Powered By Blogger

Friday, August 26, 2011

धुक्याच्या पल्याड


धुक्याच्या पल्याड वसे गाव कुठले ?
न उमजे तरीही कसे नाव सुचले ?

धुक्याच्या पल्याड असे गुढ काही
न सरते तरीही कशी रात जाई

धुक्याच्या पल्याड असे पायवाट
ना चाले कधीही तरी देई साथ

धुक्याच्या पल्याड असे गीत कुठले?
ना गाई कुणीही तरी शब्द दिसले

धुक्याच्या पल्याड असे स्वप्न अर्धे
अर्थ जगण्यास येता कसे सत्य सरते ?

धुक्याच्या पल्याड श्वास तेच ओळखीचे
हात हातात घेता भास तेच नेहमीचे 

धुक्याच्या पल्याड आठवांचे किनारे
सुखाच्या सरीने विझती निखारे..!
                                             .......आनंद


Sunday, August 14, 2011

श्रावणसरी



अलगद पाण्यावरी
सरसरे शहरुनी काटा
श्रावणसरी शोधत येती
उन्हातूनी वाटा.. १                  

पानांवरती थेंबांच्या अन्
भरती मग शाळा
श्रावण सरी गुंफुनी घेती
मोत्यांच्या माळा.. 

डोंगरातुनी कोसळती जणू
अमृत जलधारा
अवखळ गंधित चोहीकडे अन्  
वाहे श्रावण वारा.   

कळीस पडते खळी
हसते अशी ती गालात
फुलण्याचाही विसर पडे मग
श्रावण प्रेमात... ४

उन सरीचा लपंडाव हा
धुंदल्या क्षणात
इंद्रधनुही कधी जन्मती
श्रावण रंगात...  

चिंता दुखे दूर हरवती
ऋतू हा आनंदाचा
नवीन उर्मी देऊन जातो
श्रावण चैतन्याचा...६ 

                         आनंद