Powered By Blogger

Monday, February 29, 2016

प्रबळ इच्छा

शुक्रवार ची संध्याकाळ, ऑफिस मध्ये मीटिंग  संपली. लॅपटॉप बंद झाला आणि दिवस संपला. पुढच्या आठवड्याच काम आताच डोळ्यासमोर दिसत होतं. पण तेवढ्यात आठवलं कि उद्या शनिवार आहे आणि मन क्षणांत आनंदल कारण शनिवारी प्रबळगडला भटकंती ठरली होती. क्षणांत उत्साह आला आणि जीवाने घराकडे धाव घेतली.
अर्थात Beyond mountains सोबत volunteer म्हणून जाणे हीच पर्वणी होती.
शुक्रवारी रात्री झोपायला तसा उशिराच झाला पण तरीही पहाटे उठून आवरून वेळेत FC रोड ला पोहीचलो ,बाकीचेे मावळे आणि हिरकण्या पण वेळेत हजर झाल्या आणि सुरु झाला तो उगवणाऱ्या सूर्याच्या साक्षीने प्रबळगडाचा प्रवास.
नेहमी प्रमाणेच काही ओळखीचे काही अनोळखी चेहर होते. थोड्याच वेळात सगळ्यांच्या पोटातल्या भुकेला सँडविचचा आधार मिळाला.
मराठी दिनाच औचित्य साधून गायलेली काही भन्नाट गाणी, आणि मधेच "ट" अक्षर आल्यावर "तुम्हावर केली मर्जी बहाल" गाण्याचं "टूम्हांवर" असा अपभ्रंश करून पोट धरून हसून मजल दरमजल करत ठाकूरवाडी आलं.
उतरल्यावरच जाणवलं कि हवेतल्या आर्द्रते मुळे हा ट्रेक तसा जीव जेरीस आणणारा असणार आहे. सुरुवात केली आणि मजल दरमलजल करत दुपार पर्यंत 20 जणांच्या चमू ने प्रबळगड सर केला,  वर पोहीचल्यावर पोटोबा उरकून घेतला, आणि कलावंतीण पॉईंट ,गणपती मंदिर पाहून सगळे उतरणीला लागले. अर्थात उतरतानाही तिथल्या आर्द्रते मध्ये सगळ्यांनाच फार तहान लागत होती आणि पाण्याची खरी किंमत सगळ्यांना कळत होती. कधी एकदा प्रबळ माची वर पोहोचून पाणी पितो असे सगळ्यांना झाले होते.



प्रबळमाचीवर गाव आहे आणि इतक्या उंचीवर मुळात तिथले लोक कसे राहतात याचं अप्रूप वाटल्याशिवाय राहत नाही. शेणाने लिंपलेल्या भिंती , कौलारू घरं , त्या समोर सारवलेलं अंगण आणि लाकडी काठ्यांचं कुंपण , सगळीच घरे साधारण अशीच दिसत होती. आजूबाजूला पाहिलं तर अर्थात डोंगर आणि क्षितिज या पलीकडे काहीच दिसत नाही. प्रमाणबद्ध आयुष्य जगणाऱ्या इथल्या माणसांबद्दल मनोमन कौतुक वाटत राहतं. चौकट हा शब्द मुळात इथे अस्तित्वातच नसावा इतकं हे सगळं मोकळं भासतं. प्रगतीच स्वप्न सुद्धा इथे फार दूर वाटत होतं पण निसर्गाच्या जवळ नाही तर त्याचा भाग होऊन जगणारी माणसं बघून भारावून जायला होत.अर्थात हे जगणं प्रचंड कष्टाचं होतंच पण तरीही त्यात एक समाधान दिसत होतं.
गड उतरताना शरीरातल्या कमी झालेल्या पाण्याने आलेला थकवा गावात येऊन पिलेल्या थंडगार सरबताने नाहीसा झाला.
पुढच्या वेळी येईन तेव्हा इथे मुक्काम नक्कीच मुक्काम करेन असं ठरवूनच इथून निघालो. सायंकाळ चा सूर्यास्त पाहत पुन्हा सगळे जण पायथ्याशी परतलो.भटक्या जीवाची शिदोरी अजून एका अनुभवाने वाढली होती.



या सगळ्यात एक गोष्ट महत्वाची होती खरतर ती प्रत्येक भटकंती ला लागू होते,  इथे या ट्रेक मध्ये नुसता गड सर झाला नव्हता तर आयुष्याने एक नवा पडदा उघडून आत डोकावून पाहिलं होतं. ट्रेक ला आलेल्या पैकी कुणी अशा अनुभवाला पहिल्यांदा सामोरं जात होतं तर कुणी अनेकदा सामोरं जाऊनही पुन्हा पुन्हा फिरून इथे येत होतं पण सगळ्यांना जोडणारा धागा मात्र एक होता,
आत खोलवर असलेली किंवा रुजलेली एक दुर्दम्य इच्छा, काहीतरी नवं गवसेल, काहीतरी पुन्हा आठवेल , एखाद्या दुर्मिळ गोष्टीला साकडं घालता येईल , सतत धावणाऱ्या आयुष्याला एक चिरकाल थांबलेला क्षण सापडेल, मनाला असलेली जुनी जखम वा सल तेवढ्यापुरते का होईना विरून जातील आणि त्या विशाल काळ्या कातळाला पाहताना सगळ्याच गोष्टी खूप छोट्या होऊन जातील.
अर्थात प्रत्येकाला यातलं काहीतरी नक्कीच गवसलं होतं आणि या भटकंती साठी तेवढं पुरेसं होतं.
Beyond चा आणखी एक ट्रेक पार पडला होता आणि सगळ्यांना असंख्य आठवणी देऊन गेला होता..!




29 फेब्रुवारी 2016
आनंद

No comments:

Post a Comment