Powered By Blogger

Monday, November 9, 2015

अंगणात माझिया तव प्राजक्त उमललेला



निषाद, सप्त सुरातला सातवा सूर. वरचा “ नि “. अर्थात आमच्या घरातला नवा स्वर. 
आमच्या घराचा श्वास, जो प्रत्येकाला स्पर्शून जातो , वाऱ्या बरोबर गंधाने प्रवास करावा तसं काहीसं आम्ही करत राहतो. दिशा, वेग याचं भान सोडून फक्त वाहत राहतो. हाच कोवळा जीव घरात येऊन आता वर्ष उलटून गेलंय पण तरीही पहिल्या दिवसापासून आता पर्यंतच्या आठवणी तितक्याच ताज्या आहेत. जणू काही परवा सगळं घडलं आहे इतक्या आणि तेच स्मरण करताना त्याच्या जन्माच्या पहाटे पासून आतापर्यंत च्या आठवणी कवितेच्या रूपाने व्यक्त झाल्या आणि इथे त्या सादर केल्या आहेत.  
निषाद आमच्या साठी प्राजक्ताचा सडा आहे. ज्याने आमचा अंगण भरून टाकलंय, पहाटे कोवळ्या फुलांनी पांढरी शुभ्र नक्षी काढावी तसं काहीसं. प्राजक्ताचं फुल आपणहून अंगणात झेप घेतं आणि एकामागून एक अशा सगळ्या फुलांचा सडा अंगण भरून टाकतो. असंच एक फुल आमच्या अंगणात नव्हे ओंजळीत आलंय निरागस, कोवळं आणि तितकंच लोभस.


होती पहाट वेडी आतुर शुक्र तारा ,
गंधाळूनया झुरे तो, पुन्हा उनाड वारा
वेड्या त्या जीवाची, झाली उगाच दैना
अंगणात माझिया तव प्राजक्त उमललेला....!

नव्हतास तू जगी या , होती चाहूल घराला ,
क्षण एक एक होता, आतुर त्या घडीला,
बहरे वसंत पुन्हा तुझियाच स्वागताला ,
अंगणात माझिया तव प्राजक्त उमललेला....!

तुझिया त्या स्वरांनी, नांदी नव्या सुरांची
स्वप्ने नवीन पुन्हा, गुंफून पापण्यांची ,
स्पर्शून त्या जीवाला, आनंद भारलेला
अंगणात माझिया तव प्राजक्त उमललेला....!

छेडीले नाद जेव्हा कोवळ्या पावलांनी,
हाकेस साद तुझिया अनामिक शब्दांनी,
स्मृतीतुनी तरंगे राग ऐकलेला,
अंगणात माझिया तव प्राजक्त उमललेला....!

छोटया मुठीत तुझिया स्वप्ने गुंफलेली
कोवळ्या नजरेतुनी तू व्याकूळ शोध घेई,
खट्याळ त्या खळीचा संकेत ना कळाला
अंगणात माझिया तव प्राजक्त उमललेला....!

हास्यात तुझिया मिळे अर्थ जीवनाचा
येता कुशीत माझ्या, कल्लोळ भावनांचा
बरसुनी अतृप्त तरीही मेघ भारलेला
अंगणात माझिया तव प्राजक्त उमललेला....!

आनंद

30 नोव्हेंबर २०१५