Powered By Blogger

Saturday, March 19, 2011

सरळ वळण .....!




चालता चालता ठेच लागावी आणि आणि आयुष्याने वळण घ्यावं असं होतं कधी कधी. माणूस म्हणून जगण्याचा अट्टाहास असेल तर मात्र कुठलीही पायवाट असेल तरीही निराशा येत नाही. आता पर्यंत बराच फिरलो, कोणाच्या मते खूप कमी असेल कदाचित कोणाच्या मते फार जास्त असेल पण या सगळ्यात मला गवसत गेलं ते या निसर्गाचं गुढ आणि ते या पुथेही चालूच राहील या शंका नाही. पण या सगळ्याला सुरुवात झाली ती शेवटी इथूनच आणि संपणार सुद्धा इथेच, म्हणून मग ठरवलं थोडं मागे वळून पहायचं आणि तोच जाणवलं कि खूप वळणं येऊन गेली आहेत आणि सगळी मी सरळपणे पार करत आलो आहे आणि याच वरून सुचलं या वेळच शीर्षक “सरळ वळण “.
तर अशा अनेक सरळ वळणावर मला गवसलेली निसर्गाची रूपे, चमत्कार आणि खूप साध्य वाटणाऱ्या अशक्यप्राय गोष्टी.

गवतावरचे थेंब :
 
वाटेवरून जाताना सहज गवतावर पाण्याचे थेंब दिसले. थेंबांनी अर्थातच त्यांच्या सौंदर्यामध्ये भरच घातली होती .मनात विचार सहज विचार आला खरंच गवतासाठी त्या थेंबांच महत्व जास्त असेल कि थेंबाला त्या गवताच्या पात्याचा आधार वाटत असेल ?  आपलं आयुष्यही असाच असतं नाही का ? आपलं आपलं म्हणून आपण शोधात बसतो ते खरंच आपलं असतं , कि जे आपल्या कडे आहे पण जाणवत नाही ते आपलं असतं?
कदाचित यातच आयुष्याचं कोडं दडलेलं असावं. आपण आपल्या परीनं ते शोधण्याचा प्रयत्न करायचा बस्स.......!

विहीर :
 
राजगडच्या पायथ्याशी गावात या विहिरीचा फोटो जेव्हा मी काढला तेव्हा मनात हा विचार नव्हता जो आता आलाय.  आपल्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक गोष्टी आपल्या आयुष्याशी किती साधर्म्य दाखवत असतात , आपण त्या कडे कधी अनाहतपणे तरी कधी जाणूनबजून दुर्लक्ष करत असतो. विहीर हि एक अशीच मला भूल घालणारी व्यक्ती. हो व्यक्तीच. कारण मला दरवेळी विहीर पाहिल्यावर तिला एक व्यक्तिमत्व असलयाचा भास होतो. पावसाळ्यात पाण्याने भरून आनंदाने भरलेली आणि उन्हाळ्यामध्ये पाणी खोल गेल्यावर रडवेली झालेली विहीर मला फार जवळची वाटते. तिचे बदलणारे भाव जाणायला कुणालाच वेळ नसतो असं सारखं जाणवतं. कठडयावरून पाणी भरणारी मानसं आपल्याशी कधीतरी बोलतील अशी वेडी अशा लावून बसलेली विहीर मला फार निरागस वाटते.


 
पहिला सूर्योदय :

नवीन वर्षाचा पहिला सूर्योदय टिपताना फार भारावून जायला झालं होतं मला. पहाटे झाडांच्या फांद्या मधून येणारी ती कोवळी किरणे पाहून क्षणभर वाटलं यांना कळत असेल का नवीन वर्ष , त्यांना असेल का त्याचा अप्रूप ? कि ती आपली नेहमी प्रमाणे सकाळी धरणीला भेटायला आली असतील ?  पहाटेच्या त्या किरणांनी मला पुन्हा एकदा पेचात टाकलं होतं. आणि माणूसपणाच छोटे पण सिध्द केलं होतं. नवीन वर्षाच्या स्वागताला माणूस जय्यत तयारी करत असतो , पण हि किरणे मात्र आपसूक पणे नेहमी प्रमाणे येत राहतात. न कुठला हेवा न कुठला अहंकार . माणसाला येऊ शकतं असं राहता ? सगळ्या काल्पनिक बंधनांना तोडून फक्त माणूस होता येईल ?
अवघड आहे खरं पण अशक्य नक्कीच नाही , ........नाही का ?

 
इंद्रधनू : 
 


चिखलदरा इथे गाविलगडला काढलेला हा दुहेरी इंद्रधानुश्याचा फोटो पाहून मला अजूनही हरवून जायला होतं. पश्चिमेला सूर्य अस्ताला जात होता आणि पावसाची एक सर् जणू काही त्याला निरोप द्यायला धावून आली होती. आणि दोघांच्या मिलनातून पूर्वेला इंद्रधनू कधी उमटलं हे कळलंच नाही. डोंगराच्या एका टोका पासून दुसऱ्या टोकापर्यंत अर्धगोलाकार इंद्रधनु मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहत होतो. कितीही वेळा पाहिलं तरी मन भरत नव्हतं.  क्षणिक मिलनातून जन्मलेलं इंद्रधनू सुद्धा क्षणिकच असतं पण त्या छोट्या आयुष्यात ते अनेकांना भुरळ घालत.  अजून थोडं जगावं असं त्याला वाटत नसेल का ? पण वाटलं तरी त्याच्या हातात काहीच नसतं. त्याचं आयुष्य पराधीन असतं. पण तरीही ते जेव्हा जेव्हा जन्म मिळेल तेव्हा सप्तरंगाच दाखवतं आणि काळवंडलेल्या आकाशाला नवे रंग देतं.
मला वाटतं इंद्रधनू आयुष्यात असलेल्या सप्तरंगांची आठवण माणसाला करून देत असावं. मळभ
चढलेल्या आयुष्याला नवीन रंगांची ओळख करून देत असावं. आणि आयुष्याच्या अनिश्तीततेची जाणीव सुद्धा.
 
फुलपाखरू :
 
फुलपाखराचे फोटो काढणं हा हि माझा एक आवडता छंदच आहे. फोटोतल फुलपाखरू राजगडला काढलेलं आहे. मुळात फुलपाखरू हेच मुळी मला एक अशक्यप्राय गोष्ट वाटते. देवाने माणसाला घडवायला जेवढा वेळ दिला असेल त्या पेक्षा कितीतरी जास्तपट वेळ फुलपाखरू घडवायला त्याने दिला असला पाहिजे. कारण सौंदर्य म्हणजे काय हे फक्त इथेच कळतं.  फुलपाखरू काय, इंद्रधनू काय, सर्वात सुंदर अशा गोष्टीचं आयुष्य हे कमीच असतं. , जेमतेम हातावर मोजता येईल इतक्या दिवसांच आयुष्य लाभलेलं फुलपाखरू भिरभिरत जेव्हा फिरत असतं तेव्हा वाटतं कि छोट्याश्या आयुष्याचा पुरेपूर उपभोग घेण्यासाठी तर ते धडपडत नसेल ? रायगडावर एकदा वाऱ्याच्या प्रवाहाशी झुंज देणार फुलपाखरू पाहिलं आणि वाटलं स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि हक्क साठी लढण्याचं बळ कुठून येत असेल त्याच्यात ?

आंतरिक सौंदर्या पेक्षा बाहरी सौंदर्याला सर्वस्व मानणाऱ्या जगात स्वतःच्या सौंदर्याची जाणीव सुद्धा नसलेलं ते फुलपाखरू मला निगर्वीपणाचा एक चमत्कारच वाटतं.

                                                                      .....आनंद
             

4 comments:

  1. Khara sangaycha tar Hya nisargaat pratyekach goshta faar faar sundar banaleli ahe...! Fakt tyachya kade pahanyachya drishtivarun tya tya goshtitil soundarya tharata....!

    Tich ani tevadhich niragas najar ani vichar ji vyakti karu shakte, tich evadhe sunder photo ani tyamagcha vichar ashaprakaare mandu shakte...!

    U r truly Good Human...!

    ReplyDelete
  2. khup changle wichar ahet ani te wyakta hot ahet. asach wachan ani manan karat raha ajun khup kahi chan goshti tuza aatun bhaer wyakta hotil

    lai bhari mitra...

    ReplyDelete
  3. Thanks Girish, Shivali and Meghendra :)

    ReplyDelete