Powered By Blogger

Wednesday, March 22, 2017

उगाचंच सहजंच 3 : उनाड


उगाचंच कधीतरी उनाड व्हावं, घराबाहेर बाहेर पडावं , पहावं मोकळं क्षिजित ,द्यावी एक साद त्या भटक्या आभाळाला.
त्यानेही वळून पहावं आणि हसावं गालातल्या गालात ,
हिणवावं खवळलेल्या समुद्राला , किनारा गाठू न शकणाऱ्या त्याच्या लाटेला राग यावा, वाऱ्याने पहावी तिची तगमग आणि लाटेला साथ देऊन आणून सोडावं किनाऱ्यावर, वाळूनं तृप्त व्हावं त्या चिंब स्पर्शानं आणि तोच क्षणात दूर व्हावी लाट, पुन्हा जन्म घ्यावा त्याच जुन्या जाणिवेनं.

दूर कड्यावरच्या एखाद्या वाळक्या झाडाने लक्ष वेधून घ्यावं, निष्पर्ण पण तरीही रेखीव, आकाशात ढगांची नांदी व्हावी आणि तोच एका चिंब सरीने मातीला गंध देऊन जावा, तृप्त होऊन त्या वाळक्या झाडाच्या शेवटच्या पानाने फांदीला निरोप द्यावा. पुन्हा उमटावी तीच जुनी निष्पर्णतेची जाणीव.

आपण हे सर्व पाहावं दुरून डोळ्यादेखत पण तरीही अंतर ठेवून अलिप्तपणे.
हीच अलिप्तता जपता यायला हवी , त्यातून कधी त्रयस्थपणे काही गोष्टी शिकता येतात पाहता येतात, एखाद्या प्रसंगात, अनुभवात स्वतः न गुंतता त्यातल्या बारकाव्याशी जोडून अर्थ लावता यायला हवा.

                                                                                                                                      आनंद