Powered By Blogger

Saturday, August 24, 2013

मनातून - भाग १






मनसोक्त रडावं वाटलं, खूप भरभरून बोलावं वाटलं, निस्तब्ध शांतता अनुभवावी वाटली, जोरात आरोळी ठोकावी वाटली , खूप मोठं काहीतरी करावं वाटलं तर माणसाने समुद्राकडे जावं. जगाच्या पाठीवर त्याच्या इतकं मोठं कुणी नाही. आणि मोठं असूनही जमिनीशी असलेलं नातं जपणारं सुद्धा दुसरं कोणी नाही. विस्तीर्ण क्षितीज समोर पसरलेलं असून सुद्धा फक्त भरती ओहोटीला हाताशी धरून खळाळणारा समुद्र पहिला कि मला नेहमी प्रश्न पडतो कि मोठे पण नक्की कशात असतं आणि ते टिकून ठेवणं खरंच इतकं अवघड असतं का ? खळाळनाऱ्या लाटांनी जिवंतपणाची साक्ष देणारा समुद्र मला कित्येक पटीनी महान वाटतो.  
मग उमगतं कि समुद्राला मोठेपण मिळत ते समर्पणातून. मनातला अहंकार, स्वार्थ बाजूला सारून आयुष्याला साद घालत राहिलं कि ते आपोआप मिळत. प्रत्येकवेळी आलेल्या क्षणाला सामोरा जाताना त्याचा अर्थ आपणच लावावा लागतो. तिथे दुसरा पर्याय नसतो.  तरीही प्रत्येक गोष्टीचा अर्थ आपणच दर वेळी लावायचा सुद्धा कंटाळा येतोच की , तेव्हा मग समोरच्या व्यक्तीने आपणहून हात दिला तर उगाचच त्या मोठेपणातून मुक्त झाल्यासारखं वाटतं.
अशा मुक्तेतेच्या क्षणांची ओढ जेवढी जास्त तेवढे तुम्ही आनंदी होता आणि पण जो पर्यंत जीवाभावाचं माणूस तुमची तगमग ओळखत नाही तो पर्यंत मात्र मोठेपणाचं ओझं तुम्हालाच वहावं लागतं. हे ओझं जितकं जास्त तितके तुम्ही एकाकी. म्हणून आयुष्यात आपलं माणूस लागतं. जिथं व्यक्त होता येईल असं. तिथे त्रयस्थ पणे पाहणाऱ्या माणसा सारखं परकेपण नसतं. तर स्वतःहून दिलेली साद असते. आपल्या माणसाला जेवढी लवकर ही साद ऐकू जाईल तितकं चांगलं. नाहीतर ऐकू येत असून बहिरेपण आलेली माणसे कधीच दुसऱ्याच ओझं वाहू शकत नाहीत.
माणूस कधी कधी अबोला धरतो तेव्हा प्रत्येकवेळी जगबुडी होईल इतकी मोठी कारणं नसतातही खरतरं तेव्हा माणसाला हवी असते आपल्या माणसाने ओझं कमी करण्यासाठी दिलेली साथ. इतरांना कळत नसलं तरी मला कळतंय हा दिलासा देणारं माणूस. ती साथ मिळाली नाही की तो खट्टू होतो. चीडचीड करतो. आजूबाजूच्या लोकांना मात्र तो उगाच केलेला त्रागा वाटत राहतो. त्यातून तो अजून एकाकी होतो. अशातच मग गर्दीतून कोणी येऊन त्याला हात देतं. इतरांपेक्षा तो गर्दीतला हात त्याला जवळचा वाटू लागतो. मोकळं व्हायला, मुक्त व्हायला तो मदत करतो. आणि इतरांच्या पेक्षा ते माणूस आपल्याठाई खूप मोठं होतं. माणसाचा जन्म हा एक चमत्कार आहे तो काही उगीच नाही, साडेपाच सहा फुटाच्या देहाला चालवणार अदृश्य मन अजून कुणालाच उमगलं नाही कारण त्याचा ठाव लागणं केवळ अशक्य आहे.

आपल्या पोटात इतकं काही साठवून वरून मात्र सतत हसणारा समुद्र आणि माणसाचा देह या दोन्ही गोष्टी खरंतर सारख्याच आहेत. समुद्र स्थितप्रज्ञ राहून सगळं काही सहन करत राहतो मात्र माणसाला ते दरवेळी जमतच असं नाही.





                                                            आनंद
२४ ऑगस्ट २०१३