प्रेरणा आज तशी उशिराच निघाली , आधी तिला बँकेत जाऊन पैसे भरायचे होते आणि मग
तिथून लायब्ररीत जाऊन पुस्तकं बदलायची होती. आणि हे सर्व करून मग पुढे कामाला
जायचं होतं. कितीही उशीर झाला तरी हि दोन कामं करण आज आवश्यकच होतं कारण दोन्ही
गोष्टींची आज शेवटची तारीख होती नाहीतर दंड पडणार होता. लगबगीने तिने रस्ता
ओलांडला आणि चालत बँकेत पोहोचली. कोपऱ्यातल्या टेबलावर बसून ती स्लीप भरू लागली.
पटकन काऊटर वर जाऊन तिने पैसे भरले.
पलीकडच्याच लाईन मध्ये उभ्या असलेल्या उन्मेषच सहज लक्ष प्रेरणा कडे गेलं. पैसे
भरून प्रेरणा लगबगीने बाहेर पडली. ती बाहेर जाताच उन्मेष चं लक्ष टेबलावरच्या
छोट्या पिशवी कडे गेलं. प्रेरणा तिची पिशवी गडबडीत तिथेच विसरून गेली होती. उन्मेष
पटकन पुढे झाला आणि त्याने ती पिशवी उचलली आणि तो बाहेर पळत आला. पण तेवढ्यात
त्याने पाहिलं कि प्रेरणा रिक्षात बसून निघून गेली होती. त्याला काय करावे सुचेना.
नाव गाव काहीच माहित नसताना आता हि पिशवी त्या मुलीला कशी परत करणार हा प्रश्न
मनात घोळ घालत असतानाच त्याने पिशवी उघडून त्यात काही ओळखीचं सापडतं का हे पहावं
म्हणून ती उघडली. त्याच्या हाताला एक वही लागली त्यात दुमडलेल्या पानावर आजची
तारीख आणि आज करायच्या गोष्टींची यादी लिहिली होती. बँक १० वाजता, सुमेध लायब्ररी
१०.३० वाजता , निर्मिती पुस्तकालय ११ वाजता .. अशी यादी वाचतानाच त्याला वाटलं
यावरून आपण तिला गाठून तिची पिशवी परत करू शकतो.
आणि मग तो हि रिक्षातून लायब्ररी कडे निघाला.
इकडे प्रेरणा रिक्षातून लायब्ररी मध्ये पोहोचली. मोठी पिशवी खांद्याला
असल्यामुळे आपली एक पिशवी बँकेत विसरली आहे हे तिच्या अजूनही लक्षात आलेलं नव्हतं.
ती भरभर लायब्ररीत पोहोचली आणि पुस्तक जमा केलं. दोन कामं झटपट झाल्यानं तिला हलकं
वाटलं आता ती गावातल्या दुकानात निघाली. बाहेर आल्या आल्या बस मिळाल्यानं ती अजून
सुखावली. खिडकीतून बाहेर बघताना ती स्वतःशीच हसली. आपण किती उत्साहानी कामं करतो .
कदाचित आपण आपल्याला आवडणारं काम करत असल्यानं असं होत असेल असं तिला वाटलं.
आपल्या आयुष्याच्या नागमोडी वळणांनी आपल्याला खूप काही शिकवलंय , अगदी या क्षणीजरी
मरण आलं तरी आपल्याला काहीही वाईट वाटणार नाही पण जेवढा जास्त जगू ठेवढा अजून
चांगलाच आहे असे काहीतरी विचार तिच्या मनात चालू होते.
तिकडे उन्मेष लायब्ररीत पोहोचायच्या आधीच प्रेरणा तिथून निघून गेल्यामुळे
त्याचा हिरमोड झाला. आता शेवटी वहीच्या पानावर लिहिलेल्या गावातल्या पुस्तकांच्या
दुकानात जायला निघाला. त्याने आलेली बस पकडली. आपण खरतर या अनोळखी मुलीच्या मागे
तिची पिशवी द्यायला का जात आहोत हेही त्याला उमगलं नव्हतं पण त्या क्षणी वाटलं आणि
केलं असं काहीसं त्याचं झालं होतं. पण मुळात तिच्या चेहऱ्यावरच्या प्रसन्न
हास्याने त्याला भुरळ घातली होती.
प्रेरणा दुकानात पोहोचून तिने हवी ती पुस्तके घेतली आणि ती बाहेर पडली. उन्मेष
ची बस दुकानाच्या समोर थांबली. पळत पळत खाली उतरून त्याने दुकानाकडे पाहताच त्याला
लांब चालत जाणारी प्रेरणा दिसली. तो तिला गाठण्यासाठी मागे निघाला. प्रेरणा चौक
ओलांडून पलीकडे गेली. उन्मेष तिच्या पासून तसा बराच लांब होता पण ती त्याला दिसत
होती. प्रेरणा रस्ता ओलांडून अगदी छोट्या
बोळात शिरली. इथून पुढे आजूबाजूची वस्ती फारशी चांगली दिसत नव्हती. त्याचे पाय
थोडे अडखळले पुढे जावं कि नाही याचा त्याला प्रश्न पडला पण जिच्या मागे एवढ्या दूर
आलो ती नक्की कुठे चालली आहे याची त्याला उत्सुकता वाटू लागली होती. त्यामुळे खरतर
तो आता थोडा अंतर राखून चालू लागला. दोन छोट्या गल्ल्या ओलांडून प्रेरणा चाळी वजा
खोल्या असलेल्या इमारतीत जाऊ लागली. उन्मेष ते पाहून चांगलाच चपापला. ती वैश्या
वस्ती होती. क्षणभर आजूबाजूला बघताच त्याला गरगरून आलं आपण काय विचार केला होता
आणि हे काय निघालं असं त्याला वाटू लागलं पण तरीही त्या मुलीला भेटून पिशवी तिला
देऊन दोन शब्द सुनावूनच आपण इथून जायचं असं त्याने ठरवलं. तो जिन्याने वर आला.
आजूबाजूच्या स्त्रिया खूप वेगळ्या नजरेनं त्याच्या कडे पाहत होत्या. समोरच्याच
खोलीत प्रेरणा शिरल्याच त्याने पाहिलं होतं तो त्याच दिशेने चालत राहिला. दार
हाताने लोटून त्याने समोर पाहिलं. लहान मुलांच्या गराड्यात प्रेरणा बसली होती. तापलेल्या
जमिनीवर पाणी ओतल्यावर जशी गरम हवा बाहेर पडते तसं त्याचं काहीसं झालं . मुलही
तिला बिलगली होती. तिने आणलेली पुस्तके ती एक एक करून प्रत्येकाला देत होती.
उन्मेष तसाच उभा राहिला. त्याला काहीच कळेना. मनात विचारांचं काहूर माजला होतं खूप
कमी वेळात नाना प्रकारचे विचार त्याच्या मनात येऊन गेले होते. त्याची त्यालाच घृणा
वाटत होती आणि कीवही येत होती. तेवढ्यात प्रेरणाच लक्ष त्याच्या कडे गेलं. मुलांकडे
वळून त्यांना काही सूचना करून ती उठून त्याच्याकडे आली. तो भानावर आला.
माझ्याकडे काही काम आहे का ? तिने विचारलं . हो तसच काहींसं त्याने अडखळत
उत्तर दिल. आणि हातातली पिशवी पुढे केली. उन्मेषने सकाळ पासून ची सगळी हकीकत तिला
सांगितली. आणि तिच्या विसरलेल्या पिशवी साठी तो कसा इथे पोहोचला हेही सांगितलं. प्रेरणा
ने त्याचे खूप आभार मानले आणि आपण कसे विसरभोळे आहोत हेही मान्य केलं. दोघांनी
एकमेकांची नावे एकमेकांना सांगितली.
प्रेरणाला या वस्तीत शिरताना पाहून त्याच्या मनात आलेले विचार, नंतर आपण हिला
सुनावून मगच इथून जायचं वगैरे सगळं त्याने तिला सांगितलं. प्रेरणाला ते ऐकून गम्मत
वाटत होती आणि जग गोष्टी कशा पाहता हे हि तिला पुन्हा उमगत होतं. तिला अर्थातच हे
नवीन नव्हतंच.
शेवटी प्रेरणाला बोलणं भागच पडलं पुन्हा पुन्हा भूतकाळ चार लोकांसमोर उगाळत
बसावा हे खरतर तिला अजिबात आवडायचं नाही पण इथे तिला का कुणास ठावूक उन्मेषचा
प्रामाणिकपणा पाहून तिला सांगाव वाटलं.
प्रेरणा म्हणाली, मुळात मी इथे का ?, या प्रश्नापेक्षा हि वस्ती इथे का हा
प्रश्न लोकांना पडायला हवा. तुला म्हणून सांगते उन्मेष , (न कळत तिने त्याच्या
नावाचा एकेरी उल्लेख केला) मला जन्मतःच एच.आय.व्ही आहे. माझ्या वडलांकडून तो आईला
आणि मग माझ्या जन्मानंतर मला तो फुकटच मिळाला. पूर्वीच्या काळात त्यांनी केलेल्या
कुठल्यातरी चुकीची शिक्षा हि अशी आम्हा सगळ्यांना मिळाली. आई आणि बाबा दोघेही
पंधरा वर्षापूर्वीच गेले. मी एका संस्थेत वाढले. तिथल्याच एका शिक्षकांच्या मदतीने
पुढे कॉलेज केलं. खरतर जगण्याची इछाच नव्हती पण दर वर्षी अजूनही माझ्यासारखे
जन्मतःच एच.आय.व्ही असलेली लहान मुलं संस्थेत येणं काही बंद होत नव्हतं, मग ठरवलं
जेवढं जगेन तेवढं सार्थकी लावेन. आता या वस्तीत येते या बायकांच्या मुलांच्या
शिकवण्या घेते. इथल्या बायकांना शिकवते आयुष्याचं मोल समजावते. आपल्या चुकीमुळे
कुणाचे संसार कसे उध्वस्त होतात हे जेव्हा त्या बायकांनी पाहिलं तेव्हा त्याही
ढसाढसा रडल्या. पण मी म्हटलं रडून काही होणार नाही बदल घडवावा लागेल. एकदा धंद्यात
पडलं कि बाहेर येता येत नाही वगैरे गोष्टी खोडून काढत आम्ही इथल्या ४ मुलीना बाहेर
शिक्षणाला पाठवलं त्या आता इकडे कधीच फिरकायच्या नाहीत. मी हि किती जगेन हे मलाही
माहित नाही कदाचित फार फार तर दोन चार वर्ष पण मला ती खूप मोलाची वाटतात अजून खूप
काही करायचय.
उन्मेष ऐकून स्तब्ध झाला होता. त्याला काय बोलावं हेच कळेना. त्याची घालमेल बघून
प्रेरणा म्हणाली, तू वाईट वाटून घेऊ नकोस बरीच लोकांना दुसरी बाजू माहित नसते
त्याने लोक माझ्या बद्दल असा विचार करतात पण त्याने आता काहीच फरक पडत नाही.
गर्दीत आणि एकटी असल्यावर मी फक्त “मी” असते. त्यात माझ्याकडे वर्ष आहेत कमी आणि
काम आहे खूप त्यामुळे काही गोष्टीना बगल देऊन पुढे जाण भागच आहे. तेच मी करते.
ज्यांच्याकडे आहेत ७०-८० वर्षे त्यांनी खुशाल करावा इतरांच्या आयुष्याबद्दल
चांगल्या वाईट चर्चा मला या जन्मी ते थोड अवघडच आहे. असं म्हणून ती खळखळून हसली.
एक एक कप चहा घेऊन प्रेरणाला निरोप देऊन उन्मेष बाहेर पडला. त्याला आजूबाजूची
लोकं खुजी वाटत होती आपणही त्यातलेच आहोत हे हि त्याला कळत होतं. आयुष्याची
परिमाणं कशी बदलतात हे त्याने आज नुसता अनुभवलच नव्हतं तर प्रत्यक्ष पाहिलं होतं.
अमक्या वर्षी हे करू तमक्या वर्षी हे करू असं ठरवणारी कित्येक माणसे त्याने पहिली
होती अशा लोकांची मोठ्ठाली आयुष्ये त्याला शुल्लक वाटू लागली होती. जी गोष्ट
माणसाकडे मुबलक असते त्याची किंमत त्याला नसते हेच खरं आणि आयुष्यचं सार्थक करणारी
कामे माणूस नेहमीच कशी लांबणीवर टाकतो याचीही त्याला जाणीव झाली होती. आयुष्य
म्हटलं तर खूप मोठा शब्द आणि म्हटलं तर खूप छोटा. पण मग हे छोटं मोठं कसं ठरतं ? मुळात
ते आपण ठरवत असतो. मिळालेल्या वेळेचा काळाचा आपण किती आणि कसा उपयोग करतो यावर
आयुष्य जगण्याची गणितं अवलुंबून असतात. हो गणितच कारण ते एकदा चुकलं कि पुन्हा
सुधारता येत नाही.
प्रेरणाचं आयुष्य छोटं असलं तरी तिचीच गोष्ट खूप मोठी आणि खरी होती. आज आलेला आयुष्याची
नव्याने ओळख करून देणारा अनुभव मनात ठेवून तो गर्दीतून वाट काढत निघाला.
आनंद
२८ जून २०१४