दूर झाला तिमिर आता
पुढे प्रकाशवाट,
सरले सारे मळभ आता
स्वप्ने आली सत्यात.
पुढे प्रकाशवाट,
सरले सारे मळभ आता
स्वप्ने आली सत्यात.
अंधाराची पायवाट ही
उजळली चांदण्याने ,
सरेल सारा प्रवास आता
नक्षत्रांच्या सोबतीने....!
काहीकाही अनुभव आपलं जगणं समृद्ध करून जातात आणि सध्या असे अनुभव सतत आयुष्यात येत असल्यामुळे मी स्वतःला नशीबवान समजतो. अफाट पसरलेल्या जगत अगणित लोकांना साध्या साध्या गरजांसाठी सुद्धा खूप कष्ट घ्यावे लागतात पण या सर्वच लोकांपर्यंत पोहोचणं शक्य नसलं तरीही स्वतःच्या आसपास चा समाजातल्या अशा गरजूंना ओळखून त्यांच्या पर्यंत पोहोचणं हा प्रवास सुद्धा काही लहान नसतो.
साधना विलेज मधला आमचा CSR चा “Teach a child “ उपक्रम (माझ्या भाषेत “साधनेची साधना” ) चालू असतानाच तिथल्याच गावांमध्ये असलेल्या वयोवृद्ध स्त्री आणि पुरुषांसाठी Whirlpool च्या १०० व्या वर्धापन दिनानिमित्त CSR अंतर्गत एखादा उपक्रम राबवता येईल का असा विचार घेऊन सुरु झालेला हा छोटा प्रवास १२/११/११ या दिवशी ३३ लोकांना नवी दृष्टी देऊन संपन्न झाला आणि जन्म झाला नव्या प्रकाशवाटेचा....!
या प्रवासाची सुरुवात झाली ती डॉक्टर मनोहर डोळे यांच्या नारायणगाव येथील मेडिकल फौंडेशन च्या भेटीपासून. आम्ही तिथे दिलेली भेट आम्हाला स्फूर्ती तर देऊन गेलीच पण त्याच बरोबर आमच्यासाठी एक नवी वाट खुली झाली. या हॉस्पिटल ला दिलेल्या भेटीने आम्हाला भारावून सोडलं.
डॉ. मनोहर डोळे यांनी केलेले अथक प्रयत्न, त्यांची प्रचंड इच्छाशक्ती आणि अनेक संकटांचा केलेला सामना आणि मुख्य म्हणजे त्यांनी ठेवलेला उद्दात हेतू या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या आणि १९८२ साली जन्म झाला तो समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांसाठी सुरु केलेल्या Mr. मोहन ठुसे (R.S.S. social worker) यांच्या स्मरणार्थ बांधलेल्या “Mr. Mohan Thuse a charitable eye hospital” चा.
पुणे, अहमदनगर आणि ठाणे इथल्या अनेक दुर्गम भागात ६००० पेक्षा जास्त मोफत डोळे तपासणी शिबिरे भरवून या charitable हॉस्पिटल तर्फे आत्तापर्यंत ९०००० पेक्षा जास्त मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत. या संपूर्ण उपक्रमात रुग्णाची येण्याजाण्याची ,राहण्याची, खाण्याची सोय ही हॉस्पिटल तर्फे केली जाते. हॉस्पिटल तर्फे चालवण्यात येणारा हा उपक्रम पाहून थक्क तर व्हायला होतंच पण त्याच बरोबर नव्याने काहीतरी सुरु करू इच्छिणाऱ्या आमच्या सारख्या लोकांना एक नवी प्रेरणा सुद्धा मिळते यात कोणतीच शंका नाही.
२८ वर्षाच्या इतक्या मोठ्या प्रवासानंतरही डॉ. मनोहर डोळे यांच्यात अजूनही तोच ओसंडून वाहणारा उत्साह आणि त्यांच्या जोडीला असलेले त्यांचे सुपुत्र यांची भेट हा खरोखरच एक आनंददायी क्षण होता. एवढी मोठी व्यक्तिमत्वे पाठीशी उभी राहिल्यावर आमचा उपक्रम यशस्वी होणारच यात आम्हाला तीळमात्रही शंका उरली नाही.
कोळवण खोऱ्यातल्या दुर्गम भागातल्या गावात असा एखादे मोतीबिंदू शिबीर भरवावे अशी इच्छा बोलून दाखवताच “साधना विलेज’ ने पुन्हा एकदा मदतीचा हात पुढे केला आणि रंजना madam, माधुरी madam यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झाली आमची प्रचार मोहीम आणि मदतीला धावले तिथल्या स्वयंसेवकांचे अनेक हात. शिबिराची तारीख ठरली १२/११/११.
नाणेगाव, चिखलगाव आणि अत्यंत दुर्गम ठिकाणी वसलेलं काशिग अशा ३ गावांची निवड करण्यात आली. प्रत्येक गावात जाऊन तिथल्या प्रत्येक घरात जाऊन ४५ पेक्षा जास्त वय असलेल्या स्त्री पुरुषांना शोधणे त्यांची नावे लिहून घेणे, शिबिराची माहिती देणे, अशी अनेक कामे सुरु झाली. पाहता पाहता यादी तयार झाली. तिथे मिळालेला प्रतिसाद पाहून बळ अजून वाढलं आणि आमच्यावर असलेल्या जबाबदारीची जाणीव झाली.
शेवटी शिबिराचा दिवस उजाडला सकाळ पासून धावपळ सुरु झाली.
संपूर्ण उपक्रमात काशिग गावात आलेला अनुभव खूप काही शिकवून गेला. काशिग गाव खूप दुर्गम असल्यामुळे तिथे मी आणि माझा सहकारी कपिल बस घेऊन लोकांना शिबिराला आणण्यासाठी गेलो. पण दुर्दैवाने गावात कुठलातरी धार्मिक कार्यक्रम असल्यामुळे कोणीही शिबिराला येण्यास तयार होईना. १-२ वेळा कपिल ने mic वरून सूचना देऊन सुद्धा लोकं यायला तयार होईनात. गावाच्या सरपंचांशी बोलून सुद्धा काही फायदा झालं नाही. शेवटी तिथे असलेल्या साधनाच्या स्वयंसेवकाच्या मदतीने २० लोकांना गोळा केलं आणि शिबिरात आलो. गावागावामध्ये वसलेला भारत समजून घेणं आणि त्यांच्याशी जुळवून घेणं हे किती जिकरीचे काम आहे याची जाणीव आम्हा दोघांना त्या क्षणी झाली.
१० वाजता शिबीर सुरु झालं. एक एक करत लोकं येऊ लागली. गावागावातली भोळीभाबडी माणसा पाहून माणूसपणाच्या परीसीमांची जाणीव होत होती. आयुष्यभर कष्ट उपसून नजर गेल्यामुळे आता घराला ओझं झालेले अनेक वृद्ध पाहून वाटलं यांच्या आयुष्यात खरंच प्रकाश येण्याची गरज आहे .दृष्टी नसल्यामुळे आलेलं परावलंबन खरंच खूप कष्ट दायक असतं.
दुपार पर्यंत ६०-६५ लोकांची तपासणी झाली आणि त्यातल्या ३८ जणांमध्ये मोतीबिंदू आढळला. दुपारची जेवणाची सोय साधना तर्फे करण्यात आली होती. सर्वांना जेवण देऊन साधारण दुपारी ४ ला आम्ही नारायणगाव साठी निघालो. सर्वांना नारायणगावच्या हॉस्पिटल मधे नेण्यात आलं. तिथे सगळंच्या राहण्याची, जेवणाची सोय हॉस्पिटल तर्फे करण्यात आली होती. सर्वांना तिथे सोडून आम्ही पुन्हा पुण्याच्या दिशेने निघालो. पहाटे ६.३० ला सुरु झालेला दिवस आता संपला होता.
पण दिवस भराच्या अनुभवांची शिदोरी खूप मोठी होती. डोळे असूनही आंधळे असल्याचा भास अनेक क्षणिक क्षणांनी करून दिला होता. कोणीही नातेवाईक नसलेल्या दृष्टी हरवलेल्या आजी, त्यांनी हातात हात घेऊन सांगितलेली त्यांची कहाणी, माझं नको पण माझ्या ५ वर्षाच्या नातवाचे डोळे तपासा असा हट्ट करणाऱ्या आज्जी, चुलीवर स्वयंपाक करून डोळे गमावलेले स्वयंपाकी आजोबा, दरवेळी दुरून कौतुकाने पाहून हसणाऱ्या आणि जेवण करताना तू जेवलास का म्हणून खाणाखुणा करणाऱ्या आज्जी..! एक ना दोन असे अगणित अनुभव जोडले गेले होते. शहरातल्या कृत्रिम जगण्याची मला नेहमीच कीव वाटत आलीये आणि अशा ठिकाणी गेल्यावर खरंतर मला दारिद्र्यात राहून समाधानी असलेल्या या लोकांचं नेहमीच हेवा वाटतो. कदाचित त्यांच्या आयुष्य जगण्यासाठी लागणाऱ्या प्राथमिक गरजा भागत नसतील पण माणूस म्हणून ही माणसे माझ्यासाठी नेहमीच नवे अनुभव देणारी ठरली आहेत.
आज १९/११/११ रात्रीचे ११.४५ वाजलेत. संध्याकाळीच चिखलगाव आणि नाणेगाव वरून परत आलोय. साधनाच्या प्रदीप आणि रेश्मा बरोबर जाऊन आज डॉक्टरांनी सांगितल्या प्रमाणे ऑपरेशन नंतर ८ दिवसांनी डोळ्याची प्राथमिक तपासणी केली. प्रत्येक घरात गेल्यावर आलेला अनुभव हेलावून टाकणारा होता. हातात हात घेऊन फक्त नजरेनं बोललेले प्रत्येक शब्द मला आज कळत होते. पाठीवरून चेहऱ्यावरून फिरवलेल्या त्यांच्या मायेची उब मला न सांगताही जाणवत होती. नव्या दृष्टीने कदाचित त्या सर्वांना नवी उमेद नक्कीच मिळाली होती. अंधारातल्या पणतीला भोवतालच्या अंधाराची सवयच असते पण तिला त्याचं भय नसतं कारण तेवणारी वात आणि पेटलेली ज्योत दोघेही तिला अखंड साथ करत असतात तिथे प्रश्न असतो विश्वासाचा. काळ्याकुट्ट अंधाऱ्या रात्री कधी कधी एखाद्या दूरच्या ताऱ्याचीही सोबत होते दर वेळी चंद्रच लागतो असं नाही.
नव्याने दृष्टी मिळालेल्या त्या भाबड्या जीवांना पाहून खरोखर सगळ्याचं सार्थक झाल्याचं समाधान मिळालं प्रकाशवाटेवर एक पाउल नक्कीच पडलं आहे. पुढे कदाचित नक्षत्रांचा चांदणं असेल यात शंकाच नाही.
आनंद
No comments:
Post a Comment