पत्र लिहायला बसलोय खरा, पण बऱ्याचदा होतं तसं या वेळीही
काय लिहावं हे काही ठरवलं नाही. हा विचार मनात आला आणि मग जाणवलं कि कित्येक वर्षात
कुणाला पत्रच लिहिलं नाहीये आणि कुणाचं पत्र वाचलं सुद्धा नाहीये. मग म्हटलं स्वतःच्या
मनालाच पत्र लिहायचा प्रयत्न करून पाहावा. काय हरकत आहे नाही का ?
खरतर पत्र म्हणजे नक्की काय असत ? मनातले संवादात न मावणारे
शब्द कागदावर उतरवण्याचे साधन म्हणजे पत्र. असं मला वाटतं. मुळात हल्ली माणसाचं
स्वतःशी बोलणच बंद झालंय. काहीकाही गोष्टी आपण कुणाशीच बोलत नाही. अगदी स्वतःशी
सुद्धा. मग म्हटलं अशाच शब्दांना वाट करून द्यावी. आणि मोकळं व्हावं. थोडासा
आतल्या मनाशी हितगुज करावी , त्रयस्थ पणे त्याच्या कडे बघून पाहावं , कदाचित
त्यातूनही काहीतरी गवसेलच कि. आणि नाहीच गवसलं तरी समाधान मात्र नक्कीच मिळेल.
माझ्या प्रिय मनास ,
तू अनेक कित्येक वर्ष भल्याबुरया परिस्थितीत साथ दिलीस. खूप
त्रासही करून घेतलास. कधी मुक्त होऊ दिलंस ,तर कधी बंधनात बांधून ठेवलंस, पण कधीही
एका शब्दाने तक्रार केली नाहीस कि असहकार पुकारला नाहीस. त्यासाठी आधी तुझे खूप
खूप आभार. खरतर नुसते आभार मानून काही फारसा फरक पडणार नाही पण हे आभार खरच
मनापासून आहेत. J अरे हे काय, पण मी तर मनाशीच बोलतो आहे ना ? मग असं म्हणतो कि माझ्या अगदी अंत:करणापासून आहेत.
तुझी साथ नसती तर कदाचित आत्ता पर्यंतचा प्रवासही शक्य झाला नसता. प्रत्येक
वळणावरची दरी फक्त तुझ्या मुळे पार झाली. तू
कुठे राहतोस हे मला माहित नाही. पण तुझं अदृश्य अस्तित्व पावलोपावली जाणवत राहता
हे मात्र नक्की. कधी कधी समोर न दिसणाऱ्या गोष्टीच जास्त परिणाम करतात ना मला हा त्यातलाच
प्रकार वाटतो.
चपळ, चंचल, भावूक, कणखर, नाजूक, जिद्दी, हट्टी, प्रेमळ,
रागीट अशी एक न दोन कितीत्तरी विशेषणं तुझ्या बाबतीत वापरली जातात. आणि तुझ्या या
विशेषणांनी तेवढ्या पुरता का होईना मलाही ओळखलं जातं. ती खरतर माझीच ओळख होऊन जाते.
पण मला आश्चर्य वाटतं ते तुझं , इतक्या भावनांचं संमेलन भरलेलं असताना तू स्वतःची
ओळख माझ्यावर लादत नाहीस. ती स्वीकारणं तू खुशाल माझ्यावर सोडून देतोस. स्वतःच्या
मालकीच्या प्रत्येक गोष्टीचं भांडवल करणाऱ्या या जमान्यात तुझं हे निस्वार्थी
वागणं मला खरच भावून जातं. तुला वेगळा करून मी माझा विचारच करू शकत नाही हे कदाचित
त्याच मुळे. विज्ञान कितीही पुढे गेलं तरी तू मात्र गूढच होताच ,आहेस आणि पुढेही राहशील.
सगळ्याच गोष्टी माणसाला कळल्या तर त्या मला वाटतं कदाचित जगण्याचा अर्थच निघून
जाईल. त्यामुळे तू आहेस तसाच रहा.
अगदी गूढ , अथांग.......!
बाकी तू एक गोष्ट मात्र सुधारली पाहिजेस हं , आणि ती म्हणजे स्वतःची काळजी घेणं. मला माहित आहे कि रोज तुझ्या मागे हजार गोष्टी लागलेल्या असतात पण याचा अर्थ असा नाही कि तू पूर्ण पणे त्यातच वाहून जावस. कधी कधी हात वर करून एखाद्या गोष्टीला खुशाल नाही म्हणत जा. इतकी दमछाक का म्हणून करून घ्यायची ? आम्ही माणसे सुद्धा स्वतःला झेपेल तेवढीच कामे करतो. कधी कधी मर्यादा ओलांडून काम करतोही पण ते तेवढ्या पुरता. तू मात्र अविश्रांत राबत राहतोस. त्यासाठी काहीतरी कर बाबा. मी तुझ्यावर खूप जास्त दबाव टाकला कि खुशाल झिडकारून लावत जा. अगदी मधून मधून सुट्टी घेऊन दूर कुठे फिरुन सुद्धा येत जा. हवापालट तुलाही हवाच कि. मला माहितीय अनोळखी रस्त्यावर भटकायला तुला फार आवडतं. कधी कधी खूप दूर भटकत गेलं ना कि एखादं नवीन शिखर दिसतं तर कधी एखादी नवी पायवाट सापडते. तू खुशाल अशा पायवाटा धुंडाळत फिरत जा. कारण तुझ्या त्या हरवण्यात मला बरंच काही गवसत असत.
आयुष्यातल्या आव्हानांना सामोरा जाताना तुझी अशीच साथ राहील यात शंकाच नाही पण तुला हव्या असणाऱ्या गोष्टीही तू माझ्या मार्फत पूर्ण करून घेत जा. शेवटी म्हणतात ना “Two is company “. आपल्याला अजून एकमेकान सोबत आयुष्य काढायचा आहे. त्यामुळे एकमेकांना जाणून घेणंही तितकंच महत्वाचं आहे. बाकी आता फार लिहित बसत नाही.
मधून मधून मी पत्र लिहित जाईन. तुला जमेल तसं उत्तर पाठवत जा. घाई नाही.
बाकी इकडे सगळं क्षेमकुशल आहे. काळजी घे. निरागसता जप आणि नितळ रहा. चल बोलू नंतर.
मधून मधून मी पत्र लिहित जाईन. तुला जमेल तसं उत्तर पाठवत जा. घाई नाही.
बाकी इकडे सगळं क्षेमकुशल आहे. काळजी घे. निरागसता जप आणि नितळ रहा. चल बोलू नंतर.
तुझाच आनंद
सुंदर.... पण हे नक्की कोणासाठी आहे .... स्वत:च्या मनासाठी की आणखी कोणाला काही सांगायचे आहे.... असो .... पण सुन्दर विचार आहेत मनाला सांगायला.....
ReplyDeleteAmazing lihitos....shabda ani shabda manala bhidato...wachatana oli sampu nayet itaka sundar....gr8!!!
ReplyDelete