आज सोमवार, आज पुन्हा
सुमीतला ऑफिसला उशीर झालेला. घाईघाईत तो घराबाहेर पडला. बस थांब्यावर पळत पळत
निघाला. आई ला दारातूनच “येतो गं” अशी हाक दिऊन तो निघाला. आता मिळेल त्या बसने
जायचं असं तो मनात बोलत होता. खरतरं ऑफिस तसं फार दूर नव्हतं पण गर्दीमुळे खूप वेळ
लागायचा. सुमित बस थांब्यावर पोहोचला. त्याची नेहमीची बस तर कधीच निघून गेली होती.
त्याने आजूबाजूला पाहिलं आणि मागे बाकड्यावर जाऊन बसला. नुकतीच बस गेल्याने गर्दी
थोडीशी कमी झाली होती. आता पुढची बस केव्हा येते इकडे त्याचं लक्ष लागून राहिलं
होतं. घाईने घरातून निघून आता इथे आपण निवांत बसलो आहोत याचा विचार करून त्याचं
त्यालाच हसू आलं. माणसाला उगाच असं वाटत असतं की सगळं आपल्या मनासारखं व्हावं पण
खरतरं ते बऱ्याचदा होत नसतं. १५ मिनिटांपूर्वी असलेली लगबग नाहीशी होऊन आता
एकप्रकारची हतबलता आली होती. काहीशी सक्तीची विश्रांतीच.
बसल्या बसल्याच सुमितच लक्ष
बाकाच्या टोकाला बसलेल्या एका आजींकडे गेलं. त्या एकट्याच बसल्या होत्या. सहावारी
साडी, हातात छोटीशी कापडी पिशवी, डोळ्यावर बारीक काड्यांचा चष्मा हे त्यांचं रूप
पाहून त्या चांगल्या सुशिक्षित घरातल्या आणि शिकलेल्या वाटत होत्या. सुमितचं
त्यांच्या कडे लक्ष जाण्याचं कारण म्हणजे त्या आजी हातात असलेल्या एका वहीची पाने
उलटीकडून पलटत होत्या. उत्सुकतेनं तो त्यांच्या कडे पाहू लागला. प्रत्येक पान
उलटताच त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते. सुमितला गंमत वाटली. आणि त्याच बरोबर
त्याची उत्सुकता सुद्धा वाढली.त्यांचं निरीक्षण करण्यात त्याची १०-१५ मिनिटे निघून
गेली आणि तोच बस आली. लगबगीने तो बस मधे चढला. चढताच त्याने मागे वळून पाहिलं पण
त्या आजी अजूनही तिथेच बसून होत्या. तो उगाचच थोडासा हसला.
तो दिवस कामाच्या गडबडीत
तसाच निघून गेला. रात्री घरी येऊन जेवण झाल्यावर तो पलंगावर वाचत पडला तोच त्याला
सकाळच्या आजी आठवल्या. त्या उलट्या वहीत काय वाचत असतील याची त्याला कमालीची
उत्सुकता लागून राहिली. खरतरं आपला तसा काहीच संबंध नाहीये पण तरीही हे काहीतरी
विचित्र आणि वेगळं आहे असं त्याला सारखं वाटत होतं. उद्या आपण लवकर जाऊन पाहूया
असं मनात ठरवून तो झोपी गेला.
सकाळी नेहमीपेक्षा लवकर
उठून तो साधारण १५ मिनिटे आधीच निघाला. बस थांब्यावर येताच त्याची नजर त्या
अज्जीना शोधू लागली, पण तिथे त्या नव्हत्याच. त्याचा हिरमोड झाला. कदाचित त्या
फक्त कालच इथे बसल्या असाव्यात आणि नेमकं आपण त्यांना पाहिलं असं त्याला वाटलं.
घडणाऱ्या सगळ्याचं गोष्टींचे अर्थ लावायचे नसतात असं विचार तो करतच होता तेवढ्यात
समोरून फुटपाथ वरून आज्जी हळूहळू चालत येताना दिसल्या. त्याला उगाचच आनंद झालं. त्या
येऊन बसायची तो वाट पाहू लागला. आज्जी नेहमी प्रमाणे कोपऱ्यातल्या बाकड्यावर
बसल्या. जरा सुस्कारा सोडून मोठा श्वास घेतला. सुमित त्यांच्या हालचालींकडे हळूच
लक्ष देऊन होता, त्यांच्या चेहऱ्यावर सुमितला एक प्रकारचा समाधान आणि आनंद दिसत
होता. तेवढ्यात त्यांनी पिशवीतून पुन्हा ती कालची वही बाहेर काढली. सुमितची
उत्सुकता शिगेला पोहोचली. आज्जीनी पुन्हा शेवटून वही उघडली. त्यांच्या डोळ्यातले
भाव बघून त्या काय वाचत असाव्यात याचा काही अंदाज येईना. कारण मधेच त्या गालात हसत
होत्या तर मधेच त्यांचे डोळे भरून आल्या सारखे वाटायचे, कधी वही सोडून शून्यात
पहायच्या तर कधी स्वतःच्याच हाताच्या तळव्या कडे पहायच्या. साधारण १५ मिनिटे गेली
असतील. सुमित ची नेहमीची बस आली. पण तो बस मधे न चढता तो तिथेच थांबला.
काही वेळाने आजीने वही बंद
केली आणि पिशवीमध्ये ठेवून दिली. हातातल्या घड्याळाकडे पाहून त्या उठल्या आणि ज्या
रस्त्याने आल्या त्याच वाटेने जाऊ लागल्या. एकतर आपण त्यांना ओळखत नाही त्यामुळे खूप
इच्छा असूनही त्याला आजींना विचारायचा धीर होईना. तो हा विचार करे पर्यंत आज्जी
पुढे गेल्या होत्या. पुढच्या बसने तो ऑफिस ला निघून गेला. दिवसभरात पुन्हा
कामाच्या गडबडीत तो सकाळचा प्रसंग थोडाफार विसरला पण एकदोनदा त्याच्या मनात धुसर
विचार येऊन गेलेच.
त्याला माणसाच्या मनाची
त्याला गंमत वाटली. ते कशाच्या मागे धावेल याचा खरंच काही नेम नाही. उद्या आपण
त्या आज्जीशी जाऊन बोलूया आणि आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मागुया असं
ठरवून तो झोपी गेला.
दुसऱ्या दिवशीही तो पुन्हा
बस थांब्यावर थोडा लवकर येऊन बसला. कालप्रमाणेच आज्जी समोरच्या रस्त्याने हळूहळू
चालत आल्या. त्या जागेवर जाऊन बसताच सुमित उठला. आज्जी नुकत्याच बसल्या होत्या आणि
तेवढ्यात सुमित त्यांच्या जवळ येऊन उभा राहिला. त्यांनी सुमित कडे पाहिलं. त्या
हसल्याचा भास सुमितला झाला. आज्जी
तुम्हाला राग येणार नसेल तर मी एक प्रश्न विचारू का? सुमित म्हणाला. आजीने स्मित करत मानेनेच होकार दिला. मी गेले ३
दिवस तुम्हाला पाहत आहे. तुम्ही याच वेळेला येता, इथेच बसता आणि एक वही काढून ती
उलटी वाचता. मला याबद्दल खूप आश्चर्य वाटतं. खूप काही खासगी नसेल तर तुम्ही मला
सांगू शकता का की नक्की तुम्ही काय वाचता आणि ते ही रोज ?
आजीनी मोठ्या कौतुकाने
सुमित कडे पाहिलं. हातातली वही बंद केली. एक मोठा श्वास घेतला आणि बोलू लागल्या. “तू
मला गेले २ दिवस पाहतोयेस हे मला कळलंय. जसं मी काय वाचते याची तुला उत्सुकता वाटत
होती तसच मलाही तुझ्या बद्दल कुतूहल वाटत होतं. शेवटी आज तू स्वतःच मला येऊन विचारलंस याचं बर वाटलं. आज एक गोष्ट मात्र मला
फार समाधान देऊन गेली ती म्हणजे माझ्या सारख्या म्हाताऱ्या बाई कडेही जगांच लक्ष
जातं. बर असो. तू प्रश्न विचारलेच आहेस तर मी उत्तर देते.
मी वाचते ती माझ्या पतीची
डायरी आहे. ते मागच्याच महिन्यात गेले. खूप दु:ख झालं. हे गेले आणि मग खूप मोठी
पोकळी निर्माण झाली. आमची मुले इथे नसतात
ती देशाबाहेर स्थायिक झालीयेत. आम्हाला दोघांना एकमेकांशिवाय कोणीच नाही. मग वाटलं
आता एकटा जगणं जमेल का? पण ते गेल्या नंतर पंधरा दिवसांनी यांच्या टेबलाच्या
कप्प्यात ही डायरी दिसली.
यांनी लिहिलं होतं “ मी
गेल्यावर तुझं कसं होईल याची मला नेहमी काळजी वाटायची आणि तुझ्या आधी मी जाणार
हेही मला उमगलं होतं. मग म्हटलं तुला एकट वाटणार नाही असं काहीतरी केलं पाहिजे.
म्हणून माझी उणीव तुला भासायला नको म्हणून मी तुझ्या साठी भरपूर पत्रे लिहून
ठेवलीयेत. पण ही पत्रे पहिल्यापासून नाही वाचायचीस. तर उलटी वाचायचीस. आज पासून
सुरु करायचं आणि अगदी आपली पहिली भेट जेव्हा झाली त्या दिवशी पर्यंत भूतकाळात
हळूहळू जायचं. आयुष्यात आपण दोघांनी किती सुख अनुभवलय, किती आनंद मिळवलाय फक्त हेच
तुला त्यातून पुन्हा एकदा कळेल आणि मग तुला माझी उणीव भासणार नाही. आपण आपलं
आयुष्य सार्थकी लावलंय हेच तुला त्यातून पुन्हा उमजेल . कारण या उलट्या प्रवासात
आपण दोघेही असू. फक्त एक करायचं , तुला कळू नये म्हणून मी ही पत्रे जिथे जिथे बसून
लपून छपून लिहायचो तिथेच बसून तू ती वाचायचीस. हे का करायचं हे तुला जेव्हा तिथे
जाशील तेव्हा कळेल. प्रत्येक पत्राच्या सुरुवातीला उजव्या कोपऱ्यात ते ठिकाण
लिहिलंय. चल भेटूया मग तिथेच. “
एवढं बोलून आज्जी थोडं
थांबल्या. त्यांचे डोळे भरून आले होते. पण लगेच सावरून घेत त्या बोलू लागल्या. “पाच
दिवसांपूर्वी ही पत्रे त्यांनी सांगितल्या प्रमाणे उलटीकडून वाचायला सुरुवात
केलीये. त्या प्रमाणे शेवटची २ पत्रे यांनी चक्क एका छोट्या मुलांच्या शाळेसमोर
बसून लिहीलीयेत. मी ही ती त्या शाळेसमोर बसूनच वाचली. आमची स्वतःची नातवंडे जरी
जवळ नसली तरी ही इतर मुले पाहून मला फार आनंद व्हायचा. आम्ही कित्येकदा
बालवाडीच्या शाळेसमोर जाऊन लहान मुलाकडे पाहत बसायचो. आज ते गेल्यावरही मी पुन्हा
तिथे गेले ते केवळ त्यांच्या पत्रामुळे.”
नंतरची २ पत्रे यांनी या इथे
या बस थांब्यावरच्या बाकड्यावर बसून लिहिली आहेत. शाळेनंतर आमचा दोघांच आवडत ठिकाण
होतं ते बसथांबा. खूप कंटाळा आला की आम्ही दोघे सरळ उठून कुठल्याशा बस थांब्यावर
जाऊन बसत असू. इथे आम्हाला पुन्हा
जगाबरोबर पळू लागल्या सारखं वाटायचं. कुणी बस साठी धावत पळत यायचं, कुणी रमत गमत,
कुणी अनिइछेने , कुणी बेफिकीर पणे , तर कुणी खूप आनंदाने पण प्रत्येक जण शेवटी
एकाच बस मधे बसायच. आम्हाला दोघांना आयुष्य आणि ही बस यात फार साम्य वाटायचं. सगळ्यांना
जोडणाऱ्या दुव्याप्रमाणे ही बस सगळ्यांना आपल्या पोटात घेऊन निघून जायची तेव्हा
आम्हाला खूप गंमत वाटायची. कदाचित म्हणूनच यांनी ही पत्रे इथे बसून लिहिली असतील.
आता मला उत्सुकता आहे ती
उद्याच्या पत्राची. उद्या मला हे कुठल्या ठिकाणी घेऊन जाणार आहेत कुणास ठाऊक.
हे वाक्य आज्जी इतक्या
विश्वासाने म्हणाल्या की क्षणभर सुमितला सुद्धा आजोबा जवळ पास आहेत की काय असं
वाटून गेलं. शेवटी आजोबांच्या पत्रामुळे आज्जी साठी ते अजूनही त्यांच्या जवळच होते
हे मात्र सिध्द झालं होतं.
तोच आजी म्हणाल्या “ तुला
एक सांगू सुमीत माणूस म्हातार झालं ना की त्याला काही नको असतं तेव्हा लागते ती
आपुलकीनं चौकशी करणारी जीवाची माणस. खरतरं प्रत्येक माणूस आपलं प्राक्तन घेऊनच जन्माला
आलेला असतो. माणसाला मुळात दुखाची भीती नसतेच ,त्याला सतत भीती वाटत असते ती एकट
पडण्याची. आपला तोल गेला तर आपल्याला सावरायला कुणीतरी येईल ही जाणीव खरतर त्याला स्वतःचा
तोल सांभाळायला बळ देत असते. म्हातारपणी नेमकं हेच होतं दोघांमधलं कुणीतरी एकजण
आधी निघून गेलं की मग तो आधार सुटतो आणि जगाच्यापरीनेही ते एकट राहिलेलं माणूस
सुद्धा ओझं होऊन जातं. अशावेळी वेळी त्या एकट्या जीवाचा मनाचा तोल ढळतो आणि ते
कष्टी होतं आणि जग मात्र फक्त पाहत बसतं. माझंही कदाचित हेच झालं असतं पण यांच्या
पत्रांमुळे आम्ही आजही एकत्र आहोत. शरीर कदाचित नसेलही पण त्यांचा आधार मला अजूनही
जाणवतो आणि त्याच बळावर मी आज उभी आहे. मी अजूनही उद्याची तितक्याच आर्ततेने वाट
पाहते आहे ते केवळ याचमुळे.
चल मी खूप बोलत बसले. मला
आता गेलं पाहिजे. घरातली कामे उरकून पुन्हा दुपारचा रेडीओ वरचा गाण्याचा कार्यक्रम
ऐकायचा आहे आम्हा दोघांना. उशीर करून चालणार नाही. तू आपुलकीनं चौकशी केलीस बरं
वाटलं. निघते मी.
मी काही बोलायच्या आत आज्जी
पुन्हा आल्या वाटेने जाऊ लागल्या होत्या. आज्जी नुसत्या बोलल्या नव्हत्या त्यांनी
आनंदी जगण्याचा मार्ग दाखवला होता. आजूबाजूच्या म्हाताऱ्या लोकांकडे, माणसांकडे
पाहताना मला आज्जीची वाक्य आठवत होती. “देवाला वाहिलेली फुलं जेव्हा दुसऱ्या दिवशी
सुकून निर्माल्य होतात तेव्हा आपण फक्त पायी तुडवले जाऊ नये एवढीच अपेक्षा असते, आपल्याला पुन्हा कुणीतरी हारामध्ये मध्ये माळाव
असं त्यांना कधीच वाटत नसतं. “
गर्दीत धुसर होत गेलेल्या
वाटेवर आज्जी दिसेनाश्या झाल्या. सुमित पाहत राहिला. निर्माल्यातल्या त्या एका दोन
फुलांनी आपली वाट स्वतःच शोधली होती. आनंद
२५ जानेवारी २०१४
Good one!specially Title of blog perfectly mean it!!!
ReplyDeletethanks a lot :)
Delete