Powered By Blogger

Saturday, September 3, 2011

साधनेची साधना


माणसाची जडण घडण हा एक फार महत्वाचा आणि तितकाच नाजूक असा विषय आहे. खास करून शहरातल्या आपल्या सारख्या so called “Educated “  पठडीतल्या समाजच्या एका वर्गाला या गोष्टी साठी फार झगडावं लागत नाही आणि आपल्या नवीन पिढीलाही सगळयाच गोष्टी फार लवकर कळून येतात कारण त्या सगळयाच गोष्टी त्यांच्या आवाक्यात असतात. स्पर्धेच्या युगामध्ये आजकाल अगदी पहिल्या इयतेतल्या लहान मुलालाही जेव्हा मी त्याच्यावरच्या जबाबबादारीची ओझी वाहताना पाहतो तेव्हा थक्क व्हायला तर होतंच पण मग जाणीव होते ती या सगळ्या गोष्टींपासून फार दूर असलेल्या आणि अगदी साध्या साध्या शैक्षणिक गरजासाठी आसुसलेल्या त्या लहान मुलांची जी आपल्या कृषिप्रधान भारत देशाच्या ग्रामीण भागात अगदी प्राथमिक गरजांसाठी झगडत आहेत. 

हाच विचार धरून सुरु झाला आमचा “CSR” चा नवा उपक्रम “ Teach a Child”  आणि त्यासाठीचं पाहिलं पाउल टाकण्यासाठी केंद्रबिंदू ठरलं ते  कोळवण खोऱ्यामध्ये वसलेलं “साधना विलेज “. 
साधारण पुण्यापासून ३२ किमी अंतरावर असलेल्या साधना विलेज च्या आसपास नाणेगाव, चिखलगाव, डोंगरवाडी, कुळे अशी छोटी छोटी गावं आहेत. साधनाचं मुख्य काम हे “ mentally challenged adults “ साठी  Residential care  देणे हे आहे. या सगळ्यांना इथे “खास मित्र” किंवा “Special Friends “ असं म्हटलं जातं. या सगळ्यांना इथे उत्कृष्ट जीवनपद्धती शिकवली जाते. इथलं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे  असलेल्या प्रत्येक इमारतीला संगीतातल्या रागांची नावं दिलेली आहेत ते पाहून वाटून गेलं आयुष्यातला हरवलेला सूर शोधून तो स्वतः गाणं हे खऱ्या अर्थाने इथे शिकवलं जात असावं. 
या मुख्य उपक्रमाबरोबरच साधना विलेज आणि तिथल्या रंजनाताई देशपांडे ,त्यांचे volunteers आसपासच्या परिसरातल्या गावांसाठी अनेक विविध समाज उपयोगी कार्यक्रम आणि उप्रक्रम राबवत असतात. समाजच्या या दुर्लक्षित आणि मागे पडलेल्या प्रभागाला विकासाची नवी दिशा दाखवण्याचं मोठं काम इथे अविरत पणे चालू असलेलं दिसतं. 

 
“Teach a Child “ सुरु झालं ते त्यांच्याच मदतीने आणि त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या संधी मुळे. आमच्या उपक्रमाला आवश्यक ती सगळी मदत त्यांनी केली. आसपासच्या गावातल्या मुलांना “computer” ची  basic  तोंडओळख करून देणं हा विषय घेऊन सुरुवात केलेला हा उपक्रम आता २ महिन्यांनंतर बऱ्यापैकी रुळून त्यात आता पर्यंत Computer, Meditation , Basic English असे वेगवेगळे विषय हाताळले गेले या सगळ्याचं श्रेय जातं ते यात सहभागी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना आणि वेळात वेळ काढून मुलांबरोबर त्यांनी घालवलेल्या प्रत्येक सुटीच्या दिवसाला. 

 
१८ जून या दिवशी या उपक्रमाचा मुहूर्त झाला. पहिल्या दिवशी सगळ्या मुलांची आमच्याशी आणि आमची त्यांच्याशी ओळख करून घेण्याचा कार्यक्रम झाला. सुरुवातीला लाजरीबुजरी असलेली मुलं थोड्या वेळात आमच्यात छान मिसळून गेली. पहिल्याच दिवशी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली कि जरी सगळी मुलं वेगवेगळ्या इयतेतली असली तरी प्रत्येकात एका गोष्टी साम्य होतं आणि ते म्हणजे काहीतरी नवीन शिकण्याची त्यांची इच्छा हि खरोखर वाखाणण्याजोगी होती. कुतूहल असणं स्वाभाविक होतं पण त्या सगळ्यांमधे ते जाणून घेण्याची इच्छा जबरदस्त होती.
पहिल्या दिवशी मिळालेला प्रतिसाद पाहून आमच्या सगळ्यांचच बळ आणखी वाढलं होतं आणि मग सुरु झाला तो एक असा प्रवास जो दर आठवड्याला एक वेगळी उंची गाठू लागला. वेगवेगळे गमतीशीर खेळ, कधी पुस्तकातल्या कविता तर कधी गाणी अशा विविध गोष्टी आमच्या वर्गात सुरु होऊ लागल्या आणि जुळला तो एक वेगळाच ऋणानुबंध. 

जुलै महिन्यामध्ये मुसळधार पावसात डोक्यावर छत्री, पोत, प्लास्टिक ची मोठी पिशवी घेऊन ४-५ किमी चालत मुलं जेव्हा वर्गात येत तेव्हा मन गलबलून जायचं. पण मुलं मात्र निरगसपणे आपलेपणाने मी कसा आलो याची चौकशी करायची तेव्हा सगळा क्षीण निघून जायचा आणि शिकवायला नवा हुरूप यायचा. 

 
पावसाळ्याच्याच एके दिवशी सगळ्या मुलांबरोबर त्यांच्या गावाला भेट देण्याचं ठरलं आणि अर्धा वेळ वर्गात शिकवून झाल्यावर आम्ही सगळे चालत निघालो. वर्गात गुपचूप बसणाऱ्या काही छोट्या मुली बाहेर पडताच इतक्या बडबड करत होत्या कि एखाद्याचा विश्वासच बसणार नाही. रस्त्याने चालताना सगळ्याच मुलांची अखंड बडबड चालू होती. सगळ्यांना आम्हाला काय दाखवू आणि काय नको असं झालं होतं. कुणी पेरू तोडून आणतंय, कुणी रान फुलांचा गुछच, कुणी झाडांची नावं सांगतंय कुणी नदीवरचा पूल दाखवतंय असं सगळं चालू न थांबता चालू होतं. सगळंच कसं अनोखं होतं. बराच वेळ चालल्यानंतर आम्ही नदीच्या पुलाजवळ पोहोचलो, नदीच्या पाण्यात चिखलाने माखलेले पाय धुतले आणि मग पूल ओलांडला. शेतातली लाल काळी माती तुडवत आम्ही एका छोट्या झऱ्या पाशी पोहोचलो. झऱ्याच्या पाण्यात भरपूर फोटो काढून शेवटी आम्ही सगळ्या मुलांना घरी पाठवून परतीला लागलो. त्यांच्या गावाला भेट दिल्यामुळे मुलं खरंच आनंदली होती. गावाची ती भेट नक्कीच एक स्मरणात राहणारी होती. वाटून गेलं या मुलांना शहरातल्या मुलां सारख्या संधी मिळत नसतील पण निसर्गाच्या खूप जवळ राहून हि मुलं नशीबवानच होती. या भेटीने अजून क गोष्ट केली होती वर्गातली हि मुलं कुठे ,कुठल्या परिस्थितीत राहतात ,कुठून चालत येतात, कुठल्या परिस्थितीत अभ्यास करतात , घरी कोण असतं हे समजल्यामुळे मुलांचं भावविश्व जवळून अनुभवता आलं होतं आणि त्यानां शिकवताना हे नक्कीच उपयोगी पडणारं होतं.

 
हळूहळू आमचे इंग्रजीचे वर्ग सुरु झाले. अर्धा वेळ इंग्रजी आणि अर्धा वेळ computer असे नियमित वर्ग होऊ लागले. वर्ग सुरु करण्यापूर्वी माझं सहकारी मित्र पुष्कर ने शिकवलेले Meditation चे ५ मिन्. चे एक session  सुद्धा सुरु झाले. या सगळ्यात एक गोष्ट नक्की होती ती म्हणजे मुलं मनापासून शिकत होती आणि हळूहळू त्यांची या विषयांबद्दल असलेली भीड चेपत होती.  त्याना दिलेल्या वह्यांमध्ये नियमित पणे शिकवलेली प्रत्येक गोष्ट ती उतरून घेत होती.
अजून एक गोष्ट जी मला फार महत्वाची वाटते ती म्हणजे मुलांना आम्ही शिकवत तर होतोच पण या बरोबर आम्हा सर्वांना या उपक्रमातून खूप नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या होत्या. खऱ्या अर्थाने शिकण्या आणि शिकवण्याच्या या उपक्रमाचा हेतू इथे साध्य झाला होता. शिकवणं हि एक कलाच असते आणि उत्तम शिक्षक हा स्वतःच नेहमी मुलांना बरोबर घेऊन त्या कलेला वृद्धिंगत करत असतो.

गेल्या २ महिन्यातले सांगावे तितके अनुभव कमीच आहेत. आणि तितकेच अजून येत राहतील यात शंका नाहीच. अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे आम्हा सर्वांनाच माहित आहे. पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे याला सुरुवात झाली आहे आणि पाहिलं पाउल नक्कीच खंबीर पणे पडलं आहे. आता दिवस उजाडताच विरून जाणारं स्वप्न उरलं नाहीये त्यामुळे रात्र संपायची भीतीही उरली नाहीये. आणि यालाच म्हणत असतील “सत्य” ,स्वप्नाच मूर्त रूप. खऱ्या अर्थाने इथे साधना घडत होती आणि साधनेची हि साधना अशीच अखंड चालू राहिल यात शंकाच नाही.


 
स्वप्नातला भारत कोणता असं प्रश्न खुपदा विचारला जातो आणि खूप लोकं त्याची वेगवेगळी उत्तर देतात. पण त्याच वेळी ती सत्यात ला सध्याचा भारत विसरतात. स्वप्नं पाहणं या काहीच गुन्हा नाही परंतु जर ते साध्य करायचं असेल तर तसे प्रयत्न करायला हवेत हे हि तितकंच खरं आहे. मला वाटतं गावागावात वसलेला भारत जो पर्यंत शहरी माणसाला कळणार नाही तो पर्यंत ते अशक्य आहे. स्वतःच्या कोशात स्वेर पणे धावत असेलला शहरी माणूस आणि त्याची पुढारलेली नवी पिढी हे चित्र दिसायला सुंदर दिसतं खरं पण शहर प्रगत झाल्याने देश समृद्ध होत असेल पण त्याची प्रगतीची पाळमुळा हि गावांमध्येच रुतली आहेत हे विसरून नक्कीच चालणार नाही. 
गावातली नवी पिढी सक्षम करणं ,त्यानां कुठल्याही बाबतीत मागं पडू न देणं आणि मुख्य म्हणजे कर्तुत्व सिद्ध करण्यासाठी योग्य संधी देणं याची नितांत गरज आहे. आणि हे फक्त आपल्याच हातात आहे. गरज आहे ती फक्त आपल्या नजरेच्या कक्षा रुंदावण्याची , कदाचित तुमच्या स्वतःच्याच जवळचं कुणीतरी अशा संधीला आसुसलं असेल. चला तर मग आधी एक पाउल तर उचालुयात पुढंच पाउल पडण्यापूर्वीच कदाचित दहा हात मदतीला तयार होतील......!

                                                                             आनंद
 साधना विलेज वेब साईट : http://www.sadhana-village.org/index.html

No comments:

Post a Comment