मनात येणारे विचार शब्दात मांडता येतात हे खरंच मला भाग्याचं वाटतं. ते कागदावर उतरले कि मनाला मिळणारं समाधान सुद्धा तितकंच आनंद देऊन जातं. मागच्या कित्येक महिन्यात असे कागदावर आलेले विचार एकत्र मांडावे असं वाटत होतं ते आता शक्य झालं. नवी पालवी फुटण्या आधी झाडाची जुनी पाने गळून पडतात. कदाचित ती आपणहून गळून पडत असतील. दरवर्षी नित्यनियमाने असं वागायला त्यानां कुणी सांगत नाही पण तरीही ती आपसूक पणे पानगळी मध्ये गळून पडतात. नव्या पालवीला जागा करून देतात. अशीच आपसूक पणे गळून पडलेली शब्दांची पाने वेचून इथे मांडायचा प्रयत्न केला आहे. हीच कदाचित सुरुवात असेल जुन्या आठवणींना उजाळा देत नव्या अनुभवांना शब्दात मांडायची.
अनेक या जगण्यास अर्थ ,काही अपुले कैक परके.
एक लावी जीव अन एक करी दुखः हलके.
.......आनंद
भर उन्हात गुलमोहोर उभा असतो फुलांनी बहरून. सांगत जगण्याचा अर्थ आणि गात आकाशाचं गाणं. फुलावं तर गुलमोहोरासारखं जपत निष्पर्णतेतला अस्तित्व, आयुष्याच्या वळणावर शोधात सुखाचा स्वत्व.
......आनंद
जेव्हा उमगलं, हातात काय उरलंय
तेव्हा समजलं, चांदण्या रात्रीचं गुढ
स्वप्न नेहमीच अश्रू देत नाहीत
कधी आशेचा किरण सुद्धा दाखवतात.
.......आनंद
नसे खेद वा नसे दुरावा
जगण्याची मज अजून उर्मी.
फक्त नको मज बंधन कसले
भिडण्याची मज नाही भीती.
.....आनंद
स्वप्नं नक्की काय असतं ? अंधाऱ्या रात्री चांदण्यांच्या साक्षीने घेतलेली एखादी अलगद भरारी ? कि मग तापत्या उन्हा मध्ये वडाच्या सावलीने मनाला दिलेला दिलासा ? कि खळाळनाऱ्या पाण्याला वाटेल भेटणारा लाकडाचा ओंडका ? कि आजूबाजूच्या गोंधळात लक्ष देऊन ऐकलेलं देवाचं कुजबुजणं? कि स्वप्न असतं फक्त भास, कळीचं फुल व्हायला लागणाऱ्या क्षणांइतकंच क्षणिक ?
....आनंद
जिंदगी तेरे दामन से खुशिया नही चाहिये,
रास्ते मै थोडी मुश्किले और भर दे,
हर मोड पे मंजिले नयी खडी है,
उनको सताने को कुछ तो वजह दे दे....!
हर सांस को इंतजार है उस लम्हे का,
जब फुरसत मै तुझसे बाते करू,
तू भी अकेली है मेरी तरहा शायद,
तेरे साथ वक्त बिताया करू...!
.....आनंद
अपेक्षापूर्तीचा कोणता क्षण हा शाश्वत असतो ? त्या क्षणाला मिळालेलं सुख आनंद देऊन जातं पण मग नंतर उरतो तो आठवणींचा गलका . गेलेल्या क्षणांचं हातातून निसटून गेलेलं अस्तित्व सुद्धा नकोसं वाटू लागतं. वेडं मन नेहमीच फसतं आणि आपल्याला देऊन जातं नव्या अपेक्षांचं ओझं .......!
....आनंद
काळ फक्त पुढे जात असतो आणि मागे भूतकाळ सोडत असतो, पण कधी कधी मागे सोडलेला भूतकाळ भविष्याचा आरसा होऊन आपल्याला पुनः प्रत्यय देत असतो काळाच्या असीम अशा परीसीमांचा आणि त्यातून जन्म घेतात काही अनमोल अशा दुर्मिळ व्यक्ती ज्या संपूर्ण युगावर छाप सोडून जातात. बालगंधर्व याच एकच शब्दाची जादू इतकी आहे कि अजूनही कानात तेच सूर उमटले तरी काळजात तीच लकेर उठते. आज्जीने ६० वर्षापूर्वी प्रत्यक्ष ऐकलेली बालगंधर्वांची गाणी जेव्हा नातू आज ऐकतो तेव्हा काळ पुढे नक्कीच गेलेला असतो पण प्रत्यक्षात तो जोडत असतो भूतकाळाशी तुटलेलं नातं..! यालाच कदाचित म्हणत असतील ऋणानुबंध...!
.......आनंद
पहिला पाऊस देतो नवे सूर
उरात लपलेल्या गाण्याला..!
पहिला पाऊस देतो नवी आशा.
नव्यानं उचलेल्या पावलाला...!
पहिला पाऊस देतो बळ,
पाउलवाट सोडून चालण्याचं..!
आणि पहिला पाऊस देतो विश्वास,
स्वतःचं स्वत्व जपण्याचं...!
.....आनंद
हरवलेलं गवसणे म्हणजे काय ? कधीतरी ती गोष्ट आपली होती याची जाणीव होणे आणि तिची नितांत गरज भासणे. गवसणे हा शब्द फार लबाड आहे. काही केल्या तो आपल्याला ती गोष्ट हाती लागल्याचं समाधान घेऊ देत नाही हेच खरं....! सुखाचं लालूच दाखवून पळण्याखेरीज तो काहीही करत नाही..! आपण उगाचच गवसल्यावर साक्षात्कार झाल्यासारखं हरखून जातो.
.......आनंद
मिळालेल्या जन्माचं सार्थक होणं म्हणजे नक्की काय ? मोठी डिग्री ,चांगली नोकरी, भरपूर पैसा, दारात गाडी, मोठं घर, चैनीच्या चार गोष्टी ,हवीतशी बायको आणि समाजात प्रतिष्ठा. हे सगळं असल्यानं खरंच माणूस सुखी असतो. कि हे सगळं फक्त दुसरा करतो म्हणून तो करत असतो .चारचौघां सारखं आयुष्य जगणं म्हणजे समाजाला धरून वागणं हा नियम त्यानेच ठरवलेला असतो. चाकोरी बाहेरचं आयुष्य जगणारे वेगळे ठरतात ते त्याच मुळे. जन्माला आलेला माणूस आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वतःचं मन मारू लागतो आणि त्याच क्षणी गमावतो ती स्वतःची ओळख. आरशात दिसणारं प्रतीबिम्ब मनातली घालमेल दाखवू शकत नाही तिथे फक्त मुखवट्याच सौंदर्य दिसतं. म्हणूनच मनाचा संवाद हा सगळ्यात महत्वाचा. तो साधला कि कळत कि आपण किती आयुष्य जगलो आणि किती वर्ष पुढे ढकलली.
.....आनंद
माणसाचं लहानपण माणूसच विसरतो. आणि आजूबाजूची माणसंही ते विसरायला त्याला भाग पाडत असतात. लहानपणी घेतलेले उंच झोके तो मोठेपणी घेऊ शकत नाही. इच्छा असूनही ती दरवेळी त्याला दडपून ठेवावी लागते. वय वाढतं तसतशी माणसाची समज वाढत जाते तो प्रगल्भ होत जातो असं म्हणतात. हाच प्रगल्भ माणूस मग स्वतःसाठी आणि इतरांसाठी नियम बनवतो आणि मोठे पणाचा आव आणू लागतो. आपल्यापेक्षा वयानं लहान असणाऱ्यांना तो सल्ले देऊ लागतो. प्रसंगी ते योग्यही असतात केलेले नियम कधी पाळत कधी तोडत एकसुरी आयुष्य तो जगू लागतं पण जसजसे दिवस जातात तसं मग हळूहळू त्याला एकाकी वाटू लागतं आणि मग शोध सुरु होतं जे हरवलं आहे ते शोधण्याचा आणि उत्तर सापडतं ते त्यानं विसरलेल्या बालपणात. जो उंच झोका कधी एकेकाळी त्याला निर्मळ आनंद द्यायचा तोच आता त्याला परका झालेला असतो. तीच मुक्त पणे ठोकलेली आरोळी कुठेतरी खोल मनात मुकी होऊन बसलेली असते. कुठलाही भय नं बाळगता विचारलेले उत्तर नसलेले प्रश्न आता त्याला पडत नाहीत पण त्या ऐवजी उत्तर माहित असलेल्या प्रश्नांमध्ये तो बुडत जातो. हे असंच चालायचं असं म्हणत आयुष्य जाऊ लागतं आणि उरतो तो मनातून अतृप्त असलेला तोच नियम बनवणारा माणूस......!
.......आनंद
आयुष्याच्या वाटेवर अनेक वाटसरू भेटले. काहींनी ठेच लागताना सावरलं, काहींनी डोळ्यातल्या अश्रूंना पुसलं, काहींबरोबर जगणं अनुभवलं, काहीं बरोबर कधीही विस्मृतीतले क्षण जागवले ,चिंब सरीमध्ये भिजलो, भर उन्हात हातात हात घालून हिंडलो, पायवाटांवरून धावलो, नवी नाती जोडत नव्या वाटा शोधल्या, शब्दांच्या पलीकडे जाऊन मनाचा संवाद साधला, सुखाचे क्षण वाटले. पण शेवटी फक्त काहीच वाटसरूचे मित्र झाले आणि आयुष्यभरासाठी मैत्रीच्या नात्यात बांधले गेले. मैत्रीच्या या सुगंधी नात्याला आठवणींमध्ये साठवून ठेवत हाकेला साद देणाऱ्या माझ्या प्रत्येक मित्रांना मैत्री दिनाच्या शुभेच्छा. .......आनंद
क्षण निसटतात , आणि मग कळत कि जे मागायच होतं, अनुभवायचं होतं ते सुटून गेलंय. मग मनाची समजूत काढताना जाणवतं कि खरंच हे अतृप्त आहे कि त्याची हाव हि न कधीच संपणारी आहे. बऱ्याचदा जेव्हा आपण म्हणतो कि मला मनाप्रमाणे जगायचंय तेव्हा मग शंका वाटते कि ते जगणं नक्की आपण कसं अनुभवतो ? जगायला फार कष्ट पडत नसतात अवघड असतं ते त्याला अर्थ देऊन जगणं.
.......आनंद
इच्छा हि चलाख असते. मनाला इच्छा होते आणि ते भरकटता. ती साध्य करायला धावतं. इच्छापुर्तीचा आनंद मिळेल या आशेवर झुरत राहतां. पण शेवटी ती हि फसवीच असते, मावळणाऱ्या सुर्याला चांदणं कधीच दिसत नाही पण तरीही दररोज तो दिवसभर वाट पाहतोच. चंद्राला मात्र न मागताही ते सुख मिळालेलं असतं म्हणूनच सूर्य नेहमी अतृप्तच राहतो तर चंद्राच्या इच्छा मेलेल्या वाटतात. कदाचित इच्छा पूर्ण झाल्या कि आपलाही चंद्रच होईल, जो पर्यंत मनात अतृप्त इच्छा आहेत तो पर्यंत जगण्याला अर्थ आहे, नाहीतर सर्व इच्छांची पूर्तता झाल्यावर जगण्याला कारणच उरणार नाही. शेवटी अतृप्तेतली मजा हीच माणसाला स्वतःची असते बाकी साऱ्या गोष्टी फक्त श्वास चालू ठेवतात.
.......आनंद
पाण्यात खडा फेकला कि उठणारे गोल तरंग...हळूहळू पुन्हा पाण्यात विरघळून जातात. पुन्हा एकदा जन्मण्यासाठी त्यानं नव्याने कुणीतरी पुन्हा खडा फेकण्याची गरज असते. तरीही दरवेळी पाण्यात उठणारं त्याचं वर्तुळ कधीच एका आकाराच नसतं. क्षणिक आयुष्य असूनही दर वेळी मला भावतं ते त्याचं पाण्याला जिवंतपणा देण्याचं कसब. पाणी अस्थिर करून जणूकाही गुपचूप पुन्हा ते तरंग कुठेतरी दूर लपून बसतात. आपण मात्र शोधत बसतो अस्थिर पाण्यातलं प्रतिबिंब.
.....आनंद
जाता जाता जागवून गेला ,
स्मृतींमध्ये दाटलेले स्पर्श ,
आठवणीच्या मागे
दडलेले धुसर असे क्षण.
थेंबातलं आभाळ टिपताना होणारी
मनाची घालमेल
निसटून गेलेल्या सुखाची
उरातली हुरहूर
.............आनंद
समोर येणाऱ्या गोष्टींचा अर्थ लावण्यात आयुष्यातले कित्येक क्षण खर्ची पडतात. निसटून गेलेल्या क्षणांना परत आणता येत नसलं तरी तेव्हा लावलेले अर्थ भविष्यातले अनेक क्षण सार्थकी लावतात हे तितकेच खरं आहे.
.......आनंद
.......आनंद