Powered By Blogger

Sunday, January 20, 2013

बोलते व्हा ......!



शहरातला गोंगाट, माणसांची गजबज, आजूबाजूला पसरलेल्या इमारती, पळणारे दिवसरात्र , धावणारा सूर्य, कधी नात्याचं ओझं तर कधी ओझ्यांची नाती, पैशाचा खेळ आणि साचेबद्ध आयुष्य, पण हे ही रोज बदलत आहे, प्रत्येक गोष्टीला नवीन आकार येत आहे. नाविन्याचा विळखा खूप वेगाने पुढे झेपावतो आहे. जग बदलतंय.......!

पण मी अजूनही तोच आहे... 

तोच अलिप्त पणे जगाकडे पाहून हसणारा. स्वतःच्या अस्तित्वाला न झुगारता मनाशी बोलणारा...
स्वतःच्या माणसांनी न ओळखून सुद्धा मनाशीच गुजगोष्टी करणारा..,
कधी अथांग सागराशी दोस्ती करून त्याच्याशी मनसोक्त गप्पा मारणारा...,
कधी गर्द झाडीतून दिसणाऱ्या आकाशाला न्याहाळणारा...,
कधी उंच कड्यावरून वाहणाऱ्या वाऱ्याला साद घालून बेभान होणारा...,
पावसाच्या सरीत चिब भिजून तिला कवेत घेणारा...! 

स्वतःच स्वत्व जपण अवघड नसतं. एकाकी पडू अशी भीती नसेल तर स्वतःशी संवाद साधनं ही सोपी गोष्ट असते. 




कधी कधी वाटतं , अस्तित्वाची जाणीव नसणं हे ही कधी कधी खूप महत्वाचं असतं तुम्ही जगाच्या चौकटीमध्ये निदान अडकत तरी नाही. चारचौघांसारख असणं म्हणजे नक्की काय हे खरंतर अजून मला उमगलेलं नाहीये आणि निदान या जन्मात कळलं नाही तरी फार काही अडणार नाहीये.
प्रश्न आहे तो माझ्या आजूबाजूला असणाऱ्या माणसांचा, पण मग तिथेही जर आपण अपेक्षा ठेवल्या नाहीत तर दुसऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करायला आपण बांधील नसतो, नाही  का?  आयुष्य फार सोपं करून जगण्यात जी मजा आहे ती खरंतर दुसरी कशातच नाही.
मला वाटतं आपणंच आपलं जगणं संकुचित करतो कि काय ? स्वतःच्या आयुष्यावर आक्रमण करणाऱ्या गोष्टींना आपण नाही का म्हणू शकत नाही ?  हो म्हणण्याचा एवढा अट्टाहास आपण कुणासाठी करतो ? स्वतः साठी कि दुसऱ्यासाठी ? प्रश्न खूप आहेत आणि प्रत्येकाला उत्तरं शोधण्याचे श्रम घेण्याची इच्छा नाहीये. आपल्याला पटेल ते उत्तरं बरोबर मानून मनाचं करण्याची वृत्ती वाढत चालली आहे.  गरज आहे थोडं निस्वार्थी होण्याची ,त्रयस्थपणे स्वतःकडे पाहता आलं तर निम्मे प्रश्न आपोआप मिटतील आणि उरलेले प्रश्न मुळात का पडले याची जाणीव होईल. 
नक्षत्र रात्री दिसतं याचा अर्थ दिवसा ते नसतं असं नाही, त्याचं अस्तित्व दिसण्या साठी रात्रीची गरज असते. आयुष्यातल्या भौतिक गोष्टी अशाच असतात दिसत नसतात तो पर्यंत आपण स्वप्न पाहत बसतो आणि समोर आल्या कि कौतुक सोहळा साजरा करतो. जवळ असलेली नक्षत्रे आपल्याला दिसत नाहीत कुणीतरी जाणीव करून दिली कि खडबडून आपण जागे होतो पण तो पर्यंत दिवस उजाडलेला असतो. 

"स्वतःच्या उरातली घालमेल फक्त स्वतःला कळत असते, हसताहसता कधी डोळे भरून येतात तेव्हा दरवेळी ते पाणी आनंदाचच असेल कशावरून, कधी कधी उरातले जुने हरवलेले क्षण अचानक डोळ्यातून वाहू लागतात. समोरच्याला वाहणारं पाणीच दिसतं ,वाहताना पाण्याने कितीही आक्रोश केला तरी तो मुकाच असतो. सांत्वनाचे शब्द कधी कधी पोहोचूच शकत नाहीत ते उगीच नाही..
म्हणून मला नेहमी वाटतं एका ठराविक मर्यादेनंतर फक्त “आपणच” स्वतःशी संवाद साधू शकतो."
      
न विचारलेल्या, न बोललेल्या, अनेक विचारांची मनात गर्दी असते. ती गर्दी जितकी जास्त तितकी घालमेल जास्त. यावर उपाय म्हणजे स्वतःशी संवाद. एखादी गोष्ट स्वतःशी कबुल करण्यापेक्षा मोठी गोष्ट जगात  कुठलीच नसते. मनातल्या जळमटाना बाजूला सारण्याची जबाबदारी फक्त स्वतःवर असते. स्वतःशी बोलून आपण मोकळे होतो. आपण कुणाजवळ व्यक्त झालो तरी मनात भीती असते समोरच्या माणसाबद्दल कितीही खात्री असली तरी व्यक्त होताना परकेपणाची भावना ही असतेच. मनाशी बोलताना मात्र ही भीती नसते.


आपल्या आयुष्यातल्या समस्यांवर आजूबाजूच्या लोकांनी हात टेकले कि समजून घ्यावं कि “स्वतःशी” बोलण्याची वेळ आली आहे.
म्हणून म्हटलं बोलते व्हा.......! पण आधी स्वतःशी.....!
                                                                 ......आनंद
 

No comments:

Post a Comment