Powered By Blogger

Monday, May 7, 2012

लघुकथा - कळ्या


ग्रीष्म वैशाखाच्या झळा अंग करपून काढत होत्या. आकाश नुसतं आग ओकत असल्याचा भास होत होता. तशाच भर उन्हात तो लाकुडतोड्या जंगलात लाकडे तोडायला चालला होता. दोन चार झाडं पाहिल्यावर शेवटी मनासारखं एक झाड त्याला मिळालं. कुऱ्हाडीचे घाव घालून दुपार पर्यंत त्याने त्या झाडाला अगदी भुईसपाट केलं. तोडलेल्या झाडाचे ओंडके गोळा करून लाकडांचा भारा डोक्यावर घेऊन तो लाकुडतोड्या भराभरा आपल्या घराकडे निघाला. किलबिलाट करणाऱ्या दोन पोरी आणि दिवसभर राबणारी त्याची बायको यांच्याशिवाय त्याला दुसरं काहीच दिसत नव्हतं. उन्हामुळे सगळ्या जंगलाची कळा पालटली होती. जंगल तसं घनदाट होतं. पायवाटेच्या बाजूने आजूबाजूला अनेक फुलांची छोटी छोटी रोपटी उगवली होती. जाई, जुई, मोगरा, अबोली तर होतीच पण उंच चाफा सुद्धा पांढऱ्या शुभ्र बाहूंनी आकाशाला आलिंगन देत होता. पण त्या सगळ्याकडे बघायला लाकूडतोड्याला सवड नव्हती. तो फक्त झपझप चालत होता.
चालता चालता अचानक कुणाची तरी कुजबुज त्याच्या कानावर पडली. तो थबकला. आवाजाच्या दिशेने पाहू लागला. त्याचे पाय आपोआप त्या दिशेला वळले. तो एका कुंपणाजवळ आला. त्या कुंपणाला लागून एक नाजूक मोगऱ्याची वेल आपल्या शुभ्र कळ्या मिरवत डोलत उभी होती.  लक्ख सूर्य प्रकाशात डोलणारी ती वेल खुपच लोभस दिसत होती. तिच्याच जवळ एक अबोलीचं छोटं रोपटे होतं. अबोलीलाही गुलाबी रंगांच्या छोट्या छोट्या कळ्या आल्या होत्या. फांदीच्या टोकाला उमलेल्या कळ्यांची फुलं फार मोहक दिसत होती. अबोलीच्या कळ्या आपल्या टपोऱ्या डोळ्यांनी आजूबाजूला टकमक पाहत असल्यासारख्या भासत होत्या.  


लाकूडतोड्याने कान देऊन ऐकले. ती मोगऱ्याची वेल म्हणत होती. “माझा गंध अनेकांना वेड लावतो. बायकाच काय पण पुरुष देखील माझ्या सुगंधाने बेभान होतात. माझा सुगंध कुणाची पहाटेची देवाची पूजा प्रसन्न करतो तर कधी एखाद्या प्रेमी जोडप्याला प्रेमाचा हळवा गंध देऊन जातो तर कधी कुणाची उतारवयातली एखादी संध्याकाळ सुवासिक करून जातो. शेवटी सुगंध आहे तरच सगळं आहे. आणि त्या मुळे तुझ्या पेक्षा मीच श्रेष्ठ आहे. “
यावर अबोली म्हणाली “तुझ्याकडे सुगंध आहे हे मान्य, पण माझ्याकडे असलेल्या गुलाबी रंगाचं सौंदर्य तुझ्याकडे नाही. तुझ्या पांढऱ्या पाकळ्या माझ्या रंगीत नाजूक पाकळ्यांची बरोबरी करूच शकत नाहीत. माझ्या रंगाने मी अनेकांना भुरळ घालते. बेरंगी आयुष्य कुणालाही आवडत नाही. अबोलीच्या कळ्या गंध नसला तरी अनेकांना भावतात ते काही उगीच नाही. त्या मुळे रंग आहे तरच सगळं आहे म्हणून मीच श्रेष्ठ आहे.”
लाकुडतोड्या वेड्या सारखा ते संभाषण ऐकत दोघींकडे पाहत होता. त्याला काही कळेना. मोळीच्या ओझ्याने त्याच्या मानेला रग लागली त्याने ती मोळी खळी उतरवली आणि जवळच्या झाडाच्या बुंध्याला टेकून बसला. बसल्या बसल्या तो त्या दोन कळ्यांच्या संवादाबद्दल विचार करू लागला. अचानक त्याला आठवलं आपल्या बायकोला मोगरा फार आवडतो आणि आपल्या दोन छोट्या पोरी अबोलीच्या फुलांचा हार त्यांच्या बाहुलीला घालतात. तो मनातून खुश झाला. लगोलग तिथून उठला आणि कुंपणापाशी येऊन मोगऱ्याच्या कळ्या तोडू लागला. ते पाहून अबोलीला मोठी गंमत वाटू लागली. मोगऱ्याच्या कळ्या तोडून झाल्यावर त्याने त्या एका फडक्यात ठेवल्या नंतर तो अबोलीपाशी आला आणि  अबोलीच्या कळ्या तोडू लागला. हे पाहून मोगऱ्याला हायसं वाटलं. अबोलीच्या कळ्या त्याने त्याच फडक्यात ठेवल्या आणि फडक्याच तोंड त्याने बांधलं. मगाशी एकमेकांचं उणदुण काढणाऱ्या दोघी आता मात्र हतबल होत्या. त्यांना काहीच कळत नव्हत. 

  
घरी येऊन लाकूडतोड्याने त्या कळ्या बायकोला दिल्या. संध्याकाळी तिने त्या कळ्यांचे तिघींसाठी तीन गजरे केले पण ते करताना तिने मोगऱ्याच्या आणि अबोलीच्या कळ्या एका आड एक गुंफल्या. तिने ते गजरे लाकूडतोड्याला दाखवले. तिची कल्पकता पाहून तो फारच खुश झाला. तो म्हणाला मोगऱ्याचा सुगंध आणि अबोलीचा रंग या दोन्ही गोष्टींमधले सौंदर्य एकत्र गुंफण्याच कसब तुला कळले याचा मला फार आनंद झाला. आणि त्याने तो गजरा तिच्या केसात माळला.
हे पाहून मोगऱ्याची कळी अबोलीला म्हणाली “ माझ्या सुगंधाला तुझ्या रंगात मिसळणारी आणि तुझ्या रंगाला माझा सुगंध देणारी ही स्त्री आपल्या दोघींपेक्षा श्रेष्ठ आहे. आपण मात्र वेड्या सारख्या फक्त स्वतःच्याच प्रेमात पडून दुसऱ्याला कमी लेखत होतो. पण खरं सौंदर्य हे स्वतःला विसरून दुसऱ्याच्या प्रेमात पडण्यात आहे हे आपल्याला कळलच नाही.” हे ऐकून अबोलीने मान डोलावली आणि दोघी मनापासून हसल्या......!
७ मे २०१२  
....आनंद