Powered By Blogger

Sunday, April 24, 2011

मला भेटलेल्या वाटा – भाग २



पहिल्या भागाप्रमाणेच या भागातही मला फिरताना वेळोवेळी भावलेल्या वाटा आणि त्यांचे मला गवसलेले अर्थ आणि शेवटी मिळालेली नवीन वाटा शोधण्याची उर्मी हेच मांडण्याचा प्रयत्न मी केला आहे.
वाटा या नेहमी गवसत असतात असं मला नेहमी वाटतं ते याच कारणामुळे, शोधून सापडतो तो रस्ता असतो पण चालताना मधेच गवसते ती वाट असते. भलेही मग इतरांसाठी ती वाट कदाचित रस्ता असू शकेल पण नव्यानं त्यावरून पुढे जाणाऱ्या माणसासाठी ती नवी वाटच असते.
या वेळच्या वाटा जरा वेगळ्या आहेत, आणि वेगळ्या अशासाठी कि त्या वाटा अनुभवण्यासाठी त्यांची ओळख असणं जास्त महत्वाचं आहे, कारण या सगळ्या वाटा जगाच्या दृष्टीकोनातून पहिल्या तर त्यांचं अस्तित्व नगण्य ठरेल. पण तरीही या वाट मला भावल्या त्या त्यांच्या याच वेगळेपणामुळे. 
 
धुक्यातल्या डोंगर वाटा :



धुकं म्हटलं कि आपल्या समोर पांढरा धुसर हवेचा तरंगणारा थर समोर येतो. डोंगर दर्यातून जाणाऱ्या डोंगर वाटा जेव्हा या धुक्यामध्ये हरवतात तेव्हा त्यांना शोधण्याचा आनंदही आपल्याला देऊन जातात. धुक्या मध्ये हरवलेल्या या वाटा मला भावतात त्या अशासाठी कि समोरचं दिसत नसलं तरीही आयुष्यात प्रवास करत राहा असं त्या सांगत असाव्यात असं मला सारखं भासतं. आयुष्यात बऱ्याचदा अशी वळणं येतात आणि समोरचं आयुष्य धुसर वाटू लागतं पण अशा वेळी ती वाट धुसर करणारं संकटांच धुकं हे क्षणिक आहे आणि ते गेल्यावर समोरची वाट दिसू लागेल असं जणू काही त्या सांगत असतात. धूक्यातल्या वाटेची अजून एक मजेशीर गोष्ट अशी असते कि आपण जसजसं पुढे जात असतो तसतस समोरची वाट आपल्याला आपोआप दिसू लागते पण मागे गेलेली वाट पुन्हा धुक्यामध्ये हरवून गेलेली असते. जगण्याची नवी उमेद देतानाच दुःखी आठवणींच्या भूतकाळाला विसरून जाण्याची कानपिचकी सुद्धा या वाटा मारून जातात. सूर्याची किरणे आल्यावर धूक्याला निरोप देताना पोरकी झालेली वाट स्वतःच्या मनाची समजूत काढून पुन्हा पहाटेच्या धुक्याची वाट पाहू लागते. आणि शेवटी आपल्यासाठी सोडून जाते ती खुणावणाऱ्या नव्या क्षितीजावरच्या उद्याची नवी आशा.
 

वाट अडवणाऱ्या वाटा :


वाट अडवणाऱ्या या वाटा हा माझ्या साठी खूप चिकित्सेचा विषय आहे. कारण प्रत्येक प्रवासात आपला मार्ग रोखणाऱ्या वाटा भेटतच असतात. फोटोतल्या वाटा सुद्धा पुढच्या प्रवासाआधी आपल्याला थांबवतात आणि आत्तापर्यंत केलेल्या प्रवासाची उजळणी करायला भाग पाडतात. या वाटा इतरांच्या आवडीच्या नक्कीच नसतात कारण मार्गात अडथळे असलेल्या वाटा पेक्षा दूरच्या पण विनाअडथळ्याच्या वाटा लोकांना जास्त जवळच्या वाटतात. या वाटांच्या चेकपोस्ट वर आत्तापर्यंत केलेल्या प्रवासाचा आढावा तर घेता येतोच पण त्याच बरोबर पुढच्या प्रवासासाठी मनाची तयारी सुद्धा करता येते आणि येणाऱ्या आव्हानांना सामोरं जाताना लागणारं बळ सुद्धा इथेच मिळते.
वाट अडवूनही या वाटा आपल्याला आपलंसं करतात आणि या वाटांना मागे सोडून जाताना मला उगाचच मनात हुरहूर वाटते. कदाचित सगळ्यांच्या टीकेला पात्र ठरलेल्या या वाटांना आपलं स्वगत सांगायला कोणी भेटत नसावं असं वाटत राहत.
 
सुखावणाऱ्या वाटा :


सुखावणाऱ्या असल्या तरी या वाटा सगळ्यांना सापडतातच असं नाही. कुठलीही सीमा ,बंधन, ओझं नसणाऱ्या या वाटा हवं तस आयुष्य जगणाऱ्या एखाद्या मुक्त पाखरा प्रमाणे असतात. आजूबाजूला वाढलेली झाडे सुद्धा या वाटा अजून सुखावणाऱ्या कशा करता येतील याचीच काळजी करताना दिसतात. आणि आपली सावली अगदी मनसोक्त पणे वाटेवर उधळत असतात.
दुसऱ्या फोटोतली नदी काठची वाट हि सुखावणारी कशी असं प्रश्न बऱ्याच जणांना पडू शकतो पण या वाटेवरून जर प्रवास केला असेल तर मग त्यातलं सुख हे सांगण्याची गरज पडूच शकत नाही. संथ पणे वाहणारी नदी आणि तिच्या काठावरून छोट्या मोठ्या दगड गोट्यांची वाट हि मनाला एक अनामिक आनंद देते. नदी सोबत असल्या मुळे या वाटेला एकटेपणा हा कधीच नसतो. हातात हात घालून चाललेल्या मैत्रिणी सारखी हि वाट चालणाऱ्यालाही एकटे पणा भासू देत नाही.  दूरदूर पणे कितीही चालत राहिला तरी वाट संपूच नये असं वाटत राहत.
आयुष्यातल्या दुःखांना विसरायला लावणाऱ्या या वाटा मला काय पण सगळ्यांनाच हव्याहव्याश्या असतात. शेवटी सुख प्रत्येकालाच हवं असतं नाही का ?


 दडलेल्या वाटा :

  
दडलेल्या वाटा या कधी स्वतः दडतात तर कधी समोरच्या नव्या वाटेला दडवून ठेवतात. आजूबाजूला असलेला गर्द झाडीमुळे या वाटा अजूनच गुढ वाटतात आणि वळणानंतरची नवी वाट काय असेल हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण करतात. कधी जंगलातून, कधी डोंगरातून या दडलेल्या वाटा प्रवास करताच राहतात. आयुष्याच्या अनिश्चीततेची जाणीव करून देतानाच सतर्क राहण्याचा सल्ला त्या प्रत्येकालच देतात. आयुष्यात येणारी वळणं आणि आयुष्यात दडून राहिलेल्या अनेक वाटा ओळखण्यासाठी गरज असते ती फक्त विचारपूर्वक परीक्षणाची आणि स्वतःवरच्या विश्वासाची.   दडलेल्या वाटेला टाळता येत नसलं तरी त्याच वाटेला सुखावह नक्कीच करता येतं. शेवटी दडलेलं ओळखलं कि मिळणारा आनंद हा मोठाच असतो. आणि तो फक्त अनुभवायचा असतो तो कुठल्याही किमतीला विकत घेतं येत नाही. आणि म्हणूनच दडलेल्या वाटा सगळ्यात जास्त आनंद देऊन जातात.

.......आनंद

1 comment:

  1. As usual, I am not much into reading but I like the pictures !!!!!!!!

    ReplyDelete