Powered By Blogger

Saturday, February 28, 2015

Let it go..!


हिवाळा संपून आता उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. कुणीही न सांगता निसर्गाने नेहमी प्रमाणे आपल्यात बदल घडवून आणला आहे. मला नेहमी खूप अप्रूप आणि आश्चर्य वाटतं जेव्हा निसर्गात असे बदल आपोआप घडून येतात. तिथे न कुणाचं वाट पाहणं असत न कुणाच्या सल्ल्याने केलेली कृती. ते इतकं सहज असत कि बदल घडतोय हे कळायलाही तो नेमका क्षण सापडत नाही. काही दिवसांपूर्वीच जिना उतरताना घराच्या जवळच्या बागेत डोकावलं तर दिसलं कि काही दिवसांपूर्वी बहरलेला गुलमोहोर पर्णरहित झाला आहे. त्याचं ते भकास रूप पाहून क्षणभर वाईट वाटलं पण नंतर पहिला त्याच्या आसपासच्या छोट्या झाडांनीही  त्याचंच अनुकरण केला आहे. सगळ्या जुन्या पानांचा पालापाचोळा जमिनीवर पडलेला होता. मग जाणवलं कि जुन्या पानांनी स्वतःच फांदीला सोडून नव्या पालवी साठी जागा करून दिली आहे. आता काही दिवसांसाठी तो असाच भकास दिसत राहील खरा पण लवकरच तो पुन्हा नव्या पालवीने भरून जाईल आणि त्याच्या केशरी तांबड्या फुलांनी उन्हाला समोर जाईल. जे मुळात निसर्गाचं देणं आहे ते धरून ठेवून चालत नाही हे या झाडांना कोण सांगत असेल. एखाद्या वर्षी एका झाडाची पाना गळतच नाहीत असं कधीच कसं होत नाही ? बदल घडवून आणत असताना इतकं त्रयस्थ पणे झाड कसं वागू शकतं ? मग कळलं कि जुन्याला सोडून नव्याला सामोरं जाण हा सहज भाव निसर्गात मुळातच आहे. तिथे प्रत्येक झाड स्वतःचा विचार करत नाही तर नियमाला धरून ते निसर्गाचा भाग म्हणून जगत राहत. त्यामुळेच निसर्गात समानता जपली जाते आणि त्याचा समतोल ढासळत नाही. जुन्याचा अट्टाहास ठेवला नाही तरच नवीन क्षण जन्म घेतात. निसर्गात याची इतकी उदाहरणे सापडतात कि खरोखर विस्मयचकित व्हायला होतं.


माणूस म्हणून आपण जेव्हा या निसर्गाचाच भाग आहोत तेव्हा मात्र ते तितकं सोपं राहत नाही. माणसाला मुळात भावना असल्यामुळे खरतरं प्रश्न सोपे व्हायला हवेत पण खरं चित्र काहीसं वेगळच दिसतं. आयुष्यातल्या भौतिक गोष्टीं पासून माणसांपर्यंत प्रत्येकाला एकच नियम लावला जातो. घडून गेलेल्या गोष्टींचं भांडवल करून त्या धरून ठेवल्या जातात, ओठातून बाहेर पडलेल्या शब्दांना जास्त किंमत देऊन माणसं दुरावतात.  भूतकाळ आणि भविष्य याचा नेहमीच संबंध असतो पण माणसांच्या जगात तो नुसताच संबंध उरत नाही तर तिथे वर्तमान आणि भविष्यावर भूतकाळातले अनुभव लादले जातात. या सगळ्यात होतं इतकंच कि नव्याचं नवंपण जपलं जात नाही कारण जुन्याला हातातून सोडलंच जात नाही. मुळात आयुष्यात गोष्टी ठरवून घडत नसतात पण त्या जशा घडतील तशाच प्रकारे त्याला सामोरा गेलं आणि कुठलाही आवश्यक नसलेला संदर्भ जोडला नाही तरच आयुष्यातल्या नाविन्यपूर्ण गोष्टींचा आनंद घेता येऊ शकतो. पण “सोडून देणं “ हे बऱ्याचदा बऱ्याच लोकांना जमत नाही आणि त्याचं ओझं वर्षानुवर्ष वाढत जातं. ऐन उमेदीच्या काळात थकलेली तरुण पिढी हेच ओझं वाहत असते.  आयुष्यात वाटचाल करताना चांगल्या वाईट अनुभवांना सगळ्यांनाच सामोरं जावं लागतं. त्यातल्या वाईट अनुभवांना तिथल्या तिथे सोडणं गरजेचं असत आणि चांगल्या अनुभवांना अनुभवून ते स्वतःत आत्मसात करून इतरांना ते अनुभव दिले तरच खरतर त्याचं सार्थक होतं. अनुभवातून शिकणे यालाच म्हणतात पण तो अनुभव नुसताच आत दडवून ठेवल्याने काही काळ छान वाटेल पण नंतर अपेक्षाभंग झाला तर मात्र दुःखच होईल. त्यासाठी तिथल्या तिथे गोष्टी सोडून देणे आणि पुढे वाटचाल करण गरजेचं आहे.
गोष्टी “धरून” ठेवून काहीही मिळत नाही उलट अनावश्यक अपेक्षांचं ओझं आपण स्वतःवरच लादून घेतो. झाकलेल्या सव्वा लाखाच्या मुठी पेक्षा कष्टा साठी नेहमी पुढे असलेला हात आपल्याला जास्त पुढे नेतो.
“आनेवाला पल जाने वाला है” असं जेव्हा गुलझार म्हणतो तेव्हा त्याला हेच सांगायचं आहे. क्षण धरून ठेवताच येत नाहीत. सूर्यास्त रोज होत असला तरी एखाद्या सूर्यास्ताला समुद्राच्या लाटांचा आवाज कानावर घेत डोळे भरून पाहतानाचा “क्षण” मुठीत दडवून ठेवता येत नाही तो फक्त तेवढ्या पुरता अनुभवायचा असतो आणि त्याची आठवण मनात साठवायची असते. शहरातल्या गजबजलेल्या रोड वरून तोच सूर्य दुसऱ्या दिवशी दिसला तर तो काल सारखा दिसत नाही म्हणून त्याला नावे ठेवण्यात काहीच अर्थ नसतो. गेलेल्या क्षणांचं परिमाण येणाऱ्या नव्या क्षणांना लावयचं नसतं. इतकं साधं गणित सोडवलं म्हणजे आयुष्यात घडणारा प्रत्येक बदल सुखावह वाटू लागेल आणि त्याच्या स्वागताला आपण नव्या जोमाने पुढे जाऊ शकू. साचलेलं पाणी शेवटी गढुळ होतं पण वाहत्या पाण्यालाच जिवंतपणा असतो. किनाऱ्याला असलेल्या झाडांच्या मुळाना स्पर्श करत ते पुढे जात राहत.
सोडून देणं अवघड असलं तरी शेवटी “Let it go” म्हटलं कि बरेच प्रश्न सुटतात हेच खरं, कारण आयुष्याची गती राखण्यासाठी हाच एकमेव मार्ग आहे.

My Version of Aanewala pal janewala hai : 

                                                            आनंद

२८ फेब्रुवारी २०१५ 

2 comments:

  1. Good to know that you also Play Synthesizer

    ReplyDelete
  2. Let it go....is very nice Anand

    Neelambari

    ReplyDelete