आज वसुबारस. दिवाळी आज सुरु
झाली. प्रकाशाचा उत्सव दिवाळी. अगदी लहान पणापासून दिवाळी सगळ्यांनाच आवडते. मलाही
लहान पण पासून दिवाळीचं खूप अप्रूप वाटे. पेपर संपवून कधी एकदा सुट्टी लागते असं
व्हायचं. किल्ले करणे, फटाके उडवणे, फराळावर डल्ला मारणे आणि आई आणि आजी बरोबर
चकल्या कडबोळे करणे , नुसती धमाल. लहानपणीची दिवाळी जशी वेगळी होती तशीच वय वाढता
वाढता दिवाळी जास्तच कळू लागली. फटाक्यांच अप्रूप जाऊन मग मला दिवाळी आवडू लागली
ती दिवाळीतल्या प्रकाश पसरवणाऱ्या पणत्यामुळे . पहाटेचा काळाकुट्ट अंधार असो किंवा मग तिन्ही सांजेचा मंद संधी प्रकाश असो पणत्या
लावल्या की सगळंच उजळून जायचं.
वाऱ्याच्या झोतावर डुलणारी पणतीची ज्योत कधी रागावून डोळे मोठे करून बघायची, तर कधी तुरुतुरु पळणाऱ्या लहान
मुली सारखी खुदकन हसायची , कधी स्वतःच्याच धुंदीत डोलायची ,तर कधी विझता विझता
पुन्हा उंच उभी राहायची, कधी गोलगोल गिरक्या घ्यायची, तर कधी शांत स्तब्ध भासायची.
मला मात्र कौतुक वाटायचं ते तिच्या या वेगवेगळ्या स्वभाव वैशिष्ट्यांच. प्रकाशाचा
उत्सव म्हणजे काय हे खरतरं तिनंच मला शिकवलं. कधी खिडकीत, उंबऱ्याच्या कडेला, तुळशी वृंदावनाजवळ, कधी
रांगोळी जवळ , कुठेही ठेवली की ती तिथली होऊन जायची. कधीकधी मला वाटायचं वर
बांधलेला आकाश कंदील पणतीला हिणवतोय पण पणती मात्र खूप नितळ पणे तेवत राहायची.
तिला न स्वतः बद्दल गर्व होता न इतरांबद्दल असूया. दिलेला काम मात्र ती नेटाने
करायची. एखाद्या घरासमोर तर हातात हात घालून पणत्यांची मोठी रांग जणू काही समूह
गान करते आहे असं वाटायचं , तर कुठे एखाद्या घराच्या कोनाड्यात एकटी तेवणारी पणती जणू
ध्यानस्थ बसलेली दिसायची.
एकदा मी वाऱ्याशी झुंज
देणाऱ्या एका पणतीला पाहिलं , इवल्याश्या वातीने ती सोसाट्याच्या वाऱ्याशी लढू
पाहत होती. मला वाटून गेलं कुठून येत असेल हे बळ तिच्यात ? मग कळल मुळात पणतीला हे
संकट आहे हेच कळलेलं नसतं, आपण विझलो तर आजूबाजूला अंधार पसरेल हे एकच ध्येय नकळत
तिला संकटांमधे तग धरून ठेवायला मदत करत होतं. स्वतःचं आयुष्य इतरांना अर्पण करून
तेवणारी पणती माझ्या नजरेत कधीच खूप मोठी झाली होती.
जसं समुद्राला, आकाशाला मोठेपण
आपोआप मिळत तसं नशीब पणतीच नव्हतं पण तरीही ती माझ्या ठाई मोठीच होती आणि अजूनही
आहे. आयुष्याच्या अनेक वळणांवर निराशेच्या अंधारातून तिची तेवणारी मंद वात आठवली
की पुन्हा नवा हुरूप येतो आणि मन पुन्हा पेटून उठते.
आता जग खूप बदललंय. शेकडो
आकाश कंदील, दिव्यांच्या माळा यांनी बाजारपेठा गजबजू लागल्यात . अनेक प्रकारच्या
पणत्या बाजारात मिळतायेत. लाईट वर चालणाऱ्या, लुकलुकणाऱ्या, आपल्याला हव्या तश्या
प्रकारे डुलणाऱ्या, एकाच पणतीत ३-४ किंवा १०-१२ वाती असणाऱ्या. अशा अनेक पणत्या
दिसतायेत. अशा दिव्यांनी अनेक घरं उजळून जात आहेत. प्रकाशाचा उत्सव खरोखर
दिपावणारा होत चाललाय.
मात्र या पणत्या बोलत नाहीत
त्यांना न वाऱ्याशी झुंज द्यावी लागते न तेल घालण्याची वाट बघावी लागते. मालकाने
म्हणेल तसं लुक्लुकायचं किंवा डोळ्यांची उघडझाप करायची इतकंच त्यांना जमतं. मालक
खुपच हौशी असेल तर एका पेक्षा जास्त रंगांच्या दिव्यांची आरास सुद्धा दिसते. पण जिथे
हुंकारच नाही तिथे संवादाचा प्रश्नच येत नाही. निर्जीव प्रकाशाच्या खेळण्यांनी
सगळी अंगणे हल्ली उजळून जातात. डोळे दिपवणारया दिव्यांच्या प्रकाशात पणतीचा प्रकाश
कोणालाच दिसत नाहीये.
हे सगळं असलं तरीही हरवत
चाललेत ते पणतीला उजळवणारे ज्योत पेटवणारे हात, दारातली पणती विझु नये म्हणून लक्ष देऊन तेल घालणारी
आजी आणि नातवंडं.
परवा असंच एकेठिकाणी शंभर
दोनशे दिव्यांची आरास दिसत होती ,यांत्रिक पणे तेवणारे निर्जीव दिवे खूप लोक
उत्सुकतेने पाहत होते. तेवढ्यात वीज गेली आणि यांत्रिक दिवे बंड पडले आणि सगळीकडे
अंधार पसरला. आता काय करायचं हा प्रश्न पडे पर्यंत जवळच्या घरा समोर असलेल्या पणतीचा
प्रकाश सगळ्यांना दिसला. त्या अंधारातही लक्ख प्रकाश पडावा असं वाटून गेलं. प्रकाशाचा
सोहळा खऱ्या अर्थाने साजरा झाला होता. शेवटी ज्योत कितीही छोटी असली तरी अंधाराला
सामोरं जाण्याचं बळ तिच्यातच असतं आणि म्हणूनच शेवटी तीच साऱ्या अंधाराचा ठाव घेते
आणि प्रकाशाला वाट करून देते.
हजार दिवे लावून आसमंत
उजळवून टाकण्यापेक्षा एक पणती लावून प्रकाशाला अंधारावर मात करू दिली तर तिचा
प्रकाश जास्त वेळ साथ देईल आणि आशेचे अनेक किरण अशी अनेक आयुष्य सार्थकी लावतील.
चला तर मग नवीन दीप लावूया पण असे की जे आपले मार्ग प्रकाशित करतील.
आनंद
३१ ऑक्टोबर २०१३