आकाशात ढगांचा
गडगडाट होत होता. एखादी वीज मधेच चमकून पून्हा दडून बसत होती. पाउस नुकताच सुरु
झाला होता. वीत भर वाढलेल्या गवतावर पाण्याचे थेंब पडून ती डोलू लागली होती. गवताच्या
त्या झुबक्यातून जागा काढून वाढलेल्या फुल झाडांवरच्या पानांवर थेंबांची शाळा भरू
लागली होती. आणी या सगळ्यांपेक्षा मोठ्या आणी उंच असलेल्या चिंचेच्या आणी वडाच्या
झाडांना पाउस ओला करू पाहत होता. कुंपणाच्या पलीकडे असलेल्या शेतात पावसाचे थेंब
पडून माती सुगंधी हुंकार देत होती. पाखरं झाडांमध्ये दडून बसली होती. हळहळू
सगळीकडे चैतन्य पसरू लागलं होतं.
सुमित आज पून्हा
नाराज होता. त्याला दहावीत चांगले मार्क मिळाले तर बाबांनी त्याला सायकल घेण्याचं
कबूल केलं होतं. काल त्याचा दहावीचा निकाल लागला होता आणी त्याला ८० टक्के मार्क्स
पडले होते. आज सकाळी बाबा गावावरून आले आणी त्यांना हि बातमी त्याने खूप आनंदाने
सांगितली. बाबांनी त्याचं खूप कौतुक केलं. आईनेही बाबांसमोर सुमितची स्तुतिसुमने
उधळली. पण सुमितला जो विषय हवा होता तो काही कुणी काढेना. दुपारची जेवणे उरकली. बाबा
ओसरीवर अडकित्त्याने सुपारी फोडत बसले होते. आतल्या खोलीतल्या दरवाजाच्या फटीतून
सुमित ने हे पाहिले आणी तो हळूच येऊन बाबांच्या जवळ बसला. आणी बाबाना सायकल ची आठवण करून दिली. बाबांचा
चेहरा थोडा गंभीर झाला. त्यांनी प्रेमाने त्याच्या पाठीवरून हात फिरवला आणी
म्हणाले ,
“बाळ सुमित, तुला
चांगले मार्क्स पडले हि खूप चांगली गोष्ट आहे मी तुला सायकल द्यायच कबूल केलं होतं
हे हि खरं आहे. पण बाळा आत्ता आपल्याला हे
जमेल असं काही वाटत नाही. तू आता मोठा आहेस, तुला तर माहीतच आहे , तुझ्या
आत्त्याचं लग्न जमत आहे ,त्यात आजोबांच्या दवाखान्यालाही खूप खर्च झाला आहे,
तुझ्या ११ वी साठी सुद्धा आपल्याला पैसे लागतील
आणी अशात आपल्याला हा ज्यादाचा खर्च परवडण्या सारखा नाही. पण पुढच्या वर्षी
आपण तुला सायकल नक्की घेऊयात. चालेल ? तू शहाणा मुलगा आहेस इतरांसारखा नाहीस हे
मला माहित आहे. ऐकशील ना माझं तू ? “
सायकल मिळणार नाही
हे कळल्यावर खरंतर बाबांचं बोलणं सुमित ला ऐकू येईनासं झालं होतं. त्याचं मन खट्टू
झालं. खाली मान घालून तो रागारागाने तिथून आतल्या खोलीत पळाला. बाबांनी हात पुढे
करून त्याला थांबवायचा प्रयत्न केला पण तो तरीही निसटला. बाबांना खूप वाईट वाटलं. आत
जाऊन सुमित गुढग्यामध्ये डोकं घालून मुसुमुसु रडू लागला. सारं जग त्याला वाईट आहे
असं वाटत होतं. नव्या सायकल बद्दल त्याने आपल्या सगळ्या मित्रांना आधीच सांगून
ठेवलं होतं. स्वतःची सायकल आली कि आपण दूरदूर भटकायचं असं त्याने ठरवलं होतं. त्याच्या
बरोबरच्या सगळ्या मित्रांकडे आठवी पासून सायकल होती गेली २ वर्ष त्याने फक्त
दहावीची वाट पहात काढली आणी आता त्याला तरीही सायकल मिळणार नव्हती. तालुक्याच्या
कॉलेज ला ११ वी ला जाताना आपण सायकल वरून जाण्याची अनेक स्वप्ने त्याने रंगवली
होती. पण आता यातलं काहीही होणार नव्हतं. त्याला सगळं जग खोटं वाटू लागलं होतं.
खोलीच्या खिडकीतून बाहेरच्या विजेच्या गडगडाट ऐकू येत होता. पाउस चांगलाच भरून आला
होता.
अशातच सुमित घरातून
बाहेर पडला. रागारागाने निघाल्याने त्याने अंगावरचा सदरा, विजार आणी पायातल्या
चपला या शिवाय काहीच बरोबर घेतलं नव्हता. पायाच्या मोठ्या ढांगा टाकत तो ओसरीवरून
निघाला. वाड्याचा दरवाजा रागानेच उघडून तो बाहेर पडला. आईची हाक येऊनही एकदा मागे
वळून पाहावं अशी इच्छाही त्याला झाली नाही. चालत चालत तो गावाच्या बाहेर जाणाऱ्या
रस्त्याने चालू लागला. त्याला सगळ व्यर्थ वाटत होतं. तो चालत होता. हळूहळू पावसाचे
थेंब त्याच्या अंगावर पडत होते. पण त्याला काही फरक पडत नव्हता. चेहऱ्यावर सुद्धा
थेंबांचे ओघळ येत होते. पण त्यामुळे त्याचे अश्रू त्यात मिसळत होते.
आजूबाजूला शेती सुरु
झाली. पावसाच्या थेंबानी तृप्त होऊन पाती डोलत होती. आपण कुठे चाललो आहोत याचंही भान
सुमित ला राहीलं नव्हतं. समोर छोटी टेकडी होती टेकडी चढून वर गेलं कि सगळा गाव
दिसत असे. सुमित अनेकदा इथे येत असे. टेकडीच्या मागे दाट झाडीचं जंगल होतं. वर्षभर
हिरवी राहणारी अनेक प्रकारची झाडं त्या जंगलात होती. सुमित चालत चालत टेकडीवर
पोहोचला. एव्हाना तो पूर्ण भिजला होता. अजून दिवस ढळला नव्हता पण तरीही अंधारून
आलं होतं. दुरून गाव हळूहळू अंधारात बुडत होतं आणी मिणमिणत्या दिव्यांचा प्रकाश
घराच्या खिडक्यान मधून बाहेर पडू लागला होता. सुमित उठला आणी जंगलात जाणारया
वाटेने जाऊ लागला. त्याला स्वतःच्या प्रश्नांची उत्तरं हवी होती त्याशिवाय त्याला
घरी परत जायचं नव्हतं.
जंगलातली ती वाट बारीक
पावसाने ओली होऊन जणू काही भीजली होती. भरलेल्या मनाने ओल्या डोळ्यांनी हुंदके
देणाऱ्या सुमितला ती वाट आपल्या सारखीच भासली. तिच्या भिजलेल्या मातीवरून पाय
ठेवून जाताना जणूकाही तिचेही अश्रू हुंदक्या सारखे वर येऊन पून्हा आज जात होते. चालता चालता त्याच्या मनात जुन्या आठवणींची
गर्दी झाली. आजच्या अनुभवा सारखेच त्याला
आपल्या लहानपणा पासूनचे खूप क्षण आठवू लागले.
शाळेतल्या नव्या कपड्या
साठी केलेली रडारड, फाटलेल्या पुस्तका मुळे त्याला वर्गात झालेली शिक्षा,
आतापर्यंत वर्षातून एकदा जाणारया सहलीला कधीच न जाता आल्यानं सहलीचा कधीच न घेता
आलेला अनुभव, दिवाळीला केलेले किल्ले आणी नवीन चित्रे विकत न घेता आल्यानं त्यावर
स्वतःच बनवून मांडलेली मातीची चित्रे, तुटक्या जुन्या खेळण्याबरोबर गेलेले
लहानपणीचे दिवस, खाण्याची अगदीच आबाळ नसली तरीही साध्या बिस्किटासाठी आई कडे
महिनाभर धरलेला हट्ट. मोठा मुलगा म्हणून नेहमीच समंजस पणे लहान भावंडांसाठी केलेली
तडजोड आणी या समंजसपणा मुळे नातेवाईकांमध्ये झालेलं कौतुक.
कधी कधी आपल्या
माणसांना हतबल झालेलं पाहून येणारं दुख :हे स्वतःच्या अतृप्त इच्छांपेक्षा जास्त
प्रभावी ठरतं. सुमितचं तसंच झालं होतं. आपल्या
आई बाबांना हतबल पाहून तो अजून अस्वस्थ झाला होता. आपल्या मनाप्रमाणे काही
होत नाही याचं दुख तर होतंच पण त्याला कारणीभूत असणाऱ्या गोष्टी आपल्याच बाबतीत का
घडत आहेत हे हि त्याला कळत नव्हतं. तडजोड हि नेहमी मीच का करायची आणी मग मोठेपणाचा
आणी समंजसपणाच्या नावाखाली मनातल्या इच्छा किती दिवस मारत राहायच्या हा विचार त्याला
काही केल्या सोडत नव्हता. त्याला समंजस पणाचं ओझं वाटू लागलं होतं.
इकडे सुमितच्या घरी
तो घरी न आल्यामुळे आईला ,बाबांना खूप चिंता लागली होती. गावातल्या चार लोकांना
घेऊन सुमित चा शोध घेणं सुरु झालं होतं.
चालता चालता सुमित जंगलात
बराच आत आला होता. चालून चालून त्याचे पाय सुद्धा दमले होते. हवेत गारवा पसरला
होता. एका झाडाखाली तो टेकला. एव्हाना पाउस थांबला होता ,रात्र झाल्याने सगळीकडे
अंधार पसरला होता. पण आकाश थोडा साफ होऊन आकाशात चंद्र दिसू लागला होता. कडाडणाऱ्या
विजा सुधा झोपी गेल्या होत्या. त्याला समोर एका झाडाखाली उजेड दिसला तो त्या
दिशेने जाऊ लागला. जवळ जाताच ती एक झोपडी असल्याचं त्याला कळून चुकलं. त्याने धीर
धरून दार वाजवलं. सुमितच्या आजोबांच्या वयाच्या गृहस्थाने दार उघडलं. त्यांनी
सुमितची चौकशी केली. पलीकडच्या गावात राहतो पण जंगलात आलो आणी रस्ता चुकलो असं
सुमित ने सांगितलं. आजोबांनी त्याला घरात घेतलं. झोपडीत एका कोपर्यात जळणाऱ्या
दिव्याने पिवळा प्रकाश पसरला होता. आजोबा काहीतरी खायला बनवत होते. सुमित एका
बाजूला बसला. झोपडीत उबदार वाटत होतं. तिथे टेकताच त्याला डुलकी लागली. काही
वेळाने कुणाच्यातरी हसण्याच्या आवाजाने त्याला जाग आली. डोळे किलकिले करून त्याने
पहिले, साधारण त्याच्याच वयाचा एक मुलगा आणी ते आजोबा खूप मनमोकळे हसत होते.
त्याने डोळे चोळले. सुमित उठल्याच कळताच आजोबांनी त्याला पाणी दिले. तोंडावर पाणी
मारल्यावर त्याला जरा बरे वाटले.
हे सगळं ऐकून सुमितला फार वाईट वाटलं. तेवढ्यात त्याचं लक्ष दाराच्या मागे
ठेवलेल्या सायकल कडे गेलं. सायकल पाहून त्याला आश्चर्य वाटलं. जर दिनू ला पाय नाहीत
तर मग हि कोण चालवत असेल ? त्याने तसं आजोबांना विचारलं.
आजोबा म्हणाले “अपघात झाल्या नंतर काही दिवसांनी शहरातून माझ्या मुलाचं थोडं सामान आलं तेव्हा
ज्या माणसाने ते आणून दिलं ,त्याने हि आणून दिली आणी त्याने सांगितलं दिनूचे वडील
सायकल साठी पैसे साठवत होते आणी जेव्हा ते दिनूला शहर दाखवायला आणणार होते तेव्हा
त्याला सायकल भेट देणार होते. अपघाताच्या मागच्याच आठवड्यात त्यांनी सायकल विकत
घेतली होती. त्या सद्गृहस्थाने ती सायकल मला आणून दिली. पण अपघातात दिनूचे पाय
गेले आणी सगळंच संपलं. आता तिचा काही उपयोग नाही.”
सुमित ते ऐकून सुन्न झाला होता. त्याला काही वेळ काही समजेना. आजोबांनी
त्याच्या मनाची होणारी चलबिचल ओळखली. त्यांनी सुमितला सगळं खरं सांगायला भाग
पाडलं. सुमित ने आपण घरातून कसे निघून आलो, का आलो हे सगळं आजोबांना सांगितलं.
आजोबा गालात हसले. ते सुमितला म्हणाले “
बाळा एक लक्षात ठेव “आयुष्यात आपल्याला
फक्त मना विरुध्द घडणारया गोष्टीच आठवतात आणी त्याच आपल्याला त्रास देत राहतात जेव्हा
सगळं आपल्या मनासारखं होत तेव्हा आपल्याला त्याचं फार काही वाटत नाही. सुखाचे धुंद
क्षण आठवताना आपल्याला इतरांची आठवण येत नाही. जगात प्रत्येकला सगळ्या गोष्टी मिळत
नाहीत पण प्रत्येकाला काही न काही जरूर मिळत असते. आपल्याला मिळालेली गोष्ट कोणती,
हे फक्त तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. आपल्या बाबतीत एखादी चांगली गोष्ट झाल्यवर “हे माझ्या बाबतीत का ? “ हा प्रश्न
आपण कधीच विचारत नाही मग मनाविरुद्ध गोष्टी घडल्यावर आपण स्वतः ला दुर्दैवी
का बनवायचं ?
माझा मुलगा म्हणजे
दिनूचे वडील गेल्यावर खरंतर आयुष्य संपल्यात जमा होतं. पण दिनू अजून होता भलेही
त्याला पाय नसतील पण माझा खरा आधार तोच आहे. दिनूला त्याच्या वडिलांनी घेतलेली
सायकल चालवायची आहे. लुळ्या पडलेल्या पायांनी हे अशक्य आहे हे साहजिक आहे. पण
त्याला त्यातून जगण्याचं बळ मिलते . बाबांची शेवटची खूण म्हणून तो सारखा तिच्याकडे
पाहत असतो.
सुमित तुझे आई बाबा
तुझ्यावर खूप प्रेम करतात. भौतिक सुख मिळवून देण्यात कदाचित ते अपयशी ठरत असतील,
ते हतबल होत असतील , पण एक लक्षात ठेव जन्मदात्याचं
प्रेम मिळणं हीच खूप मोठी गोष्ट असते, तू नशीबवान आहेस. तू ज्या गोष्टी साठी घर सोडून आला आहेस ती
गोष्ट दिनू कडे आहे पण जे आईबाबा तुझ्याकडे आहेत ते दिनू कडे नाहीत. मग तूच ठरव
कोण जास्त कमनशिबी आहे.
रात्री आजोबांचे
विचार डोक्यात ठेवून सुमित झोपी गेला. पहाटे पक्ष्याच्या किलबिलाटाने त्याला जाग
आली. सकाळचं कोवळं उन झाडीतून लपछपी खेळत होतं. आजोबा आणी दिनू पलीकडे झोपले होते.
तोंडावर पाणी मारून तो उठून बाहेर आला. तो काल आलेल्या वाटेने पून्हा परत निघाला.
आजही वाट कालचीच होती. पण कालच्या भिजलेल्या वाटेपेक्षा आजची वाट वेगळी होती कारण
तिच्यावर कोवळी किरणे पसरली होती रात्रीच्या अंधारातली उदासीनतेने भरलेली वाट आज
जणूकाही नव्या उत्साहाने न्हाऊन निघाली होती. आई बाबांची आठवण होऊन सुमितचे डोळे
पाणावले. पण कालचे अश्रू आणी आजचे अश्रू यात खूप फरक होता. आजची वाटही भीजली होती
पण तिच्यात प्रेमाचा ओलावा होता. सूर्य वरती पळत होता आणी सुमित घराकडे. दोघांचं आकाश मात्र
निरभ्र झालं होतं काळे ढग विरघळून गेले होते. आणी सुमित ला वाटून गेलं आपण किती
सुखी आहोत नाही ......?
आनंद
७ सप्टेंबर २०१२
No comments:
Post a Comment