Powered By Blogger

Sunday, June 12, 2011

कात्रज – सिंहगड ट्रेक : - अनपेक्षित , अविस्मरणीय , अदभूत


कधी कधी काही गोष्टी ठरवून होतात तर काही अगदी अनपेक्षित पणे, पण ठरवलेल्या गोष्टींपेक्षा या अनपेक्षित गोष्टी अचंभित करणारा अपार आनंद देऊन जातात. तसंच काहीसं झालं या वेळच्या कात्रज सिंहगड या अनपेक्षित पणे घडलेल्या ट्रेक मधे. एकूण १३ टेकड्या त्यात ४ मोठे डोंगर साधारण १६-१७ किमी चा ट्रेक आणि मग घाटात उतरून पुन्हा ६.५ किमी चा  walk अशी साधारण दिवसभरात २४-२५ किमी ची केलेली पायपीट हे शेवटी मात्र एक अदभूत असा इच्छापूर्तीचा आनंद देऊन गेली.  
 कात्रज लेक च्या बाजूला असलेल्या टेकडीवर मी आणि माझा मित्र चेतन सकाळी फिरायला जातो.  तिथे दरवेळी फिरताना इथून सिंहगड ची वाट कोणती असावी अशी आमची चर्चा होत असे. एकेदिवशी नेहमीपेक्षा थोडं वेगळ्या वाटेनं जाऊन आम्ही दूर असलेल्या एका घरामध्ये थोडी वाटेबद्दल विचारपूस केली. आणि तिथून मिळालेल्या माहितीमधून असं कळलं कि हिच वाट पुढे खंडोबाचा डोंगर आहे तिथपर्यंत जाते. खंडोबाचा डोंगर हा बराच दूर पर्यंत दिसतो. तिथे असलेल्या मंदिराचा घुमट धायरी गावातून अगदी स्पष्ट दिसतो. त्यामुळे तिथून पुढे सिंहगडची वाट असणारच हे आम्हाला कळून चुकलं.
हि माहिती मिळाल्या नंतर पुढच्या आठवड्यात खंडोबाच्या टेकडी पर्यंत किंवा जिथपर्यंत जाता येईल  तिथपर्यंत जायचं ठरलं. प्रत्येकाने येताना पाण्याची बाटली, पाठीवरची sack, वाटेत खायला थोडे snacks असं आणायचं ठरलं. ५ जून रविवारी सकाळी ६.४५ ची वेळ ठरली. त्याच दिवशी जागतिक पर्यावरण दिन आहे हे आम्हाला थोडं नंतर लक्षात आलं आणि त्या दिवशी आपण भटकायला निघालो आहोत याचं समाधान वाटलं.
चेतनचा आतेभाऊ श्रीकांत, त्याचा राहुल हा मित्र आणि मी असे आम्ही ४ जण ठरल्या वेळेला सकाळी
भेटलो. आणलेल्या बाईक टेकडीच्या पायथ्याशी लावल्या आणि आमचा ट्रेक सुरु झाला. पहिली टेकडी हि
रोजचीच असल्यानं अजून ट्रेक सुरु झालाय असं वाटतं नव्हतं पण आकाशात दाटून आलेले ढग, आणि पहिल्या पावसाने ओली झालेली जमीन हे सारे आज काहीतरी वेगळं अनुभवायला मिळणार असं सांगत होते. हळूहळू चालतानाच झाडावरच्या पक्षांकडेही आमचं लक्ष होतं कारण चेतनने त्याचा कॅमेरा आणला होता आणि त्यात टिपता येईल असे पक्षी आम्ही त्याला दाखवत होतो.

वर् टेकडीवर पोहोचल्यावर आम्ही उजव्या बाजूने दुसऱ्या टेकडीची वाट धरली. या वाटेवरून जाताना एक टिटवी मोठा आवाज करून भंडावून सोडते हा अनुभव मला आणि चेतनला या पूर्वीच आलेला होता आणि तो या वेळीही आला. आम्ही त्या वाटेवर प्रवेश करताच ती जोरजोरात ओरडू लागली. मागच्या आठवड्यात तर त्या टिटवीने एका घारीशी दोन हात केले होते हे आम्ही प्रत्यक्ष पाहिलं होतं. जणूकाही त्या भागावर तिने आपला हक्क प्रस्थापित केला होता. त्या टिटवीला मागे सोडून आम्ही उजव्या बाजूला दिसणाऱ्या दरीपुलाकडे पाहत पुढे चालत राहिलो.   थोडं पुढे जाताच रस्त्यात एक बेडूक बसलेला दिसला त्याची फुगलेली छाती पाहून तो अजून मोठा दिसत होता. पण क्षणभरातच तो जिवंत नसल्याचं आमच्या लक्षात आलं कदाचित काही तासांपूर्वीच तो मेला असावा असं वाटत होतं. बेडकाला मागे सोडून आम्ही दुसरी टेकडी चढायला सुरुवात केली. थोडीशी दगड धोंड्याची असलेली वाट चढताना छान वाटत होतं. तोच समोर एका झाडावर ८-१० पक्षी बसलेले दिसले. ग्रीन बी इटर ( वेडा राघू किंवा बहिरा पोपट ), लव बर्डस, चिमणी ,साळुंकी, ग्रे रंगाचा कुठलासा एक पक्षी असे सगळे एकत्र जमलेले पाहून मजा वाटत होती. ते पक्षांचं झाड मागे सोडून आम्ही खंडोबाच्या टेकडीच्या दिशेने पुन्हा चालू लागलो.

थोडं चालल्यावर समोर एक घर दिसू लागलं. घरं शेजारीच एक गोठा होता त्यात गायी म्हशी दिसत होत्या, घराबाहेर दोन पांढरे शुभ्र बैल उभे होते, घराच्या पलीकडे छोट्या जागेत शेती केलेली दिसत होती, आणि मुख्य म्हणजे त्या गोष्टीने आम्हाला थबकवल ती म्हणजे तिथे ४ कुत्रे आमच्या कडे कान टवकारून पाहू लागले होते. आणि हळूहळू पुढे सरकत आमच्या दिशेने येत होते. हे पाहून मी जवळ पडलेली एक काठी उचलून घेतली जी काठी मी शेवटपर्यंत जवळ बाळगली होती. आम्ही हळूहळू डाव्या बाजूने पुढे जाणे चालूच ठेवलं त्यातलं एक पांढऱ्या रंगाचं कुत्रं आमच्या जवळ आलं आणि शेपटी हलवू लागलं आणि आम्ही निश्वास सोडला, त्याला एक बिस्कीट खायला दिलं आणि मागच्या बाजूनं घरामध्ये हाक देऊन पुन्हा एकदा वाट विचारली. आता खंडोबाची टेकडी हि तिसरी टेकडी सुरु होत होती. ज्या कुत्र्याला बिस्कीट दिलं होतं ते आमच्या पुढे ती टेकडी चढू लागलं होतं. टेकडी चढतानाच अंगावर गारवारा येत होता त्यामुळे अजून दमायला होत नव्हतं.  

खंडोबाच्या टेकडीवर पोहोचल्यावर लगेचच मंदिर समोर दिसलं. बूट काढून देव्हाऱ्यात गेलो आणि दर्शन घेतलं. वाहिलेली शुभ्र फुलं ,मंद तेवणारा दिवा आणि आजूबाजूला पसरलेली शांतता या सगळ्यामुळे एक मनाला एक अनमिक आनंद वाटला. खंडोबाच्या टेकडीवरून उजव्या बाजूला सिंहगड आणि डाव्या बाजूला पसरलेलं धायरी गाव दिसत होतं. प्लान प्रमाणे इथपर्यंत येणंच ठरलं होतं.अजून सगळ्यांनाच वेळ भरपूर असल्यामुळे पुढे जायचं ठरलं. खंडोबाची टेकडी आणि सिंहगड या मधे एक पसरट डोंगर आहे ज्यावर एका रेषेत झाडे लावली आहेत जी दूर दूर पासून दिसतात.त्या डोंगरामुळे सिंहगड झाकला गेला होता तिथपर्यंत जायचा ठरलं. आणि आम्ही पुन्हा एकदा नवी वाट धरली. राहुलला घरी काहीतरी काम असल्यामुळे तो आधी नाही म्हणत होता पण चेतनने शेवटी अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नांतर त्याचा होकार मिळवला.
अशा तऱ्हेने आमची चौथी टेकडी सुरु झाली. बराच वेळ सरळ चालल्यानंतर टेकडी आली आणि मग ती आम्ही ती चढू लागलो. छोटीशीच असल्या मुळे ती लगेचच सर् झाली. पण वर् येताच आम्हाला असं कळलं कि अजून एक टेकडी पार केल्यावर आपण त्या पलीकडच्या डोंगरवर पोहोचू. समोरच्या त्या डोंगराकडे पाहत पाचवी टेकडीहि पार केली. आणि आम्ही त्या उंच डोंगराच्या माथ्यावर पोहोचलो. वर् पोहोचे पर्यंत चौथ्या आणि पाचव्या टेकडीवर आम्हाला एक छोटा स्नेक ,पेंटेड लेडी (painted lady butterfly) , danaid butterfly असे बरेच फोटो काढता आले. संपूर्ण रस्त्यात मधे वेलवेट सारखी कातडी असणारा अतिशय मनमोहक असा लाल चुटुक रंगाचा एक छोटा किडा आमचा सगळ्यांचाच लक्ष वेधून घेत होता. जसजसं पुढे जात होतो तसतसं निसर्गाच्या आणखी जवळ जात असल्या सारखं वाटत होतं.
त्या मोठ्या डोंगावरून पलीकडचा संपूर्ण भाग दिसत होता. डाव्या हाताला दुर दिसणारा पुरंदर आणि उजव्या हाताला आम्हाला खुणावणारा सिंहगड..! दमल्या मुळे आम्ही तिथेच आमच्या पाठीवरच्या sacks टाकल्या आणि बसलो. भूक लागल्यामुळे आणलेली बिस्कीट आणि बाखरवडि खाल्ली आणि ५ मि. नंतर पुन्हा चालायला सुरुवात केली ती सिंहगड च्या दिशेने. आणि तिथे सुरु झाला आमचा ट्रेक मधला दुसरा टप्पा. 
आत्ता असलेला डोंगर आम्ही उतरायला सुरुवात केली. ११.३० होऊन गेले होते आणि आकाशातले ढग अचानक नाहीसे झाले होते. त्यामुळे सूर्य आपली किरणे सर्वोतोपरी फेकत होता. हळूहळू उन्हाचा चटका वाढू लागला होता पण अजूनही वाऱ्याची एखादी झुळूक येत असल्यामुळे फार त्रास होत नव्हता. सहावी टेकडी पार करून आम्ही पुढे आलो. खडकाखालुन बाहेर आलेल्या सापसुरळीचे फोटो काढून आम्ही पुन्हा निघालो.
सातव्या टेकडीला सुरुवात केली आता उन्हाचा चटका वाढू लागला होता. आणि हात भाजू लागले होते. आकाशाकडे पाहून आम्ही ढग कुठल्या दिशेने येत आहे हे पाहत होतो. टेकडी चढून तर झाली पण वर् आल्या नंतर पुन्हा तेवढीच उतरावी लागत होती त्या मुळे चांगलीच दमछाक होत होती. जवळ असलेलं पाणी अजून ६ टेकड्या पुरवायचं असल्या मुळे तेही सांभाळून वापरावं लागत होतं. सातवी टेकडी उतरताना झाडांवरची माकडे दिसली. आमची चाहूल लागताच दूर पळाली. शेवटी एकदाची ती सातवी टेकडी उतरून आम्ही आठवी सुरु केली आणि आठवीच्या माथ्यावर पोहोचलो. 
वर् पोहोचताच सगळे मटकन खाली बसलो.एव्हाना ढग जमा होऊ लागले होते. तोच आमचं आवाज ऐकून एक गुरे हाकणारा गुराखी आला. आमच्या आधी सकाळी २०-२५ जणांचा ग्रुप पुढे गेल्याचं त्याने आम्हाला सांगितलं. अजून पुढे किती टेकड्या आहेत हे त्याला विचारून घेतलं. पुढची टेकडी जरा जड जाईल असं त्याने सांगताच आमचं उरलेलं त्राण गळायचच बाकी होतं. पण तरीही मनाचा ठिया करून सगळे उठलो आणि चालू लागलो.
नववी टेकडी चढून आम्ही वर् आलो. आणि तोच पावसाचा पहिला थेंब हातावर पडला. आणि जणू काही चैतन्याचा स्पर्श झाल्या सारखं जाणवलं. हा हा म्हणता सगळं आकाश काळ्या ढगांनी भरून गेलं आणि धरणी च्या भेटीला पाऊस आला. मागे दिसणाऱ्या खडकवासला धरणावर पावसाची धार धरल्या सारखं वाटत होतं. बघता बघता सगळीकडे पाऊस कोसळू लागला. तापलेली माती चिंब ओली झाली. आणि तिच्या तृप्ततेचा गंध आजूबाजूला पसरला. इतका वेळ शांत बसलेली झाडं जणूकाही नाचू लागली, प्रत्येक पान गाणं गाऊ लागलं.फांद्या त्या तालावर डोलू लागल्या आणि सार जंगल गिरक्या घेत हसू लागलं.
कोसळलेले सगळे थेंब एक होऊन एक जलधारा निर्माण झाल्या आणि बघता बघता डोंगरावरून पाणी वाहू लागलं. आकाशातले ढग उतरून डोंगरावर आले आणि आजूबाजूच्या सगळ्या टेकड्या ,डोंगर दिसेनासे झाले. पावसाचा जोर खूप होता म्हणून आम्ही सगळे थोडं थांबलो. मी एका छोट्या झाडाचा आश्रय घेतला, पण  त्याचा फारसा उपयोग नव्हता कारण झाडाचं प्रत्येक पान ओंजळ करून पावसाचं पाणी जणू काही माझ्या अंगावर बरसवत होतं असं मला क्षणभर वाटून गेलं. कदाचित अशा चिंब पावसात त्याला मला कोरडं राहू द्यायचं नव्हतं त्यामुळे मी हि नखशिखांत ओला झालो. हळू हळू पाऊस कमी झाला आणि आम्ही पुन्हा चालायला सुरुवात केली. पण अजूनही समोरची टेकडी ढगामध्ये हरवलेलीच होती. ढग पुढे जायची वाट पाहून आम्ही निघालो हळूहळू दूरच दिसू लागलं. तोच समोर एक भेकर ( हरीण) झाडामागे धावत गेलं. पाऊस पडून गेल्यावर दूरदूर पर्यंत अगदी स्पष्ट दिसू लागतं त्यामुळे आम्हालाही घाट रस्त्याने जाणारी वाहने दिसू लागली, तसाच सिंहगड सुद्धा बराच जवळ आला होता. पाऊस अगदी रिमझिम पडत होता.या पावसाने आमच्या सगळ्यांच्या मरगळलेल्या शरीराला एक नवा तजेला दिला होता आणि त्याच उत्साहात आम्ही सगळे पुढे निघालो.

हि नववी टेकडी आम्ही भरभर उतरलो. मग दहावी, अकरावी आणि बारावी सुद्धा पटपट संपल्या कारण आम्ही आता न थांबता चालत होतो. पाऊस थांबला असल्याने आजूबाजूच्या जंगलामधून मोरांचे आवाज येऊ लागले होते. कदाचित कुठेतरी मोर पिसारा फुलवून नाचत सुद्धा असतील असा विचार येऊन गेला. शेवटच्या तेराव्या टेकडी नंतर आम्हाला आता घाट रस्त्याला जावं लागणार होतं आणि तिथे जाणारी वाट हि झाडाझुडपातून गेलेली होती. नुकताच पडलेला पाऊस आणि चिंब भिजलेलं जंगल यातून चालण्याची मजा काही औरच असते.पानापानातून पाणी ठिबकत होतं. एकामागे एक असे चालत असतानाच मला आणि राहुलला एक मोर दिसला आणि तो इतरांना दाखवण्याआधीच झाडीत गडप झाला. अजून थोडं पुढे आलो असू तोच मला सोडून बाकी सगळ्यांना उडत जाणारा मोर दिसला. चेतनने सांगितलं कि या टोकापासून त्या टोकापर्यंत त्या मोराने अशीकाही glide घेतली कि बस्स. त्या मोराची वर्णने ऐकत आणि मी miss केलेला तो क्षण मागे सोडून मग आम्ही सगळे खेडशिवापूर कोंढणपूर रोडला लागलो. 
जंगलातून बाहेर येताना चेतनने आमचा सगळ्यांचा एक फोटो काढला, खरतर सकाळ पासून सुरु झालेला हा चढ उताराचा प्रवास कधी संपेल याची आम्ही वाट पाहत होतो पण या शेवटच्या क्षणाला मात्र मन राजी होत नव्हतं. शरीर आणि मन यांचा पुरता गोंधळ उडालेला होता. दमलेलं शरीर आणि गुंतलेलं मन हे दर ट्रेक मधे भेटणारे दोन कट्टर प्रतिस्पर्धी असावेत असं मला वाटतं.
खेडशिवापूर कोंढणपूर रस्त्याने सिंहगड घाट रस्त्याला लागलो आणि समोर असलेली टपरी पाहून फार फार हलकं वाटलं. घड्याळ ४.३० ची वेळ दाखवत होतं.लगेचच चहा आणि भज्याची ऑर्डर दिली आणि तिथेच कट्ट्यावर टेकलो. तिथे असलेल्या कॅन मधलं पाणी पिऊन तहान भागवली. ५ मिनिटांमध्ये चहा आला. गरम गरम भजी आमच्या समोरच तयार होत होती. २ प्लेट भजी डिश मधे दिल्यानंतर सगळे त्यावर तुटून पडलो. आणि २ मि. मधे सगळी संपली. दुसरी ऑर्डर लगेच दिली पण तो पर्यंत मला आणि राहुलला राहवत नव्हतं म्हणून आम्ही चेतनला हळूच त्या पलीकडे कट्ट्यावर ठेवलेल्या ट्रे मधली भजी उचलायला सांगितली. आधी नको नको करत असतानाही ,जेव्हा ते पाणी देणारे काका पलीकडे गेले, भजी तळणारा माणूस दुसरी कडे पाहत होतं तेव्हा चेतनने हळूच त्यातली राहिलेली २ भजी उचलली आणि डिश मधे टाकली आणि राहुल आणि मी क्षणभराचाही विलंब न लावता तोंडात टाकली. अशा गमती जमती करत पुन्हा आम्ही घाट रस्त्याने पायथ्याच्या दिशेने चालू लागलो. 
साधारण १.३० तासानंतर आम्ही पायथ्याला पोहोचलो. बसची चौकशी करून बस थांब्यावर येऊन थांबलो. रविवार असल्यामुळे प्रचंड गर्दी होती. १५-२० मि. बस आली, कसेबसे त्यात चढलो आणि उभे राहिलो. नवी बस आणि नवा driver असल्याने आमचे सगळ्यांचे stretching चे चांगलेच व्यायाम झाले. दर मिनिटाला एक ब्रेक अशातऱ्हेने बस चालली होती आणि उभी राहिलेली माणसे एकमेकांच्या अंगावर आदळत होती. असाच प्रवास करत शेवटी बसने आम्हाला आमच्या इच्छित स्थळी पोहोचवले हे आमचे नशिबाच म्हणावे लागेल.

अशा तऱ्हेने अजून एक ट्रेक पूर्ण झाला होता. आणि या वेळचा ट्रेक विशेष होता कारण कुणालाच याची कल्पना नव्हती, तो अनपेक्षित होता पण तरीही दिवसभराचा अनुभव अविस्मरणीय आणि अदभूत नक्कीच होता. चेतनच्या घरी जाऊन आम्ही जेव्हा आमच्या बाईक्स आणायला पुन्हा त्या सकाळच्या टेकडीपाशी गेलो तेव्हा एक चक्र पूर्ण झाल्याचा भास झाला.  घडणाऱ्या गोष्टी घडतातच आपण फक्त त्यांचं घडणं अनुभवायचं असतं हे पुन्हा एकदा सिध्द झालं होतं. असंख्य नव्या अनुभवांची शिदोरी हाताला बांधून घराची वाट धरली......! 
 
रात्री झोपताना ,सकाळची कोवळी किरणे आणि आताचा काळामिट्ट अंधार यामध्ये आजचा दिवस होता एवढं आठवलं आणि दिवस सार्थकी लागल्याचं समाधान मिळालं यातच सगळं आलं नाही का ?   

.....आनंद
        



3 comments:

  1. Saheee ree .......... Next time go for a Katraj Sihagad MOON-LIGHT trek ...... It is AWESOME ...... it really feels like fairy land under the full-moon.

    ReplyDelete