प्रवास फक्त करीत जातो
मी एकटा प्रवासी,
पायवाट वा रस्ता असो
फिकीर नसे कुणाची...!
पायाखाली कधी तुडवितो
लाल मातीची ढेकळे,
पार कराया वाट कधी
दगड धोंड्यातूनही मिळे...!
नक्षत्रांच्या सोबतीने
कधी उजळे पायवाट
कधी अंधार धावून येई
त्याचीच होई साथ...!
डोंगर वाटे मधेच बिलगे
पावसाची अधीर सर,
मिठीत तिजला घेऊन जाता
अचानक संपे अंतर...!
वाऱ्यालाही कधी बोचती
एकटेपणाची सल
तोही म्हणून धावत येतो
बदलूनी अपुली चाल...!
कधी झुरतो एकटाच निरंतर
दूरच्या किनाऱ्यावर,
रेतीवरती ठेवत जातो
जुन्या आठवांचे सागर...!
कधी हरवतो चकव्यामध्ये
शोधत बसतो दिशा
हवेहवेसे सुख मिळवण्या
मनास चढते नशा...!
प्रवास वेडा जीव गुदमरे
काळाच्या पिंजऱ्यात
वाटे उडून जावे
मोकळ्या आसमंतात...!
जगास न उमगे कोडे माझे
असे उत्तर जरी एकच,
निसर्गच घाली भूल जेव्हा
का भ्यावे कुणास...!
....आनंद
No comments:
Post a Comment