Powered By Blogger

Monday, January 2, 2012

शांत शीतल वासोटा ( व्याघ्रगड )


आज ३१ डिसेंबर २०११. वर्षाचा शेवटचा दिवस. मागच्याच आठवड्यात २४ आणि २५ ला वासोट्याचा किल्ला सर केला. सरत वर्ष मग सोडताना हा वर्षातला शेवटचा ट्रेक आणि त्या बद्दल याच वर्षी लिहावं असं मनोमन वाटत होतं आणि त्यासाठी वर्षाचा शेवटचा दिवस या पेक्षा अजून चांगलं काय असू शकतं ? खरंतर वासोट्या वरून परत आल्यावरच तो एक भन्नाट अनुभव उरात अगदी भरून राहिला होता.
लिहायला बसण्यापूर्वीच अगदी ५ मिनिटा आधी व.पुं. चं “ तू भ्रमत आहासी वाया “ हे पुस्तक वाचून संपवल. वासोट्याचा तो अनुभव ,निसर्गाने मुक्त हस्ताने केलेली उधळण आणि त्याला धरून ठेवणारं माझं मन याला लागू पडणाऱ्या पुस्तकातल्या ४-५ ओळी मला फार भावल्या.
व.पुं नी लिहिलंय “ सुखाची पुनरोक्ती झाली तरी त्याचं शीण येतो. त्यात ताजेपणा नसतो. पावसाचा प्रत्येक थेंब नवा असतो. समुद्राची प्रत्येक लाट कोरीकरकरीत असते. नदीवर अंघोळ केली तर नदीचं नाव तेच असलं तरीही पाण्याचा प्रवाह वेगळा असतो. पाण्यात उतरतो तेव्हाचं पाणी कधीच पुढे जातं, पाण्यातून आपण बाहेर येतो ते पाणी बदललेलं असतं. प्रत्येक क्षणाचं भिजणं वेगळं असतं. सगळी समृद्धी असूनही माणसाला त्या जगण्यात जेव्हा आनंद निर्माण करता येत नाही तेव्हा समजावं, नव्या दिवसाची किरण  त्याला झेलता आली नाहीत. “
 
हे वाचून वाटलं खरंच निसर्ग किती जिवंत असतो नाही ? त्याने दिलेले कित्येक क्षणांची कुपी आपण अशीच  न उघडता मागे सोडून देत असतो. पण अशाप्रकारे जेव्हा एखादी कुपी उघडली जाते तेव्हा त्याच्या अमर्याद अशा शक्तीची, त्याच्या निरागसतेची जाणीव होते. अगदी असाच अनुभव देऊन वेड लावून गेला तो वासोट्याचा ट्रेक आणि मला पुन्हा एकदा त्या निरव शांततेत हरवलेल्या क्षणांशी संवाद साधता आला आणि त्याच्या शीतलतेत चिंब भिजता आलं. 


 
वासोट्याला जायचं पक्कं झाल्यावर काही मित्रांना विचारून झालं. ६-७ लोकांचा विचार चालू असताना शेवटी उरले ते ४ जण. मी, सतीश, दीपक आणि त्याचा मित्र अमित.  ट्रेकडी च्या ऑफिस मधे जाऊन रेजीस्त्रेशन केलं. २४ ला रात्री माझ्या घरी सगळे जमलो. साधारण ११.३० च्या आसपास आम्ही हायवे वर बस पकडली. डिसेंबर ची हुडहुडी भरवणारी थंडी आणि बस चा रात्रीचा प्रवास या दोन्ही प्रचंड आवडणाऱ्या गोष्टी एकत्र आल्या होत्या आणि मागच्याच आठवड्यात कार ने ७०० किमी चा पुणे- पाथरी- पुणे असा एकदिवसाचा कार्यक्रम करून झाला होता त्यामुळे अशी संधी पुन्हा लगेचच आल्यानं मी जाम खुश होतो. शहरा पासून दूर आल्यानं आकाशातल्या चमकणारया चांदण्या पाहताना एक वेगळीच तंद्री लागत होती.  रात्रीचा साधारण ३ तासाचा प्रवास करून आम्ही सगळे २.३० वाजता बाणमोली गावात पोहोचलो.  ठरल्या प्रमाणे गावातल्या मंदिरात उतरलो. गावातलं भैरवनाथाच नुतनीकरण केलेलं मंदिर अतिशय प्रशस्त आहे. 
बरोबर आणलेलं झोपायचं सामान बाहेर काढलं आणि मस्त पैकी तिथेच अंग टाकून दिलं. थंडी बरीच होती पण सुसह्य होती. मंदिराला असलेल्या कठड्यातून मधेच एक गार वाऱ्याची झुळूक माझ्या कानापाशी येत होती आणि अंगावर काट्याची लहर उठत होती. झोप तशी लागत नव्हती पण उजाडेपर्यंत थोडं वेळ  झोपणं भाग होतं. सकाळी साधारण ६.३० ला जाग आली. गाव जागं झालं ते कोंबड्याच्या आरवण्यामुळे. काही क्षणातच गावातल्या घरातले बंब पेटल्याच जाणवलं कारण घरांच्या छतावर असलेल्या धुराड्यातून हळूहळू पांढरा धूर बाहेर येऊ लागलं होता. शहर जागं होतं ते ही धुरातच पण तो असतो तिथल्या वाहनांचा धूर. शहराचं जागं होणं आणि गावाचं जागं होणं यात असलेली ती धुसर सीमा रेषा मला खरोखर धुक्यातही स्पष्ट दिसत होती. आम्हाला साधारण ८ च्या दरम्यान तयार व्हायचं होतं. त्या प्रमाणे आवरून आम्ही सगळ्यांनी नाश्ता उरकून घेतला. 

 
बाणमोली पासून वासोट्याला बोटीने साधारण सव्वा तास लागतो. कोयना धरणाच्या backwater असलेल्या  शिवसागर तलावातून बोटीने जावं लागतं. काठावर लावलेल्या बोटी पाहूनच आपल्याला एक खूप exciting  अनुभव मिळणार याची खात्री पटते. आम्ही सगळे मिळून ११ जण असल्यानं एक बोट पुरेशी होती. काठावर थोडी फोटोग्राफी करून शेवटी आम्ही सगळे बोटीवर चढलो. बोटीच्या इंजिनाची अवस्था फार विचित्र होती कारण त्यातून निघणारा सगळा धूर चालू केल्यावर तिथेच पसरत होता. शेवटी बोट सुरु झाली आणि वासोट्या कडे आमचा खरा प्रवास सुरु झाला. मी बोटीच्या अगदी समोरच्या बाजूला बसलो होतो. पाण्याच्या प्रवाहाला कापत बोट पुढे पुढे जात होती. आजूबाजूला पसरलेल्या सदाहरित वनांनी बहरलेल्या डोंगर रांगा सकाळच्या कोवळ्या उन्हात जणू काही पहुडल्या होत्या असं वाटत होतं. त्यांचा हिरवा रंग , फेसाळणारया पाण्याचा शुभ्र निळसर रंग आणि वर अथांग पसरलेल्या आकाशाचा निळा रंग इतके लोभस वाटत होते कि जणू काही क्षणभर मला हरवायला झालं. पाण्यातल्या छोट्या बेटांना वळसे घालत पुढे जातानाच बोटीला वासोट्याच पाहिलं दर्शन झालं. पाण्यात पडलेलं त्याचं प्रतिबिंब कॅमेरा मधे टिपलं. गर्द झाडीची चादर घेऊन तो आमच्या सारख्या अनेक भटक्यांची वाट बघतोय कि काय असं क्षणभर वाटून गेलं. थोड्याच वेळात आमचा कोयना  अभयारण्याचं ( WLS) प्रवेश होणार होता. बोट काठाला लागली आणि आम्ही सगळे जंगलातल्या काठावरच्या त्या ओल्या जमिनीवर पाउल ठेवलं. समोर अभयारण्याचं प्रवेश द्वार दिसत होतं. ट्रेक सुरु करण्या पूर्वी गोल रिंगण करून आम्ही एक एक करत सर्वांची ओळख करून घेतली. निनाद ने आम्हाला गडाची आणि ट्रेक ची थोडी माहिती पुरवली.
साधारण ७५% ट्रेक हा घनदाट जंगलामधून असल्याने उन्हाचा त्रास होणार नव्हता आणि दुसरा फायदा म्हणजे जंगलातून जाताना कापलेल्या अंतराचा सुद्धा अंदाज येणार नव्हता. कोयना अभयारण्य ( सह्याद्री व्याघ्र प्रकल्प ) निसर्ग परिचय केंद्रात नावांची एन्ट्री करून मेट इंदवली मधून आम्ही पुढे निघालो. निघतानाच सगळ्यांचा एक ग्रुप फोटो काढून झाला. जंगलामध्ये शिरताच अंगावर गार वाऱ्याची झुळूक आली. निसर्गाकडे असलेल्या असंख्य भाषांपैकी ही सुद्धा एक भाषा असावी असं मला वाटून गेलं. रोज अंगावर AC चं गार वारं झेलत बसणाऱ्या निर्ढावलेल्या शरीराला आज मात्र या एका नैसर्गिक अनुभवामुळे शहारून सोडलं होतं. 

 
आपण जणू काही हिरव्या गार गुहेमधून प्रवास करतोय कि काय असं वाटण्या इतपत आजूबाजूला पसरलेली झाडी ,आकाशातल्या सूर्याची मधून मधून डोकावणारी अल्लड कोवळी किरणे , पायाखाली तुडवल्या जाणाऱ्या वाळलेल्या पानांचा होणार आवाज, त्यात मधेच कुठल्याशा पक्षाने दिलेली सुमधुर तान , पुढे चालत असतानाच कुठेतरी झाडी मधे होणारी कुजबुज , वाटेत मधेच पावसाळ्यात उन्मळून आडवं पडलेलं झाड  हे सगळं अनुभवताना मनाची अवस्था ही वेडीपिशी झाली नसती तरच मला नवल वाटलं असतं. वाटेत मधे एक दगडांचा आडोसा करून उभं केलेलं हनुमान आणि गणपतीचं मंदिर लागलं. तिथेच जंगलातून वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह होता. पाण्याचा तळ दिसेल इतकं निर्मळ ,नितळ आणि तितकंच थंड गार पाणी असलेल्या त्या प्रवाहात आम्ही सगळ्यांनी मस्त पैकी तहान भागवली. थोडं विसावून आम्ही सगळे पुन्हा चालू लागलो. नागेश्वारला जाणाऱ्या वाटेपाशी पोहोचून पुन्हा एकदा दुसरा विसावा घेतला, अमृताने आम्हाला तिने आणलेल्या तिळाच्या वड्या दिल्या. मी बरोबर आणलेले आवळे दीपक, अमित आणि सतीश ला देऊन आम्ही पुन्हा शेवटचा टप्पा पार करायला निघालो. साधारण १ च्या सुमारास किल्याची तटबंदी दिसली आणि आम्ही ५ मि. मधे वर पोहोचलो. मागे वळून पाहताच आम्हाला बोटीने सोडलेली जागा खूप लांब अंतरावर दिसत होती. आणि मधे दूर दूर पसरलेलं कोयना अभयारण्य दिसत होतं. ज्ञानेश्वरी नुसार वासोटा या शब्दाचा अर्थ “ आराम करण्याची जागा ( resting place) “ असा होतो इथे पसरलेली इतकी शांतता, येण्याजाण्यासाठी फक्त जलमार्ग हाच एक पर्याय आणि निसर्गाने दिलेलं सदाहरित वनांचा वरदान या सगळ्या गोष्टी सुद्धा तो अर्थ सार्थकी लावतात हे मनोमन पटल. 


गडावर पोहोचताच हनुमानाच्या मंदिर समोर आम्ही सर्व जण टेकलो . पण पोटात कावळे ओरडू लागल्यामुळे लगेचच मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या पाण्याच्या टाकी जवळ सावलीला आम्ही जेवणाचा बेत करायचं ठरवलं. मस्त पैकी पराठा, काकडी, कांदा, दही, tomato sauce  असा मेनू पोट भर हादडून थंडगार पाणी पिऊन आम्ही आमचे सगळ्यंचे आत्मे शांत केले. जेवताना अमृताने १-२ शेर ऐकवले पण ते ऐकून कळण्याच्या पलीकडे आम्ही गेलो होतो इतकी भूक लागली होती. सगळ्यांच खाऊन होताच आम्ही बाबुकड्या कढे निघालो. बाबुकड्या वर येताच समोर पसरलेला जुना वासोटा दिसतो. बाबुकड्याच्या  समोरचा “ U “ आकाराचा कडा पाहून कोकण कड्याची आठवण होते. दोन्ही बाजूने येणारा गार वारा हवा हवासा वाटत राहतो. आपण गुंग होऊन फक्त त्या कड्या कडे आणि दूर दूर पसरलेल्या सह्याद्रीच्या डोंगर रांगांकडे पाहत बसतो. प्रत्येक ट्रेक मधे येणारा सार्थकी क्षण मला इथे येता क्षणीच गवसला होता. तो कडा आणि त्याचं ते निसर्ग दत्त रूप डोळ्यात भरून घेतलं. 
इथेच निनाद ने आम्हाला वासोट्याचा थोडा इतिहास सांगितला.  जुन्या इतिहासातल्या लेखा नुसार शिवाजी महाराजांनी जावळी वर कब्जा केल्यानंतर वासोटा जिंकला. पण हे खरंतर शिवाजी महाराजांनी जावळी आणि कोकणातले इतर किल्ले काबीज केले पण वासोटा त्यांच्या हाती आला नाही. पण जेव्हा शिवाजी पन्हाळ गडावर अडकलेले होते तेव्हा त्यांनी त्यांच्या सैन्यातील एक तुकडी वासोट्याला पाठवून तो ६ जुन १६६० साली जिंकला हे सत्य आहे. 
बाबुकड्या वरून आम्ही मग माची कडे निघालो. माचीवरून होणारं सह्याद्रीच दर्शन हा एक खरोखर हेलावून टाकणारा आणि आपल्याला आपल्या छोटे पणाची जाणीव करून देणारा अनुभव होता. वाटेत महादेवाच मंदिर दिसतं ते ओलांडून पुढे जाताच आपल्याला दुरवर नागेश्वर च्या गुहा दिसू लागतात. दुर्बिण असेल तर त्या नीट पाहता येऊ शकतात. तेव्हाच दुसऱ्यांदा येऊन नागेश्वर करायचं असं मी मनात ठरवून टाकलं. ४.३० ला बोट बोलावली असल्यामुळे आम्हाला लवकर खाली उतरणं भाग होतं. ३.३० च्या आसपास आम्ही उतरायला सुरुवात केली. निरव शांततेत खाली उतरताना मन खरंच आतून शांत झालं होतं. 


भरभर खाली उतरू लागल्यामुळे मी, दीपक, अमित बरेच पुढे आलो होतो. मी मधेच पाणी पिण्या साठी थांबल्यामुळे थोडा मागे पडलो. मागचे लोक अजून बरेच दूर होते. आजूबाजूला पसरलेलं घनदाट जंगल आणि पायवाटेवर एकाकी उभा असलेला मी. पायाची हालचाल केली तरी पाल्यापाचोल्याचा होणार आवाज मला नकोसा वाटत होतं. आयुष्यातले हे एकांताचे क्षण मला खरोखर खूप दुर्मिळ वाटतात. गर्दीत असून माणूस एकटा असू शकतो पण इथे मी खरोखर एकटा होतो. स्तब्ध उभं राहून मी जंगलाकडे डोळे भरून पाहिलं. कदाचित कित्येक छोटेमोठे जीव मलाही पाहत असतील. तो एकांत भीतीदायक नव्हता, कदाचित तो एकांत माझाही नव्हता तो या जंगलाचा होता मी फक्त त्याचा साक्षीदार होतो इतकंच. हेच खरं तर निसर्गाचं दान. कदाचित ते घ्यायला आपल्याला सवड नसते तो नेहमी तयारच असतो आपण मात्र दूर पळत राहतो गर्दीकडे. तीच गर्दी मागे सोडताच तो मला सामोरा आला आणि मला क्षणभर का होईना पण त्याच्यात सामावून घेतलं असं मला वाटून गेलं.
पाण्याच्या ओढ्यापर्यंत पोहोचताच मन पुन्हा एकदा त्या पाण्याच्या स्पर्शासाठी आसुसल. मी आणि दीपक ने पाण्यात तोंड बुडवून मनसोक्त पाणी प्यायलो. पोटात एक थंडगार गोळा आला. पाण्याकडे पाहत तिथल्याच एका खडकावर बसलो. थोड्याच वेळात मागे असलेले सगळे तिथे आले. सगळ्यांनीच त्या थंडगार पाण्यात हातपाय बुडवले, मनसोक्त प्यायले आणि तृप्त झाले. तिथून निघून पुन्हा आम्ही सगळे जंगलातून बाहेर आलो .समोरच बोट उभी होती .बोटीकडे जातानाच आम्हाला बिबट्याच्या पायाचे ठसे त्या काठावरच्या ओल्या मातीत दिसले . काही मोठे होते तर काही चिमुकले होते कदाचित रात्री मादी आणि तिची पिल्ले पाणी पिण्यासाठी येऊन गेले असावेत. त्याचे फोटो काढले आणि बोटीवर चढून परतीच्या प्रवासाला लागलो. 

 
वासोट्याच्या मागे सूर्य खाली उतरला होता. सावल्या तिरक्या झाल्या होत्या. बोट सुरु झाली. मन मात्र अजूनही त्या घनदाट झाडीतच राहिला होतं. क्षणभर डोळे मिटून पुन्हा एकदा त्याला साद घातली , बोटीच्या कठड्यावर डोकं टेकवून पाण्याकडे बघू लागलो. प्रवाह अजूनही तोच होता पण कदाचित सकाळचं पाणी पुढे गेलं असावं. पाणी दुसरं असलं तरी ते अजूनही तितक्याच निरागसतेनं हसत होतं. काठावरची तीच हवीहवीशी वाटणारी गर्द झाडी मला दूर जात होती. वासोटा दिसेनासा झाला. लाल तांबडा सूर्य दिसत होता. संध्याकाळची किरणे अंगावर पडत होती आणि दूर दिसू लागला तो माणसांनी गजबजलेला जिवंत किनारा.
बोट किनाऱ्याला लागली आम्ही सगळे खाली उतरलो.  जवळच्याच हॉटेल मधे जाऊन गरम गरम चहा आणि बटाट्याची भजी खाल्ली. आणि पुन्हा सुरु झाला तो पुण्याच्या दिशेने परतीचा प्रवास. आणि सगळ्याच ट्रेक मधे होतो तसा तो परतीचा प्रवास हा संगीतमय झाला. जुनी नवी गाणी गात , लता, आशा, रफी, किशोर, सोनू, शंकर, संदीप सलील, गुलझार, पंचमदा , अशा अनेक आवडत्या गायकांची कवींची गाणी आळवत मी, सतीश, अमृता, योगेश काका, शेवटी शेवटी केदार, अनिल, निनाद सगळ्यांनी धमाल केली. अखंड ३ तास गाणी गात पुण्यात पोहोचलो तेव्हा गळा अर्थातच आपल्या असण्याची जाणीव करून देऊ लागला होता. सगळ्यांना बाय करून घरापाशी उतरलो खरंतर असे प्रवास कधी संपू नये असं वाटत असतं तेव्हाच ते संपतात. पण काळ पुढे जातोच कारण त्याच्या साठी शाश्वत काहीच नसतं.  आजच्या ट्रेक ने पुन्हा काही नवीन मित्र जोडले होते. संपूर्ण दिवसाच्या आठवणी मनात साठवून अनुभवलेल्या अगणित क्षणांना मनाच्या कुपीत बंद करून घरी पोहोचलो. अजून एक संपन्न दिवस आणि मनासारखा ट्रेक पूर्ण झाल्याचं समाधान मनाला मिळालं आणि पुढच्या प्रवासाला लागणारी उर्मी सुद्धा. 
                                                                   आनंद