जाताना साधारण ६-७
वर्षापूर्वी लिहिलेली “आठवण“ ही कविता आज
जेव्हा मी पुन्हा वाचली तेव्हा माझेच डोळे पुन्हा पाणावले. तेव्हा कुठल्या
परिस्थिती मधे ही लिहिली होती हे आता आठवत नाही. पण आज इतक्या वर्षांनी पुन्हा
वाचताना ही खूप जवळची वाटली. मला वाटतं कवीच्या आयुष्यातली हीच गोष्ट खूप मोठी
असते. आपणच लिहिलेली एखादी गोष्ट आपल्याला खूप वर्षांनी पुन्हा नव्याने कळते आणि
काहीतरी चांगलं लिहिल्याचं समाधान मिळून जातं आणि वाटतं हेच कदाचित आयुष्याचं
सार्थक आहे.
जाताना फक्त एक आठवण देऊन जाईन तुला...!
आठवावं असं खूप आहे
सगळंच तू आठवू नकोस,
झेलावं असं खूप आहे
सगळंच तू झेलू नकोस.
आठव पेललेली आव्हानं
झेल श्वासाच नवं गाणं ,
म्हणताना फक्त आठव मला
जाताना फक्त एक आठवण देऊन जाईन तुला...!
खूप पूर्वी बोलीन म्हटलं
इच्छेला शब्द सापडलेच नाहीत,
पटकन अंतर कापीन म्हटलं
आशेला श्वास पुरलेच नाहीत.
झालं गेलं जाऊ देत
फक्त एकच लक्षात ठेव ,
डहाळीची फुलंही फार काळ टिकत नाहीत
आकाशाला भिऊन काही झाडाच्या फांद्या वाकत नाहीत.
फुलाकडून फुलणं शिक
फांदीकडण भिडणं शिक,
शिकताना फक्त आठव मला
जाताना फक्त एक आठवण देऊन जाईन तुला...!
कधी तुला एकट वाटेल
तेव्हा आठव नभातल चांदणं ,
आपल्या अंगणातल्या पारावर
कधी व्हायचं त्यांचं नांदण.
आता तिथे ते नसेल
पण तिथे तू असशील,
तुझ्या त्या असण्यानंच
तू त्यांचं नसणं पुसशील.
चांदणं होऊन पसरायचं तुला
माझ्यासाठी जगायचय तुला
जगताना फक्त आठव मला
जाताना फक्त एक आठवण देऊन जाईन तुला...!
रडू नकोस...
रडण्याने का प्रश्न सुटतात ?
मी रोज भेटेन तुला
रोपट्याच्या पालवी मधून ,
झाडाच्या सावली मधून
खिडकीतून येणाऱ्या कोवळ्या उन्हामधून.
ऋतू बदलतात ,पाने गळतात
फक्त नव्यानं फुलण्यासाठी ,
नदी आटते नभ फाटते
फक्त नव्यानं वाहण्यासाठी .
ऋतू कडनं फुलणं शिक
नदीकडनं वाहणं शिक,
वाहताना फक्त आठव मला
जाताना फक्त एक आठवण देऊन जाईन तुला...!
आता फार बोलत नाही
नाहीतर डोळे भरून येतील ,
दाटलेल्या अश्रूंना
डोळ्यामध्ये पूर येतील.
भरलेल्या डोळ्यांना
काहीच दिसायचं नाही
कितीही फसवलं तरी
मन फसायचं नाही.
तुला मात्र सगळं पहायचंय
आयुष्यभर फक्त हसायचंय,
हसताना फक्त आठव मला
जाताना फक्त एक आठवण देऊन जाईन
तुला...!
आनंद
३१ मार्च २०१३
are kiti sundar lihali ahes...
ReplyDeletemala khup awadali re...agadi shabdh aata manat pohachtat..mast
Ek number!! Jatana fakt aathavani tar thevun jato aapan.. nahi ka?
ReplyDeleteDhanyavaad Vaibhav ani Yashwant. :)
ReplyDelete