Powered By Blogger

Tuesday, May 31, 2016

माणसांतले “सूर” : भाग १

माणसांतले “सूर”  : भाग १

मुळात माणसांवर लिहावं असं खरतरं काही विशेष असं कारण नाही पण एक वेगळा प्रयत्न आणि त्यात आजूबाजूच्या म्हणा किंवा कुणा दुसर्याकडून कानावर आलेल्या अशा खऱ्या आणि तितक्याच काल्पनिक वाटाव्या अशा व्यक्ती रेखा किंवा मुळात त्या माणसांच्या प्रकृती या इतक्या लक्षवेधी आहेत कि थोडं विचार केला कि आपल्यालाच त्या खूप जवळच्या वाटू लागतात. अर्थात कुणालाही दुखावण्याचा हेतू नाहीच पण माणसातल्या विविधतेवर नजर टाकली तर किती गम्मत येते हा बघण्याचा हा खटाटोप. हे करताना मला जाणवलं कि खरतर आयुष्य सुरांचं बनलेलं आहे प्रत्येक जण आपला सूर जमेल तसा लावत असतो त्या मुळे प्रत्येक माणसाचा एक स्वतः चा असा सूर असतो आणि मग त्यात हवा तसा बदल करत तो जीवन गाणं गात असतो. प्रत्येकाच्या आयुष्याला स्पर्शणार्या या माणसांचे “सूर शोधण्याचा एक प्रयत्न इथे केलाय.


“नकार-तक्रार” सूर” आळवणारया व्यक्ती : अर्थात नावावरून जो अर्थ प्रतीत होतोय तशाच प्रकारची हि माणसे असली तरी या सगळ्याचं मूळ शोधणं गरजेचं आहेच. सर्वसाधारण पणे हि माणसे कधीच “हो” म्हणत नाहीत पण “तक्रार” ,“नकार” किंवा “नाही” चा सूर मात्र लावतात. अर्थात हो म्हणायला आधी ऐकावे लागते हि बाब वेगळी. पण मुळात नकार कशाला द्यावा हे हि कळू नये इतकी यांची मजल असते. उदाहरणे द्यायची झालीच तर खूप आहेत , जसे चहा गरम असेल तर “छे.. फार गरम आहे, मध्यम आहे तर साखर कमी आहे , साखर आहे तर कप तुटका आहे, कप छान नवीन आहे तर दुध चांगले नाही  आणि सगळे छान आहे तरी हवा खराब आहे आणि त्या मुळे चहा कसा चांगला लागत नाही हे सुद्धा हि माणसे सिध्द करू शकतात. यांच्याकडे कार असेल तर काही विचारूच नका, ,तुम्हाला यांच्या गाडीत बसायचा योग आलाच तर तुमच्या संवादात पुढची वाक्ये आलीच पाहिजेत, तुम्हाला काहीही करायची गरज नाही , “रस्ता कसा खराब आहे, रस्ता चांगला असेल तर लोक कसे नियम भंग करतात (हे बोलताना स्वतःची कार सिग्नल तोडून पुढे नेतील आणि उलट अशा पठ्ठ्यांना असेच केले पाहिजे हे हि सांगतील), कार कसा आवाज करते, हल्ली कार वाले किंवा गाडी दुरुस्त करणारे कसे फसवतात, सिग्नल बनवणारे लोक कसे मूर्ख आहेत, सगळे लोक एकाच वेळी कशाला घराबाहेर पडतात. अर्थात हे महाशय पण त्याच वेळेला गर्दीत असतात. अशा वेळी मला आपण स्वतः सुद्धा या गर्दीचा भाग आहोत हि गोष्ट हे लोक जाणूनबुजून विसरतात. पाउस पडला तरी यांना त्रास होतो आणि पडला नाही तर ग्लोबल वार्मिंग मुळे कसा दुष्काळ पडला आहे यावर एखादा मोठा लेख A.C च्या गार वाऱ्यात बसून लिहितील. अर्थात तो लेख  पेपर मध्ये छापून आला नाहीच तर आजकालचे पेपरवाले कसे पैसे खातात हे रद्दीचे पेपर विकता विकता  आपल्याला समजावतील.

  परवा असाच एक जण देव कसा निर्दयी आहे आणि मला जास्त वजन कसे दिले म्हणून दैवाला कोसताना पहिला अर्थात समोर ताटात असलेल्या पंजाबी भाजीला आणि रोटीला ऐकता येत नसल्यामुळे ती दोघं बिचारी काहीच करू शकत नव्हती आणि सकाळीच खाल्लेला बर्गर पोटातून मला का खाल्ले असं निषेध व्यक्त करू शकत नव्हताच. अर्थात इथे माझा कुणाचे “खाणे”  काढण्याचा हेतू मुळीच नाही. शेवटी मुद्दा आहे तो तक्रारीचा. प्रत्येक गोष्टीत काहीतरी कमी दिसणे हा गुण (खरतर अवगुण) असलेल्या या व्यक्तिरेखा त्यांच्या याच गोष्टी मुळे प्रकाश झोतात असतात. पण ते क्षणिक चमकण खरतर काही कामाचं नसतं.  
पण समजा कर्मधर्म संयोगाने तुम्हाला भेटलाच असा माणूस तर आपण काय करायचे हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. पण याचं उत्तर फार सोपे आहे कारण यांच्या नकार घंटे पुढे आपण फक्त “अच्छा .., हो, काय करणार, अरे वाह हो का ? , कसे काय ? ह्म्म्म्म , शशश., एवढाच करू शकतो अर्थात 
आपल्याला तेवढाच वेळ मिळतो. त्यात जर तुम्ही थोडाफार स्वतःच कल त्यांचा म्हणण्याकडे आहे असं दाखवलंत तर मग विचारूच नका कारण तुमची लवकर सुटका नाही. कधी कधी मला वाटतं अशा लोकांना स्वर्गात पाठवलं तरी हे असं म्हणायला कमी करणार नाहीत कि स्वर्ग फारच उंचीवर आहे बुवा, निदान जरा जमीन जवळ असती तर फेरफटका मारून येता आल असत. (अर्थात असे लोक नक्की कुठल्या स्वर्गात जातात हि बाब अलाहिदा J). 

या सगळ्यात गमतीचा भाग बाजूला ठेवला तर थोड्याफार फरकाने आपण सगळेच या तक्रार वर्गातले असतो. अर्थात प्रत्येकात त्याचे प्रमाण कमी जास्त असते. सुखवस्तू घरात राहून सुद्धा हल्ली प्रत्येकामध्ये तक्रारीचा सूर नक्की येतो कुठून हे शोधायचा प्रयत्न केला तर असं दिसतं कि खरतर तो आपल्याच नव्या जीवन शैलीतून आला आहे. त्या सुराचा अर्थ न जाणता एकाने तो आळवला कि इतर आपोआप त्याच्यात आपला सूर लावतात. अजून एखाद्या घोळक्याला तो सूर ऐकू गेला कि त्याचं गाणं होतं आणि नंतर तोच आपला सोबती असल्या सारखं प्रत्येकजण “तक्रार” मय होऊन जातं. कधीकधी तर इतकं कि एखाद्याला खरंच वाटेल कि हा माणूस फार हलाखीचे दिवस काढतो आहे. तक्रार, निषेध किंवा प्रतिक्रिया देणं हा निसर्गाचा नियम आहे पण त्याची जीवनशैली होता कामा नये. शरीराला चटका बसला तर ते आपसूकपणे प्रतिक्षिप्त क्रिया करून मोकळं होतं. पण त्याच गोष्टीचा निषेध करत बसत नाही. 
एकदा असेच एका ओळखीच्या नातेवाईकांकडे गेलो असता त्यांनी टीव्ही वर लागणाऱ्या त्याच त्याच कार्यक्रमांना आणि नंतर चनेल वाल्यांना नावे ठेवायला सुरुवात केली. दिवसाचे कित्येक तास ते कार्यक्रम बघणाऱ्या लोकांना सारखे नवीन प्रोग्राम कुठून मिळणार. करमणूक म्हणून एखादा तास बघितला जाणारा टीव्ही दिवसभर चालू राहिला तर अर्थात तो कंटाळवाणा होणारच. सुख वाढलं कि तक्रारीचा सूर वाढतो , आराम आला कि विचार सुचतात. सुखसोयी जितक्या जास्त तितक्याच जास्त अपेक्षा वाढत जातात. सतत काहीतरी कमी आहे असं वाटत राहिल कि माणूस तक्रारीचा सूर काढतोच. शहर जितकी जोमाने वाढत आहेत तितकीच ती अतृप्तता वाढताना दिसते आहे.
वयाने बरीच मोठी असलेली मुलेहि हट्टी दिसतात, त्याला हि गोष्ट लागतेच, त्याला नाही ऐकून घ्यायची सवय नाही अशी वाक्ये ऐकून धडकी भरायला होतं. घरातल्या बायकांना पुरुषांना जर या तक्रारीच्या रोगाने ग्रासलं असेल तर संपूर्ण घरंच सतत काहीतरी मागत राहता. घर, ऑफिस, समाज सगळीकडे सतत “ आपल्याकडे काय नाही” इथेच लक्ष केंद्रित राहतं. “Ambition” च्या नावाखाली संपूर्ण आयुष्याला तक्रारीचा सूर लावण्याआधी जगायला काय लागतं आणि काय आहे हे जर प्रत्येकाने जाणलं तर अतृप्तता नक्कीच कमी होईल. नव्याची आस असणं चूक नाहीच फक्त “त्याचीच” आस असणं हे घातक आहे. कुठल्याही महागड्या खेळण्यांशिवाय गेलेल्या जुन्या बालपणाला आठवलं कि मातीची किंमत कळते आणि धावायचा वेग आपोआप कमी होतो. शेवटी म्हणणं एवढंच आहे कि हा सूर न आळवलेलाच बरा कारण “न” चा पाढा गाणं तितकं बर नसतंच त्या पेक्षा संवेदना जाग्या ठेवून जगणं सोपं आहे.
अशाच अजून एखाद्या सुराला भेटू पुढच्या भागात...!

   आनंद

   ३१ मे २०१६ 

No comments:

Post a Comment