ऋतू येती ऋतू जाती ,ऋतू येती ऋतू जाती,
सुखदुखाच्या चक्रात ऋतू अपुले सोबती.
ऋतू येती, ऋतू जाती....!
ग्रीष्म वैशाखाच्या झळा, दाही दिशांना वणवा,
जीव उन्हाळ्याचा शोधे सावली गारवा,
त्याच अग्नीच्या शेवट लपे पावसाचा मोती.
ऋतू येती ऋतू जाती, ऋतू येती ऋतू जाती......!
या गाण्याच्या ओळी परवा कानावर पडल्या आणि अचानक उन्हाळ्याच्या या ऋतू कडे लक्ष वेधलं गेलं. हिवाळा आणि पावसाळा हे बऱ्याच लोकांना आवडणारे ऋतू पण उन्हाळा मात्र कोणालाही मनापासून आवडतं नाही. त्या मुळे या ऋतू मध्ये काय विशेष असतं हे दुर्लक्षितच केलं जातं. किंबहुना विशेष काही असतं हेच माहित नसतं. अंगाची लाही लाही करणारं उन आणि चटके बसवणारी दुपार एवढाच खरंच उन्हाळा असतो का ? असा प्रश्न पडला. आणि मग अर्थातच उत्तरमिळे पर्यंत ते शोधणं अपरिहार्यच होतं.
कदाचित मी हा प्रश्न विचारण्याच्या आधीच निसर्गाने त्याला उत्तर तयार ठेवलं होतं. मागचे २ आठवडे सगळी कडे निसर्गाने रंगांची उधळण करून ठेवली आहे. कोरड्या, तप्त आणि तहानलेल्या निसर्गाने २ आठवड्यातच आपलं रूप पालटलेलं दिसलं आणि सगळे कडे रंगीबेरंगी फुलांची उधळण करून ठेवलेलं जाणवलं.
रोज सकाळी ऑफिसला जाताना रस्त्याच्या आजूबाजूने गुलमोहोर, बहावा, गुलबक्षी, चाफा अशी अनेक झाडं फुलांनी बहरलेली दिसू लागली. आणि नकळतच लक्ष वेधून घेऊ लागली. मग एक दिवस सकाळी लवकर निघून हे सौंदर्य फोटो मध्ये बंदिस्त करायचं ठरवलं. आणि बघता बघता ४०-५० गुलमोहोर, १५-२० गुलबक्षी, ८-१० चाफा, २०-२५ बहावा याच बरोबर नावं माहित नसलेल्या अनेक झाडांच जवळून निरीक्षण करता आलं आणि निसर्गाच्या या अद्भूत किमयेला दाद सुद्धा देता आली.
एप्रिल आणि मे महिने हे तापमानाचा उच्चांक गाठणारे महिने. आणि याच महिन्यांमध्ये मनाला सुखद अनुभव देणारी हि फुलं पाहून आश्चर्य तर वाटतच पण त्याच बरोबर या सगळ्यातून निसर्ग काही संदेश देत असावं का ? असंही वाटून जातं.
गुलमोहोर हा मला मनापासून आवडणारा वृक्ष . त्याला पाहिल्यावर मला नेहमी या ओळी सुचतात.
तापत्या उन्हात गुलमोहोर उभा असतो फुलांनी बहरून,
निष्पर्णतेतल अस्तित्व जपत,
सागंत जगण्याचा नवा अर्थ,
आणि गात आकाशाचं गाणं ....!
मनाला नेहमीच नवी उर्मी देणारा असा गुलमोहोर हा खरोखर जेव्हा फुलांनी बहरतो तेव्हा त्याच्या पानाचं अस्तित्व सुद्धा उरत नाही ,फक्त उरतो तो लाल चुटुक फुलांच्या ताटव्यांचा मोरपिसारा. समांतर पसरलेल्या फांद्या आणि त्यावर असलेली लाल फुलं पाहून भर उन्हातही गार वाऱ्याची झुळूक आल्याचा भास होतो. त्याचा लाल रंग तापलेल्या धरतीला साजेसा असला तरी तो सुखावहच वाटतो. गुलमोहोरावर जसजशी लाल फुलं फुलू लागतात तसतशी हिरवी पाने गळून पडू लागतात. फुलांनी डवरलेल्या गुलमोहोराखाली उभं राहिल कि जो काही आनंद मनाला मिळतो तो प्रत्येकानं एकदातरी नक्कीच अनुभवावा. निळ्या आभाळाखाली लाल रंगाची उधळण करताना तापलेल्या सुर्याला तो काय सुचवत असावा ?
खचलेल्या मनाला नवी वाट दाखवणारा, संकटातही न डगमगता सामोरं जायला शिकवणारा आणि हे सगळं करताना तितक्याच मुक्तपणे आनंद उधळणारा गुलमोहोर हा प्रत्येकाच्याच आयुष्याच्या वाटेवरचा एक मार्गदर्शक असावा असं वाटून जातं.
गुलमोहोरा बरोबरच बहावा सुद्धा आपलं वेगळेपण दाखवत तेवढाच छान दिसतो. गर्द हिरव्या पानांमधून डोकावणारी पिवळी फुले उन्हामध्ये अजून उठून दिसतात. झाडा खाली पडलेला पिवळ्या फुलांचा सडा जणू काही तप्त धरतीला अभिषेक करत असल्यासारखा भासतो. झाडांनी फुलांचे अलंकार घातले आहे कि काय असं वाटावं अशा प्रकारे फुलं एकमेकांत गुंफून गेलेली दिसतात.
रंगांच्या बरोबर सुगंध असलेली फुलं म्हणजे चाफा. चाफ्याच्या फुलांनी बहरलेला वृक्ष पाहून डोळ्याचं पारणं फिटल्या शिवाय राहत नाही. बाहेर शुभ्र पांढऱ्या आणि देठापाशी पिवळ्या होणाऱ्या पाकळ्या आणि असे संपूर्ण झाडावर पसरलेले झुपके पाहून जणूकाही चाफा येणाऱ्या कोवळ्या उन्हाला हजार हातांनी आलिंगन देतोय कि काय असं वाटून जातं. त्यामुळेच कि काय भर उन्हात चाफ्याच्या झाडाकडे पाहून आपोआपच उन कमी झाल्यासारखं वाटतं. निर्भीड पणे परिस्थितीला सामोरं जाताना जपावी लागणारी विनम्रातही चाफ्याच्या झाडाकडे पाहून तितकीच प्रभावी पणे दिसते. आणि चाफ्याच्या सुगंधाने मंत्रमुग्ध होऊन जणूकाही वाराही त्याचीच गाणी गातोय असं वाटून जातं.
हे सगळं पाहताना कधी कधी मग मला आठवतो तो आज्जीच्या गावाला असलेला आडावरचा चाफा. या चाफ्याच्या फुलांची केलेली अंगठी आणि पाच बोटात पाच फुलांच्या अंगठ्या घालून घरभर मिरवलेले, जगलेले, अनुभवलेलं ते बालपणीचं सुखाचे दिवस. काळ्या दगडावर पडलेली शुभ्र फुलं आठवून त्या दगडांचा हेवा वाटतो आता. त्या निर्जीव दगडालाही क्षणभर हुंकार फुटत असावा असं मनोमन वाटत राहतां. आज इतक्या वर्षांनी तोच चाफा मला पुन्हा तसाच भासला जेव्हा रस्त्याच्या कडेला बहरलेला दिसला आणि क्षणभर थांबून त्याचं सौंदर्य डोळ्यात भरून आणि सुगंध श्वासात भरून मी पुढे निघालो.
लाल गुलमोहोर, पिवळा बहावा आणि शुभ्र चाफा झाल्यवर मग मला भावली ती गुलबक्षीची रंगीबेरंगी कागदाची फुलं. फुललेली गुलबक्षी हि मला हवेत अंथरलेल्या एखाद्या चादरी प्रमाणे भासते. दाटीवाटीने फुललेली फुलं झाडाच्या फांद्यांना जेव्हा पूर्ण झाकून टाकतात तेव्हा दिसणारं रूप हे फार आगळ दिसतं. गुलबक्षीच्या पाकळ्या या गुलाबी, पिवळ्या, पांढरा रंगाच्या फुलपाखराच्यापंखां सारख्या दिसतात. सहजासहजी कुठेही आढळल्यामुळे गुलबक्षी तसं दुर्लक्षित केलं जातं पण ठिकठिकाणी बहरलेली गुलबक्षी पाहून डोळ्यांना नक्कीच एक सुखावह आनंद मिळतो.
भर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये निसर्गाने धारण केलेलं हे देखणं रूप पाहून थक्क व्हायला तर होतंच पण त्याच बरोबर रोजच्या रहाटगाड्यात पिचून जाणाऱ्या रुक्ष जीवनात सुद्धा नवीन रंग कसे भरतां येतील आणि ऋतू पालटण्याची नुसती वाट पाहण्या ऐवजी आलेल्या ऋतूत असलेले रंग कसे खुलवता येतील याची जाणीव निसर्ग नकळत कसा करून देतो याची जाणीव होते . या धावत्या युगात निसर्गाचे हे संकेत आपण ओळखायला थोडा वेळ आपण नक्कीच राखून ठेवायला हवा नाही का? कारण या शाश्वत गोष्टी जपल्या नाहीत तर बेचव आणि बेरंगी आयुष्यात कृत्रिम रंग भरायची वेळ आपल्यावर येऊ शकते.
मग बाहेर चालताय ना ? कदाचित तुमच्या घराजवळचा एखादा गुलमोहोर ,चाफा,बहावा वाट पाहत असेल एखाद्या वाटसरूची जो त्याच्या सावलीत क्षणभर विसावेल आणि त्या फुलांच्या रंगांमध्ये नवा रंग शोधेल.
......... आनंद