झाला तरी लगेच पुन्हा अजून एक गड सर् करण्याची इर्षा काही कमी झाली नव्हती त्यामुळे नवीन वर्ष वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याची माझी परंपरा या वेळीही मोडली नाही आणि भल्या पहाटे मी राजगड ची वाट धरली आणि मस्त गारवारा अंगावर झेलत कोवळ्या उन्हा मध्ये गड कधी सर् झाला कळलाच नाही. निसर्ग आपल्याला दोन्ही हाताने भरभरून देत असतो याची प्रचीती क्षणाक्षणाला आली.
७.३० – ८ वाजता राजगड च्या पायथ्याशी पोचलो . डोंगरामागून उगवणारा नव्या वर्षाचा पहिला सूर्य दिसत होता . कॅमेरा सरसावून त्याचा मस्त फोटो घेतला. तोच झाडावर एक खारुताई जणू काही फोटोसाठीच तयार होऊन बसलेली दिसली . चिंचेच्या झाडाच्या फांदी मधून कोवळी किरणे अशी काही तीरा सारखी पुढे सरसावली होती कि जणू काही नवीन वर्षाची ओढ त्यांनाही वेड लावत होती.
मस्त पैकी फक्कड चहा पिऊन राजगडाच्या दिशेची वाट धरली. तोच समोर गावातल्या घरासमोरची एक भली मोठी विहीर समोर आली. हल्ली विहीर या प्रकाराने मला वेड लावलेच आहे . पाणी काढण्य साठी मोट लावलेली ती विहीर पाहून आणि त्या वर पाणी भरणाऱ्या म्हाताऱ्या आज्जी पाहून स्वतःचं छोटे पण जाणवलं. आपण शहरातली मानसं किती शुल्लक गोष्टीवरून चिडतो, भांडतो, आणि निराश होतो. पण इथे तर प्रगतीचा स्वप्नाचा किती दूर आहे . पण तरीही माणूस म्हणून हि साधी मानसंचं मला जास्त जवळची वाटतात. त्या विहिरीच्या कठड्यावर उभा राहुंन तिचे ४-५ फोटो घेतले. मला नेहमी एक गुढ असा भास विहीर देते . काहीतरी खूप दडलेला आहे तिच्या मध्ये असा वाटत राहता. पण तरीही ती मला हतबल वाटत नाही उलट नेहमीच स्वतःशी हसत आहे असा वाटत राहत. जणू काही स्वतःमधेच गुंग अशी एखाधी अबोल राजकन्या.
विहिरीला मागे टाकून पुढची वाट धरली. उन खुपच कोवळा होतं आणि हवेत मस्त गारवा होता. इथे मनात हाच विचार आला कि नक्की काय हवा असतं माणसाला ? माणसाचं माणूस पण जपण्यासाठी इतके का कष्ट पडावेत ?
लालमातीची वाट संपून आता खडकाळ पायवाट सुरु झाली, दोन्ही बाजूने दाट झाडी आणि मधून गेलेली पायवाट. गर्द झाडी मध्ये मधेच होणारा सळसळ असा आवाज. डोंगराच्या उतारावर आपसूक पणे आलेली एकाच जातीची छोटी झुडपे इतकी लयबद्ध पणे उगवली होती जणू काही कुणी तरी शेतीच लावली आहे अशी भासत होती.
जसजसे वर चढत होतो तसा वाऱ्याचा आवाज वाढत होता आणि गारवारा बोचत होता. भर उन्हात थंडी भरेल इतका गारवारा पाहून निसर्गाची गम्मत वाटली . भर उन्हात जराही घाम इत न्हवता तो यामुळेच.
साधारण १ तासाने चोर दरवाज्या पर्यंत पोहचलो. त्या आधीची रॉक ची चढण मस्तच आहे. घोंगावणारा वारा, मागे खोल दरी आणि वर खुणावणारा राजगड. तिथल्याच एक खडकावर बसलो. दूर पर्यंत जणूकाही कुणीच नाहीये अस भासत होतं. प्रत्येक ट्रेक मध्ये एक असा क्षण असतो त्या क्षणी तुम्हाला वाटता कि हाच तो क्षण ज्या साठी हि सगळी धडपड केली . आणि माझ्यासाठी तो पहिला क्षण असाच होता.
आणि माझ्या नशिबाने तो मी अजून गडावर प्रवेश करण्या पूर्वीच आला होता.
चोर दरवाज्यातून गडावर प्रवेश केला. ३१ डिसेंबर गडावर साजरा करणारी काही हौशी मंडळी तिथे बघून छान वाटला. पद्मावती मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. आणि मग सुवेळा माची कडे प्रस्थान केला. जाताना वाटेत राजवाड्याचे अवशेष दिसतात. ते पाहून खरोखर भरून यायला झालं आणि तोच समोर भगवा झेंडा वाऱ्याबरोबर झुंज देत फडकत होता. तो पाहून उर अभिमाने भरून आला कारण मागे बालेकिल्ला खुणवत असतो.
सुवेळा माची कडे जाणाऱ्या वाटेवर खूप सारी फुलपाखरे असणार असा मनात वाटत होताच आणि ती शक्यता प्रत्यक्षात उतरल्यावर तर आनंदच झाला . फार फुलपाखराच्या जाती काळात नसल्या तरी त्यांना कॅमेरा मध्ये बंदिस्त मात्र केला.
सुवेळा माची कडे जाताना मध्ये बिग होल लागता. मोठ्या खडका मध्ये असलेला ते होल अगदी पायथ्याच्या गावातूनच बघताना खुणावत असतं. त्या मध्ये एक अर्धा तास बसलो. एका बाजूला खोल दरी आणि एका बाजूने येणारा गारवारा . ट्रेक साध्य झाल्याचा हा तो दुसरा क्षण . थोड्या वेळाने खाली उतरून .पुन्हा पद्मावती माची कडे निघालो.
पद्मावती माची वरच येऊन जेवण केलं. गडावरच्या विहिरीचा पाणी इतका थंड होतं कि हात जणू काही गोठले. ते थंड पाणी तोंडावर मारला आणि इतकं फ्रेश वाटला कि अजून काही मिळाला नाही तरी चालेल असा वाटून गेला.
थोडा वेळ पद्मावती माची वर बसलो , मागच्या बाजूला असलेला तोरणा सुद्धा ढगांच्या आड लपछापिचा खेळ खेळत होता. राजगडाच्या तटबंदीवरून पुन्हा चोरदरवाजाच्या दिशेने वाट धरली.
तोच माकडांचा कळप समोर मस्त पैकी उड्या मारत होता. जवळ जातात सगळे दूर पळाले. चोर दरवाज्यातून पुन्हा गड उतरायला सुरुवात केली.
येताना मन खूप मोकळ मोकळ झालं होतं. आत काहीतरी दबून राहिलेलं आपसूक पणे बाहेर यावं आणि ते येताना एक अनामिक आनंद देऊन जावं असा काहीसं झालं होतं. मागे वळून पाहताना गड अजूनही तसाच भासत होता. पण आता मी मात्र वेगळा होतो. काही गोष्टी खरच समजण्या पलीकडच्या असतात. आणि त्यांचा अर्थ न लावलेलाच बर असतं.
असा हा दिवस आयुष्यभर स्मरणात राहील यात कुठलीच शंका नाही. आणि त्या बरोबरच लक्षात राहतील ते अगणित क्षण जे विकत घेता येत नाहीत.
माणूस किती छोटा आहे आणि आपल्याला अजून किती आणि काय काय आहे करायला याचीही जाणीव झाली. सरळ रेशेतल्या आयुष्याला अचानक अनेक वाटा फुटतात ना अगदी तसा होता कधी कधी. अचानक एखादी पायवाट पुढे खुणावत येते आणि आपल्याला आपसूक पणे तिच्या बरोबर घेऊन जाते. वाट चुकण्यात सुद्धा कधी कधी मजा असते कारण त्यातूनच नवीन वाटा सापडत असतात आणि गवसत असतो आपल्यातला हरवलेला “मी”.
या वेळीही तो मला गवसला ,कदाचित हेच हवा असता प्रत्येकाला पण त्याची योग्य वेळी जाणीव होणं महत्वाचं, नाहीतर हाती काही उरेल याची अपेक्षा करणंच चुकीचा.
नवीन वर्षासाठी नवीन उर्मी मनात घेऊन ट्रेक वरून परत आलो तेच मुळी मनात नवी अशा घेऊन आणि पुन्हा याच इर्षेन अजून एक नवा गड सर् करण्याचं ठरवूनच.
आनंद
छान निरीक्षण केलं आहेस आनंद !
ReplyDeleteGood Keep it up.This is what is expected from you OUT OF THE TRACK but on RIGHT TREK.
ReplyDeleteAparna