कधी कधी एखादी गोष्ट अनुभवण्याची खूप इच्छा असते. पण तो योग जुळून येणं हि फार महत्वाचं असतं. एखाद्या मोठ्या झाडाचं पान आपसूक पणे गळून पडत तेव्हा त्याच्या ध्यानी मनी नसताना त्याचं स्वप्नं पूर्ण होत असतं हे त्यालाही कळत नाही. यावेळी असंच काहीसं घडलं.
विठू माउली हे साऱ्या महाराष्ट्राचं दैवत. गेली कित्येक शतकं न चुकता हजारो माणसं माउली साठी सर्वस्व विसरून पंढरीच्या वारीला जातात. हजारो लोकांची लाखो पाऊले अविरतपणे फक्त माउलींचा जयघोष करत दरवर्षी नेमाने निघतात. अशाच वारीला अगदी जवळून पहायचं असेल, अनुभवायचं असेल तर ती प्रत्यक्ष केल्याशिवाय पर्याय नाही. पण संपूर्ण १५-१८ दिवसांची वारी करणं सध्या शक्य नसलं तरी त्या अथांग सागरातला एक थेंब आपल्या ओंजळीत घ्यायला काय हरकत आहे असा विचार केला आणि यावेळी आळंदी पुणे माऊलींबरोबर वारी करायचं ठरलं. आणि हा विचार शक्य झाला तो केवळ माझा मित्र पुष्कर मुळे . असं म्हणतात एकदा वारी केली कि ती पुन्हा पुन्हा करावीच वाटते असंच काहीसं त्याचं झालं होतं. मागच्या वर्षी पुणे पंढरपूर अशी संपूर्ण वारी केल्यामुळे त्याचं यावेळी जाणं हे तसं पाहिलं तर अपेक्षितच होतं. आणि त्यामुळेच आम्ही दोघांनीही यावेळी आळंदी पुणे वारी करायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे ती पार सुद्धा पडली.
ज्ञानेश्वर माउलींची पालखी शनिवारी आळंदी वरून निघत असल्यामुळे आमचं अर्ध काम आधीच झालं होत आणि ते म्हणजे ऑफिसला सुट्टी टाकावी लागणार नव्हती .त्यामुळे शुक्रवारी रात्रीच आळंदीला मुक्कामाला जायचं ठरलं. ठरल्याप्रमाणे शुक्रवारी संध्याकाळी ६.३० च्या दरम्यान ऑफिसमधून निघालो. कॉर्पोरेशनच्या बस थांब्यावर सगळ्या वारकऱ्यांची झुंबड उडाली होती. साधारण ३-४ बस गेल्यानंतर ७.३० च्या आसपास आम्हाला बस मिळाली. संपूर्ण बस आळंदीला जाणाऱ्या लोकांनी किंबहुना वारकऱ्यांनीच भरली होती.
अशातच साधारण १५ मि.नंतर बस पुणे सोडून आळंदीच्या रोडला लागली. तोच मागे बसलेल्या वारकऱ्यांनी एकमेकांना गाणी म्हणायचा आग्रह सुरु केला आणि काही वेळातच त्यांची गाणी कानावर येऊ लागली. त्यांच्या थोड्याश्या मिश्कील पण भाबड्या विनवण्या ऐकून हसू सुद्धा येत होतं आणि गंमतही वाटत होती. “हाती घेतली आरती , भवती शोभे सुख समाधी” हे आनंद गीत गाताना प्रत्येकाच्या मनातली माउलींची प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहत होती. त्याचप्रमाणे आळंदीला जाऊन माउलीना भेटायला आतुर झालेल्या त्या जीवांची “ अरे पांडुरंगा कधी भेटशील “ अशी आर्त साद मनाला भिडत होती. संत तुकाराम, संत एकनाथ, ज्ञानेश्वर माउली या सगळ्यांना आपल्या अंगा खांद्यावर खेळवणाऱ्या पांडुरंगाला त्यांनी आपल्या “ विठू माझं लेकुरवाळा “ या गाण्यातून आपलंसं केलं होतं. जसजसं आळंदी जवळ येत होतं तसतसं “ बाई मला वारीला जायाचं “ असं भारुड गाऊन सर्व सामन्यांच्या मनातील भावनाही पांडुरंगासमोर काढून ठेवत होत्या. खिडकीतून बाहेर सगळीकडे राहुट्या, वारकरी विसावलेली घरं , झाडाखाली मांडलेलं बस्तान असं एखाद्या चित्रात शोभेल असं दृश्य दिसत होतं. आम्ही साधारण ९ च्या आसपास आळंदीला पोचलो .चालत चालत आम्ही इंद्रायणी नदीच्या पुलावर आलो. आणि तोच समोरचं दृश्य पाहून डोळे धन्य झाले. उजव्या बाजूला इंद्रायणीच्या दोन्ही काठांवर वारकऱ्यांचा मेळावा भरलेला दिसत होता. डाव्या बाजूने वाहत येणारी नदी जणूकाही मोठ्या आवेशाने त्या सगळ्या वारकऱ्यांना येऊन मिठी मारते कि काय असं वाटत होतं. तिचा खळाळणारा आवाज तिचा आनंद लपवू शकत नव्हता. पुलावरच्या एका कठड्या वरचा सुवर्ण स्तंभ आपलं सौंदर्य मिरवत उभा होता. पलीकडच्या काठाच्या मागच्या बाजूस मंदिर दिसत होतं आणि कित्येक वर्ष अखंड उभा असलेला सुवर्ण पिंपळ. हे सारं दृश्य डोळ्यात भरून घेत आम्ही मंदिराच्या दिशेने निघालो.
पालखी गांधीवाड्यात असल्यामुळे आधी तिथे जाऊन पालखीचं दर्शन घ्यायचं ठरलं. त्याप्रमाणे रांगेत जाऊन उभं राहिलो. अतिशय शिस्तबद्ध पणे रांग पुढे सरकत होती. प्रत्येकाच्या ओठी विठू माउलीचा ,ज्ञानेश्वर माउलीचा गजर चालू होता. संपूर्ण वातावरणाच भारावलेलं झालं होतं.माउलीच्या पालखीवर डोकं टेकवायला मन अधीर झालं होतं.शेवटी पालखी समोर आली आणि दोन क्षणाच्या त्या सहवासामध्ये शतजन्माची तहान भागल्याचं समाधान मिळालं. त्याच भारावलेल्या अवस्थेत मंदिराकडे निघालो. एव्हाना मंदिराची रांग कमी झाली होती त्यामुळे मंदिरात अपेक्षेपेक्षा फारच लवकर प्रवेश मिळाला. माऊलींच्या चरणात डोकं ठेवून आशीर्वाद घेतला. बाहेर येऊन सुवर्ण पिंपळा समोर उभे राहिलो. त्याचा तो विस्तार पाहून मन प्रसन्न होत होतं. त्याच्या समोरच्याच पायऱ्यांवर विसावलो. प्रत्येक वाऱ्याची झुळूक आल्यावर पिंपळाच्या पानांची होणारी सळसळ त्याच्या जिवंत पणाची साक्ष देत होती. त्याच्या पसरलेल्या अगणित बाहूंनी तो प्रत्येक भक्ताला मायेने गोंजारत असल्याचा भास होत होता. त्याच्या त्या शांत , शीतल सान्निध्याचा आम्ही डोळे मिटून अनुभव घेतला. त्या अतिशय सुखावणाऱ्या अनुभवातून कधी बाहेरच पडू नये असं वाटत होतं. तिथून उठून आम्ही माउलींचा स्पर्श ज्या झाडाला झाला होता त्या अजान वृक्षाचं दर्शन घेतलं. याच्या केवळ दर्शनाला सुद्धा खूप पवित्र मानतात. या वृक्षाच्या सान्निध्यात केलेल्या अनुष्ठानामुळे अज्ञान दूर होते असा समज आहे. अजान वृक्षाची इतर शास्त्रीय माहिती तिथे लावलेल्या माहिती फलकावर लिहिली होती. अजान वृक्षाचं दर्शन घेऊन मंदिरातून पाय निघत नसतानाही तेथून पाउल काढत घ्यावं लागलं. तेथून निघून आम्ही थेट पोचलो ते इंद्रायणी नदीच्या काठावर. तिथे मगाशी होता त्यापेक्षा जास्त जनसागर लोटला होता. पलीकडे कार्तिकी गायकवाड हिचा गाण्याचा कार्यक्रम चालू होता. मंद वारा वाहत होता आणि इंद्रायणीचं वाहात पाणी गारवा पसरवत होतं. कुणी झोपलं होतं, कुणी बसलं होतं, कुणी टेकून बसलं होतं, कुणी उभं होतं, पण सगळ्यांच्या मनात माउली वसली होती या शंका नव्हती. आम्ही सुद्धा काठावरच्या पायऱ्यांवर विसावलो. वाहणाऱ्या पाण्याकडे पाहताना तेही निरागसपणे हसत होतं असं जाणवत होतं. बराच वेळ त्या मंत्रमुग्ध वातावरणाचा अनुभव घेतल्यानंतर आम्ही रात्रीचा विसावा शोधत निघालो. आणि नृसिंह सरस्वती मंदिरात आमची सोय झाली किंबहुना माउलीनेच केली असं म्हणायला हरकत नाही.
सकाळी साधारण ४.१५ लं उठून आवरून पावणेपाच च्या सुमारास आम्ही पुन्हा इंद्रायणीच्या काठावर आलो. इंद्रायणीच्या पाण्यात स्नान करणाऱ्यांची झुंबड उडाली होती. स्त्री, पुरुष, लहान मुले, म्हातारी माणसे सगळेच एकत्र त्या पवित्र वातावरणात इंद्रायणीच्या पाण्यात स्नान करत होते. रात्री प्रमाणेच हे दृश्य सुद्धा वेड लावणारं होतं. तिथून निघून आम्ही मंदिराच्या दिशेने चालू लागलो. पालखीचं प्रस्थान होण्याची वेळ जवळ आली होती . मंदिराजवळ येताच समोर आला तो पालखीचा फुलांनी सजवलेला रथ .फुलांची सजावट फारच मनमोहक होती. पालखीला जुंपणारे बैल सुद्धा तिथेच उभे होते. पाच साडेपाच फुट उंचीचे ते पांढरे शुभ्र बलदंड बैल रथाला जुंपतना आजूबाजूच्या लोकांना फार कसरत करावी लागत होती. शेवटी बैल जुंपले गेले आणि रथ गांधीवाड्याच्या मागच्या बाजूस रवाना झाला. मग आम्हीही तेथून गांधीवाड्या कडे निघालो. एक कोपरा पकडून रस्त्याच्या बाजूला उभे राहिलो. हळूहळू सगळ्या दिंड्या तिथे जाऊ लागल्या. प्रत्येक दिंडीतील झेंडेवाले वारकरी , मृदंग वादक, वीणा वादक, डोक्यावर तुळशीवृंदावन घेतलेल्या बायका, हातात दिंडीचा क्रमांक असलेली पाटी हातात असलेले वारकरी अशा सगळ्या प्रकारच्या माणसांची गर्दी वाढू लागली. आणि तोच माउलींच्या घोड्याचं तिथे आगमन झालं. त्याच बरोबर चाफा , झेंडू, मोगऱ्याच्या नाजूक फुलांनी सजवलेली पालखी बाहेर आली आणि एकच जयघोष झाला. आसमंतात माउली माउली अशी साद दुमदुमली. हवेत गुलाबाच्या पाकळ्या उधळल्या गेल्या. सर्वजणांच्या चेहऱ्यावर निर्व्याज हसू उमटलं आणि पालखी रथाकडे मार्गस्थ झाली. पालखी रथामध्ये विराजमान होताच पुन्हा मोठा गजर झाला आणि सगळ्यांच्या आनंदाला उधान आलं. त्याच गजरामध्ये रथ पुठे सरकू लागला आणि सुरुवात झाली ती आनंद सोहळ्याच्या प्रवासाला...!
आळंदी मधून निघाल्यावर आम्ही पालाखीपासून थोडंफार अंतर ठेवूनच चालत होतो. आम्ही एका दिंडी बरोबर चालत होतो. दिंडी मधे चालू असलेली भजनं ऐकू येत होती. माउलींच्या प्रस्थानामुळे सुखावलेले वारकरी तल्लीन होऊन गात होते. सगळ्यांच्या गळ्यातील टाळ एका तालात वाजल्यामुळे एकप्रकारचा नाद निर्माण होत होता. इतकी पाऊले एकावेळी जमिनीवर पडत होती कि पायाखालची जमीन दिसेनाशी झाली होती. इथे प्रत्येक जण एकमेकाला माउली नावानेच हाक मारत होता, मग तो लहान पोर असू दे कि वय झालेले आजोबा असू दे किंवा तरुण मुलगा असू दे इथे नात्याला एकच नाव होतं ते म्हणजे “माउली”. माउली पुढे चला, माउली बाजूला व्हा , माउली वाट सोडा अशी वाक्य कानावर पडत होती. ती ऐकून माणसातला देव ओळखणे म्हणजे काय याची प्रचीती येत होती. थोडं दूर जाताच एक गुलमोहोर दिसला.त्याचा बुंधा पुढे वाकला होता त्याच्या समोर पालखी येताच जणूकाही तो गुलमोहोर वाकून माऊलींच दर्शन घेतोय कि काय असं चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं.
साधारण अजून ५-६ कि मि जाताच साईबाबा मंदिराजवळ पालखीचा पहिला विसावा आला. आम्हीही रस्त्याच्या कडेला बसून घेतलं. मंत्रमुग्ध होऊन गाणारे वारकरी जवळून पुढे जात होते त्यांच्याकडे पाहून त्यांच्या भाबड्या भक्तीचं दर्शन होत होतं. पुढे दिघी गावाच्या जवळ पुन्हा पालखी विसाव्याला थांबली. समोर विस्तीर्ण पठार असल्यामुळे दिंड्याही इथे विसावू लागल्या. त्या विसाव्याला कुणी सकाळची न्याहारी करू लागलं, कुणी घटकाभर डुलकी काढू लागलं. बायका लगबगीने चक्क आपल्या ओल्या साड्या बोचाक्यातून काढून वाळवायला सुद्धा लागल्या. एका सासू सुनेची जोडी तर दोन बाजूला दोन टोके धरून बऱ्याच वेळ उभी होती. त्यांचा तो कार्यक्रम पाहून गम्मत वाटत होती आणि प्रत्येक गोष्टीत तक्रार करणाऱ्या आपल्या सारख्या शहरी लोकांच्या छोटे पणाच हसू आलं आणि त्याच वेळेस आहे त्या परीस्थितीत सुखी समाधानी असणाऱ्या त्या माऊलींना बघून अप्रूप वाटल्याशिवाय राहिलं नाही. वर काळानिळा आकाश पसरलं होतं. काळे ढग अधून मधून सुर्याला झाकत होते. मंद पणे वाहणारा वारा मनाला गारवा देत होता. अशा वातावरणात आम्हीही छोटीशी डुलकी काढली.
आजूबाजूला इतकं गोंगाट चालू असताना इतकी शांत झोप मला आत्तापर्यंत कधीही लागली नव्हती. मनात इतर कुठलेही विचार येत नव्हते ,वारीला येऊन मिळणारी मनशांती ती हीच यावर माझं विश्वास दृढ झाला.
पायात घातलेल्या फ्लोटर मुळे माझी टाच दुखू लागली त्यामुळे ते मी काढून ठेवले आणि इथून सुरु झाला किबहुना माउलींनी घडवून आणला तो माझं खरा पायी प्रवास. प्रत्येक दिंडी अतिशय शिस्तीने पुढे जात होती. नं थकता गाणारे वारकरी अजूनही तितक्याच उर्मीने गात होते. पालखी एव्हाना बरीच पुढे निघून गेली होती . प्रवासातला हा मोठा टप्पा होता. साधारण ९ -१० कि मी चालल्यावर विसाव्याचं ठिकाण होतं. त्याच्या थोडं अलीकडेच रस्त्याच्या कडेला थोडी मोकळी जागा दिसली ,बरेच लोक तिथे विसावलेले दिसले. आम्हीही तिथे थोडावेळ पडायचं ठरवलं. विस्तीर्ण पसरलेल्या पिंपळाखाली sack टाकून आम्ही तिथे पडलो. बाजूनेच दिंड्या गजर करत पुढे जात होत्या. दूर लागलेली स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशींची गाणी कानात ऐकू येत होती त्यात दिंडीतील मृदंग आणि टाळ यांचा आवाजही मिसळून जात होता. साधारण तासाभराच्या त्या विसाव्यानंतर मात्र आम्ही उठलो आणि भरभर चालू लागलो. आमच्यात जणू नव बळ संचारलं होतं . आम्ही हळूहळू एक एक दिंडी पार करून पुढे जाऊ लागलो. माउलींचा रथ दिसेपर्यंत चालत रहायचं असं आम्ही ठरवलं होतं. अचानक पावसाची रिमझिम सुरु झाली. जणू काही पालखी विसाव्यावरून हलल्याचा निरोप तो पाऊस देत होता. थोड्यावेळातच अचानक उजव्या बाजूने माउलींचा रथ समोर आला आणि मन आनंदून गेलं. आम्ही पुन्हा एकदा त्या प्रवाहात सामील झालो.
माउलींच्या मागे २ नंबरच्या दिंडी बरोबर आम्ही चालू लागलो ते पुण्याच्या दिशेने. याच दिंडीत आम्हाला भेटल्या त्या घसरून पडल्यामुळे ज्यांच्या टाचेला ,गुढघ्याला जखम झाली होती अशा म्हाताऱ्या आज्जी. त्यांच्या पायाला दोन्ही ठिकाणी पांढऱ्या पट्ट्या बांधलेल्या होत्या त्या रक्ताने माखल्या होत्या पण तशाही अवस्थेत त्या नाचून डोक्यावरची पिशवी सांभाळत हातवारे करत गाणी म्हणत होत्या आणि सगळ्यांचच मनोरंजन करत होत्या. आणि आपल्याबरोबर इतरांनाही नाचायला लावत होत्या. साधारण त्यांच्याच वयाच्या शहरातील आज्ज्या सुद्धा ते कौतुकाने पाहत होत्या आणि दाद देत होत्या. त्यातल्या एका आज्जीने त्यांना मारलेली मिठी न बोलताही खूप काही बोलून गेली होती. तुम्हाला लागलं आहे आज्जी नाचू नका असं सांगताच माउली माझी काळजी घेईल मला काही होत नाही असं उत्तर त्या प्रत्येकाला देत होत्या. काय म्हणावं अशा भक्तीला , देहभान विसरलेल्या त्या माउलीला कितीही लोटागणं घातली तरी कमीच होती. भक्तीतून शक्ती मिळते असं ऐकलं होतं पण आम्ही मात्र ते प्रत्यक्ष पाहिलं होतं. आणि हीच ती भक्ती प्रत्येक वारकऱ्यांमध्ये संचारलेली असते हे सारखं जाणवत राहत. माउलींची पालखी थोडी दूर गेली तर धावत सुटणाऱ्या वारकऱ्यांमध्येहि हीच शक्ती संचारते यात कुठलीच शंका नाही. आणि अशी एक ना दोन हजारो माणस आजूबाजूला दिसत राहतात आणि आपण फक्त नवल करत राहतो.
साधारण ६.३० सुमारास आम्ही खडकी ओलांडून शिवाजीनगरच्या जवळ पोहोचलो आणि तेथून पालाखीतल्या पादुकांच पुन्हा एकदा दर्शन घेऊन आम्ही परतीची वाट धरली. जड झालेलं पाउल उचलत नव्हतं पण नाईलाज होता. वारी एक दिवसात “जगणं” केवळ अशक्य गोष्ट आहे पण आदल्यादिवशी पासून ते आजपर्यंत पाहिलेल्या, ऐकलेल्या, बोललेल्या प्रत्येक शब्दात माउलीच भरून राहिली होती. भिरभिर करणाऱ्या फुलपाखराला एखाद सुगंधी फुल दिसावं आणि त्यावर त्याने क्षणभर का होईना विसवावं असंच आमचं झालं होतं. त्या अल्पशा सहवासाने नवी उमेद आणि बळ तर मिळालंच होतं पण त्याच बरोबर ती आयुष्यारूपी सुगंधी कुपी सुद्धा उघडी केली होती आता गरज उरली होती ती फक्त तो गंध आपल्याबरोबरच इतरांपर्यंत पसरवण्याची...!
भक्तीरसाने, भाबडेपणाने , निरपेक्षतेने भारलेले ते २४ तास संपवून घराची वाट धरली तीच मुळी जड पण समाधानी अंतकरणाने......!
आनंद
* इंद्रायणीचं वाहात पाणी गारवा पसरवत होतं. कुणी झोपलं होतं, कुणी बसलं होतं, कुणी टेकून बसलं होतं, कुणी उभं होतं, पण सगळ्यांच्या मनात माउली वसली होती या शंका नव्हती.
ReplyDelete* वारी एक दिवसात “जगणं” केवळ अशक्य गोष्ट आहे
* भिरभिर करणाऱ्या फुलपाखराला एखाद सुगंधी फुल दिसावं आणि त्यावर त्याने क्षणभर का होईना विसवावं असंच आमचं झालं होतं.
..........फार फार फार सुंदर आनंद !! छान निरीक्षण आणि सुंदर कल्पना :)
अशा परमोच्च आनंदाचे भरपूर क्षण तुझ्या आयुष्यात येवो !....