Powered By Blogger

Saturday, November 30, 2013

लघुकथा – मुक्ता



आज सुट्टी असल्यानं सुमित निवांत होता. उशिरा उठून खूप संथ गतीने सगळं आवरणं चाललं होतं. रविवारची सुट्टी फार काही वेगळ्या प्रकारे वगैरे घालवणाऱ्या मधला तो नव्हता. पण तरीही आज मस्त पैकी आराम करायचा आणि एखाद पिक्चर पहायचा त्याचा बेत चालला होता. तसं त्याने सुमनला सांगूनही टाकलं. आज चक्क त्याचा मूड बरा दिसतोय हे पाहून सुमननेही लगेच तयारी दाखवली. सकाळचा नाश्ता झाला. सुमीत घराबाहेर पडला. पिक्चरची तिकिटे काढून आणतो असं म्हणून तो निघाला. इकडे सुमन जेवणाच्या तयारीला लागली. ते करता करता सुमन च्या डोळ्या समोरून मागची ३ वर्ष येऊ लागली. लग्नानंतर या घरात आल्यावर तिने खूप सुखाचे दिवस अनुभवले होते. सुमितच्या प्रेमाने ती कधी कधी भारावून जायची. घरातल्या छोट्या छोट्या गोष्टींना तिने जीव ओतून सजवल होतं. पहिली दिवाळी, पहिली गाडी, घराचं रंगकाम , खिडकीमध्ये लावलेली फुलझाडे , वाढदिवस ,लग्नाचे वाढदिवस, नातेवाईक त्यांनी गजबजून गेलेलं घर,  असे एक न दोन अनेक प्रसंग, आठवणी तिच्या मनात एखाद्या स्लाईड शो सारख्या येऊ लागल्या. 



इकडे सुमीत घराबाहेर पडला आणि त्याला रिक्षा काही मिळेना.. थीएटेर फारसं दूर न्हवतं त्या मुळे तो चालत निघाला. रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. तो चौकात पोहोचला. एका दिशेने पाहून रस्ता ओलांडू लागला तोच दुसऱ्या दिशेने एक कार अचानक आली आणि सुमित खाली कोसळला. रस्त्याच्या पलीकडून जाणाऱ्या मुक्ताने ते पाहिलं आणि धावत येऊन सुमितला लोकांच्या मदतीने जवळच्या हॉस्पिटल मधे नेलं. त्याच्या खिशातल्या डायरीतून घरचा नंबर शोधून तिने सुमनला बोलावून घेतलं. हॉस्पिटल मधे पोहोचताच सुमन चा धीर सुटला. तिला जवळ घेऊन मुक्ता समजावू लागली. सुमितच्या पायाला जबर मार लागला होता. तरीही डॉक्टरांनी सुमित ला वेळेत दवाखान्यात आणल्या बद्दल मुक्ताचं कौतुक केलं. हे ऐकून सुमन सुद्धा मुक्ताकडे खूप भारावून पाहत होती. आणि याचं कारण म्हणजे मुक्ता एका पायाने अधू होती. पण तिच्या चेहऱ्यावर मात्र खूपसाधे सरळ भाव होते. एखाद्या निळ्याशार तळ्यातल्या पाण्याचा तळ दिसावा तसे तिचे डोळे खूप बोलके होते. “सगळं काही बरं होईल हे तिने डोळ्यांनीच सुमनला खुणावलं. सुमन ला हायसं वाटलं. सुमन कडून नातेवाईकांचे नंबर घेऊन मुक्ताने भरभर फोन करून सगळ्यांना झालेल्या अपघाताबद्दल कळवल. इकडे डॉक्टर सुमित च्या ऑपरेशन च्या तयारीला लागले होते.  जवळचे नातेवाईक येताच  मुक्ता सुमन चा निरोप घेऊन निघाली. काही लागलं तर मला न संकोचता नक्की कळव असं सांगून ती तिथून निघाली. काही कुठलं रक्ताचं नातं नसताना या मुलीने आपल्याला किती निरपेक्ष पणे मदत केली ती जर नसती तर सुमित चा काय झालं असतं असे विचार सुमन च्या डोक्यात येत असतानाच डॉक्टर ऑपरेशन थेटर मधून बाहेर आले. आणि सुमन समोर येऊन म्हणाले की आता काहीही काळजी करण्याचं कारण नाही पायाला जबर मार लागल्या मुळे हाडांना खूप दुखापत झाली आहे पण लवकर उपचार करता आल्यामुळे सुमित चा पाय मात्र वाचला आहे. तो काही महिन्यातच नीट चालू शकेल. असं म्हणून त्यांनी मुक्ताची चौकशी केली पण ती गेलेली कळताच ते आत निघून गेले.
 
बघता बघता दोन आठवडे निघून गेले. इकडे सुमित वर उपचार चालूच होते. या काळात मुक्ता तीन चार वेळा येऊन गेली पण दरवेळी ती सुमनला भेटून सुमितच्या तब्येतीची चौकशी करून निघून जायची. सुमनला मुक्ताचा चांगलाच आधार वाटू लागला होता. एखाद्या मोठ्या बहिणी सारखी मुक्ता सुमन ला हवी ती मदत करायची. सुमन ने एक दोनदा सुमितला भेटायला चल म्हणून आग्रह करूनही तिने ते टाळल. ती सुमनला म्हणाली “मला उगाच त्यांच्या समोर कोणीतरी मोठ्ठ माणूस म्हणून जायला आवडणार नाही आणि परोपकार, मदत या गोष्टींबद्दल आभार मानलेले मला खरंच आवडत नाहीत, माणसाने माणसाला मदत नाही करायची तर कुणी निर्जीव वस्तूंनी करायची का ? आणि ती केली तर मी फार काहीही जगावेगळी गोष्ट केलीय असं मला वाटत नाही. त्यामुळे मी त्यांना तेव्हाच भेटेन जेव्हा सुमित हे सगळं विसरलेले असती. इकडे सुमित ला मात्र आपण या मुलीचे आभार कधी मानतो असं झालं होतं. दिवस सरले आणि सुमित ला घरी सोडण्यात आलं. 


आता मात्र सुमनने निश्चय केला की मुक्ता ला घरी बोलावून सुमित च्या समोर उभं करायचं. तसं तिने सुमितला ही बोलून दाखवलं , त्यानेही तिला सरळ घरीच बोलाव असं सुचवलं. शेवटी सुमित कामासाठी बाहेरगावी गेला आहे आणि तू जरा माझ्या सोबतीला येशील का असं सांगून सुमन ने मुक्ताला घरी बोलावलं. खरतरं सुमित कुठेही बाहेर गेला नव्हता. मुक्ता घरी आली. ती बाहेरच्या खोलीत बसलेली असताना सुमन सुमितला बाहेर घेऊन आली. मुक्ता एव्हाना भिंतीवरचं चित्र पाहण्यात दंग होती. “ते सुमन ने काढलेलं चित्र आहे “ सुमित मागून म्हणाला. हे ऐकून दचकून मुक्ताने मागे पाहिलं. मुक्ताला पाहून सुमितच्या पाया खालची जमीन सरकली. त्याला आपल्या पायातलं बळ निघून गेल्या सारखं वाटलं. आपण कोणत्याही क्षणी खाली पडतो की काय असं वाटू लागलं. मुक्ता ही थोडीशी अस्वस्थ झाली. तोच सुमन मागून म्हणाली “आलीस की नाही समोर आता ? इतके दिवस माझ्या सुमितला टाळत होतीस. काय तर म्हणे आभार नकोत वगैरे, अग एवढी मदत केलीस तू आम्हाला एवढा हक्क तर बनतोच ना आमचा ? म्हणून सुमित आणि मी अशी शक्कल लढवली.”



सुमित ला त्यातलं फारसं काही ऐकूच आलं नाही. तो हरवला होता. मुक्ताने मात्र स्वतःला सावरून घेतलं आणि सुमन ला म्हणाली अग तसं नाही पण मला खरंच नाही आवडत असं.  सुगंधाला वाहून नेणारा वारा कुणाला दिसतो का पण सुगंधाला नेमक्या ठिकाणी पोहोचवायचा काम तो करतोच ना. तिथेही  एकमेकांना न पाहता दोघे आपल्या आपल्या जागी आपली कामे चोख बजावतात की नाही. तसंच हे.
सुमन ला मात्र अपार आनंद झाला होता. पण तिला कळेना सुमित एकदम गप्प का झाला आहे. ती सुमितच्या जवळ आली. सुमितच्या डोळ्यातून अश्रू धारा वाहत होत्या. तिला काहीच कळेना. तिने सुमितला खुर्चीवर बसवलं. तुला काय झालाय असं ती सुमितला विचारात होती. तिचा जीव घाबरा झाला होता. मधून ती मुक्ता कडेही पाहत होती. मुक्ता मात्र भावनांवर संयम ठेवून होती.    
तुझ्याशी लग्न करण्याआधी मी जिच्यावर जीवापाड प्रेम केलं, अनेक आणाभाका, शपथा घेतल्या आणि एका अपघातात तिचा पाय अधू झाल्यावर तिला तसंच सोडून दिलं ती हीच मुक्ता आहे हे सुमितने सुमन ला सांगितलं. आणि तो अजून हमसून रडू लागला. ते ऐकून मुक्ता सुमितला भेटायला का तयार नव्हती याचा उलगडा सुमन ला झाला. तिचा गोंधळ उडाला. मुक्ताची कीव वाटू लागली.
दोघाची ही अवस्था पाहून मुक्ता बोलू लागली. तुम्ही दोघांनी माझ्या साठी असा त्रास करून घेऊ नका. मी तुमची कुणीही नाहीये. आजची भेट आपली शेवटची भेट. मी पुन्हा कधीही तुमच्या आयुष्यात येणार नाही. पण सुमित जाण्याआधी मी एवढंच म्हणेन, की चाकोरी बाहेरच्या गोष्टी करायला फार धैर्य लागत नाही, आजूबाजूच्या लोकांना काय वाटेल ह्या प्रश्नाच्या डोंगराला वळसा घालून पुढे गेलं कि राहिलेले प्रश्न आपोआप सुटतात. लोकं हा डोंगर चढत बसतात आणि बऱ्याचदा दमून पुन्हा मागे फिरतात. जसं तुझं झालं सुमित. अपघातात माझा नुसतच पाय गेला पण तू मात्र तुझं स्वत्वच गमावलंस. जी गोष्ट तुम्हाला साध्य करायची, तुम्हाला हवी आहे ति गोष्ट इतर सहजपणे समजून घेतील अशी अपेक्षा आपण तरी का करायची ,स्वार्थ तुमचा असेल तर प्रश्नाला बगल देऊन पुढे जाणे तुम्हाला जमलं पाहिजे. पण तुला मात्र जगाचे प्रश्न मोठे वाटले. मला बाजूला सारण तुला सोपं होतं. तीच जवळची वाट तू निवडलीस. मला या बद्दल खेद नाही वाटत पण दुख होतं कारण मी तुझं जग होऊ शकले नाही आणि म्हणूनच दूर झाले.
त्या नंतरचे काही दिवस माझ्यासाठी खूप अवघड गेले. एकीकडे गमावलेला पाय आणि दुसरीकडे गर्दीत तुझा सुटलेला हात. दोन्ही गोष्टींमुळे मला जमिनीवर पुन्हा आधारा शिवाय उभं राहणं केवळ अशक्य होतं. 
पण एके दिवशी खिडकीतून  मी वाऱ्याशी झुंज देणाऱ्या एका फुलपाखराला पाहिलं , इवल्याश्या पंखांनी ते सोसाट्याच्या वाऱ्याशी लढू पाहत होतं. वाटून गेलं कुठून येत असेल हे बळ ? मग कळल मुळात फुलपाखराला हे संकट आहे हेच कळलेलं नसतं त्याला वाटत असतं की जणू वारा आपल्याला उडायला मदत करतोय. त्यामुळे नकळत दिलेली झुंज त्याचा संकटांमधे तग धरून ठेवायला मदत करत होती. शेवटी संकटं येतातच,  फाटे फुटल्याशिवाय पायवाटा घडत नाहीत आणि कस लागल्याशिवाय माणूस घडत नाही हेच खरं.  त्यादिवशी ठरवलं पुन्हा उभं रहायचं. सोशल सायन्स विषय घेऊन डिग्री मिळवली आणि एका अपंग मुलांच्या सामाजिक संस्थेमध्ये काम करू लागले.
किनारा खरं तर समुद्राचा शेवट असतो पण तरीही तो त्याच्या कडेच झेप घेत असतो. संकटांचा सामना करणं या पेक्षा वेगळं काय असू शकत ? आता म्हणूनच तू हे कसं केलंस, कधी केलंस,  हा प्रश्न विचारणाऱ्या लोकांची मला कीव येते...! आणि हसूही येतं.
तू वाईट वाटून घेऊ नकोस. भूतकाळाची ही पाने अशा तऱ्हेने समोर आली, पण काही गोष्टींचा फार खोलवर अर्थ न लावणंच योग्य असतं. तुझा आणि माझा मार्ग वेगळा होता एवढाच याचा अर्थ. सुमन खूप प्रेम करते तुझ्यावर आणि तुझंही खूप प्रेम आहे तिच्यावर. तुम्ही आनंदी राहा. एकमेकांचा आधार बना.
एवढं बोलून मुक्ता जाऊ लागली. एका पायाने लंगडत ती दारापर्यंत गेली आणि स्वतःच्या पायांवर बाहेर पडली. इकडे सुमन आणि सुमित मात्र पाय असूनही उभे राहू शकत नव्हते.

       आनंद
                                                                   ३० नोव्हेंबर २०१३