Powered By Blogger

Thursday, December 15, 2011

गंधर्व सोहळा


पुण्यातला आर्य संगीत प्रसारक मंडळाचा ५९वा “सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव” ७ डिसेंबर ते ११ डिसेंबर या काळात पार पडला. या अपूर्व सोहळ्याचा साक्षीदार होण्याचं भाग्य पुन्हा एकदा लाभलं आणि असंख्य सुरांनी कान खरोखर तृप्त झाले. प्रत्येक सूर काळजात उतरत गेला आणि शेवटी उरला तो आनंद देणारा अपूर्व अनुभव..! पंडित भीमसेन जोशी यांची उणीव रसिकांना जाणवलीच पण सर्व कलाकारांच्या उत्कट सादरीकरणाने रसिक श्रोता सुखावला हे मात्र नक्की..!
दिग्गज म्हणण्या पलीकडचे सगळे कलाकार आणि अक्षरशः गुंग होऊन भान विसरून ऐकणारा, दाद देणारा श्रोता वर्ग अशी मैफिल जमल्यावर खरंतर ते फक्त याची देही याची डोळा पाहणे आणि अनुभवणे या  दोनच गोष्टी उरतात. संपूर्ण कार्यक्रमातील अशाच काही क्षणांना टिपून सर्वांसमोर मांडण्यचा प्रयत्न इथे केला आहे.

दिवस पहिला : 

पहिला दिवस लक्षात राहिला तो पंडित सतीश व्यास यांच्या संतूर वादनाने. त्यांनी “रागेश्री” च्या सुरांनी सुरुवात करून सर्व वातावरण हळूहळू नादमय केले. अगदी खर्जा पासून तार ते अतितार सप्तकातील स्वरांपर्यंत आवर्तने घेऊन अनेकदा टाळ्या मिळवल्या. संतूर या वाद्यातून निघणारे कोमल स्वर लय  आणि तालात जेव्हा येतात तेव्हा खरोखर भान हरपते याची प्रचीती अनेकदा आली. टाळ्यांच्याच गजरामध्ये त्यांनी आपले वादन संपवले आणि त्या नंतर आगमन झाले ते ज्येष्ठ गायक पंडित अजय पोहनकर यांचे. “कौशी कानडा” मधील “राजन कैसे” या चीजेने त्यांनी प्रारंभ केला. घनगंभीर आवाजाबरोबरच त्यांनी आक्रमक शैलीचेही दर्शन रसिकांना घडवले.  “काहे करत मोसे बरजोरी “ या बंदिशी बरोबरच त्यांनी फर्माईश झालेल्या पहाडीची झलक ही “सैया गये परदेस “ या केरवा तालातल्या ठुमरीतून दाखवली. हार्मोनियम वर सुधीर नायक आणि तबल्यावर पंडित रामदास पळसुले यांनी खूप रंगतदार साथ दिली. आकाशात पसरलेल्या चांदण्यात कानावर पडणारे हे सूर खरोखर शांत आणि शीतल जाणवत होते.


दिवस दुसरा : 

पहिल्या दिवसा प्रमाणेच दुसरा दिवस लक्षात राहिला तो मुख्यतः पाश्चिमात्य संगीतात ऐकू येणारे सेक्सोफोन ,उत्तर हिंदुस्तानी संगीतात वाजवली जाणारी बासरी , दाक्षिणात्य संगीतात वाजवले जाणारे मृदंग आणि तबला या सर्व वाद्यांनी एकत्रित पणे दिलेल्या अप्रतिम अशा प्रयोगामुळे. सेक्सोफोन वर पंडित कद्री गोपालनाथ , बासरीवर पंडित रोणू मुजुमदार , मृदंगवर पी हरीकुमार आणि तबल्यावर पुण्याचे रामदास पळसुले या सर्वानी एकत्रित मिळून सर्व रसिकांना जो काही अपूर्व आनंद दिला आणि सुरांच्या हिंदोळ्यावर बागडवले ते खरोखर शब्दात व्यक्त करणे केवळ अशक्य आहे. भारतीय संगीताच्या सुरावटी जेव्हा सेक्सोफोन वर ऐकू येऊ लागल्या तेव्हा सर्व जण अवाक झाले. सर्वांच्या आवडत्या “हंसध्वनी “ रागाने सुरुवात केल्यावर एक एक सूर उमटू लागले जुगलबंदीच्या अंगाने वाजवत आणि तरीही एकमेकांचे वादन फुलवत एक अत्यंत मनोहारी असा डाव त्यांनी रसिकांसमोर उलगडला. मृदंग आणि तबला यांची जुगलबंदीही वाहवा मिळवून गेली. “शब्दवीण संवादु” अशा या वाद्यांच्या शास्त्रीय सादरीकरणाने रसिक भान हरपून ताल धरू लागला आणि टाळ्यांच्या कडकडाट झाला. “तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल “ या अभंगाबरोबरच “पायोजी मैने राम रतन धन पायो “ चे सूर सुद्धा निनादले आणि भक्तिमय वातावरणात आणि टाळ्यांच्या गजरात वादन संपले.  दिवसाचा शेवट डॉक्टर एन. बालमुरलीकृष्णन यांच्या गायनाने झाला. 


 दिवस तिसरा :

 
तिसरा दिवस गाजला तो शंकर महादेवन आणि पंडित जसराज यांच्या गायनाने. सुमारे सोळा हजार रसिकांची उपस्तिथी ,जागा मिळेल तिथे बसणारा किंवा उभे राहून दाद देणारा रसिक आणि खिळवून टाकणाऱ्या रचनांमुळे भारावून गेलेले वातावरण हे सर्व एकाच वेळी या ठिकाणी घडले आणि सर्वानी अनुभवला एक आनंद सोहळा. शंकर महादेवन यांनी कर्नाटकी संगीतातील रचना “श्री गणपते नमो नमो.. “ ही सादर केली. त्याच बरोबर मृदंग वर श्रीधर पार्थसारथी आणि व्हायोलीनवर पद्मा शंकर यांनी अप्रतिम साथ दिली. पंडितजींना श्रद्धांजली वाहण्यासाठी फक्त टाळ आणि एकतारी वर सादर केलेली “इंद्रायणी काठी..” , “विठ्ठल नामाचा गजर..”, “सावळे सुंदर रूप मनोहर...”  अशी भजने रसिकांची दाद घेऊन गेली. 
त्यानंतर स्वरमंचावर आगमन झाले ते पंडित जसराज यांचे . “जयजयवंती” रागातील “मां मोरे दरस दे “ या बंदिशीने त्यांनी सुरुवात केली. ते गातानाच रसिकांना त्यांनी शास्त्रीय संगीतातील अस्थायी , अंतरा, संचारी आणि अभोग यांची ओळख करून दिली. पंडितजींना पेटीवर मुकुंद पेटकर , तबल्यावर रामदास पळसुले, बासरीवर सशांक सुब्रमण्यम तर मृदंग वर श्रीधर पार्थसारथी यांनी साथ केली.  पंडित जसराज यांच्या या वयातील खर्जातील घनगंभीर “सा” हेलावून टाकत होता. आणि दुसरीकडे अतितार “ सा” पर्यंतचा आवाज तितकाच आकर्षक होता.  सर्व श्रोत्यांच्या आग्रहास्तव त्यांनी “गोविंद दामोदर” या भैरवीतील भक्ती रचना सादर केली. आकाशात दिमाखदार पणे मिरवणारा चंद्र दिसत होता आणि समोर पंडितजी आपल्या घनगंभीर आवाजात गात होते क्षणभर वाटून गेलं कि खरोखर चांदणं नक्की कुणाचं पडलं आहे कारण सर्व रसिकजन ज्या स्वरांच्या चांदण्यामध्ये न्हाऊन निघाले होते ते खरोखर पौर्णिमेच्या चंद्रापेक्षा शीतल होते यात कुठलीच शंका नाही. 


दिवस चौथा :


चौथा दिवस हा गायन, नृत्य आणि वादन अशा तिन्ही कलांचा संगम दाखवणारा ठरला. कार्यक्रमाची सुरुवात योजना शिवानंद आणि श्रीनिवास जोशी यांच्या गायनाने झाली. शिवानंद यांनी राग “ मधुवंती “ सादर केला तर श्री निवास यांनी “पुरिया धनश्री “ सादर केला. त्यानंतर ग्वाल्हेर घराण्याच्या  मालिनी राजूरकर यांनी राग “नारायणी” ने त्यांच्या गायनाला प्रारंभ केला. अत्यंत साधेपणाने पण खूप प्रभावीपणे सादर केलेल्या ”देखत ही मुख” या अंतर्याने सर्वांना मंत्र मुग्ध करून टाकले. या नंतर त्यांनी त्रितालातील चीज संपवून बिहाग रागातील “टप्पा” गाणार असल्याचे सांगितले. “दिलदा प्यारा” असा मुखडा असलेला टप्पा गाताना “प्यारा” शब्दावर तानांचे वर खाली होणारे सूर मान डोलायला लावत होते. टप्पा चालू होताच बसलेले, उभे असलेले, येणारे असे सर्व रसिक जागच्या जागी खिळून  गेले आणि अजून एक वेड लावणारा असा सुरांचा सोहळा संपला.  

 
या गायना नंतर डोळ्याचे पारणे फेडणारा नेत्र दीपक असा आणि तरीही श्रवणीय असा सुधीर राव यांच्या नृत्यानिकेतनच्या  कलाकारांचा भरतनाट्यम चा कार्यक्रम झाला. भीमसेनजींच्या तीन कानडी, एक मराठी आणि एक हिंदी अशा भक्तीगीतांवर आधारित नृत्याभिनय अविष्कार हा एक विलक्षण अनुभव होता. शेवटी दाखवलेला त्रिशूलाने केलेला महिषासुराचा वध खूप अप्रतिम आणि तितकंच कौशल्यपूर्ण होता.
यानंतर पुण्याच्या शमा भाटे यांच्या नादरूप संस्थेच्या कलावंतांचे “निराकार साकार “ हे कथ्थक नृत्य हे सुद्धा तितकेच प्रेक्षणीय होते. भीमसेनजींचे “राम रंगी रंगिले” हे भजन, “अब पिया तो मानत नाही” ही ठुमरी, “बद्खा बरसन लागी “ हे मल्हार ,तर “बाजे रे मुरलिया बाजे “ हे भीमसेन- लताजींच गायन अशा अनेक रचनांवर केलेला पदन्यास आणि मनोहारी दर्शन पाहून सर्व रसिक भारावले यात नवल नाही.    

 
या सगळ्यानंतर कार्यक्रमाची वेळ संपत आली असताना सरोदवादक अमजद अली खां यांनी “गणेश कल्याण” रागाने सुरुवात केली. त्यानं विजय घाटे यांनी तबल्याची साथ केली. शेवटी रविंद्रनाथ टागोरांची “एकला चालो रे “ धून त्यांनी छेडली आणि पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला. वेळ संपल्यामुळे कार्याक्रमची सांगता करावी लागली.  
पण एक संपूर्ण कलेने नटलेला असा सात तासांचा अविष्कार पाहून, ऐकून, अनुभवून घरी परत जाणारा प्रत्येक रसिक हा खरोखर भाग्यवान होता कारण प्रत्येकाने आपल्या उरात ते सूर, तान, शब्द साठवले होते आणि ते प्रत्येकालाच चिरंतन आनंद देत राहतील यात कुठलीच शंका नाही. 


दिवस पाचवा :

 सवाई चा शेवटचा दिवस हा अनेक अर्थाने एक परिपूर्ण असा दिवस ठरला. शेवटच्या दिवसाची सुरुवात श्री ओंकार दादरकर यांच्या गायनाने झाली . त्यानां प्रशांत पांडव (तबला) आणि सुयोग कुंडलकर ( हर्मोनियम) यांनी साथ केली . दमदार आवाज आणि उत्कृष्ट तयारी यामुळे त्यांचे गायन लक्षवेधी ठरले. सुरुवातीला “कवन देस” आणि मोरे मंदिरवा मै..” या बंदिशी सादर केल्या आणि रसिकांची वाहवा मिळवली. राधाधर मधुमिलिंद जयजय या भजनाबरोबरच “ बाजे रे मुरलिया..” ही रचनाही सदर करत रसिकांना तृप्त केले.  


या नंतर आलेल्या पद्मा देशपांडे यांनी श्याम कल्याण रागाने सुरुवात केली. “जियो मेरी” आणि सावन कि सांज भरी” या बंदिशी सादर केल्या. त्यांना अरविंद थत्ते ( हर्मोनियम ) प्रशांत पांडव ( तबला ) यांनी साथ केली.  शेवटी “ मला मदन भासे...” हे नाट्यगीत सादर करून रसिकांची मने जिंकली. 

यानंतर किराणा घराण्याचे डॉक्टर नागराजराव हवालदार यांच्या भारदस्त आवाजाने वातावरण भारावून गेले.  “सखी कैसे “ ही राग यमन मधील बंदिश त्यांनी अत्यंत सुंदर रित्या खुलवली. त्यांनी  कानडीतील “करुनी सो रंगा “ या भजनाबरोबरच “तीर्थ विठ्ठल..” हा अभंग सुद्धा गायला.   त्यानां ओंकारनाथ हवालदार ( गायन), केदार हवालदार ( तबला ) अविनाश दिघे ( हार्मोनियम) यांची अप्रतिम साथ लाभली.

 
यानंतर आगमन झाले ते श्रीमती एन. राजम व त्यांच्या कन्या आणि नाती यांचे. या सर्वांचे व्हायोलीन ऐकताना प्रत्येक जण स्वर, लय यामध्ये हरवून गेला आणि अंगावर अनेकदा काटा उभा राहिला. तीन पिढ्यांचे वादन ऐकताना त्यांनी रसिकांची दाद मिळवली. जोग रागाने सुरुवात करून त्यांनी आलापी आणि ताना अत्यंत खुबीने सादर करून सगळ्यांची मने जिंकली. “पायोजी मैने..” हे भजन आणि “घेई छंद मकरंद..” हे नाट्यगीत सुद्धा सादर केले. टाळ्यांच्या कडकडाटात शेवटी त्यांनी “ नरवर कृष्णासमान ..” ही रचना वाजवून वादन संपवले. सर्व रसिकांनी उस्फुर्त पणे उभे राहून त्यानां मानवंदना दिली.



यानंतर किराणा आणि ग्वाल्हेर घराण्याची गायकी अंगिकारलेल्या व्यंकटेशकुमार यांचे गायन सुरु झाले. त्यांनी प्रथम राग “बागेश्री” ने सुरुवात केली. तार सप्तकात घुमणारा भारदस्त आवाज आणि त्याच सोबतीला लयीचे प्रभुत्व असा सुंदर मिलाफ झाल्याने रसिकांची अनेकदा वाहवा मिळवली. त्यांनी “सखी मन लागत” ही बंदिश सादर केली. 
महोत्सवाची सांगता डॉक्टर प्रभा अत्रे यांच्या गायनाने झाली. नुकतेच त्यांनी वयाच्या ऐंशीव्या वर्षात पदार्पण केले आहे अशी माहिती निवेदक आनंद देशमुख यांनी पुरवली. “ बसंती चुनरिया..” या ठुमरीने कार्यक्रम संपला. 
 
संपूर्ण पाच दिवस चाललेला हा सुरांचा सोहळा संपल्यानंतर मनाला रुखरुख मात्र लागली. पण सुरांच्या अशा सागरामध्ये मनसोक्त विहार केल्यानंतर प्रत्येकजण सुखावूनच बाहेर पडत होता हे मात्र नक्की होतं.
शास्त्रीय संगीताचा हा वारसा असाच वर्षनुवर्षे पुढे असाच चालत राहिल आणि स्वरांची ही बरसात अशीच न चुकता दर वर्षी होत राहिल अशी आशा मनात ठेवून आणि अनेक सूर मनात साठवून बाहेर पडलो. शेवटी हवातसा सूर लागणं हे ही तितकंच महत्वाचं असतं नाही का ?
                                                                    .....आनंद 



2 comments:

  1. इतके सारे details कसे काय आठवतात यार तुला...! :-)

    ReplyDelete
  2. I never knew that you were so much into classical music!

    ReplyDelete