Powered By Blogger

Sunday, March 27, 2011

मला भेटलेल्या वाटा – भाग १


 

सरळ वळण हा लेख लिहिला तेव्हा पासून मनात विचार येत होता कि वळणं ज्या रस्त्यावर असतात त्या वाटां बद्दल काहीतरी लिहिलं पाहिजे. शेवटी वळणांना अर्थ येतात तेच मुळी वाटां मुळे. कधीतरी अचानक समोर येऊन ठेपणारी वळणं जेवढी लक्षात राहतात तेवढ्याच त्या वाटा राहतातच असं नाही.
आज वर फिरताना ज्या ज्या वाटा मला भावल्या त्या वाटा पुन्हा आठवल्या आणि नेहमी प्रमाणे मी काढलेले फोटो पुन्हा मदतीला धावून आले. याच सगळ्या वाटा आणि त्यांच्या मागे दडलेले आपल्या आयुष्याशी जवळीक साधणारे त्यांचे रंग, भाव आणि मुख्य म्हणजे त्याच वाटांवरची सरळ वळणे यांचा मला गवसलेला अर्थ.

धावत्या वाटा :

 
महामार्गावरच्या धावत्या वाटा मला नेहमीच एखाद्या राज मार्गाप्रमाणे भासतात. स्वतःच्या वेगाचा अभिमान बाळगणाऱ्या आणि प्रसंगी गर्वही करणाऱ्या या वाटा मात्र प्रत्येक प्रवासात भेटतच राहतात. त्यावर सुसाट वेगाने धावणारी वाहने आणि त्या मधली त्या राज मार्गावर खुश असलेली माणसे हि मला तेवढीच भाग्यवान वाटतात. अशा या वाटा मात्र प्रत्येकाच्याच नशिबात नसतात, कारण या वाटांना जोडणारे रस्तेच काहींच्या आयुष्यात नसतात. अशा वेळी मात्र दूर वरून या वाटांना पाहणं एवढाच हाती उरतं. आपल्या आयुष्याशी तुलना केली तर हेच दिसून येतं धावती आणि वेगवान आयुष्य प्रत्येकालाच मिळत नाही. पण ते मिळालं नाही म्हणून काही संथ वाटांवरून जाणारे काही कमनशिबी ठरत नाहीत, कारण या धावत्या वाटांवरून जाताना एखादी चुकसुद्धा सगळं उध्वस्त करू शकते आणि नेमका हेच न कळल्यामुळे अनेक आयुष्य सुरु होण्या आधीच संपतात आणि मागे सोडून जातात याच धावत्या वाटांवरचे डागाळलेले अनुभव. म्हणूनच प्रसंगी हतबल झालेल्या या वाटा मला खूप एकाकी वाटतात आणि त्याचं एकसुरी आयुष्य हे एखाद्या पिंजऱ्या सारखं बंदिस्त....!

नागमोडी वाटा :
 
वरच्या फोटो मधली डावीकडची वाट हि रायरेश्वर ची आहे तर उजवी कडची वाट हि चिखलदरा येथील. डोंगरामधून धावणाऱ्या या नागमोडी वाटा मला भावतात ते त्यांच्या अनिश्ततेमुळे आणि त्यांच्या पुढंच वळण दडवून ठेवणाऱ्या खोडकर वृत्ती मुळे. स्वताच्या मनाप्रमाणे हवा तिथे वळण घेणाऱ्या या वाटा मला खूप स्वावलंबी आणि स्वतंत्र वाटतात. आजूबाजूच्या झाडाझूडपाना या वाता हव्या हव्याश्या वाटत असाव्यात असं वाटतं. कारण या वाटांच्या वळणांप्रमाणे ती झाडेही स्वतःला सावरून घेतात. या नागमोडी वाटा प्रत्येकाच्याच आयुष्यात कधी न कधी येतातच आणि या वाटेच्या वळणावर आल्यावर माणूस गोंधळतो , पुढचं वळण कसं असेल याचा विचार करतानाच कधी अचानक एखादा सुखद धक्का मिळतो तर कधी तो अनुभव भाम्बावाणारा ठरतो. म्हणूनच स्वतः बरोबरच इतरांचं जगणं बदलवण्याऱ्या या वाटा मला आयुष्यातल्या एका न उलगडलेल्या कोड्या प्रमाणे भासतात.  

 
जंगल वाटा :

 
मेळघाटातल्या जंगलातल्या या वाटा माझ्या सगळ्यात आवडत्या वाटा आहेत. आजूबाजूच्या जंगलाच्या सोबतीने हातात हात घालून चालणाऱ्या निरागस अशा या वाटा स्वतःच्याच धुंदीत बागडणाऱ्या छोट्या मुली सारख्या वाटतात. आजूबाजूच जंगलच या वाटेची काळजी घेतं असं भासतं.
जेव्हा मी पहिल्यांदा या वाटांवरून गेलो तेव्हा या वाटांवरून जाताना झाडांच्या पानांची सळसळ हि जणू काही माझं स्वागतच करत होती. फांद्यावर बसलेली पाखरं स्वतःच्याच धुंदीत चिवचिव करत गाणी गात होती. गर्द झाडीमधून डोकावणारं निळ आकाश सुद्धा जणू काही या जंगलवाटे कडे डोकावून पाहत असल्या सारखं क्षणभर मला जाणवलं. कदाचित त्यालाही या वाटेवरून एकदा तरी चालावं असं वाटत असेल. शांतता म्हणजे काय हे मला त्या जंगलातल्या किलबिलाटातहि जाणवत होतं. कारण जंगलाचा आवाज हाच मुळी शांततेचा असतो असं माझं ठाम मत आहे. या वाटेवरून चालताना ती कधी संपूच नये असं वाटत राहता.
यातच पावसाची एक सर् आली आणि हि जंगल वाट ओली झाली ,पाण्याचे ओघळ वाटेवरून घरंगळून उजव्या बाजूला पाण्याचंछोटं डबकं साचलं. आणि जणू काही त्यात पडलेल्या आकाशाच्या प्रतीबिम्बाने त्या वाटे वरून जाण्याची आपली इच्छा अशा प्रकारे पूर्ण करून घेतली कि काय असा प्रश्न मला पडला. आणि निसर्गाच्या या नितळ चेहऱ्याची थोडीशी झलक आपण पहिली याच आनंदात मी पुन्हा ती वाट चालू लागलो.

गुढ वाटा :


 
रायरेश्वर पठारावरच्या या धुक्यात हरवलेल्या गुढ धुसर वाटा मला नेहमीच पेचात टाकतात. नागमोडी वाटांची अनिश्ततता तर या वाटांमध्ये खच्चून भरलेली तर आहेच पण त्याच बरोबर धुक्यात हरवलेल्या या वाटा गुढ सौंदर्य स्वतःमध्ये दडवून ठेवल्या सारख्या दिसतात.
धुक्यात समोरचं काही दिसत नाहीच पण जेव्हा आपण त्या धुक्या मध्ये शिरतो तेव्हा मात्र आपल्या अस्तित्वाची जाणीव आपल्याला होते आणि अर्थातच आजूबाजूला असलेल्या निसर्गाच्या किमेयेचीही. डावीकडच्या फोटो मध्ये दरीच्या बाजूने धुक्यात चाललेली गाडी आणि जणू काही जगाशी संपर्कच नसल्यासारखी ती गुढ वाट मला आजही तितकीच भावते जितकी त्या वाटेवर गाडी चालवताना मला ती तेव्हा भावली होती. प्रत्येक वळणावर मनात निर्माण होणारी उत्सुकता आणि त्यावर प्रत्येक वेळी मिळणारं सुखद उत्तर असं तो प्रवास करत ती वाट पठारावर पोहोचली.
पठारावर पोहोचल्या नंतर तीच गुढ वाट एक पायवाट झाली आणि झाडाझुडपातून जेव्हा जाऊ लागली तेव्हा ती आणखीनच सुंदर वाटू लागली आणि एका मोठ्या वृध्द झाडाच्या पसरलेल्या फांद्यांच्या खालून पुन्हा दिसेनाशी झाली. जणू काही त्या वृध्द झाडाच्या आश्रयाने ती इतकी सुरक्षित झाली होती कि आजूबाजूचा भानच तिला उरलं नव्हतं . 

लाल मातीच्या पायवाटा :



 
राजगडाच्या वाटेवरच्या या लाल मातीच्या वाटा खरतर वाटा नव्हेतच ,कारण पावसाळ्यात याच वाटा पाणी वाहून नेणाऱ्या जल वाहिन्याच होऊन जातात. पण तरीही प्रत्येक ट्रेक मध्ये त्या कुठे नं कुठे तरी भेटतात आणि या वाटांवरूनच अनेक जण अनेक किल्ले सर करतात.
कधी फसव्या ,कधी आखूड, कधी निसरड्या, कधी पसरट, कधी खडकाच्या तर कधी आजूबाजूच्या गवताने झाकून गेलेल्या या वाटा प्रत्येक भटक्यांच्या फार जवळच्या असतात. चुकलेल्या वाटाही बऱ्याचदा नव्या वाटांचा शोध लावून देतात.  आजूबाजूच्या वाळलेल्या झाडा झुडपांना घासत खर खर असं आवाज करत या वाटांवरून जाताना त्या कधी आपल्याशी बोलू लागतात हेच कळत नाही. उन डोक्यावर आलेलं असताना काही वाटा झाडाच्या सावली मधे एखादा खडक समोर आणून ठेवतात आणि नकळत आपल्याला बसायला सांगतात. 
चालता चालता एखाद्या ठिकाणी अचानक वाटेला फाटा फुटलेला असेल तर एक वाट नकळत हाक मारून बोलावते आणि आपल्याला तिच्या सोबत घेऊन जाते. ऋतू प्रमाणे रूप बदलणाऱ्या या वाटा त्याच्या याच गुणधर्मामुळे लक्षात राहतात आणी पुन्हा पुन्हा या वाटांवरून गेलं तरीही नव्या वाटतात.

                                           ....आनंद


3 comments:

  1. तुझी कल्पनाशक्ती किती भन्नाट 'वाटेवरून' चालतेय ते या वाक्यावरून उमगलं !

    "गर्द झाडीमधून डोकावणारं निळ आकाश सुद्धा जणू काही या जंगलवाटे कडे डोकावून पाहत असल्या सारखं क्षणभर मला जाणवलं. कदाचित त्यालाही या वाटेवरून एकदा तरी चालावं असं वाटत असेल. .... पाण्याचे ओघळ वाटेवरून घरंगळून उजव्या बाजूला पाण्याचंछोटं डबकं साचलं. आणि जणू काही त्यात पडलेल्या आकाशाच्या प्रतीबिम्बाने त्या वाटे वरून जाण्याची आपली इच्छा अशा प्रकारे पूर्ण करून घेतली."
    :)

    ReplyDelete
  2. have not read the blog yet but the pics are AWESOME !!!!!!!!

    ReplyDelete
  3. Tuzi kalpana chan ahe.. Ata nisarga chya kahi dusrya pailunkade jase megh, samudra nadya wagere kahi gostin war tuzi mate wachayla awdel.

    ReplyDelete