Powered By Blogger

Wednesday, March 7, 2018

उगाचंच सहजंचं :- प्राजक्त





कधी प्राजक्ताचं फुल व्हावं, गळून पडावं अलगद जमिनीवर , कुणालाच कळू नये आपलं ते तरंगत जन्म घेणं,   कुणी पहाटे फुलं वेचून जावं पण आपण मात्र दडून बसावं कुणालाच न दिसता.  जवळच्या समुद्राच्या लाटांचा आवाज यावा आणि येत राहावा. काही काळ अनुभवावी ती निश्चल आणि चिरकाल वाटावी अशी शांतता. डोळे भरून बघावं निळं आकाश आणि त्याला खुणावावं उगाचंच.
 मग अचानक वाऱ्याने उठवावं त्या स्वप्नातून आणि जाणीव करून द्यावी तोकड्या आयुष्याची. उचलून फेकावं त्याने पायवाटेवर. मनात उगाच दाटावी भीती कुणाच्या पावला खाली चिरडले जाण्याची , मग अखंड काळ तोच विचार करत असताना एक नाजूक चिमुरडी ओंजळ यावी आणि आपल्याला अलगद उचलून घ्यावं.
माडाच्या वनातून सफर घडावी त्याच ओंजळीतून, समुद्र दिसावा आणि तिथेच सूर्यास्त ही. अश्रूंची दोन टिपं अलगद पडावी पाकळ्यांवर. अश्रू कुठले कसले काहीच न कळावं पण उगाच भरून यावं आपलंही मन,
परतावं पुन्हा अंधारलेल्या वाटेवरून त्याच ओंजळीतून, आता मात्र पुन्हा कधीच न परतण्यासाठी.
आपलीही वेळ संपत आलेली , एक दिवसाचं आयुष्य आता समारोपाला आलेलं. अश्रू आपले की त्या ओंजळीचे हे समजेनासं झालेलं. ओंजळीने सोडून द्यावा आपल्याला तुळशी वृंदावनावर ,तिथेच तेवणाऱ्या दिव्याने दिलासा मिळावा आणि
तेवढ्यात दिसावं चांदण्यांनी भरलेलं आकाश आणि ओढ लागावी पुन्हा जन्म घायची तेवढ्याच आशेने आणि सहजतेने.....!


आनंद
8  मार्च 2018