आज आजीचा वाढदिवस . खरतरं
आज्जीच्या वाढदिवसाची वाट आज्जीपेक्षा आजोबाच जास्त पाहायचे. दरवर्षी काहीतरी
वेगळ्या प्रकारे वाढदिवसा साजरा करण्याची पद्धत लग्नानंतर इतकी वर्ष झाली तरी
दोघांनीही अखंडित पणे न चुकता सुरु ठेवली होती. आजोबांना दर वेळी काहीतरी वेगळ्या
करून आज्जीला धक्का द्यायला फार मजा यायची. यातही एक गोष्ट दोघे दर वर्षी न चुकता
करायचे आणि ती म्हणजे दोघे एकमेकांना दर वर्षी या दिवशी पत्र पाठवायचे. एकच घरात
राहून रोज एकमेकांबरोबर असूनही खरंतर पत्रामध्ये असं विशेष काय लिहणार असं कुणालाही
वाटू शकत आणि खूप लोकांना हा काय वेडे पणा असंही वाटायचं. पण इतरांकडे दुर्लक्ष करत हा पत्राचा नियम असंच
वर्षानुवर्ष दोघेही पाळत आले होते.
आजी आजोबा शहरापासून दूर आणि
तितक्याच निसर्गरम्य अशा छोट्या गावात एका बैठ्या घरात राहत होते. शेजारी अशीच
५-१० बैठी घरे होती. खूप वर्षांपूर्वी शहरात नोकरी करतानाच घेतलेल्या या जमिनीवर
काही वर्षांपूर्वी हे बैठं घर बांधून दोघे इथे राहायला आली होती. महिन्या दोन
महिन्यानंतर शहरातला मुलगा, सून , नातवंडं त्यांना भेटायला यायचेच. घराच्या भोवती
दोघांनी मिळून भरपूर फुलझाडे लावली होती. दोघांनी गावातल्या लोकांशी सुद्धा खूप
जिव्हाळ्याचे नाते जोडले होते. दिवस आनंदात चालले होते.
आजच्या दिवशी सुद्धा आजोबा
याचीच वाट पाहत होते. त्यांनी आज्जी साठीच पत्र कधीच पोस्टात टाकलं होतं. आज सकाळ
झाली, तसे ते अंघोळ आणि पूजा उरकून बसले होते . पोस्टमन १० वाजता गावातून चक्कर
मारून पत्र वाटत असे. आजोबा मात्र ८ वाजताच आवरून बसले होते आणि मागच्या खोलीतून
खिडकीतून बाहेर पाहत उभे राहिले होते. मधे येर झाऱ्या घालत होते. मधेच घड्याळात
पाहत होते. लग्नाला इतकी वर्ष झाली तरी त्यांना तितकीच हुरहूर वाटत होती. आजींना
ही सगळी गंमत कळत होती.
पण आजींची अवस्था सुद्धा
काही वेगळी नव्हती. वर्षातून दोनदा दोघांची अशीच अवस्था असे.
बरंच वेळ गेला आणि पाहता
पाहता दहा वाजून गेले. पोस्टमन काही अजून
आला नाही. आजोबा मागच्या खोलीत आणि आजी ओसरी वर दोघेही अस्वस्थ झाले होते. आजी
मात्र कंटाळून दुपारच्या जेवणाच्या तयारीला लागल्या. आजोबांना मात्र काही राहवेना.
बाहेर उन्हाचा तडाखा वाढत होता. जून सुरु झाला होतं अगदी कालच ढगांनी आकाश भरून
आलं होतं. पण आज पुन्हा उन वाढलं होतं.
साधारण ११.३० वाजले आणि
आजोबा ओसरी वर आले. आजी आत काम करत होती. तिला चाहूल लागणार नाही याची काळजी घेऊन
त्यांची चपला घातल्या आणि बाहेर पडले. पोस्ट ऑफिस साधारण ३-४ किलोमीटर लांब होतं. रस्त्याच्या कडेनी आजोबा चालत निघाले. गावातली
घरे मागे सोडून ते महामार्गाच्या कडेनी जाऊ
लागले. उन आता चांगलाच तापलं होतं. आजोबा घामाने ओले झाले होते. खूप तहानही लागली
होती. साधारण तासा दीड तासाने आजोबा पोस्ट ऑफिस मधे पोहोचले. तिथे पोहोचताच पोस्टमास्तरांनी
आजोबांना पाहिलं आणि ते धावत त्यांच्यापाशी गेले. तिथल्या शिपायाला हाक मारून
त्यांनी पाणी आणायला सांगितलं. आजोबा बसले. पोस्तामास्तारांनी आजोबांना शांत होऊ
दिलं आणि मग त्यांना इतक्या उन्हात येण्याचं कारण विचारलं. आजोबांनी सांगितलं कि
त्यांनी नेहमी प्रमाणे टाकलेलं पत्र आज पोस्टमन ने आणून दिलेलं नाही म्हणून मग ते
पाहायला ते भर उन्हात चालत आले होते. पोस्ट मास्तर हे जाणून होते त्यांना आजोबांचा
दर वेळचा पत्राची गोष्ट माहित होती. हे खुदकन हसले. नवीन रुजू झालेल्या पोस्टमनने पत्र
कालच आजींना कसे नेऊन दिले हे ही सांगितले. हे ऐकून मात्र आजोबांना थोडसं राग आला.
मात्र मग आजीने ही गोष्ट कशी लपवून ठेवली याचीही त्यांना गंमत वाटली. पोस्त मास्तरांनी
त्यांना गाडीत बसवलं आणि घरी सोडायला निघाले.
तिकडे आजोबा कुठे गेले म्हणून
आज्जी काळजीत बसल्या. आजींना न सांगता आजोबा कुठेच जात नाहीत. आज हे असे कसे कुठे
गायब झाले हे आजींना कळत नव्हतं. त्या शेजारी पाजारी जाऊन त्या चौकशी पण करून
आल्या होत्या त्यातल्याच एका तालुक्याला काम करणाऱ्या पोराने आजोबांना पोस्ट
मास्तरांबरोबर पहिल्याच सांगितलं.
आणि आता ओसरी वर बसल्या
होत्या. दुपारचे ३ वाजून गेले होते. काल सारखीच आकाशात ढगांची गर्दी होऊ लागली
होती. पहिल्या पावसाचे ढग बरसण्याची वाट पाहत होते.
तेवढ्यात समोरून गाडी येऊन
थांबली. त्यातून आजोबा उतरले. आजी उभ्या राहिल्या. आजोबांकडे लटक्या रागाने
पाहिलं. आजोबांनी ही डोळे मिचकावून दाद
दिली. आजी जवळजवळ धावत आत गेल्या आणि मांडणीतून आजोबांचा पत्र आणलं. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. ओसरी वर पावसाचा
पहिला थेंब मातीत पडला. जणूकाही मातीतून त्याच्या पडण्याने हुंकार यावा असा भास
झाला. काही कळायच्या आतच सरींचा सोहळा झाला. आजीनी छत्री आणली आणि आजोबां न आणायला
गेट कडे निघाल्या. आजोबांसमोर येताच आजोबांनी छत्री बाजूला सारली. हातात हात घेऊन
दोघे चिंब सरी मधे भिजले. पाणावलेले डोळ्यांना पावसाच्या सरींनी दडवून ठेवलं. दोघे ओसरी वर येऊन बसले. आजोबांनी विचारलं तू
पत्र वाचलस का ? आजी खुदकन हसल्या आणि म्हणाल्या नाही. एक दिवस आधी आलेलं पत्र मी कसं वाचणार ? ज्या
दिवशीचं काम त्या दिवशी करावं माणसाने. या वाक्यावर दोघेही मन भरून हसली.
आजोबा कोसळणाऱ्या पहिल्या
पावसाकडे पाहत म्हणाले, आपलं म्हातारपण किती छान आहे नाही सुमे. आजींच नाव सुमन
होतं. आजोबा त्यांना सुमे अशी हाक मारायचे. म्हातारपण म्हणजे ज्यांना ओझं वाटतं त्यांची
मला खरंच कीव येते. बघ ना आजच्या दिवसाने आपल्या नात्याला आज पुन्हा नवी पालवी
नाही का दिली. दुपारचं तापणारे उन आणि आताच्या या पहिल्या पावसाच्या चिंब सरी. उन आणि पाऊस एवढंच तर असतं नाही का म्हातारपण , थोडेसे
चटके आणि आयुष्याचं सार्थक करून टाकणाऱ्या चिंब सरी. कधी कधी मला वाटतं सुमे माणसाने म्हातारा होऊनच
जन्माला यावं कारण इथेच माणसाला माणसाची असलेली खरी गरज कळते. एकमेकांसाठी जीव
देणाऱ्या तरुणाई पेक्षा आपलं हे निर्व्याज प्रेम किती निर्मळ आहे नाही.
यावर आजी नितळ हसल्या,
त्यांच्या बोलक्या डोळ्यातून त्यांनी हुंकाराच दिला होता. त्यांच्या डोळ्यातून एक
अश्रू ओघळला आणि हातातल्या पत्रावर पडला. त्या लगबगीनं उठल्या. आणि आत जाऊ
लागल्या. आजोबानि वळून पाहिलं आजींच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहताना आजोबांचे डोळे
धुसर झाले आणि दाटलेल्या सरींनी जमीन खरोखरच तृप्त झाली.
आनंद ३० जून २०१३.