पहिल्या पावसाच्या आठवणी या प्रत्येकाच्याच मनात घर करून असतात. तरीही दरवर्षी पुन्हा सगळे जण त्याच आतुरतेनं त्याची वाट पाहतात. अगदी अशीच मनाची अवस्था असताना अचानक पावसानं येऊन तुम्हाला आश्चर्य चकित करावं या पेक्षा सुखद अनुभव काय असू शकतो ? या वर्षीही माझं काहीसं असंच झालं आणि म्हणून मग पहिला पाऊस अजून चालू असतानाच लिहायला घेतलं.
दुपारी सुरु झालेला पाऊस अजूनही बारीक बारीक कोसळतोय, अगदी मी बसलेल्या टेरेस वर माझ्या पावलांवर पाण्याचे थेंब पडतायत आणि थेंबांनी लयीत सुरु केलेलं गाणं अजूनही तितकंच ऐकावं वाटतंय जितकं ते सुरुवातीला वाटत होतं.
काय वेगळं असतं बर या “पहिल्या’ पावसात ? हाच विचार करत असताना मनात नव्या ओळी उमटल्या.
“पहिला पाऊस देतो नवे सूर
उरात लपलेल्या गाण्याला..!
पहिला पाऊस देतो नवी आशा.
नव्यानं उचलेल्या पावलाला...!
पहिला पाऊस देतो बळ,
पाउलवाट सोडून चालण्याचं..!
पहिला पाऊस देतो विश्वास,
स्वतःचं स्वत्व जपण्याचं...!
पहिला पाऊस देतो उर्मी
पडूनही लढण्याची,
पहिला पाऊस देतो साद
आपलं माणूस जोडण्याची .....! “
खरंच पहिला पाऊस प्रत्येकाला किती आणि काय काय देत असतो नाही ? कुणीही यावं आणि त्याला हवं तसं त्याचा अर्थ घ्यावा या पहिल्या पावसाला मात्र त्यानं काहीही फरक पडत नाही तो मात्र ठरल्या प्रमाणे इमानेइतबारे कोसळतोच.
वर सांगितल्या प्रमाणे आजही तो अचानकच आला ,दुपारी लक्ख उन पडलेल होता अंगाची लाही लाही होत असताना अचानक सोसाट्याचं वारं सुटलं. जमिनीवरची धूळ हवेत उडाली. आणि आकाशात काळ्या ढगांची गर्दी जमली. जमिनीवरची माती स्वतःबरोबर घेऊन गिरक्या घेताना हा बेभान झालेला वारा जणू काही धरतीला झोपेतून जागं करतोय कि काय असं क्षणभर वाटून गेलं.
पावसाचे थेंब कोसळण्या आधीच या वाऱ्या बरोबर दुरून ओल्या मातीचा गंध पावसाच्या आगमनाची चाहूल घेऊन आला. आणि मग आपोआपच मनानं बाहेर धाव घेतली. हवेत उडालेली धूळ अजून खाली बसते ना बसते तोच टपोरे थेंब कोसळू लागले आणि मन आनंदून गेलं.
झोपेतून जागी झालेली धरतीही त्या चिंब पावसात मुक्त पणे न्हाऊ लागली. निसर्गाची हि अद्भूत किमया डोळ्या समोर घडत असताना दुरून ते पाहणं असह्य होत होतं त्यामुळे मग शेवटी मीही त्या पावसात चिंब भिजण्याचा निर्णय घेतला आणि कोसळणाऱ्या पहिल्या पावसाला अंगावर झेलत उभं राहिलो.
साधारण अर्धा तास तो मुक्त वर्षाविहार केल्या नंतर मग पाऊस थोडा कमी झालेला पाहून मग पावसात सायकल चालवली. प्रत्येक झाडाचं पान पावसाच्या थेंबावर् डोलताना पाहून गम्मत वाटत होती. थोड्याच वेळात पाण्याची डबकी ठिकठिकाणी साचली आणि त्यात वरचं आकाश दिसू लागलं.
ते आकाशहि त्या आरशात पाहून हसतंय कि काय असं वाटत होतं. डबक्यात कोसळणारा प्रत्येक थेंब तितक्याच उर्मी ने कसा झेपावतो आणि क्षणात त्याचं अस्तित्व त्या पाण्यात कसं सामावून जातं हे पाहण्यात जी काही मजा येते ती प्रत्येकाने नक्कीच अनुभवावी.
पानांवर जमलेले पाण्याचे थेंब सुद्धा क्षणभर विश्रांतीघेत असल्या सारखे भासत होते. त्याच थेंबांनी फुलांच्या सौंदर्या मध्ये भरच घातली होती.
कित्येकांना काय काय दिलं असेल आजच्या पावसाने ?
कुणाच्या उरात दडलेल्या सुरांना मोकळी वाट मिळाली असेल तर कुणाच्या शब्दांना नवे अर्थ मिळाले असतील. कुणाच्या नव्यानं उचलेल्या पावलांना नवी दिशा मिळाली असेल आणि त्या पाउल वाटेवर जाण्यासाठी लागणारं बळ सुद्धा या पावसाने दिलं असेल.
स्व केंद्रित आयुष्य जगताना हरवलेल्या स्वत्वाची जाणीव करून देतानाच ते जपण्याचं महत्वही नकळत सांगत असेल. अपयश आलं तरी पुन्हा उभं राहण्याची उर्मी आणि अशा प्रसंगात आपल्या माणसांची भासणारी गरज आणि म्हणून माणसं जोडण्याची कानपिचकी देत असेल.
पहिल्या पावसानंतर सुखावलेले जीव मात्र त्याचे शतशः धन्यवादच मानतात. शेतकरी धरतीला तृप्त पाहून भविष्याचे अंदाज बांधत मनोमन त्याचे आभार मानत असतो तर सर्वसामन्य माणूस दरवर्षी प्रमाणे येणारा पावसाळा विनातक्रार जावा अशी आशा करत असतो. काही भटके जीव पुन्हा निसर्गाचं ते हिरवं सौंदर्य अनुभवण्यासाठी आणि त्या मध्ये स्वतःला हरवून जाण्यासाठी आतुर असतात.
प्रत्येकाच्या आयुष्यात वेगळं स्थान असलेला हा पहिला पाऊस मात्र वर्षातून फक्त एकदा येतो त्या मुळे जर या वर्षीचा तुम्ही पहिल्या पावसात भिजला नसाल तर तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या एका पावसाला मुकला आहात. पण काळजी करण्याचं कारण नाही कारण संपूर्ण पावसाळा अजून बाकी आहे आणि जर पहिल्याच पावसात भिजायचं असेल तर मग पुन्हा पुढचं वर्ष आहेच कि नाही का ?
……आनंद
No comments:
Post a Comment