Powered By Blogger

Sunday, March 25, 2012

देवळातला देव...!


वास्तविक पाहता देउळ हा सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय आणि तितकाच नाजूक सुद्धा. ( यातला नाजूक हा शब्द काही जणांना लगेच कळू शकतो तर काहीना तो उपहासाने म्हटला आहे असं वाटू शकते ) त्यामुळे देउळ या विषयावर काही भाष्य करावं अशी सुतराम शक्यता नसतानाही मी यावर लिहितोय यामागं कारणच तसं आहे. देउळ या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळण्याचा आणि मी हे लिहिण्याचा तसा खरंतर काहीही संबंध नाही पण योगायोगाने तीही गोष्ट आत्ताच घडलेली आहे आणि ते ही माझ्या पथ्यावरच पडलं आहे. त्यात मांडलेल्या  विषयावर मी पुन्हा इथे नक्कीच उहापोह करणार नाहीये. कारण जे खरोखर हल्ली प्रत्येक धार्मिक स्थळांवर घडतं त्याचं अगदी तंतोतंत चित्रण चित्रपटाने आधीच दाखवलेलं आहे. देवळाच झालेलं बाजारीकरण आणि त्यात वाहात गेलेला माणूस त्यात पाहायला मिळतो. मग खरंतर बोलण्या सारखं उरतं काय हा प्रश्न पडणं साहजिक आहे आणि म्हणूनच हा लेखन प्रपंच करण्याचे योजिले. मला वाटतं देउळ चित्रपट जिथे संपतो तिथे खरंतर सुरु होतो सामान्य माणसाचा स्वतःचे अनुभव वास्तवतेला जोडत त्याने केलेला खऱ्या आयुष्यातला प्रवास जो कदाचित त्याच्या समोर अनेक प्रश्न उभे करू शकतो.   
सर्व सामन्यांच्या जिव्हाळ्याचा असला तरीही मला वाटतं देव, देउळ, मंदिर हे विषय अजूनही तितकेच दुर्लक्षित आहेत. पूर्वी खरंच मंदिरे का बांधली जायची ?  त्याचा मूळ हेतू काय असायचा ?, लोकं नक्की कशावर भक्ती करायची ?, देवाचं माणसाच्या आयुष्यातलं स्थान काय होतं आणि काय असायला हवं या मुद्द्यांवर कधीच बोललं जात नाही आणि गेलेलं नाही. त्यातही एखाद्या शिकलेल्या माणसाने चार मनातल्या गोष्टी बोलून दाखवल्या तर त्यालाच नास्तिक म्हणून सुनावलं जातं. आणि पूर्वापार चालत आलेल्या विचारांनाच जोपासलं जातं. बऱ्याचदा मनात नसतानाही नवी पिढीही त्या स्वीकारते आणि गोष्ट चालू राहते ती मागच्या पानावरून पुढच्या पानावर.

 
मला वाटतं हे कुठेतरी थांबायला हवं.  मुळात एकविसाव्या शतकात वाटचाल करताना या सर्व गोष्टीचं समर्थन करत चालणं किंवा दुर्लक्ष करत चालणं सुद्धा मला चुकीचं वाटतं. आमच्या काळी असं नव्हतं, आता जग बदललंय तसा देवही बदललाय, उत्सव साजरे करण्याच्या पद्धती बदलल्या आहेत पूर्वी सारखं काही राहिलं नाही. ही अशी नुसती मते मांडून प्रश्न मिटणार नाहीयेत. त्यासाठी सर्वानीच अंतर्मुख होऊन, आपण गप्प बसून कदाचित एकप्रकारे या सगळ्यांचं समर्थन करत नाही ना ? , याचा विचार करण्याची वेळ नक्कीच आली आहे.
मुळात श्रद्धा स्थाने ही माणसाला पदोपदी बळ देण्या साठी असतात. आयुष्याच्या कुठल्या टप्प्यावर याची गरज पडेल हे सांगता येत नसलं तरीही नितळ श्रद्धा ठेवून अनेक गोष्टी साध्य होतात. आपल्या कडे देवाकडे एक श्रद्धा स्थान म्हणून पाहत असले तरीही त्यात श्रद्धे बरोबरच इतक्या अनेक रुढी परंपरा जोडल्या गेलेल्या आहेत त्यामुळे  नक्की पूजा देवाची होते कि आपण स्वतःची हौस भागवून घेतो हा ही प्रश्न मला बऱ्याचदा पडतो. यातल्या सगळ्याच गोष्टी चुकीच्या आहेत असं जरी नसलं तरीही ज्या काही मनाला बुद्धीला न पटणाऱ्या गोष्टी आहेत त्या आपण का बंद करू नयेत ? 
रुढी ,परंपरा या बद्दल असं असलं तरीही देव ही कल्पनाच मला बऱ्याचदा बळ देऊन जाते कारण त्याचा विचार करताना कुठलीही भेदभाव मनात न ठेवता आपण त्याला मनातल्या सर्व गोष्टी मोकळे पणाने सांगू शकतो. देवाच्या अस्तित्वावर कुणी कितीही आक्षेप घेतले तरीही काहीही फरक पडत नाही कारण मुळात त्या गोष्टीला physics च्या नियमात बसणारं लांबी रुंदी, वजन, अशा प्रकारचं अस्तित्व असण्याची काहीही गरजच नाहीये किंबहुना मूर्ती ही सुद्धा एक प्रतीकात्मच गोष्ट आहे हे आपण मान्य करायला हवं. माझं असं ठाम मत आहे कि प्रत्येकाच्या मनात देवाची स्वतःची एक प्रतिमा असते आणि ती फक्त आपल्याला माहित असते, ज्याचा त्याचा देव हा वेगळाच असतो गरज असते ती मनातली प्रतिमा स्वीकारून बाहेरच्या भौतिक गोष्टींमध्ये मूर्तीमध्ये तो पाहण्याची. हे केलं कि सगळे गणपतीच्या प्रत्येक मंदिरातला गणपती  हा अष्टविनायक वाटू शकतो, प्रत्येक दत्तात ब्रह्मा विष्णू महेश दिसू शकतात, प्रत्येक देवी वरदायिनी, सरस्वती, लक्ष्मी वाटू शकते. असं झालं तर नेमक्या त्याच देवाच्या तीर्थस्थानाला जाण्याची गरज भासणार नाही, असं घडणं हे खूप दूरची गोष्ट असली तरीही ती अशक्य नक्कीच नाही. 

 
अगदी मला आठवतं तेव्हापासून म्हणजे साधारण तिसरी चौथी पासून गणपती मला आवडत आलेला आहे. पुणे मुक्कामीच बालपण गेल्यामुळे तळ्यातला गणपती ( म्हणजे सारसबाग बरका ..!) हा अगदी लहानपणापासूनचा माझा लाडका. आत्ता पर्यंत त्याच्या समोर हजारदा हात जोडले असतील पण तरीही त्याचा “मोह” मला सोडवत नाही. होय मोहच कारण त्याच मोहापायी मी इतक्या वेळा त्याच्या कडे धाव घेतली आहे. जसजसा मोठा होत गेलो तसतसं मला हे गवसत गेलं आणि मनातले प्रश्न गडद होत गेले. देवावरच्या प्रेमाला “भक्ती” म्हणत असूनही मला मात्र तो माझा “मोह” वाटतो. आवडणाऱ्या व्यक्तीला पुनपुन्हा भेटावं वाटलं तर मनाला जसा मोह होतो तसाच मोह मला अजूनही होतो , मोहाला अपक्षांचे ओझं नसतं भक्तीला मात्र अनेक इच्छा जडलेल्या असतात. आणि म्हणूनच ती भक्ती नाही. तसेही, मनात भाव असो नाहीतर नसो एकदा हात जोडले कि सगळेच “भक्त “ होतात हे आपण पाहत आहोतच हे काय कमी आहे का ? असो भक्ती या विषयवर खरंतर एक स्वतंत्र लेख लिहून होईल.  मुळात मला वाटतं सर्वसामान्य माणूस हा याच विवंचनेत अडकेला असतो. मुळात भक्ती म्हणजे काय हे न उमजाल्याने देवा साठी सगळ्याच गोष्टी केल्या जातात आणि मग त्यात काही अनावश्यक बुद्धीला न पटणाऱ्या अशा अनेक गोष्टींचा समावेश होतो. विनाकारण तीर्थक्षेत्रे धुंडाळली जातात, तासंतास रांगेत उभं राहून दर्शन घेतलं जातं, इतकं करूनही देव दर्शन होऊनही हात जोडे पर्यंत देव नाहीसा झालेलं असतो. मोठ्या तीर्थक्षेत्रांना गेल्यावर अनेकदा हा अनुभव सगळ्यांनाच येतो. अशा ठिकाणच्या मंदिरातून बाहेर आल्यावर मला काहीतरी सुटल्याचा भास होतो आणि नंतर कळत कि तिथे देव नव्हताच तिथे फक्त मूर्ती होती खरा देव मात्र कधीच दूर कुठेतरी निवांत ठिकाणी जाऊन हा सगळा पोरखेळ दुरून पहात बसलाय. अशा अनेक तीर्थक्षेत्रांचे गाभारे मला भरलेले असूनही सुने सुने वाटतात ते कदाचित याच कारणामुळे.
 
अशा ठिकाणी गेल्यावर मी बऱ्याचदा माणसाच्या मनात असलेल्या भक्ती चा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत राहतो आणि मग कळत कि , अडाणी भाबडी लोकं काहीच न उमजल्यामुळे आंधळे पणाने त्यांच्या तऱ्हेने देवाला पूजत राहतात, जुने रितीरिवाज, चालीरीती तसेच पाळत राहतात. आपण काहीही चुकीचं करत नाही अशी त्यांची ठाम समजूत असते. वास्तवाची जाण नसल्यानं आणि तो स्वीकारण्याची तयारी नसल्यानं हा भक्तीचा वारसा हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे येत राहतो.    
उच्चभ्रू लोकांना बऱ्याचदा खरा देव खरंतर माहीतच नसतो कारण त्याच्या समोर मुळातच त्याच्या समोर काहीतरी मागण्यासाठी हात जोडण्याची पाळी फार कमी वेळा येते. पण तरीही देवाच्या किमती, मौल्यवान, रत्नजडीत श्रीमंत मूर्ती त्यांच्या घराची शान वाढवत राहतात. त्यांचा तो श्रीमंत देव म्हणजेच सर्वस्व असं त्यांना वाटत राहते. देवाच तेच रूप त्यांना लोभस वाटतं.  
आणि तिसऱ्या प्रकारची लोकं म्हणजे मी आधी म्हटल्या प्रमाणे सर्वसामान्य मध्यमवर्गीय लोक. अडाणी नसल्यामुळे खऱ्या खोट्याची जाणीव खरंतर असते पण पैसा हवा त्या प्रमाणात नसल्याने हव्याहव्याश्या अनेक गोष्टी त्यांना खुणावत असतात. एखाद्या शक्ती समोर नतमस्तक होऊन त्याची पूजा करून त्याच्या कडे आपलं गाऱ्हाणं मांडावं असं वाटून देवाची “भक्ती” केली जाते. पैशाने मिळणारी सुखे विकत घेता यावीत म्हणून देवाला अनेक साकड्यांमध्ये अडकवलं जातं. 

 
या तिन्ही प्रकारात भक्ती ही वेगवेगळ्यारूपात समोर येत असली तरीही त्यातली कुठली बरोबर कुठली चुकीची यावरही मी भाष्य करणार नाहीये कारण आपापल्या भूमिकेत आणि परिस्थितीत ते तग धरून आहेत. माणसाच्या वैयक्तिक गरजा जर त्याने भागत असतील तर मला वाटतं त्या माणसाने खुशाल ती भक्ती जोपासत राहावं.  फक्त ती जोपासताना त्याला जर थोड्या तात्विक विचारांची जोड दिली तर खरी भक्ती केल्याचा आनंद प्रत्येकाला मिळू शकतो.  मुळात देवावर केलेल्या भक्तीने, प्रेमाने, त्याच्या बद्दलच्या मोहाने, मनाला जर आधार वाटत असेल तर ती चांगलीच गोष्ट आहे. परंतु त्या भक्तीसाठी एखाद्या देवाचीच पूजा केली पाहिजे, असं घडता काम नये. भक्ती करण्याचे आपले आपले मार्ग असणं ही उलट चांगलीच गोष्ट आहे कारण तिथे आपल्याला आपल्या मनाप्रमाणे कुणावरही कशाही प्रकारे श्रद्धा करण्याचं स्वातंत्र्य मिळत असतं. 
मी स्वतः बऱ्याचदा मंदिरात जातो दरवेळी गर्दीत देव भेटतोच असं नाही पण खरंतर मी शोधत असतो मनात देव जपणारा दुसरा माणूस. मंदिरातल्या मूर्तीला पाहण्या साठी आतुर झालेले चेहरे खूप दिसत राहतात पण मन स्थिर असलेला मूर्तीत मनातला देव पाहणारा एखादाच दिसतो. पण असं कोणी दिसताच मला हायसं वाटतं आणि आनंदही होतो.  


 
परवा असंच नुकत्याच नव्याने बांधलेल्या एका गणपतीच्या देवळात गेलो असताना मनातल्या देवाला गणपतीत पाहिलं आणि चक्क देवाने त्याचं मनोगत मला सांगितलं आणि आमच्यात संवाद घडून आला. तो असा.
मी : नमस्कार देवा.
देव: नमस्कार.
मी : नवीन देवळात कसं वाटत आहे, नवीन खिडक्या, नवीन छत ,नवीन रंग, इतकंच काय मूर्तीही नवीन सगळंच नवीन.
देव : उत्तम आहे इथे. भक्तांनी मोठ्या कशाने बांधलं आहे हे देउळ. हा बस आता त्यांनी दिलेली जबाबदारी मी योग्य प्रकारे पार पाडली म्हणजे मी त्यांच्या ऋणातून मुक्त होईन.
(देवाला कसलं ऋण हे न कळल्यानं मी न राहवून देवाला विचारलं )
मी : अरे पण देवा भक्तांचं असं कुठलं ऋण तुझ्यावर आहे ?
देव : अरे बाबा तुला काय सांगू आता ? साऱ्या जगाला ही गोष्ट माहित आहे, लपून का आहे ती ? भक्ताला गरज पडली कि मला देवळात येऊन बसावं लागतच दर वेळी कारणे वेगळी असली तरी माझी कृती एकच असते. मूर्तिकार मूर्ती घडवतो आणि मी प्रकटतो.
मी : मग या वेगळी अशी कोणती जबाबदारी तुझ्यावर येऊन पडली आहे ?
देव : तुला माहित नाही याचं मला खरंच आश्चर्य वाटत आहे पण तरीही तुला ऐकायचच असेल तर ऐक. तू हे जे मंदिर आता पाहत आहेस हे इथे महिनाभरापुर्वी नव्हतं. पण अचानक इथून एक रस्ता जाणार आहे असा फतवा सरकारने काढला. आजूबाजूच्या लोकांचे धाबे दणाणले. आपल्या घरातून रस्ता ? छे शक्य नाही. काय उपाय करता येतील यावर बऱ्याच चर्चा झाल्या. कोण म्हणे आपण सरकार दरबारी अर्ज करू, कोण म्हणे आपण उपोषण करू, कोण म्हणे आपण मोर्चा काढू पण कायम स्वरूपी तोडगा काही निघेना. शेवटी एकाने सुचवलं रस्ता होऊच द्यायचा नसेल तर तिथे देउळ बांधुयात. एकदा का तिथे देउळ उभं राहिलं कि मग ते काही कोणी पडू शकणार नाही. कारण तसं केलं तर सर्व सामन्यांच्या भावना दुखावल्या  जातील आणि देवळा सारखी पवित्र गोष्ट पाडून ते पाप कोण पदरात घेईल ?  अशा प्रकारे आपण सरकारला कोंडीत पकडूयात.  हा विचार सर्वांना पटला आणि अवघ्या महिना भरात अगदी दिवस रात्र काम करून हे देउळ उभं राहिलं. आणि इथून रस्ता जाता कामा नये ही जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. आता मला सांग मला इथे राहणं भाग आहे कि नाही ? काहीही झालं तरीही मला इथून जाता येणार नाही.
मी : बापरे..! ही मोठी पंचाईतच आहे म्हणायची. पण मला एक सांग , हा रस्ता अडवण्यापेक्षा सुद्धा अनेक महत्वाची कामे अजून बाकी आहेत मग ती तू कधी करशील आता ?
देव : आहे...! त्यावरही उपाय आहे आणि तो ही विचार मी कालच केला आहे. माझी ही अशी कामे वाढतच राहणार आहेत त्यामुळे मीही त्यावर कायम स्वरूपी उपाय योजला आहे. ही मूर्ती ज्याने बनवली तू खूप हुशार कारागीर आहे, त्याला मी अशाच प्रकारच्या, पण माझी वेगवेगळी रूपे असणाऱ्या मुर्त्या बनवण्याचं  contract  दिलं आहे. एखादी नवी “case आली कि अगदी रात्रीतून तो नवी मूर्ती घडवू शकतो. नवीन बांधलेल्या देवळात मी त्या मुर्त्यांमधून पोहोचणार आहे. प्रत्यक्षात खरंतर देवळात मूर्ती पोहोचेल मी मात्र कायमचा निवांत एखाद्या दूरच्या डोंगरातल्या एखाद्या दगडी मंदिरात वास्तव्य करायला जाणार आहे. मी ही कंटाळलोय रे. माणूस त्याचं भविष्य घडवू लागलाय, त्याच्या सोयी प्रमाणे माझी आठवण काढू लागलाय, त्याच्या मनाप्रमाणे देवळातून कधी उठवतो तर कधी बसवतो. त्याला खरंतर मुर्तीच हवी आहे. बाकी सगळं तो पाहून घेतो हे मला उमगलंय. मूर्तीत तो त्याच्या मनातल्या देवाला नाही पाहत. फक्त मूर्तीचं सौंदर्य पाहत बसतो. नतमस्तक होतो पण फक्त मूर्ती समोर. त्यातला देव त्याला नाही दिसत. आता मी जिथे जाईन तिथे दिवसा वर निळा आकाश, रात्री चांदण्याची रात, पावसात सरींचा ताल आणि थंडीत सगळं गार. एखादा कोणी आलाच शोधत तर देईन त्याला दर्शन. देव अजूनही साक्षात्कार देतो याचा त्याला प्रत्यय येईल आणि एका खऱ्या भक्ताला दर्शन दिल्याचं मला समाधान..
मी : तू धन्य आहेस देवा. पण आज अचानक या देवळातल्या मूर्तीत कसा आलास मग ?
देव : अरे जेव्हा इथे माझी स्थापना केली त्या नंतर खूप लोकं येऊन दर्शन घेऊन गेली पण काही मात्र अजून आली नव्हती जाण्या पूर्वी भेटून जावं म्हंटला पुन्हा भेट होते न होते. नाहीतरी इथून पुढे ही सगळी मंडळी मुर्तीच्याच पायावर डोकं टेकवतील. खरा देव त्यांना शोधावा लागेल. म्हणून शेवटचा आलो.
मी : तू खरंच ग्रेट आहेस. आणि तुझ्या सारखा तूच आहेस.

इतकं बोलून मूर्तीकडे पाहिलं तर तर तिच्यात मला माझ्या मनातला देव दिसेना. नंतर कळलं मुर्तीतलं चैतन्य हरवलं होतं. आता दिसत होती ती मूर्तीकाराने कौशल्याने घडवलेली सुबक मूर्ती, कोवळ्या फुलांचे हार, शेजारी तेवणारी समई ची ज्योत, जळून गेलेल्या उत्बात्तीचा अंगारा. 
डोळ्यातून ओघळलेला अश्रू तसाच तळ हातावर झेलला आणि देवळातून बाहेर आलो. इथून पुढे देवळातला देव शोधावा लागेल या पेक्षा दुर्दैव काय असू शकतं ?
......आनंद


4 comments:

  1. खुपच छान !!
    "देउळ " सिनेमा मध्ये ह्याच व्यवस्थित सादरीकरण केले आहे..


    साक्षात देवाला सुद्धा मूर्तीरुपी-देवाचे दर्शन घेण्यासाठी VIP पास घ्यावं लागेल..

    ReplyDelete
  2. HHmmmmmmmmmmm.

    "Shunya" Mintat awadla..

    ReplyDelete
  3. dhanyavvad mayur, yash and shashi ( mihi shunya minitat lihila blog :) )

    ReplyDelete