शब्द नेहमी “गर्भार” असतात असं कुठेशी ऐकलेलं वाक्य .अचानक एकदम पुन्हा आठवलं
आणि समोर आले ते तेच नेहमीचे ओळखीचे आणि तितकेच नवे शब्द ...! खरंच आहे पण शब्द
इतक्या भावनांना जन्म देतात कधी व्यक्त तर कधी अव्यक्त..! जन्म दिलेल्या प्रत्येक
वाक्याला अर्थ मिळतो आणि तिथे सुरु होतो चांगलं वाईट या रस्त्यावरचा प्रवास...!
काय गंमत असते नाही या शब्दांची , कधी एकांतात कुठेशी नजर लावून दूर पाहावं तर
अचानक मनात दाटून येऊन गर्दी करतात. झरझर वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहा सारखे
समोरून वाहतात. आठवणींशी असलेल्या घट्ट नात्याला निभावत कधी डोळ्याच्या कडा
पाणावून टाकतात हे समजत सुद्धा नाही. एकांतातल्या अशा शब्दांना ओढ असते हातून सुटलेल्या
क्षणांची .
कधी मात्र हेच शब्द खरोखर खळाळत्या पाण्यासारखे होतात. समोरचं माणूस कोण आहे
कसं आहे याची फिकीर न बाळगता वाऱ्या सोबत मैत्री करून बेफाम होतात . त्यांच्या त्या
कचाट्यात भलेभले अडकतात. असे हे शब्द जन्म देतात अनेक जिवंत क्षणांना आणि त्यात
कधी रुजतात नवी नाती..!
कधी हेच शब्द जणू रुसल्या सारखे वागतात , मनात गर्दी करतात पण ओठातून जन्म घेत
नाहीत , कधी वाट पाहत बसतात तर कधी कुणावर चिडून मुके होतात. समंजस नाती अशा न बोललेल्या
शब्दांनी सुद्धा टिकून राहतात, नकळत केलेल्या मुक्या संवादाने जोडून राहतात. आपण
उगाच अमुक अमुक माणसाला मनातल कळत असं म्हणत राहतो खरंतर शब्द तिथेही असतात फक्त
त्यांचं अदृश्य रूप कुणालाच दिसत नाही.
कधी शब्द बोचरे होतात , परिस्थितीला जुगारून वेगळे होतात , कधी समोरच्यावर
तुटून पडतात तर कधी तीक्ष्ण बाणासारखे खुपतात. या शब्दांनी खोलवर झालेल्या जखमेला भरून
यायला कधी आयुष्य पुरत नाही. नाती दुरावणारे हेच शब्द स्वतः किती एकटे असतील याची मात्र कुणाला काळजी नसते.
रक्ताची नाती , मैत्रीची नाती , मानलेली नाती, जुळलेली नाती, बोजड नाती, हवीहवीशी
नाती, ताणलेली नाती या सगळ्यात एक धागा समान असतो तो म्हणजे गर्भार शब्दांचा...
कधी काय जन्मेल याचा काहीच पत्ता नसलेले सगळे जीव मात्र या शब्दांशी झुरत राहतात. दूरचे कधी जवळ येतात तर कधी साद वेळेत न
पोहोचल्याने कायमचा दुरावा निर्माण होतो.
आज वर्ष संपतंय , आणि अशाच सरत्या वर्षाचा मागोवा घेताना जाणवले ते फक्त असेच गर्भार शब्दच ... त्यांचीच सोबत खूप महत्वाची
ठरली आणि किनारा लवकर सापडला. पुढेही त्यांची सोबत अशीच राहणार असली तरी गेलेल्या
शब्दांशी पुन्हा भेट नाहीच हे दुखः ही आहेच.
आठवड्यापूर्वी
पेरलेल्या बी मधून फुटलेला पहिला कोंब हा सुद्धा संवाद साधत असतोच, कोवळं असणं म्हणजे काय याची पुर्णतः प्रचिती
देणारा आणि स्वतंत्रपणे मोकळ्या आकाशाकडे पाहणारा. निसर्ग आणि त्याचं हे मूक संवादाचं रुपडं म्हणजे शाश्वत
गोष्टीं मधला अजून एक अनुभव...!
शब्दवीण संवादु असं म्हटलं तरीही आत खोलवर
काहूर असतच . नव्याने येणाऱ्या वळणाना आणि काही कोवळ्या लहानग्या शब्दांना पुन्हा
घडवायला तयार होऊया कारण खरंतर “शब्द” फक्त संवाद साधतात आणि तेवढंच त्यांचं
आयुष्य असतं..!
आनंद
३१ डिसेंबर २०१६