Powered By Blogger

Saturday, November 10, 2012

पुणे बस डे ( Pune Bus Day ) - १ नोव्हेंबर





काही गोष्टी फक्त पुण्यातच होऊ शकतात. कारण एक सांस्कृतिक शहर म्हणून पुण्यालाच तो अधिकार आहे. जसं कि थंडीची पहिली चाहूल पुण्यालाच लागते आणि वर्तमानपत्रात बातम्या झळकतात “ पुण्यात गुलाबी थंडी “, त्याच प्रमाणे एखाद्या जागतिक बातमी वर पुण्यातून सामुहिक टिप्पणी होते “ पुणेकरांचा पाश्चिमात्य देशातल्या अमक्या ढमक्याला ला सामुहिक विरोध “,  पुणेरी पाट्या तर जगभरात प्रसिध्द आहेतच, मग कुठे पुणेरी मिसळ, पुण्यातल्या खड्यांसाठी झालेली लाक्षणिक उपोषणे आणि मोर्चे, कुठे पाणी कपात , मग त्यासाठी  हंडा मोर्चा, कुठे LPG साठी लाटणे मोर्चा, अशा एक का दोन हजार घडामोडी फक्त पुण्यात घडतात. एक सजग नागरिक म्हणून इथे प्रत्येकाच्या मताला महत्व असतं किंबहुना प्रत्येकाने आपणहूनच ते गृहीत धरलं आहे. आपलं मत “आहे तसं” मांडायला इथे कुणाची परवानगी मुळीच लागत नाही.
एकेकाळी सायकलींचे शहर अशी ओळख असलेलं पुणे काळाच्या ओघात खूप पुढे आलं. शहरीकरणाला सुरुवात झाली आणि पुण्याने सुद्धा प्रत्येक नवीन गोष्ट आत्मसात केली. काळाबरोबरच वाढती लोकसंख्या आणि बदलत्या जमान्या बरोबर पुणं बदलत गेलं. पण एक गोष्ट मात्र तशीच राहिली आणि ती म्हणजे पुणेरी बाणा. तो कदाचित इथल्या मातीतच रुजलेला असल्यानं टिकू शकला. पुण्यात कुठलीही गोष्ट नुसतीच घडत नाही तर ती इथल्या प्रत्येक माणसाच्या दृष्टीकोनातून उलगडते आणि म्हणूनच इथली बातमी ही पुणेकराला उद्देशून असते. जसं पुणेरी थंडी,  पुणेकरांचा उकाडा, पुणेकरांची पावसाने उडवलेली तारांबळ , पुणेकरांचा गणेशउत्सव, प्रदूषणाने ग्रासलेले पुणेकर अशा संज्ञा फक्त पुणेकरांच्या बाबतीतच बोलल्या जातात.  पुणे आणि पुणेकर यावर जितकं बोलू तितकं कमीच पडेल आणि मुळात मी पुणेकरच असल्यामुळे फार बोलणं सुद्धा उचित ठरणार नाही. पण शेवटी माझा मुद्दा एवढाच आहे कि पुण्यात घडणारी प्रत्येक गोष्ट ही विशेष असते आणि इतरांना तिचा महत्व पटो न पटो पुणेरी माणसाच्या दृष्टीने ती महत्त्वाचीच असते.
तर अशीच एक घटना १ नोव्हेंबर रोजी पुण्यात घडली आणि पुणेकरांनी घडवून आणली आणि ती म्हणजे “पुणे बस डे -“   



हळूहळू पसरत चाललेल्या पुण्यात दिवसेंदिवस वाहनाची संख्या वाढतच आहे. वाढलेल्या वाहनांच्या तुलनेत वर्षानुवर्ष तेवढ्याच लांबीचे असलेले रस्ते अपुरे पडणं साहजिक आहे. त्यामुळे पुण्यातल्या प्रत्येक रस्त्यावर ट्राफिक जाम हा नेहमीचाच प्रकार होऊन बसला आहे. ढिसाळ सार्वजनिक वाहतूक आणि अरुंद रस्ते या मुळे सर्वसामान्य माणूस ( पुणेकर ) त्रस्त होणे ही रोजचीच बाब झाली आहे. पुण्यामध्ये ३१ लाख वाहने आहेत आणि मजेशीर बाब अशी आहे कि मुंबई मधे २१ लाख वाहने आहेत. पुणे वाहनांच्या संखेत भारतात सातव्या क्रमांकावर आहे .
“सकाळ टाईम्स” च्या पुढाकारातून आणि अनेक सामाजिक संस्था, प्रायवेट क्षेत्रातील कंपन्या , सरकारी यंत्रणा आणि पुणेकरांच्या सहकार्यातून पार पडलेला सामाजिक उपक्रम म्हणजे “पुणे बस डे”.  गेले १-२ महिने केलेली तयारी आणि सर्व स्तरातून लाभलेला हातभार या मुळे हा दिवस नक्कीच उत्तम रित्या पार पडला यात शंकाच नाही. या दिवसासाठी PMPML ने त्यांच्या ताफ्यामध्ये १५०० गाड्यांची भर घातली होती, नवीन ३८ मार्ग, काही मार्गांवर दर ५ मिनटाला बस, काहींवर दर १० मिनिटाला बस असे अनेक बदल केले गेले होते.  
उपक्रमात सहभागी होऊन आपणही बस ने जायचे असे ठरवूनही मनात बऱ्याच शंका होत्या. पण तरीही मनाचा ठिया करून जायचे ठरवले. नऱ्हे ते विमाननगर या मार्गावर थेट बस नसल्यामुळे अर्थात २-३ बस बदलत जाणे भाग होते. सकाळी ९.४५ ला घर सोडले आणि सिंहगड रोड ला येईन बस थांब्यावर थांबलो. अर्थात बस डे मुळे सगळीकडे उत्साहाचं दिसत होतं. रोजच्या पेक्षा रस्त्यावर कमी वाहने दिसत होती. साधारण १० च्या आसपास तिथून मी डेक्कन ची बस पकडली. परंतु ती बस कर्वेनगर मार्गे जाणारी  निघाली. त्या मुळे ती बस मधेच सोडून मग दुसरी डेक्कन ला जाणारी बस पकडली. साधारण १०.४५ च्या आसपास डेक्कन बस थांब्यावर पोहोचलो. डेक्कन थांब्यावर जणूकाही जत्राच भरली होती. पुणे बस डे चे झेंडे, पताका, पाट्या अशी जय्यत तयारी दिसत होती. मिनिटाला एक बस थांब्यावर येत होती. वाघोलीच्या बस ची चौकशी केली तर ती दर १५ मिनिटाला आहे असे कळले. साधारण तेवढ्याच वेळाने वाघोलीची बस आली आणि मी आनंदलो. चटकन बस मधे बसलो आणि निश्वास सोडला. आता कुठलीही बस बदलण्याची गरज नव्हती. डेक्कन, पुणे महानगर पालिका , स्टेशन अशा मार्गने  बस निघाली. रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणात बस दिसत होत्या. पण ट्राफिक कुठेही अडून बसत नव्हते. पण स्टेशनला पोहोचताच हे चित्र बदलले. रेल्वे स्टेशन बाहेर अरुंद रस्त्यामुळे साधारण ५० बस चौकात खूप मंद गतीने पुहे जात होत्या. माझीही बस त्यात अडकली. २० मिनिटे हा खेळ झाल्यानंतर एकदाची बस बंड गार्डन च्या रस्त्याला लागली. साधारण अजून २० मिनिटानी ऑफिसला पोहोचलो. खूप फिरून आल्यामुळे अर्थात वेळ दुप्पट लागला होता. पण दमल्या सारखं वाटत नव्हतं. पण अर्थात उशीर झाल्यामुळे अर्ध्या दिवसाची सुट्टी मात्र गेली होती. कदाचित मी थोडं लवकर निघालो असतो तर ही सुट्टी वाचू शकली असती. पण संपूर्ण प्रवासात अनेक माणसे भेटली, बस डे या विषयवर अनेक मतमतांतरे झाली. कुणी फक्त आजचा दिवस  अनुभवण्यासाठी कारण नसताना प्रवास करत होतं, कुणी रोज प्रवास करणारं होतं, कुणाला आपल्या मार्गावरची थेट बस मिळाल्याने आनंदी होतं, कुणाला बस मधे बसून प्रवास करण्याचा आनंद होता. कुणी या सगळ्यातही कुरकुर करत होतं. उशीर लागूनही मी ही खुश होतो.




दिवसभर ऑफिस मधे काम झाल्यानंतर संध्याकाळ झाली आणि मग आठवले आपल्याला आज बस ने घरी जायचे आहे. पटपट कामे उरकली आणि साधारण ८.३० – ९ च्या आसपास ऑफिस सोडलं. नगर रोड ला येऊन म.न.पा. ची बस पकडली. साधारण अर्धा पाऊण तासात म.न.पा. ला पोहोचलो. पुलावर चढून शनिवार वाड्याकडे पळत सुटलो. पण तिथे पोहोचताच असं कळलं कि माझी शेवटची बस नुकतीच गेली. बस थांब्यावर बरेच वाहक आणि चालक उभे होते. त्यांनी मला सिंहगडच्या दुसऱ्या बस मधे बसायला सांगितलं. बघता बघता बस बरीच भरली आणि निघाली सुद्धा. बस मधल्या कंडक्टर ला आजच्या दिवसाची विचारपूस केली तेव्हा कळलं कि त्यांचा दिवस आज १६ तासांचा होता. पहाटे ५ ला सुरु झालेला दिवस ११ ला संपणार होता. मी मनोमन त्यांचे आभार मानले. बस सिंहगड रोड ला लागली.
खिडकीतून गार वारा येत होता. आजचा दिवस संपला होता. मनात विचार आला उद्या काय ? पुन्हा जुनेच रस्ते , तीच वाहने, तोच वाहनांचा बाजार त्यातलंच माझंही एक वाहन. आजच्या दिवसाने प्रश्न संपले नव्हते पण उत्तर दिलं होतं.  पुणेकरांनी एकजूट होऊन पार पडलेल्या दिवसाचं कौतुक होईलही पण रोज असं घडण्यासाठी दूरदर्शी विचार आपण कधी करणार आहोत. ट्राफिक मधे अडकल्यावर एकमेकांना शिव्या घालत, भोंग्या सारखे हॉर्न वाजवत दाट ओठ खाताना आपणही त्या ट्राफिक चा हिस्सा आहोत हे सगळेच कसे विसरतात. रस्त्यावरचा सिग्नल लाल असताना मधेच एखादी गाडी जोरजोरात पुढे जाते तिला पाहून अजून ४ गाड्या मागे धावतात. पण रस्ता ओलांडणारी छोटी मुले, म्हातारी आजी, काठी घेतलेले आजोबा, भाजीची पिशवी हातात घेऊन धावणारी गृहिणी  कुणालाच कशी दिसत नाहीत. या सगळ्यांच्या जागी प्रत्येकाला आपली आई, भाऊ, आजी आजोबा बाबा का दिसू नयेत. इतकी आपल्याला कशाची घाई असते ? शिस्त लावायला दरवेळी नियम असतात पण चांगलं वाईट कळण्यासाठी बुद्धी पुरेशी असते.
दरवेळी नुसती तक्रार करून भागत नाही. बदल आपोआप होत नसतो. आणि बऱ्याचदा तो बोचणारा असतो. पण तो अंगी बाणवून त्याची सवय लावून घेणं याला खरी हिम्मत लागते. आणि बदलायची वेळ आली आहे. चला तर मग बदल घडवूया , पण आधी स्वतः त......!  

                                                                       .......आनंद

                                                                  १० नोव्हेंबर २०१२

  
 

1 comment:

  1. काही मूर्ख लोकांनी या दिवसाला चक्क विरोध केला. केवळ कुठल्या तरी एका वृत्तपत्राने आयोजित केलाय किवा कुठल्या तरी एका राजकीय पक्षाचा याला पाठींबा आहे म्हणून काही लोक सहभागी झाले नाही. PMPML सहभागी होऊनही, आयोजक 'सकाळ' व्यतिरिक्त कुठल्याही वृत्तपत्राने दाखल घेतली नाही.
    चांगले काम तुमचा शत्रू जरी करत असेल तरी त्याला विरोध करू नये, असे वाटते !
    असो..

    ReplyDelete