कुणी लुटावे शब्द बापुडे
कुणी उधळावे सूर,
कुणी विकावी रितीच ओंजळ
अन लागावी हुरहुर....
कुणी लुटावी निसर्गमाया
कुणी टिपावे शुभ्र चांदणे,
कुणी शोधाव्या अंधारछाया
व्हावे तेथेच नांदणे....
कुणी पळावे सुसाट आणि
कुणी अलगद तरंगावे,
कुणी डोकवे अंतरात
अन जगणे व्हावे गाणे....
कुणी जमवती सखे सोबती
कुणी खुशाल चेंडू,
कुणा खुणावते दिशा एकटी
चला तीच धुंडाळू....
कुणकुणाची कथा इथे अन
कुणकुणाची व्यथा
जगणे म्हणजे हेच असावे
तृप्तीची ही नशा...!
आनंद
Nov 2017