गेल्या काही महिन्यात राधेय, मृत्युंजय, एकलव्य, पावनखिंड अशा पुस्तकांचा वाचन घडल आणि एक प्रचंड ताकदीचे आणि दुर्दम्य इच्छा शक्ति जागृत करणारे विषय असल्याने अर्थातच भारावून व्हयायला झाल.
पुस्तकांच विश्लेषण कराव इतकी ताकत तर माझ्यात नाहीच त्या मुळे तो खटाटोप मी करणार नाहीच पण तरीही राहवला नाही म्हणून मनाला जे वाटल आणि मला जे जाणवल ते इथे लिहिलय.
राधेय खरतर एकदा वाचल असा म्हणु शकत नाही कारण ते पुन्हा पुन्हा खुप वेळा चाळुन झालय. चांगला आणि वाईट याच्या खुप पलिकडे जाऊन कर्ण समजुन घ्यावा लागतो.
युद्धाच्या आधी कर्णाच एक स्वगत आहे त्याचा सारांश खुप काही सांगुन जातो.
मृत्यु येणार हे गवसुन सुद्धा कर्ण त्या रुपंताराची कारणमीमांसा करत असतो. मृत्यु ला रूपांतर मानणारा कर्ण खरोखर निर्भयि होता हेच क्षणोंक्षणी जाणवत राहत.
ऐहिक ऐश्वर्य , व्यवहारिक समाधान , वासना तृप्ति म्हणजेच का् साफल्य ! ते प्राण्यांनाही भोगता येत. मानवी जीवनाचा साफल्य ऐहिक तृप्तित नाही. या खेरीज अजुन एक तृप्ति असते ती कर्णाने संपादन केली होती. त्याच्या मृत्यु बरोबर संपणारी ती तृप्ति नाही. परमेश्वराने सुर भरलेल्या बासरीतुन जसे तीव्र सुर उमटले , तशीच असंख्य कोमल सुरांची पखरण सुध्हा झाली. चारित्र्य जपता आला. उदंड स्नेह संपादन करता आला. मित्रच न्हवे तर शत्रुही तृप्त झालेले पाहिले. वैरभाव पत्करला , तो ही परमेश्वररुपाशी. या पेक्षा जीवनाच यश यापेक्षा वेगळ का्य असत ?
हे विचार कर्ण नदी तीरावर उभा राहून करत असतो तोहि एक दुर्मिळ योगायोगाच म्हणावा लागेल. नदीच्या पाण्यात ज्याला सोडून देण्यात आल ,तोच आज तिथे उभा राहून आयुष्याकडे मागे वळुन पाहत होता आणि मृत्यु ला आव्हान देत होता.
कर्ण वाचताना माझ्या मनात उगाच त्याच्या बदल करुणा किंवा दया अजिबात आली नाही तर त्याच्या प्रत्येक कृतिमागे असलेली कारणे आणि त्याची भूमिका ही खुप गहन विचार करायला लावणारी होती.
एक प्रचंड इच्छा शक्तीचा स्त्रोत कुठेतरी आत आयुष्यभर झिरपत रहावा आणि वाटेवरच्या काटयाना, संकटाना लीलया सामोरा जाण्याचा बळ मिळत रहावा आणि तरीही ताठ मानने मृत्युलाही कवटाळण्याची ज्याची तयारी करणारा कर्ण भावतो तो याच मुळे...!
कर्णा प्रमाणेच नंतर वाचलेला "एकलव्य" भावला तो त्याच्या प्रचंड प्रामाणिक आणि दुर्दम्य आशेने व गुरू भक्तिमुळे. एकलव्य ची गोष्ट तशी सगळ्याच्या परिचायाची.
एकलव्य हा हिरण्यधनु चा पुत्र. द्रोणाचार्यांकडे विद्या याचना करण्यासाठी जातो पण ते नकार देतात. त्या नंतर एकलव्याने स्व प्रयत्नातुन मिळवलेली विद्या , त्यातून अर्जुनाला वाटू लागलेला मत्सर आणि द्रोणाचार्यांना गुरु दक्षिणा म्हणुन दिलेला उजव्या हाताचा अंगठा , हा घटनाक्रम. पण यात प्रत्येक वळणावर एकलव्यने दाखवलेला संयम केवळ प्रशंसेस पात्र ठरतो.
एकलव्य वाचत असताना मला क्षणोंक्षणी जाणवत होत ते आजही आपल्या आजुबाजुस असलेले अनेक द्रोणाचार्य आणि असंख्य एकलव्य. खरतर ही सामाजिक शोकांतिका आहे. पात्रता असुनही जवळ असलेली विद्या देऊ न शकणारे गुरु आणि ती शिकू न शकणारे विद्यार्थी.
संयमाच्या जोरावर माणुस किती आणि का्य प्राप्त करू शकतो याचा परिपाठ एकालव्यच्या गोष्टीतुन मिळतो. आणि तोच मला इथे जास्त भावला.
पावनखिंड आताच वाचून संपवल. एक अप्रतिम पुस्तक. बाजी प्रभुची ओळख पटायला पुरेशी अशी माहिती आणि वर्णन त्यात आहे. बर्याचदा खिंड लढ़वणारे बाजी एवढीच ओळख आपल्याला असते आणि होती पण त्या पलिकडे माणुस म्हणून ते कसे होते आणि शिवाजीन्बद्दल त्यांना कशा प्रकारे आदर होता हे खुप प्रामाणिकपणे मांडले आहे. बाजी अक्षरशः सावली सारखे महाराजांच्या सोबत असायचे आणि या राजाला काही होउ नये म्हणुन सतत झटायचे. जेव्हा सिद्दी जोहर स्वराज्यावर चालून येतो आणि मिरजेचा वेढा सोडून शिवाजी महाराज पन्हाळ्याला परत येतात तेव्हा उद्विग्न पणे ते म्हणतात " बाजी माणसाचा यश जस वाढत जात तसे त्याचे शत्रु पण वाढत जातात आणि तो एकाकी पडतो." यावर बाजी राजाना धीर तर देतातच पण पन्हाळा किती मजबूत आहे आणि इथे राहण कस योग्य आहे हे ही सांगतात. यावर महाराज आपल्या मनातला होरा बाजीनी बरोबर ओळखला म्हणून खुश होतात.
महाराज बाजीना वडिलकिच्या नात्याने वागवायचे ते उगीच नाही. बाजी नुसतेच लढ़वय्ये नव्हते तर ते एक प्रचंड हुशार सेनानी होते. पहिली तोफ पन्हाळ्या वरुन कधी डागायची हे महाराजानी पूर्ण पणे बाजींवर सोपवले होते ते फ़क्त त्यांना बाजीं बद्दल असलेल्या प्रचंड विश्वासा मुळेच.
राजा जगला पाहिजे हे एकच ध्येय समोर ठेवून खिंडित उभे ठाकलेले बाजी मन जिंकतातच पण त्याही पेक्षा मोठा काम म्हणजे इतर मावळ्या मधेही ते ती जिगर आणि इच्छा जागवून जातात.
या सगळ्या पुस्तकां मधे एक समान गोष्ट होती आणि ती म्हणजे प्रचंड बिकट , प्रतिकूल परिस्थिति असुनही केवळ मिळालेल्या आयुष्याचे सार्थक करण्यासाठी जिवाचा रान करून झटणारि काही दुर्मिळ आणि देदीप्यमान व्यक्तिमत्वे...!
दाटुन आलेले ढग उदास वाटत असले तरी मला वाटत , आपला जन्म ज्या धरणीवर बरसुन तिला तृप्त करण्यासाठी झाला आहे ती कृति करायला ते आसुसलेलेच असतात.
ढगच काय पण प्रत्येकचाच जन्म हा फ़क्त हवेतला ऑक्सीजन शोषून जिवंत राहण्या साठी झाला नसून तो जगण्याचा महोत्सव करून त्याचा सार्थक करण्या साठी झाला आहे हे जेव्हा प्रत्येकाला उमजेल तेव्हा खरे ढग बरसतील आणि आकाश निरभ्र होईल....!
आनंद
26 ओक्ट्बर 2014