Powered By Blogger

Sunday, November 30, 2014

आई बाप

आई बाप होण या सारखी जगात दूसरी आनंददाई गोष्ट नाही.नऊ महीने पोटात वाढवून जन्म देणारी आई आणि बाळाला पहिल्यांदा हातात घ्यायला चातका सारखी  आतुरतेने वाट पाहणारा बाप दोघेही तेवढेच भाग्यवान असतात.

गेले काही महीने इतके वेगळ्या प्रकारचे अनुभव देणारे होते की बस..
मग ती बाळाच्या पोटातल्या हालचालिचि पहिली चाहुल असो किंवा त्याने पोटातुन हातपाय मारून आपल्या हाकेला दिलेला प्रतिसाद असो , त्याला बाहेरून एकवलेल्या गोष्टी असोत किंवा गायलेली गाणी असोत. सगळच कसं आम्हा दोघांना नवं आणि विलक्षण अनुभूति देणारं होतं. ते दिवस कसे सरले हे खरंतर कळलंच नाही. म्हणता म्हणता तो दिवस आला आणि सारं घरदार त्या नव्या जिवाच्या जन्माकड़े डोळे लावून हॉस्पिटल मधे जमलं. हिला ऑपरेशन थेटर मधे नेलं आणि माझ्या कानाने आहे नाही ती सारी शक्ति एकवटून घेतली आणि फ़क्त पहीला "ट्या " कड़े एकवटली..! साडे सहाच्या दरम्यान तो कानावर पडला आणि बाहेर येउन सिस्टर ने मुलगा झाल्याची बातमी  दिली . लगेच एकमेकाना शुभेच्छा दिल्या गेल्या आणि फ़ोन सुरु झाले. माझी नजर मात्र बाळाला पहायला असुसली होती. थोड्याच वेळात तोहि क्षण आला.
पहिल्यांदा हातात घेतल्यावर कुणीतरी हलकी फुंकर मारावी अन मी हवेत तरंगायला लागाव अस काहीस झाल ,आजुबाजुचा विसर पडला आणि माझ्या काळजाचा ठोका चुकला. इवलेसे डोळे उघडून  मी मारलेल्या हाकेला त्याने साद दिली आणि माझ्या डोळ्यांच्या कड़ा आनंदून पाणावल्या खरया पण लगेच स्वतः ला सावरून घेत त्याला डोळे भरुन पाहिल आणि मनोमन धन्य झालो.
तो क्षण केवळ विलक्षण नव्हता तर एका नव्या अध्यायाची सुरुवात करणारा होता. नऊ महीने आम्ही फ़क्त "होणारे आई बाप" होतो त्या एका क्षणाने ते अंतर एका निमिषात संपवलं होतं. स्वप्न आणि सत्य यात खुप अंतर असतं असं म्हणतात पण कदाचित या एका क्षणाने स्वप्नाचं सत्यात झालेलं स्थित्यंतर प्रत्यक्षात डोळ्या देखत दाखवून दिलं होतं.

या नव्या अध्यायाला काही दिवसात महिना पूर्ण होईल. त्या चिमुकल्या जिवाने आमचं सारं आयुष्य व्यापून टाकलं आहे.
आता जेव्हा जेव्हा त्याची नजर मला शोधते तेव्हा तेव्हा मला सार जग ठेंगण वाटत. तो कधी हळुच गालात हसून पाहतो , कधी आठ्या आणुन मला खुणावतो, कधी इवल्याशा बोट़ात माझा हात पकडू पाहतो, तर कधी एक टक पाहत जणू माझ्या आत डोकावतो आणि शब्दा विना माझ्याशी संवाद साधतो. माझी अंगाई तुला जेव्हा झोपवते तेव्हा जीव् आनंदून जातो आणि बाप होण्याचा सार्थ अभिमान वाटतो.
बोबडं बोलून आम्ही दोघांनी त्याच्याशी साधलेला संवाद जरी एकतर्फी वाटत असला तरी त्याने दिलेले हुंकार थेट काळजात पोहोचतात.
हे सारंच कस अप्रूप वाटावं असं आहे. या अशाच काही पहिल्या क्षणांना आठवून जे सुचला ते लिहिलय फ़क्त तुझ्या साठी....:-)

पहिल रडू
पहिल हसू
पहिला स्पर्श
पहिला हर्ष..!

पहिली हाक
पहिली साद
पहिला हुंकार
पहिला प्रतिसाद..!

पहिला कटाक्ष
पहिली नजर
भुकेने व्याकुळ
पहिला गजर..!

पहिला स्वर
पहिला सुर
डोळ्याला आलेला
पहिला पुर..!

पहिली ओळख
पहिला विश्वास
पहिला काळोख
पहिला भास्..!

पहिली अंगाई
पहिल गाणं
तुझी निजही
सुरांचं देणं..!

पहिलं कौतुक
पहिला राग
क्षणभर झोपताच
आलेली जाग..!

रात्र शाळेतली
पहिली सभा
जागेपणीच
झालेली प्रभा..!

भरभर धावे
आता काळ
खोटे बोलू
लागे घडयाळ..!

पहिल सगळ
वाटे वेगळ
आता दिसे
जग आगळ..!

तुझ सार
तेच पहिलं
पहिले आम्ही
उरलो नाही..!

जन्म झाला
अमुच्या पोटी
दैवाचीच ही
कृपा मोठी..!

30 नोव्हेंबर 2014
आनंद