वर्ष संपता संपता खरंतर बऱ्याचदा ३१ डिसेंबर साजरा करत येणाऱ्या नवीन वर्षासाठी
काही संकल्प सोडले जातात. काही थोडेफार उत्साही जीव फारफार तर नवीन वर्षात काय
नवीन घ्यायचं , करायचं हे हि ठरवून टाकतात. काही नुसतेच संकल्प सोडणारे ती गोष्ट
फळास नेण्यासाठीचा भव्यदिव्य आराखडा सुद्धा बनवतात. थोडक्यात काय बहुतांश लोक पुढे
म्हणजेच भविष्याकडे पाहतात. सरलं वर्ष आणि आयुष्यात आलेले अनुभव तसे दुर्लक्षितच
राहतात. हा हल्ली आता फेसबुकने किंवा तसल्याच तस्सम सोशल वेबसाईट ने फुकटात बनवलेला
आपल्या सरल्या वर्षाचा गोड सुखावह स्लाइड शो किंवा व्हिडीओ म्हणजेच जर सरल्या
वर्षाचा आढावा, असं म्हणायचं असेल तर मग सगळेच या परीक्षेत पास होतील कारण तिथे
आपल्याला काहीच कष्ट पडत नाहीत कारण आपल्या आयुष्याचा रेडीमेड आढावा तिथे मिळतो. टेक्नोलोजी
ने आपल्याला आळशी केल्याचा हा आणखी एक पुरावा इतकंच. त्यात ना आपल्या भावनांचा
कल्लोळ असतो ना आपलेपणाची जाण.
रोजचं आयुष्य जगताना असे अगणित क्षण असतात ज्यांची नोंद फक्त आपल्या मनात होत
असते, आजूबाजूच्या जगाला कधीही कळू न शकणाऱ्या असंख्य गोष्टी फक्त आपल्या असतात
असे “ शेअर” न केलेल्या क्षणांचा आढावा घ्यायला अजूनतरी कुठला “automatic” मार्ग
नाहीये, तिथे आपल्यालाच आत डोकवावं लागतं तेव्हा कुठे तो झरा वाहू लागतो. पण खूप
कमी लोक आत डोकावू शकतात आणि ती हिम्मत दाखवतात.
येणाऱ्या वर्षाचा विचार करताना अगदी सहज मनात एक विचार आला तो असा कि माणूस
खरंच आळशी होत चाललाय कि परावलंबी ? नवे नवे शोध तर लागतच आहेत आणि त्याने आपलं
राहणीमान दिवसेंदिवस सुधारत आहे याचा अर्थ माणूस आळशी नक्कीच नाहीये. मग नक्की काय
होतंय ? खूप वेळ विचार केला आणि मग उमगलं कि माणसाची “भौतिक तहान” भागत
नाहीये तो सारखाच तहानलेला आहे. मग हि तहान आहे तरी कशाची ? तर ती अनेक प्रकारची
आहे. कुणाला पैशाची तहान आहे, कुणाला
स्वतःच्या (फक्त स्वतःच्या )करिअरची , तर कुणाला अजून मोठ्या हुद्द्याची , कुणाला
परदेशाची, कुणाला मोठ्या घराची , कुणाला उच्चभ्रू राहणीमानाची , कुणाला मोठ्या
पगाराची , कुणाला फक्त आनंदी राहायची तहान आहे. आता या प्रकारची कुठलीही तहान असणं
म्हणजे गुन्हा वगैरे आहे असं मी मुळीच म्हणणार नाहीये आणि तसं माझं वैयक्तिक मतही
नाही. पण तरीही वाईट या गोष्टीचं वाटतं हि फक्त भौतिक असणाऱ्या गोष्टींचीच तहान सगळीकडे
वाढत चालली आहे. एका मर्यादे पर्यंत अशा प्रकारची तहान माणसाला “so called आनंदी”
ठेवू शकते, पण ती फक्त सुरुवात असते एका मोठ्या कृष्ण विवरा सारख्या मोठ्या काळ्या
गुहेची. असं म्हणतात कृष्ण विवर सर्व काही गिळंकृत करत तसच हि तहान आपल्या “आतल्या”
माणसाला गिळंकृत करत चालली आहे. या तहानेच्या हव्यासापोटी माणसातली नाती आणि
प्रेमाचे धागे मात्र विरताना दिसतायेत. कुठे मुलगा परदेशात म्हणून त्याच्या आठवणीत
झुरणारे आईबाप दिसतात तर कुठे अनाठाई चढाओढ करताना एकमेकांशी स्पर्धा करून दमछाक
होणारे तरुण, पैशाच्या जोरावर गळचेपी करणारे राजकारणी तर कुठे एकमेकांच्या जीवावर उठलेली
नवी पिढी.
पण खरतर “तहान” हि हवीच किंबहुना ती उपजतच प्रत्येक गोष्टीत असते.
नव्या शोधाची जननी हि तहानच असते तसेच ती नव्या अनुभवांची नांदी हि असते. निसर्गातल्याही
प्रत्येक गोष्टीत ती दिसते. मग पावसाळ्या आधी तहानलेली धरणी असो , कि हिवाळ्यातल्या
बोचऱ्या थंडीच्या रात्री नंतर उन्हाची पाहिलेली वाट, न थकता समुद्राचं तहानलेल्या किनाऱ्याकडे
झेप घेणं असो किं तहानलेल्या वाऱ्याने डोंगराला घातलेली साद असो.
पैसा कमावणं, घर, गाडी, नोकरी, मूळबाळ अशा स्वकेंद्रित आयुष्याची सवय नव्या
पिढीला होत चालली आहे. यात सगळ्यात “मी” हि व्यक्तीरेखा मुख्य पात्र आहे. त्या पलीकडे
जाऊन स्वतःच्या व्यक्तिमत्वाशी बोलता येईल आणि त्याला अनुभव संपन्न करता येईल यासाठी
फारच कमी प्रयत्न होताना दिसतात. आणि याच साठी लागते ती निर्मळ ,चिरकाल टिकणाऱ्या शाश्वत
गोष्टींची तहान. कुणाला ती स्वतःच्या छंदात सापडते ,कुणाला रोजच्या कामात तर
कुणाला सामाजिक कार्यात.
भटकंती हे जरी सध्या एक फॅड म्हणून सुद्धा काही लोकांना वाटत असलं आणि ते
स्टेटस सारख काही लोक मिरवत असले तरी भटकंतीची “तहान” हि एक प्रचंड मोठी ताकद
असलेली गोष्ट आहे. भटकंती करून निसर्गाच्या जवळ जाऊन नवे अनुभव तर मिळतातच पण
त्याच बरोबर भिन्न समाजातील लोकांना भेटून अनेक गोष्टीकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन
मिळतो. आपल्याच देशातल्या , राज्यातल्या अनेक विस्मयचकित करणाऱ्या गोष्टी पाहायला
मिळतात. पावसाळ्यातल्या अनेक भटकंतीमध्ये पाहिलेले उलटे धबधबे, काळ्या मिट्ट
रात्री काजव्यांनी प्रकाशून टाकलेला डोंगर किंवा जंगल , घनदाट झाडीमध्ये एकटच उभं
राहून ऐकलेला शांततेचा आवाज, डोंगरावरून वाहत येणाऱ्या पाण्यात तोंड बुडवून भागवलेली
तहान, कुठे उंचावरल्या टोकावरून ढगाला लावलेला हात तर कधी दाट धुक्यामध्ये केलेला
स्वर्गीय प्रवास , कधी जंगलात चालताना लागलेला चकवा तर कधी मुद्दाम घेतलेला “longcut”,
कधी अनोळखी माणसांनी दाखवलेली माया तर कधी न कळत जुळलेले ऋणानुबंध, कधी एकाच
फुलपाखरामागे केलेला उन्हातला प्रवास किंवा कधी रान फुलांच्या रानामध्ये हरवून
गेलेला वेडा जीव, कधी समुद्राने घातलेली साद तर कधी डबडबलेल्या डोळ्याने शेवटचा किरण
दिसे पर्यंत पाहिलेला सुर्यास्त, हे सगळे प्रकार या तहानेचे द्योतक आहेत. अशा
प्रकारची तहान असणं मी भाग्याचं समजतो. ती माणसाला “जागं” ठेवते.
भटकंती प्रमाणेच वाचनाची तहान असणं हि एक प्रचंड मोठी शक्ती आहे. वाचनाने
नुसतेच अनुभव मिळतात किंवा माणूस समजदार होतो असं नाहीये तर वाचनाने माणसाला स्व
कळू लागतो, जगणं समृध्द होतं आणि मुखवटे दूर सारून स्वतःचा चेहरा समजतो. पुस्तक खरंतर
बोलत असते , वाचणाऱ्याला फक्त शब्द वेचायचे असतात. आपण हि तहान जेवढी जागृत ठेवू
तेवढी ती आपल्याला नव्या गोष्टी शिकवत राहते.
संकुचित आयुष्य जगण्यापेक्षा बहरलेलं आणि उर्जेने भरलेलं आयुष्य जगण्यात जी
मजा आहे ती खरतरं कशातच नाही. म्हणूनच आयुष्याचा वेग हा आपण शाश्वत सुखासाठी किती
तहानलेले आहोत यावर अवलंबून असतो. जितकी हि तहान जास्त तितकं आयुष्याला नवे अर्थ
येत जातात. आपण का जगतो आहोत हा प्रश्न पडायची वेळच येत नाही कारण आपल्या प्रत्येक
श्वासाला एक उद्देश असतो. तहान भागल्यानंतर जी तृप्ती अनुभवायला मिळते ती शब्दात
मांडणं खरोखर अशक्य आहे. पण ती तहान टिकवणं आणि पुन्हा पुन्हा नवी क्षितिजे धुंडाळत
राहणं जास्त महत्वाचं आहे. प्रत्येकाने जर
अशा गोष्टी शोधून त्यात स्वतःला गुंतवून घेतलं तर समाज प्रगल्भ होण्यास मदतच होईल.
सक्रीय युवाशक्ती हि देश घडवते असं
म्हणतात आणि हीच युवाशक्ती घडते ती शाश्वत गोष्टीसाठी तहानलेल्या निर्लेप मनांनी. येणाऱ्या वर्षात हीच तहान प्रत्येकामध्ये जागृत
व्हावी आणि आयुष्याला खरं परिमाण मिळवं हीच सदिच्छा व्यक्त करतो आणि अशाच एका
संध्याकाळी पावसात चिंब भिजल्यावर पावसावर लिहिलेल्या चार ओळी इथे लिहितो आणि
थांबतो. पुन्हा भेटूच तहानलेल्या एखाद्या किनाऱ्यावर जिथे किनारा समुद्राकडे झेप
घेत असेल आणि सूर्य क्षितिजाकडे...!
इति आनंद
३० डिसेंबर २०१४
पुन्हा भेटूच २०१५ मध्ये
नव्या
अनुभवांच्या नव्या गोष्टीं सोबत