Weekend ची सायकल ride करताना नेमके माझ्या सायकल चे नव्याने बसवलेले स्टँड पुन्हा तुटले. Ride तशीच पूर्ण करून मी लगोलग दुकान गाढले. सकाळची वेळ असल्याने नुकतेच दुकान उघडून झाडलोट सुरू होती. तिथे माझ्या आधी अजून एक तरुण उभा होता.
मी आधी दुकानदाराला सायकल चा प्रॉब्लेम दाखवला आणि त्याच्याशी हुज्जत घातली की आठवड्यापूर्वी बसवलेल्या स्टँड ला असा issue का आला वगैरे आणि दुरुस्त करण्यास सांगितले, पाहतो म्हणून तो पुन्हा दुकानाची मांडामांड करायला लागला.
मी पायरीवर बसकण मारली. तोच इतकावेळ माझ्या सायकलचे कुतूहल मिश्रित निरीक्षण करणाऱ्या तरुणाने मला विचारले किती चालवता सायकल तुम्ही ? मी जुजबी उत्तर दिले ,"असे काही ठरलेलं नसते वगैरे".
त्याच्या कडे पाहिले तर पायात साधी झिजलेली चप्पल, अंगात सदरा आणि मळलेली पॅन्ट पाहून तो कोणी कारागीर असावा असे मला वाटून गेले.
त्याने पुन्हा प्रश्न केला "स्पीड मिळत असेल नाही ?", मी 'हो' म्हणालो.
त्याचे निरीक्षण चालूच होते, तोच मी मध्ये पुन्हा दुकानदाराला दुरुस्त लवकर करा सांगितले.
पुन्हा त्या तरुणाने मला सायकल च्या किमतीबद्दल विचारले मी पुन्हा जुजबी उत्तर दिले, पण माझ्या उत्तराने त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले होते,
हे असे अनुभव मला काही नवे नसल्याने मला त्यात काही विशेष वाटत नव्हते.
थोड्या वेळाने तोच पुन्हा स्वतः बोलू लागला, मला माझ्या मुलाला सायकल घायची आहे,त्याचा परवा वाढदिवस आहे.
मी त्याचे कौतुक करून सायकल चालवण्याचा छंद कसा चांगला यावर प्रतिक्रिया दिली.
त्या तरुणाने पुढे बोलणं चालू ठेवले,
तो इतर मुलांची सायकल पाहून मला सारखा विचारतो मला सायकल हवी म्हणून.
आधी एक छोटी सायकल होती पण दोन मुलात भांडणं झालं आणि मी जोरात फेकली त्यात ती तुटली, तेव्हा पासून त्याची सायकल सुटली. आता मुलगा दुसऱ्याची सायकल घेऊन खेळतो.
तेव्हा या वेळी मी त्याला विचारलं या वेळेस वाढदिवसाला तुला 500-1000 rs चा ड्रेस आणू का तर तो म्हणे नको सायकल आणा.
आता माझेच पहा लग्नाआधी असे कपडे किंवा चप्पल कधी घातली नाही, पण माणसाला बदलावे लागते आता मुलांना काय हवे ते द्यावे लागते, "दिस लय चेंज झ्याहलेत बघा".
त्याच्या शेवटच्या वाक्यावर मी हसलो आणि मान डोलवली.
तोच दुकानदार येऊन त्या तरुणाला सायकल दाखवायला घेऊन गेला, जेमतेम 10 मिनिटात ते दोघे बाहेर आले आणि तरुण चालत निघून गेला.
विचारल्यावर कळले की त्याला 1000 रुपयात सायकल हवी होती कारण त्याने तेवढेच पैसे मुलाच्या वाढदिवसासाठी जमवले होते. एवढ्या मोठ्या दुकानात अशा किमतीत सायकल मिळणे अशक्यच.
आनंदाची व्याख्या प्रत्येकाची वेगळी, मी निव्वळ सायकल चे 650 चे स्टँड लावत होतो आणि कुणी तेवढयाच किमतीला मुलाचा सायकल चा हट्ट पुरवू पाहत होता.
अचानक सुई टोचवी असं काही झालं आणि अशा वेळी खूप काही करावं वाटत असतानाही आपण तसेच बसून राहतो असं काहीसं झालं, पुढे सरसावून मी तो तरुण कुठे चालत गेला पाहिलं पण गर्दी त्या बाबतीत दुजभाव करत नाही ती कुणालाही कुठल्याही भेदभावाशिवाय आपल्यात सामावून घेते, त्यामुळे तो लगेच दिसेनासा झाला होता.
आपण माणसांनी सामाजिक भिंती उभ्या करून सुखाला पैशात तोलून धरलं आहे असं उगाच वाटून गेलं. कळीचं फुल होईलही पण त्याला होण्याला लागणारा वेळ इतकाही नको की झाड स्वतःहून तिला कोमेजून टाकेल.
माझ्या सायकल चे स्टँड तुटले होते पण आता तोल मात्र माझा ढळला होता.
आनंद
6 Sept 2020