मान्सूनचं राज्यात पुन्हा आगमन झालं अश्या बातम्या पपेर मधे येत असतानाच माझं कुठल्या ट्रेक ला जावं असं प्लांनिंग चाललं होतं. सुरुवातीला कोलाड ला कुंडलिका नदीमध्ये राफ्टिंग चा बेत चालला होता. परंतु ऐनवेळी राफ्टिंग च्या सगळ्या जागा भरल्यामुळे मग पुन्हा माझी गाडी ट्रेक वर येऊन थांबली.आणि मग रोहीड्याचा ट्रेक घडला. रीतीरिवाजाप्रमाणे ४-५ मित्रांना विचारून झालं, आणि रीतीरिवाजाप्रमाणे उत्तरे सुद्धा मिळाली. शेवटी फक्त अपर्णा तयार झाली आणि मग आम्ही फार लोकांच्या मागे न लागता ठरवलेला बेत साध्य करायचं ठरवलं. ट्रेकडी च्या ऑफिस मधे जाऊन बुकिंग केलं .
दुसऱ्या दिवशी पहाटे स्वारगेट बस स्थानक इथे आम्ही सगळे जमलो. निनाद आणि अनिश हे आमचे “गाईड” होते .साधारण १५-१६ लोकांचं ग्रुप दिसत होता. वेगवेगळ्या प्रकारची माणसे पाहायला मिळणं हे प्रत्येक ट्रेकचं एक वैशिष्ट्य असतं. ते इथेही लागू पडत होतंच.
भोर पर्यंतचा प्रवास हा एस. टी. ने करायचा असल्यामुळे मजा तर येणारच होती. एस. टी. चा प्रवास का कुणास ठाऊक पण मला मनापासून आवडतो. एस. टी. मधले ते भोळे भाबडे चेहेरे इतरत्र कुठेही दिसत नसावेत असं वाटत राहत. खरं सांगायचं म्हणजे एस. टी. मधे खरा “ प्रवास” घडतो.
साधारण ६.३० च्या सुमारास आमची एस. टी. लागली आणि आम्ही सगळे त्यात बसलो. ५-१० मिनिटामध्ये गाडी निघाली. संपूर्ण प्रवासभर अखंड गप्पा मारत असल्यामुळे आम्हाला भोर कधी आलं हे कळलंच नाही. भोरच्या स्थानकावर बस थांबली आणि आम्ही सगळे जण खाली उतरलो. पोटात भुकेने कावळे ओरडू लागले होते. त्यामुळे आम्ही सगळे नाश्ता करण्यासाठी एका हॉटेल मधे शिरलो. आमची सगळ्यांची अजूनही ओळख न झाल्यामुळे सगळे जण विखरून बसले होते. ते पाहून गम्मत वाटत होती. आम्ही बसलो होतो त्या टेबलावर एक काका बसले होते. आम्ही एकमेकांची ओळख करून घेतली. मस्तपैकी मिसळपाव खाल्यावर आत्मा कसा शांत आणि ताजातवाना झाला. खाऊन झाल्यावर आम्ही सगळे बाहेर पडलो ,आता इथून पुढे साधरण ८-९ कि मी खासगी वाहनाने प्रवास करावा लागतो. आम्हाला २ मारुती व्हेन मिळाल्या. अगदी दाटीवाटीने बसून सुद्धा त्याचं अजिबात त्रास होत नव्हता. उलट छान वाटत होतं. बाहेर हिरवीगार शेतं दिसत होती. पण मुख्य म्हणजे आकाशातून सूर्य बाहेर डोकवत होता आणि उन पडलं होतं. त्यामुळे आता रोहीडा उन्हामध्ये चढवा लागतो कि काय असं वाटत होतं. समोर बसलेल्या आजीने आमचं बोलणं कदाचित ऐकलं असावं त्या लगेच म्हणल्या “नाही पाऊस येतोच रोज इकडे आजही येईल”. त्यांचं बोलणं ऐकून बरं वाटलं. आणि थोडं पुढे जातच बारीक बारीक पावसाचे थेबं कोसळू लागले आणि हवा एकदम ओली झाली. २०-२५ मिनिटांमध्ये बाजारवाडी ला पोहोचलो आणि तिथूनच रोहीडा खुणावू लागला. डाव्या हाताला बाजारवाडी आणि उजव्या हाताला रोहीडा असं चित्र दिसत होतं. सकाळचे १०- १०.१५ झाले होते. गोल रिंगण करून आम्ही सगळ्यांनी एक एक करून स्वतःची ओळख करून दिली. आणि मग सुरु झाला आमचा रोहीडा ट्रेक.
अजूनही उन मधेच ढगातून डोकवायचं आणि पुन्हा गायब व्हायचं, त्याचा हा खेळ चालूच होता आणि आम्ही हळूहळू वर चढू लागलो होतो. जसजसं वर जात होतो तसतसं वारं वाढत होतं. फोटो काढत, मधेच खडकावर बसत पुन्हा उठून चालायला लागत असं प्रत्येकाचंच चालू होतं. वारा चांगलाच वाढला होता, इतका कि चालताना शरीराचा एका बाजूला झोक जात होता. आम्ही सगळेच साधारण एकच गतीने चढत होतो, मात्र ट्रेकला हातभर मोठी छत्री घेऊन आलेली “सच का सामना” ची fashion designer मात्र काही केल्या एकवेळी ४ पावलांपेक्षा जास्त पावले टाकत नव्हती. त्यामुळे निनाद आणि ती दोघेच मागे राहिले होते. हे सगळं पाहून आम्हाला निनाद्ची कीव आल्यावाचून राहवलं नाही आणि या वरून आम्ही सगळ्यांनी त्याची नंतर बरीच खेचली.
शेवटच्या टप्प्यात थोडासा “ rock patch “ येतो तो चढताना मस्त मजा येते. तो पार केल्यावर लगेचच आपल्याला वरती पहिला दरवाजा दिसू लागतो. आम्ही सगळे तासदीड तासात वर पोहोचलो पण ते दोघं बरेच मागे असल्यामुळे साधारण आमच्या नंतर एका तासाने आले.
रोहीडा (त्याला विचित्रगड असंही म्हणतात) हा तसं पाहिलं तर फार सोपा किल्ला आहे आणि त्याच बरोबर लहान सुद्धा आहे. रोहीडा १६५६ मधे यादवांच्या कळत बांधला गेला.आणि मग शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा भाग झाला. १६६६ मधे मुघलांनी तो ताब्यात घेतला खरा पण ते फार काल तो टिकून ठेवू शकले नाहीत आणि जून २४ १६७० मधे शिवाजी महाराजांनी पुन्हा तो ताब्यात घेतला.
रोहीड्याला एका नंतर एक असे ३ दरवाजे आहेत. तीनही दरवाजे एकमेकांना काटकोनात आहेत. दाराच्या वर गणेशपट्टी आहे. दरवाज्याची लाकडी दारं अजूनही शाबूत आहेत हे पाहून आश्चर्यचकित व्हायला होतं. दरवाज्याच्या एका बाजूला सिहांच शिल्पं आहे. तिथेच उजव्या हाताला पाण्याची टाकी दिसते. गम्मत म्हणजे टाकीमध्ये बाराही महिने पाणी असतं. तिसरा दरवाजा बऱ्यापैकी भक्कम आहे आणि त्याच्या आत मधे बसण्यासाठी जागा आहे जशी मंदिराच्या दरवाज्यामध्ये असते. तिसऱ्या दरवाज्यातून आत येताच समोर भगवा झेंडा फडकताना दिसतो. तिथून उजवी कडेच थोड्याच अंतरावर भैरोबा मंदिर आहे. पूर्वीच्या काळात हे मंदिर किल्लेदारांचे घर होते.
आम्ही वर पोहोचताच मंदिराकडे गेलो आणि तिथे जाऊन दर्शन घेतलं. भैरोबा मंदिरामध्ये गणपती, शिवलिंग, भैरव अशा देवतांच्या प्रतिमा आहेत.
मंदिराच्या समोरच पाण्याच्या टाकी मधे पावसाचं पाणी साठलेल होतं. ते इतकं स्वच्छ होतं कि त्याचा तळ सुद्धा दिसत होता. आम्ही सगळे पाण्यात पाय टाकून तिथेच खडकांवर बसलो. वारं अजूनही वाहतच होतं. त्यामुळे त्या पाण्यावर वेगवेगळे आकार उमटत होते. आजूबाजूला उगवलेली गवताची पाती त्या वाऱ्यावर डोलत होती. काही पात्यांनी अजूनही पावसाच्या थेंबाना अलगद पणे धरून ठेवलं होतं. समोरच पांढरे शुभ्र ढग वाऱ्याबरोबर वाहात चालले होते. निसर्गाचं ते रुपडं पाहून मीच काय पण कोणीही हरवून गेलं असतं यात शंकाच नाही. निसर्ग निर्पेक्षेतन आनंदाची उधळण करतच असतो पण आपल्याला त्या सौंदर्याकडे पाहायला वेळ नसतो हेच खरं.
थोडं वेळ तिथे बसल्यावर आम्ही मग किल्ल्यावर भ्रमंती करायला निघालो. रोहीड्याच्या तटबंदीवर एकूण ७ बुरुज आहेत. उत्तर पूर्वेला असलेला शिरवले बुरुज ,दक्षिणेकडचा वाघजाई बुरुज, पूर्वेला फत्ते बुरुज आणि सदर बुरुज. प्रत्येक बुरुजावरून दिसणारं दृश्य हे अगदी स्मरणात राहिल असं होतं. रोहीड्यावरून आपल्याला पूर्वेला पुरंदर आणि वज्रगड दिसतो , उत्तरेला सिंहगड, उत्तर पश्चिमेला राजगड आणि तोरणा आणि पश्चिमेला केंजळगड, कमळगड या बरोबरच दक्षिणेला रायरेश्वर पठार दिसतं. पावसाळ्यात दूरदूर पसरलेला हिरवागार रंग पाहताना डोळ्याचं पारणं फिटतं. हिरव्या रंगाच्या इतक्या वेगवेगळ्या छटा दिसतात कि आपल्यालाच संभ्रम व्हावा. गडाच्या उत्तरेला खडकात कोरलेले पाण्याचे टाके आहेत. अतिशय काटेकोर पणे आणि विचारपूर्वक केलेली त्यांची रचना पाहून थक्क व्हायला होतं.
भरपूर फोटो काढून, किंवा इतरांना काढायला लावून, मस्तपैकी पावसाचे थेंब अंगावर झेलत आम्ही गड फिरून पुन्हा मंदिराकडे यायला निघालो. मन तृप्त झालं होतं. मंदिरामध्ये जाऊन मग आम्ही बरोबर आणलेले जेवणाचे पदार्थ बाहेर काढले आणि खाऊ लागलो. इतक्या लोकांचे इतके वैविध्य पूर्ण पदार्थ जमले कि आमची हसताहसता पुरेवाट झाली. ( चितळ्यांची बाखरवडि, काकांनी आणलेले थेपले, पुणेरी चिवडा, स्नेहाने आणलेला घरचा डबा, बिस्किटे, ). अशाप्रकारे सगळे जिन्नस संपवून आम्ही गड उतरायच्या मार्गाला लागलो. उतरायला सुरुवात करताच बारीक बारीक पाऊस सुरु झाला. मनसोक्त भिजायचं असल्यामुळे आम्ही तसेच उतरत राहिलो. साधारण अर्धा गड उतरल्यावर पावसाने जोर धरला आणि त्याच बरोबर वाराही जोमाने वाहू लागला. इतका जोरात कि आजूबाजूच काहीही दिसेना, आम्ही सगळे चिंब ओले भिजलो. पावसाच्या धारा अंगाला टोचत होत्या पण तरीही त्या हव्याहव्याश्या वाटत होत्या. डोंगरावरून पाण्याचे लोट वाहू लागले. छोटेछोटे धबधबे दिसू लागले.आणि बघता बघता पांढऱ्या शुभ्र ढगांमध्ये रोहीडा दिसेनासा झाला.
क्षणिक सुखाच्या मागे धावायची सवय लागलेल्या माणसांना या सुखाचं वर्णन कुठल्या शब्दात करून सांगावं ? जिथे प्रत्येक रंग आपलं अस्तित्व टिकवून इतरांमध्ये मिसळत असतो तिथे खरंतर त्यानं आपलं स्वत्व बाजूला ठेवलेलं असतं. वाहणारी प्रत्येक धारा शेवटी दुसऱ्या धारेला मिळते आणि हातात हात घालून हसत खेळत बागडत त्या तिसरीच्या शोधात निघतात. एखादी पाण्याची धारा डोंगरावरून कोसळू पाहते आणि दरी मधे उडी घेताच ढग पुन्हा त्या तुषारांना उचलून घेतात. मला वाटतं हा खरंतर निसर्गाचा एकमेकांशी साधलेला संवाद असतो, वारा, पाऊस, पाणी, धारा, ढग, उन सगळे एकमेकांशी संवाद साधतात ते फक्त एकमेकांवरच्या प्रेमापोटी. अशा सगळ्या गोष्टी आजूबाजूला घडत असताना आम्ही त्याचे साक्षीदार होतो हा विचार करूनच भरून यायला झालं आणि जाणीव झाली ती, त्या सार्थकी क्षणाची जो प्रत्येक ट्रेक मधे येत असतो.
तासाभरात आम्ही खाली पोहोचलो आणि बाजारवाडी गावात एका पिंपळाच्या पारावर विसावलो. एव्हाना पाऊस थांबला होता. अनिश आणि मिस. “छत्री” (हे आम्ही दिलेलं नाव आहे )अजून खाली उतरल्या नव्हत्याच त्या मुळे आम्हाला थांबणं साहजिकच होतं. तो पर्यंत मग थोडं गाव फिरून पाहिलं. नाव जरी बाजारवाडी असलं तरी नावापेक्षा खूप शांत असं गाव पाहून छान वाटलं. साधारण अर्ध्या तासाने आम्ही बाजारवाडी मधून निघालो आणि भोर स्थानकावर पोहोचलो.
वेळ तसा बराच असल्यामुळे तिथे थोडं चहापान करून मग आम्ही सगळे भोरचा राजवाडा पाहायला गेलो. राजवाड्यात ठिकठिकाणी वेगवेगळे फोटो काढले. इथे अभिजीत ने काढून घेतले असं म्हणायला हरकत नाही. आणि फोटो काढणाऱ्या काकांनीही अजिबात कंटाळा न करता आमचे भरपूर फोटो काढले. राजवाडा प्रचंड सुंदर आहे. प्रत्येक ठिकाणी सौंदर्य भरून वाहतंय असं वाटतं. केलेली कलाकुसर पाहून थक्क व्हायला होतं. कितीही आत गेलं तरीही राजवाडा संपतच नाही .एका दारानंतर दुसरं, मग तिसरं अशी दारं येतंच राहतात. प्रत्येक खोली मधे वाड्याला येणारा लाकडाचा वास येत होता आणि मन पूर्वीच्या काळी आज्जीच्या गावाला असणाऱ्या आमच्या वाड्याच्या खोलीत जाऊन पोहोचलं होतं. वाड्यामध्ये मनसोक्त फिरून शेवटी आम्ही निघालो आणि पुन्हा बस स्थानकावर आलो. काही मिनिटांमध्येच बस आली आणि आम्ही सगळ्यांनी बसून घेतलं. गाण्याच्या भेंड्या खेळत, हसत खिदळत ,एकमेकांची गाणी खोडून काढत आम्ही कधी स्वारगेटला पोहोचलो कळलंच नाही.
हा ही अनुभव सकाळ सारखाच होता पण आम्ही सकाळी सगळे वेगवेगळे होतो आणि या वेळी आम्ही नवे मित्र जोडले होते. काहीकाही प्रवास नको असताना संपतात पण जाताना मात्र नवी नाती जोडून जातात. पुन्हा नक्कीच भेटू असं एकमेकांना सांगत आम्ही सगळ्यांचा निरोप घेतला.
तशातलाच हा एक आनंददायी अनुभव.
आनंद