आजी गेली. पण म्हणजे नक्की काय झालं ? तिचं शरीर गेलं हेच खरं. तिच्या इतक्या आठवणी मनात भरून राहिल्या आहेत कि ती “नाही” हे म्हणणं अवघड आहे. मोठा नातू म्हणून तिचं आणि माझं असलेलं नातं इतकं वेगळं होतं कि शब्दात ते बसूच शकत नाही. पण तरीही मनाला राहवत नाही वेडं मन शब्द शोधू पाहत.
घरातली कामे करताना सुधीर फडक्यांची गाणी गुणगुणणारी, दुपारच्या वेळेला चष्म्याच्या आडून कादंबरी वाचत बसणारी, सुट्टीत रमीचा डाव मांडायला लावणारी, साडे पाच वाजता रेडीओ वरची गाणी ऐकणारी, संध्याकाळ होताच बाहेर मैत्रिणींना भेटून येणारी, घरात, रस्त्यात कुणीही भेटलं तरी भरभरून गप्पा मारणारी, प्रत्येक सण मनापासून साजरा करणारी आणि करायला लावणारी , गप्पा मारतानाच जुन्या आठवणीत रमणारी आणि त्याच आठवणी भरभरून सांगणारी, स्वयंपाक करताना त्यात जीव ओतणारी, हातात पैसा नसला तरी जोडलेली माणसं हीच माझी दौलत असं म्हणणारी आणि कितीही अवघड परिस्थिती असली तरी नेहमी आशावादी आणि हसरी असणारी अशी होती माझी आज्जी....!
इथून पुढे तिची हाक कधी येणार नाही आणि तिचा गुणागुणनं ऐकू येणार नाही पण तिने भरभरून दिलेलं प्रेम मात्र तसच राहिल. आजूबाजूला नसली तरी तिने दिलेल्या संस्कारातून ती अजूनही आमच्यात आहे. तिचं “असणं” हे त्यातून नक्कीच जिवंत राहिल.
झेलित उन्हाचे चांदणे,
अन् गाणे होते क्षितीजासम
बांधीत सुरांचे तराणे..!
शब्द निरागस तुझे बापुडे
शोधीत अशी श्रोता,
आठवणींची गाठ पडे
अन् काळ होई छोटा..!
सगळ्यांवरती जीव जडविला
केलीस प्रेमळ माया,
हातातुनी हात सोडता
पोरकी झाली छाया...!
शिशिर ग्रीष्म वैशाख असो वा
बरसल्या श्रावणधारा,
कुसुम तुझे फुलत राहिले
गंधित झाले अगणित क्षण
किमया अशी कुसुमांची,
धुंदीत डोले फांदी अन्
करिती नांदी आनंदाची...!
नाहीस आता गेलीस तू
हरवले शब्द गाणे सूर,
सुकलेले कुसुम पाहता
डोळ्यांना येतो पूर..!
पुढच्या जन्मी एकच इच्छा
पुरी करशील का माझी ?
नवे कुसुम बनून ये
अन् हो माझी आज्जी......!
.....आनंद
७ एप्रिल २०१२
Khupach chan ..... Apratim !!!!
ReplyDeletethanks omkar :)
ReplyDelete